Source :- ZEE NEWS
History And Intresting Facts About June: आज एक जून म्हणजेच वर्षातील सहाव्या महिन्याची पहिली तारीख! हा महिना संपला की अर्ध वर्ष संपलं असं मानलं जातं. भारतीयांसाठी जून महिना अनेक अर्थाने खास असतो. जून महिन्यामध्येच पावसाळ्याला सुरुवात होते. याच महिन्यात दीड ते दोन महिन्यांची सुट्टी संपवून पुन्हा मुलं पुढच्या इयत्तेत शाळेत जाऊ लागतात. शाळांबरोबरच साधारण बऱ्याच अभ्यासक्रमांचं शैक्षणिक वर्ष याच महिन्यात सुरु होतं. बळीराजासाठीही हा महिना फार महत्त्वाचा असतो. याच महिन्यात पावसाला सुरुवात होऊन पेरणीची कामं हाती घेतली जातात. मेट्रो शहरांमध्येही हा महिना काहीसा दिलासा घेऊन येणारा महिनाच असतो. मे महिन्याच्या उन्हाळ होरपळून निघालेल्या नोकरदार वर्गाला जून महिन्यात येणारा पावसाळा नक्कीच सुखावणारा असतो.
जून नावं आलं कुठून?
मात्र वर्षाचा सहावा महिना म्हणून आपल्याला अगदी लहानपणापासून ठाऊक असलेल्या जून या महिन्याला त्याचं नाव कसं मिळालं? या ‘जून’ शब्दाचा अर्थ तरी काय? खरं तर या प्रश्नाचं उत्तर आपल्यापैकी 99 टक्क्यांहून अधिक लोकांना ठाऊक नसणारच. आपण वर्षातून अनेकदा आणि जून महिन्यात तर जवळपास रोजच ‘जून’ या शब्द उच्चारतो पण याचा अर्थ काय आणि या महिन्याला हे नाव कुठून मिळालं? याबद्दल आपल्याला फारशी कल्पना नाही. आज एक जूननिमित्त आपण याबद्दलच जाणून घेणार आहोत.
हा आहे जूनचा खरा अर्थ
जून या नावाचा संदर्भ थेट एका रोमन देवीशी आहे. या देवीचं नाव जूनो असं आहे. जूनो ही देवी लग्न आणि मुलांच्या जन्मासंदर्भातील सर्व देवी-देवतांची राणी असल्याचा मान्यता आहे. याच देवीच्या नावावरुन जून हे नाव मध्य कालीन इंग्रजीमध्ये आलं. लॅटीन भाषेमध्ये जून महिन्याचं नाव जुनीअस असं होतं. याचा थेट संबंझ जूनो देवीशी होता. तर पुरातन रोमन साम्राज्याच्या कालावधीमध्ये जून महिना हा पवित्र मानला जायचा. हा संपूर्ण महिना जूनो देवीला समर्पित असायचा.
या महिन्याला खास महत्त्व कारण…
जूनो देवी ही ज्युपिटर म्हणजेच गुरु ग्रहाची पत्नी आहे अशी रोमन मान्यता असल्याचं ‘ब्रिटीश म्युझियम’च्या वेबसाईटवर म्हटलं आहे. रोमन कालावधीमध्येही उन्हाळ्यात लग्न करण्याची परंपरा होती. खरं तर भारत आणि भारतीय उपखंड वगळता सगळीकडेच केवळ दोन ऋतू असतात, उन्हाळा आणि हिवाळा! जून हा तेथील उन्हाळ्याचा भाग असतो त्यामुळेच या उन्हाळ्याच्या काळात लग्न करणाऱ्यांवर या जूनो देवीचा आशीर्वाद असतो असं मानलं जात असल्यानेच हा महिना पूर्वीच्या रोमन साम्राज्यामध्ये लग्न आणि नव्याने एखाद्या गोष्टीची सुरुवात करण्याचा महिना म्हणून ओळखला जायचा.
या शब्दाचा जन्म कधी झाला?
जून हे नाव अपभ्रंशातून तयार झालं आहे. पूर्वी जुन्या फ्रेंचमध्ये जुनी असं म्हटलं जायचं. तर लॅटीन भाषेत जुनीअस असं नाव होतं. त्यानंतर त्याचा अपभ्रंश होत होत मध्य कालीन इंग्रजीमध्ये जून हा शब्द रुढ झाला. साधारण 1600 च्या उत्तरार्धामध्ये ‘जून’ हा शब्द इंग्रजी भाषेमध्ये वापरण्यास सुरुवात झाली असं ‘डिक्शनरी डॉट कॉम’च्या लेखात म्हटलं आहे. 1925 च्या सुमारास आपल्या मुला-मुलींचं नाव जून असं ठेवणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली होती. त्यावेळी हे जगातील 39 वं सर्वाधिक लोकप्रिय नावांपैकी एक ठरलं होतं. हेच नाव मागील अनेक शतकांपासून इंग्रजी कालगणनेनुसार वर्षिक कॅलेंडमधील सहाव्या महिन्यासाठी वापरलं जातं.
तुम्हाला जून नावाचा हा इतिहास ठाऊक होता का? नाही ना? आता हा लेख शेअर करुन ही माहिती तुमच्या ओळखीच्या लोकांसोबत नक्की शेअर करा.
SOURCE : ZEE NEWS