Source :- ZEE NEWS

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोमवारी देशाला संबोधित करत ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे राबवल्याबद्दल भारतीय सशस्त्र दलांचं कौतुक केलं. तसंच पाकिस्तानला जाहीरपणे इशारा देत दहशतवाद आणि चर्चा एकत्र असू शकत नाही असं ठणकावलं आहे. याशिवाय पाकिस्तानवर करण्यात आलेल्या कारवाईची माहिती दिली. नरेंद्र मोदींच्या भाषणानंतर पाकिस्तानचा जळफळाट झाला असून, “भारतीय पंतप्रधानांचे प्रक्षोभक आणि प्रक्षोभक दावे नाकारत” असल्याचं पाकिस्तानी सरकारने म्हटलं आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर पाकिस्तानला अस्तित्व टिकवायचं असेल तर दहशतवादाला संपवावं लागेल. याशिवाय शांततेचा कोणताही मार्ग नाही असं सांगितलं आहे. तसंच दहशतवाद आणि चर्चा, दहशतवाद आणि व्यापार एकत्र होऊ शकत नाही ही भारताची भूमिका स्पष्ट आहे. पाणी आणि रक्तही एकत्र वाहू शकत नाही अशा शब्दांत मोदींनी पाकिस्तानला ठणकावलं. आम्ही प्रत्युत्तर कारवाई तात्पुरती स्थगित केली असून, थांबवलेली नाही अशी आठवणही त्यांनी पाकिस्तानला करुन दिली. तसंच शस्त्रसंधीसाठी पहिली विनंती त्यांच्याकडून आल्याचंही स्पष्ट केलं. 

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, मोदींच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे की, “देश अलीकडच्या युद्धबंदी कराराशी वचनबद्ध आहे, तणाव कमी करण्यासाठी आणि प्रादेशिक स्थिरतेसाठी आवश्यक पावले उचलत आहे”.

“पाकिस्तान भारतीय पंतप्रधानांच्या चिथावणीखोर आणि प्रक्षोभक दाव्यांना नकार देतो,” असं रॉयटर्सने देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाचा हवाला देत म्हटलं आहे. “भारत प्रादेशिक स्थिरता आणि आपल्या नागरिकांच्या कल्याणाला प्राधान्य देईल”, अशी आशा असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. भविष्यात होणाऱ्या कोणत्याही आक्रमकतेला पूर्ण दृढनिश्चयाने तोंड दिले जाईल, असंही ते म्हणाले आहेत. 

‘पाकिस्तानशी चर्चा झाली तर…’

“पाकिस्तानशी चर्चा झाली तर दहशतवाद, पाकिस्तानव्याप्त काश्मीवरवरच होईल असंही नरेंद्र मोदींनी जगाला सांगितलं आहे. शांतीचा मार्गही शक्तीतून जातो. भारतीयांनी शांततेत जगण्यासाठी, विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारत शक्तीशाली होणं गरज आहे. गरज लागल्यास या शक्तीचा वापरही गरजेचा आहे. मागील काही दिवसांत भारताने हेच केलं आहे”, असं नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे. 

‘भारताने पाकिस्तानच्या छातीवर वार केला’

पुढे ते म्हणाले. “भारताच्या या हल्ल्यांमध्ये 100 हून अधिक दहशतवाद्यांना ठार केलं आहे. त्यांचे अनेक आका खुलेआम पाकिस्तानात फिरत होते. जे भारताविरोधात षडयंत्र रचत होते. त्यांना भारताने एका झटक्यात संपवंल आहे. भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तान घोर निराशेत आहे. पाकिस्तान घाबरला आहे. आणि त्याचमुळे त्यांनी आणखी एक प्रयत्न केला. भारताच्या कारवाईचं समर्थन करण्याऐवजी भारतावरच हल्ला करण्यास सुरुवात केली. पाकिस्तानने शाळा, कॉलेज, गुरुद्वारा, मंदिरं, सामन्यांची घरं यांना लक्ष्य केलं. पाकिस्तानने आपल्या सैन्य ठिकाणांना लक्ष्य केलं. पण यातही पाकिस्तानचचा बुरखा फाटला. जगाने पाकिस्तानचे ड्रोन, मिसाईल भारतासमोर कशाप्रकारे कोसळली हे पाहिलं. भारताच्या एअर डिफेन्सने आकाशतच त्यांनी नष्ट केलं. पाकिस्तानची सीमेवर वार करण्याची तयारी होती, पण भारताने पाकिस्तानच्या छातीवर वार केला”

‘प्रत्युत्तर कारवाईला फक्त स्थगित केलं आहे’

आम्ही पाकिस्तानच्या दशतवादी आणि सैन्य ठिकाणांवर आमच्या प्रत्युत्तर कारवाईला फक्त स्थगित केलं आहे. आगामी दिवसात पाकिस्तान काय भूमिका घेत यावर सगळं अवलंबून असेल. आपली तिन्ही दलं, बीएसएफ सतत अलर्टवर आहेत. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकनंतर आता ऑपरेशन सिंदूर दहशतवादाविरोधीताल भारताची कारवाई आहे असंही मोदींनी सांगितलं आहे. 

SOURCE : ZEE NEWS