Source :- ZEE NEWS

Elon Musk God Theory: जागतिक स्तरावर विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये प्रचंड चर्चेत असणारं एक नाव म्हणजे एलॉन मस्क. नवनवं तंत्रज्ञान जगासमोर आणत मस्क यांनी कायमच सर्वांना थक्क केलं आहे. टेस्ला असो किंवा स्पेसएक्स, नवं तंत्रज्ञान आणि नवं संशोधन जिथे, मस्क यांचं नाव तिथे असंच काहीसं समीकरण कायम पाहायला मिळतं. पण, यावेळी जगातील या सर्वात श्रीमंत व्यक्तीचं नाव कोणा तंत्रज्ञानामुळे नव्हे तर त्यांच्या एका विचारामुळे चर्चेत आलं आहे. 

Add Zee News as a Preferred Source

नुकतंच एका मुलाखतीदरम्यान मस्क यांना ‘तुम्ही देवावर विश्वास ठेवता का?’ असा प्रश्न विचारण्यात आला. ज्याचं मस्क यांनी दिलेलं उत्तर अनेकांनाच आश्चर्याचा धक्का देऊन गेलं. सहसा विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन अशा गोष्टींमध्ये रमणाऱ्या मस्क यांनी मुलाखतीदरम्यान (विश्वाचा) ‘निर्माता’ आणि ब्रह्मांडाच्या उत्त्पत्तीसंदर्भात आपली मतं मांडली. एक वेगळाा दृष्टीकोन ठेवला. एका पॉडकास्टमध्ये मस्क संवाद साधत होते, जिथं त्यांनी देव, विश्वास, ब्रह्मांडाची उत्पत्ती आणि अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प यांच्यासोबतच्या आपल्या नात्यावर भाष्य केलं. 

ब्रह्मांडाविषयी मस्क यांचं काय मत? 

देवावर  अर्थात ‘God’वर तुमचा विश्वास आहे का, असा प्रश्न विचारला असता मस्क यांनी एकदमच अनपेक्षित उत्तर दिलं. ‘माझ्या मते हे संपूर्ण ब्रह्मांड कोणा एका गोष्टीतून तयार झालं आहे. लोक याच्यासाठी विविध नावांचा वापर करतात’, असं ते म्हणाले. ‘तुमचा सर्वाधिक विश्वास कोणावर आहे, तुम्ही कोणाला मानता?’, असा प्रश्न केला असता (सृष्टीच्या) ‘निर्मात्याला’ असं उत्तर त्यांनी दिलं. देवाविषयी तुमचं मत काय? असा प्रश्न केला असता, ‘GOD च निर्माता आहे’ असं उत्तर देत मस्क यांनी सर्वांच्या नजरा वळवल्या. 

ट्रम्प यांच्यासोबतच्या मैत्रीविषयी मस्क म्हणाले… 

मुलाखतपर संवादादरम्यान मस्क यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती मतप्रदर्शन केलं. ‘तुम्ही कोणा अशा व्यक्तीला ओळखता, जो सर्वाधिक विनोदी व्यक्ती आहे आणि ज्यांचा तुम्ही आदर करता?’, असा प्रश्न केला असता मस्क म्हणाले, ‘प्रत्यक्ष जीवनात अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रचंड विनोदी व्यक्ती आहेत. त्यांची विनोदबुद्धी नैसर्गिक आहे. त्यांचा स्वभावच विनोदी आहे.’

चौफेर चर्चा करणाऱ्या मस्क यांनी या मुलाखतपर कार्यक्रमात स्पेसएक्स संस्थेच्या मंगळ मोहिमेवरही भाष्य केलं. या मोहिमेत फक्त मंगळावर जाणं हा एकमेव हेतू नसून, शाश्वत मल्टी प्लॅनेटरी तयार करणं हा मुख्य हेतू आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. सोप्या भाषेत म्हणावं तर एका ग्रहावर आपत्ती आल्यास दुसरा ग्रह तुमचा बचाव करु शकतो. दरम्यान स्टारशिपच्या या मोहिमेत कोणत्याच प्रकारच्या कृत्रिम बुद्धिमता अर्थात AI चा वापर करण्यात आलेला नाही असंही मस्क यांनी संपूर्ण जगापुढे स्पष्ट केलं. 

SOURCE : ZEE NEWS