Source :- ZEE NEWS
Financial Cost Of India Pakistan War: भारत आणि पाकिस्तानदरम्यान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. खरोखरच या दोन्ही देशांमध्ये युद्ध झालं तर त्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांवरही होणार आहे. या दोन्ही देशांना युद्ध परवडणारं नाही असं यापूर्वी तुम्ही अनेकदा ऐकलं असेल पण परवडणारं नाही म्हणजे नेमकं किती नुकसान दोन्ही देशांना होऊ शकतं? असा प्रश्न तुम्हालाही कधी ना कधी पडला असेल. तर या प्रश्नाचं उत्तर हजारो कोटी रुपये असं देता येईल. त्यातही अगदी ठराविकपणे कशापद्धतीचं आणि किती रुपयांचं नुकसान भारत आणि पाकिस्तानला होऊ शकतं हे पाहूयात…
भारताकडून पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्धवस्त
पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत कारवाई करत चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारताने 7 मे च्या मध्यरात्री पाकिस्तानमधील 9 ठिकाणी केलेल्या हल्ल्यांमध्ये दहशतवादी तळ उद्धवस्त केलं. यामुळे पाकिस्तान चांगलाच खवळला आहे. तरीही भारताने नागरी वस्त्या, लष्करी तळ तसेच पाकिस्तानी सैन्यासंदर्भातील ठिकाणांना लक्ष्य केलेलं नाही. पाकव्याप्त काश्मिरमधील दहशतवादी तळ भारताने उद्धवस्त केलं. सध्या भारत आणि पाकिस्तानमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत.
सर्वासामान्यांवर होणार परिणाम
दोन्ही देशांमध्ये पूर्ण युद्ध झालं तर त्यांना किती मोठी आर्थिक किंमत मोजावी लागेल याबद्दलची चर्चा सध्या अनेक तज्ज्ञ मंडळी करत आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, खरोखर दोन्ही देशांमध्ये युद्ध झालं तर दोन्ही देशातील नागरिकांच्या मानवी जीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होईल. दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांना या युद्धाचा फटका बसण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळेच भारत आणि पाकिस्तानसारखे देश युद्धामुळे होणारं आर्थिक नुकसान सहन करु शकतील का?
भारताला दिवसाचा किती खर्च येणार?
भारत-पाकिस्तान संबंध आणि युद्धविषय अभ्यासकांच्या अंदाजानुसार, भारताने पाकिस्तानसारख्या देशाविरुद्ध युद्ध करण्याचा निर्णय घेतला तर प्रती दिवस भारताला 1460 कोटी रुपये ते 5 हजार कोटी रुपयांपर्यंतचं नुकसान होऊ शकतं. युद्धाचा कालावधी लांबत गेला तर भारताला प्रती दिवस 1.34 लाख कोटी रुपयांपर्यंतचा खर्च येऊ शकतो. तसेच परदेशी गुंतवणूकदार पाठ फिरवण्याची शक्यताही नाकारता येत नाही. परदेशी चलन मोठ्या प्रमाणात खर्च होईल. डॉलर्सच्या तुलनेत रुपयाचं मूल्य कमी होईल, या साऱ्याचा मोठा आर्थिक परिणाम होण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानवर काय परिणाम होणार?
पाकिस्तानची अर्थव्यवस्था अधीच कमकुवत झालेली आहे. एका मोठ्या युद्धामुळे पाकिस्तानी अर्थव्यवस्था उद्धवस्त होईल. पाकिस्तानी रुपया एका डॉलरच्या तुलनेत 285 रुपयांपर्यंत पडू शकतो. पाकिस्तानमधील परकीय चलन मोठ्या प्रमाणात युद्धासाठी खर्च करावं लागेल, असाही अंदाज आहे. पाकिस्तानच्या कृषी क्षेत्रावर युद्धाचा मोठा परिणाम होईल. पाकिस्तानमधील कृषी क्षेत्र हे त्यांच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे.भारत आणि पाकिस्तानमधील व्यापार आधीच ठप्प झालेला आहे. युद्ध झालं तर हा व्यापार दिर्घकाळ बंद राहू शकतो. भारत पाकिस्तानला 1.2 बिलीयन अमेरिकी डॉलर्सच्या किंमती इतका माला निर्णय करतो. यामध्ये प्रामुख्याने औषधं, रसायने आणि शेतीसंदर्भातील उत्पन्नांचा समावेश आहे.
दोन्ही देशांना किती आर्थिक फटका बसणार?
पाकिस्तानी शेअर बाजारावरही युद्धाचा विपरीत परिणाम होईल. यामुळे पाकिस्तानमध्ये परदेशी गुंतवणूक येणार नाही. इतिहास पाहिल्यास भारत आणि पाकिस्तानमध्ये पूर्ण युद्ध झालं तर भारताला 1.8 बिलियन अमेरिकी डॉलर्स आणि पाकिस्तानला 1.2 बिलियन अमेरिकी डॉलर्स इतकं नुकसान होईल. भारतीय चलनानुसार सांगायचं झाल्यास भारताला होणाऱ्या नुकसानीचा आकडा 15397 कोटींहून अधिक रुपये अधिक असेल. तर पाकिस्तानला होणारं नुकसान हे 10265 कोटींहून अधिक रुपयांचं असेल.
SOURCE : ZEE NEWS