Source :- ZEE NEWS
Google Lays Off 2025: सध्या जगभरात एआयचा शिरकाव झालाय. मोठमोठ्या कंपन्यांमध्ये एआय आपली पकड मजबूत करताना दिसतंय. दुसरीकडे जागतिक मंदीच्या झळा कर्मचाऱ्यांना सोसाव्या लागत आहेत. दिग्गज कंपन्या तडकाफडकी कर्मचारी कपात करत आहेत. अल्फाबेटच्या गुगलने त्यांच्या प्लॅटफॉर्म आणि डिव्हाइस युनिटमधील शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलंय. यामुळे एकाचवेळी शेकडो कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड पाहायला मिळतेय.
गेल्या काही काळापासून तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या कपात होतेय. त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार असल्याचे पाहायला मिळतंय. असे असताना गुगलने कपात केलेले हे कर्मचारी अँड्रॉइड सॉफ्टवेअर, पिक्सेल फोन आणि क्रोम ब्राउझरवर काम करत होते. कंपनीची पुनर्रचना आणि खर्च कपात यामुळे नोकऱ्यांमध्ये कपात झाल्याचा दावा अलिकडच्या एका अहवालात करण्यात आलाय.
जानेवारीपासून स्वेच्छा एक्झिट प्रोग्राम सुरु
गुगलने जानेवारी 2025 मध्ये या युनिटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी स्वैच्छिक एक्झिट प्रोग्राम सुरू केला होता. हा कार्यक्रम अमेरिकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी होता. अँड्रॉइड आणि पिक्सेल टीमच्या विलीनीकरणानंतर कंपनीच्या ध्येयांनुसार काम करू शकले नाहीत, त्या कर्मचाऱ्यांना कंपनी सोडण्याची संधी मिळावी यासाठी हा प्रोग्राम सुरू करण्यात आला. ज्यामध्ये संबंधित कर्मचाऱ्याला सेव्हरन्स पॅकेज देखील दिले गेले.
गुगलकडून कपातीची अधिकृत घोषणा नाही
खर्च कार्यक्षमता वाढवण्यासाठी कंपनीच्या सीईओचे हे एक धोरणात्मक पाऊल असू शकते असे मानले जाते. असे अस गुगलने अद्याप अधिकृतपणे सांगितले नाही की ही कपात कोणत्या क्षेत्रांवर केंद्रित आहे आणि किती कर्मचाऱ्यांवर परिणाम झाला आहे.
एचआर आणि क्लाउड विभाग अडचणीत
यापूर्वी फेब्रुवारी 2025 मध्ये गुगलने त्यांच्या एचआर आणि क्लाउड विभागातील कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. त्यावेळीही, कंपनीने खर्च कमी करण्याच्या आणि एआय क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्याच्या धोरणाचा एक भाग म्हणून कर्मचाऱ्यांना काढून टाकल्याचे सांगण्यात आले होते.
14 आठवड्यांच्या पगार देऊन काढले
कर्मचाऱ्यांसाठी स्वैच्छिक नोकरीतून बाहेर पडण्याचा कार्यक्रम मार्च 2025 पासून सुरू करण्यात आला. ज्यामध्ये वरिष्ठ आणि मध्यम दर्जाच्या कर्मचाऱ्यांना नोकरी सोडल्यानंतर 14 आठवड्यांच्या पगाराचे पॅकेज आणि काम केलेल्या वर्षांच्या संख्येसाठी अतिरिक्त एक आठवडा देण्यात आला. यासोबतच क्लाउड विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही कामावरून काढून टाकण्यात आले. यामध्ये सेल्स ऑपरेशन, कस्टमर एक्सिपिरियन्स आणि गो-टू-मार्केट विभागांचा समावेश आहे.
SOURCE : ZEE NEWS