Source :- ZEE NEWS

Pope Francis Death: पोप फ्रान्सिस यांचं निधन झालं आहे. व्हॅटिकनने सोमवारी व्हिडीओ निवेदन जारी करत रोमन कॅथलिक चर्चचे पहिले लॅटिन अमेरिकी पोप फ्रान्सिस यांचं निधन झाल्याची माहिती दिली आहे. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील अनेक काळापासून ते आजारी होते. 

व्हॅटिकनने सोमवारी एक निवेदन जारी करून सांगितलं आहे की, ते रोमन कॅथोलिक चर्चचे पहिले लॅटिन अमेरिकन धर्मगुरू होते. त्यांच्या दोन्ही फुफ्फुसांमध्ये न्यूमोनिया होता, ज्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक राहिली. ते बराच काळ रुग्णालयात होते. ते तब्बल 38 दिवस रुग्णालयात होते आणि अलीकडेच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यांचं निधन त्यांच्या कासा सांता मार्टा येथील निवासस्थानी झाले.

पोप फ्रान्सिस यांनी ईस्टरच्या दिवशी अचानक सार्वजनिक उपस्थिती लावली. त्यांनी सेंट पीटर्स स्क्वेअरमधील 35 हजारांच्या गर्दीला हात दाखवत अभिवादन स्वीकारलं. व्हॅटिकन कार्डिनल केविन फॅरेल म्हणाले की पोप फ्रान्सिस यांचे संपूर्ण आयुष्य देवाच्या सेवेसाठी समर्पित होते.

“आज सकाळी 7 वाजून 35 मिनिटांनी (भारतीय वेळेनुसार 5 वाजून 35 मिनिटं) रोमचे बिशप फ्रान्सिस, फादरच्या घरी परतले आहेत,” असे कार्डिनल केविन फॅरेल यांनी व्हॅटिकनने त्यांच्या टेलिग्राम चॅनेलवर प्रकाशित केलेल्या निवेदनात म्हटले आहे. रविवारी, पोप फ्रान्सिस यांनी त्यांच्या ईस्टर संडे भाषणात विचार स्वातंत्र्य आणि सहिष्णुतेचे आवाहन केले.

“धर्म स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि इतरांच्या विचारांचा आदर केल्याशिवाय शांतता असू शकत नाही,” असं त्यांनी सांगितलं ज्यामध्ये “चिंताजनक” यहूदी-विरोधीता आणि गाझामधील “नाट्यमय आणि दयनीय” परिस्थितीचा निषेध करण्यात आला होता.

SOURCE : ZEE NEWS