Source :- ZEE NEWS

Dawood Ibrahim In Pakistan: भारताने पाकिस्तानविरुद्ध युद्ध पुकारलं असून याचा फटका 1993 साली मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणल्याप्रकरणी फरार असलेल्या दाऊद इब्राहिमला बसला आहे. दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानात अडकून पडला असून त्याला हा देश सोडून कुठेही जाता येत नाहीये. इंटरपोलने दाऊद इब्राहिमविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने दाऊद इब्राहिमला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्याचा कार्यकारी आदेश दिला आहे. तर 2003 मध्ये दाऊद इब्राहिमविरुद्ध नोटीस जारी केली आहे. त्यामुळेच आता दाऊद इब्राहिमला पाकिस्तान सोडून जाता येणार नाही. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने दहशतवादाविरुद्ध युद्ध सुरू केले आहे. त्यामुळे भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिम कुठे आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दाऊद इब्राहिम अजूनही कराचीच्या क्लिफ्टन भागात आहे की त्याला अधिक सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे? याबद्दल उलट-सुलट चर्चा सुरु आहे. 

दाऊद 2001 पासून कराचीमध्ये

भारत आणि पाकिस्तानमधील सध्याच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने दाऊद इब्राहिम आणि त्याच्या कुटुंबाला कराचीहून पाकिस्तानातील इतर ठिकाणी हलवल्याचं वृत्त पाकिस्तानमधील काही प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. दाऊद 2001 पासून कराचीमध्ये राहत होता. भारतीय लष्कर पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर लक्ष ठेवून आहे. भारत करत असलेल्या हल्ल्यामध्ये दाऊदही मारला जाण्याची भीती आहे. भारतीय यंत्रणांनी दाऊदला संपवण्याचे तीन अयशस्वी प्रयत्न केले आहेत.

‘व्हाइट हाऊस’ अन् 1993 च्या हल्ल्याचा कट

दाऊद 1986 मध्ये भारतातून पळून गेला आणि दुबईला गेला. तिथे त्याने ‘व्हाइट हाऊस’ नावाचा बंगला खरेदी केला आणि त्या ठिकाणाहून त्याची टोळी चालवली. 12 मार्च 1993 रोजी मुंबईतील बॉम्बस्फोटांची योजनाही दाऊदने याच बंगल्यात आखल्याचं सांगितलं जातं. या बंगल्यातच दाऊदने मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी टायगर मेमन आणि त्याच्या लँडिंग एजंट्सला भेटला. स्फोटांनंतर, भारत सरकारने दाऊदला दहशतवादी घोषित केले. त्यानंतर तो दुबई आणि कराचीदरम्यान सतत फिरतोय, अशी सूत्रांची माहिती आहे.

दाऊदचं कुटुंबात कोणकोण?

2001 मध्ये, अमेरिकेत 9/11 च्या हल्ल्यानंतर, दहशतवादाविरुद्ध जागतिक स्तरावर कारवाई सुरू झाली. भारत आणि अमेरिका जवळ येताच, दाऊद घाबरला आणि त्याने आपला तळ कायमचा कराचीला हलवण्याचा निर्णय घेतला. कराचीमध्ये, तो डिफेन्स कॉलनीच्या शेजारी असलेल्या क्लिफ्टन नावाच्या भागात स्थायिक झाल्याचं सांगितलं जातं. हा भाग कराची शहरातील सर्वात सुरक्षित परिसरांपैकी एक मानला जातो. दाऊद त्याची पत्नी महजबीन, मुलगा मोईन, भाऊ अनीस, हुमायून, मुस्तफा आणि नूर यांच्यासोबत तिथे राहत होता. काही वर्षांपूर्वी नूरचे निधन झाले. त्याच्या कुटुंबासोबत, दाऊदच्या टोळीतील अनेक प्रमुख सदस्यही जवळच राहत होते. दाऊदचा उजवा हात असलेला छोटा शकीलचे दाऊदच्या घराजवळच एक घर होते.

कुटुंबासहीत कराचीबाहेर हलवलं?

अशी चर्चा आहे की, पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर आणि भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. भारताने 7 मे रोजी केलेलं ऑपरेशन सिंदूर सुरू होण्यापूर्वीच दाऊद आणि त्याच्या कुटुंबियांबरोबरच जवळच्या सहकाऱ्यांना कराचीबाहेर हलवण्यात आले. 2000 साली बँकॉकमध्ये छोटा राजनवर हल्ला करणारा डी-कंपनीचा शूटर मुन्ना झिंगडा देखील पाकिस्तानात अज्ञात ठिकाणी लपला असल्याचे वृत्त आहे.

दाऊद पाकिस्तानसाठी महत्त्वाचा का?

दाऊद हा पाकिस्तानसाठी एक प्रमुख व्यक्ती आहे. दहशतवादी कारवायांमुळे तो पाकिस्तानला फार महत्त्वाचा वाटतो. केवळ 1993 च्या बॉम्बस्फोटांमध्येच नाही तर त्यानंतर झालेल्या विविध हिंसक घटनांमध्ये आणि हाय-प्रोफाइल हत्यांमध्येही दाऊदचा समावेश होता. बनावट चलन आणि शस्त्रास्त्रांची तस्करी देखील डी-कंपनीद्वारे करण्यात आल्याचे अनेक पुरावे आहेत.

पाकिस्तानातून पळण्याचा प्रयत्न केला तर…

भारताने इंटरपोलद्वारे दाऊद इब्राहिमविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. त्यामुळे दाऊद आता पाकिस्तान सोडून जाऊ शकत नाही. अमेरिकेनेही त्याला दहशतवादी घोषित केले आहे आणि संयुक्त राष्ट्रांनी त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून सूचीबद्ध केले आहे. जर त्याने पाकिस्तानातून पळून जाण्याचा प्रयत्न केला तर तो पकडला जाण्याचा मोठा धोका आहे.

SOURCE : ZEE NEWS