Source :- ZEE NEWS
भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान चांगलाच घाबरला. या तणावात दिवाळखोर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने एक अब्ज डॉलरचं कर्ज दिलं. मात्र आता पाक कर्जाची परतफेड करेल का याची चिंता IMFला लागलीये. त्यामुळे IMFनं पाकिस्तानला दणका देत कर्जाच्या हप्त्यासाठी 11नव्या अटी घातल्या आहेत.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्धवस्त करतं, चोख उत्तर दिलं. आधीच आर्थिकदृष्ट्या ढेपाळलेल्या पाकिस्तानला याचा मोठा फटका बसला. त्यामुळे पाकने लगेच IMFकडे मदतीची याचना केली. भारत पाक तणावाच्या स्थितीत IMFने 9 मे रोजी बेलआऊट पॅकेज जाहीर केलं. एक अब्ज डॉलरच्या मदतीचं आश्वासन दिलं. मात्र आता कर्जाचा पुढचा हप्ता वितरीत करण्याआधी IMFने पाकवर नव्या 11 अटी घातल्यात. कर्जयोजनेतील आर्थिक, बाह्य आणि सुधारणांची उद्दिष्ट्ये धोक्यात येत असल्याचा इशारा IMFने दिलाय.
IMF च्या पाकिस्तानपुढे अटी
17 हजार 600 अब्ज रुपयांच्या नवीन अर्थसंकल्पाला संसदेची मान्यता आवश्यक
3 वर्षांपासून जुन्या वाहनांच्या आयातीवरील बंदी हटवावी
बजेटमध्ये वीज महाग करण्याच्या सूचना
प्रांतांनी जूनपर्यंत नवीन कृषी उत्पन्न कर कायदे लागू करावेत
गॅस वापरावर कर लावण्याची सूचना
सरकारचा पुढच्या वर्षाचा कारभार कसा चालणार याचा अहवाल काढा
IMFकडून ज्यावेळी पाकला आर्थिक सहाय्याची घोषणा झाली. त्यावेळी भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. कारण आंतरराष्ट्रीय पातळीवरून पैसा घेऊन दहशतवाद्यांना पोसत असल्याचा पाकिस्तानचा इतिहास आहे. मात्र आता पाक कर्जाची परतफेड करेल का याबाबत IMFलाच साशंकता आहे. त्यामुळे IMFने पाकवर पुन्हा नव्या अटी घातल्यात. आता पाकवरच्या अटींची संख्या 50वर पोहचलीये.
पाकिस्तानवरचा कर्जाचा आकडा मोठा आहे. केवळ IMFचं नाही तर आंतरराष्ट्रीय बँकांकडून देखील पाकने कर्ज घेतलं आहे. पाकिस्तानला आता हे सर्व कर्ज पुढील तीन वर्षांमध्ये फेडायचं आहे, मात्र पाकिस्तानची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहाता पाक कर्ज फेडण्यास असमर्थ वाटतंय. त्यामुळे पाकिस्तानवर आता आंतरराष्ट्रीय दबाव वाढत चालल्याचं दिसतंय.
SOURCE : ZEE NEWS