Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, Getty Images
7 मिनिटांपूर्वी
भारतीय सैन्यदलाने गुरुवारी 8 मे रोजी पहाटे पाकिस्तानमधील अनेक ठिकाणी एअर डिफेन्स रडार आणि सिस्टिमला लक्ष्य केले. तसेच संध्याकाळी पाकिस्तानची लाहोरमधली ‘एअर डिफेन्स सिस्टीम’ निकामी केल्याचं भारतानं जाहीर केलं.
याच दिवशी म्हणजे 8 मेच्या रात्री पाकिस्तानने ड्रोन्स, मिसाईल्सद्वारे उत्तर भारतातल्या अनेक शहरांवर हल्ला केला. पण भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने तो हाणून पाडल्याचं भारतीय सैन्याने जाहीर केलं.
या सगळ्या बातम्यांमध्ये एअर डिफेन्स सिस्टिम हा शब्दप्रयोग वारंवार वाचायला, ऐकायला मिळत आहे. पण ही एअर डिफेन्स सिस्टीम म्हणजे काय? भारताकडे असणारं सुदर्शन चक्र – S400 मिसाईल यंत्रणा काय आहे? ते इथं समजून घेऊया
एअर डिफेन्स सिस्टिम म्हणजे शत्रूच्या हवाई हल्ल्यांपासून संरक्षण देणारी यंत्रणा. ही यंत्रणा शत्रूकडून येणारी विमान, ड्रोन, किंवा डागण्यात आलेलं क्षेपणास्त्र हवेत दूरवर असतानाच टिपते.
त्याचप्रमाणे या विमान, ड्रोन, क्षेपणास्त्राचं स्थान शोधते, त्याच्या मार्गावर लक्ष ठेवते आणि ठराविक टप्प्यात आल्यानंतर जमिनीवरून डागण्यात येणाऱ्या क्षेपणास्त्रांद्वारे हे ड्रोन, विमान किंवा क्षेपणास्त्र हवेतच उडवून लावलं जातं.
जमिनीवरून हवेत हल्ला करणारी क्षेपणास्त्रं, हवेतली हालचाल टिपणारी रडार्स, जॅमर्स आणि नागरिकांना हवाई हल्ल्याची सूचना देणाऱ्या सायरन्स या सगळ्या यंत्रणा मिळून एअर डिफेन्स सिस्टीम बनते.
आपल्या देशाच्या दिशेने येणारा हल्ला कोणत्या प्रकारचा आहे, फायटर जेट आहे, ड्रोन आहे, मिसाईल आहे हे आधी ओळखलं जातं. त्यानंतर त्याचा बिमोड कसा करायचा याची काही ठरलेली धोरणं असतात.
या हल्ल्याची क्षमता धोका किती आहे यानुसार ते नष्ट करण्यासाठी कशाचा वापर करायचा हे अवलंबून असतं.

S 400च्या माध्यमातून जमिनीवरून डागण्यात आलेलं क्षेपणास्त्र हे दुसऱ्या बाजूने आलेल्या हल्ल्याला हवेत असतानाच टार्गेट करतं आणि शत्रूचा हल्ला जमिनीपर्यंत पोहोचत नाही.
असे हवेतून होणारे हल्ले रोखणारी लाहोरमधली यंत्रणा आपण निकामी केल्याचा दावा भारतीय सैन्याने केला आहे.
पाकिस्तानकडून 8 आणि 9 मेच्या मधल्या रात्री भारताच्या पश्चिम सीमेवर ड्रोन आणि इतर शस्त्रांचा वापर करून हल्ला करण्यात आल्याचं भारतीय सैन्याने म्हटलंय.
भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीममधली महत्त्वाची यंत्रणा आहे. S – 400 Triumf. रशियाच्या अल्माझ सेंट्रल डिझाईन ब्युरोने ही आधुनिक दीर्घपल्ल्याची जमिनीवरून हवेत हल्ला करणारी मिसाईल सिस्टीम विकसित केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
नाटोमध्ये या यंत्रणेला SO 21 ग्रॉलर असं म्हटलं जातं. भारतामध्ये या यंत्रणेला सुदर्शन चक्र असं नाव देण्यात आलं आहे.
रशियाकडून या मिसाईल सिस्टीमचे एकूण 5 स्क्वाड्रन्स घेण्यासाठी भारताने 2018 मध्ये रशियासोबत सुमारे 35 हजार कोटींचा करार केला होता.
यापैकी 3 स्क्वाड्रन्स कार्यरत असून उरलेल्या दोनची डिलीव्हरी 2026 पर्यंत मिळणं अपेक्षित आहे. भारताने हा करार केला, तेव्हा अमेरिकेने नाराजी व्यक्त केली होती.
2007 सालापासून रशियाने ही यंत्रणा वापरायला सुरुवात केली तर चीनकडेही हीच हवाई संरक्षण यंत्रणा आहे.
S-400 च्या एका स्क्वाड्रनमध्ये प्रत्येकी सहा लाँचर असणाऱ्या दोन बॅटरीज असतात. यातली प्रत्येक बॅटरी 128 मिसाईल्स डागू शकते.
यासोबतच स्क्वाड्रनमध्ये कमांड आणि कंट्रोल सिस्टीम, सर्विलियन्स रडार म्हणजे लक्ष ठेवणारं रडार आणि एंगेजमेंट रडार म्हणजे जमिनीवरून डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्राला माहिती पुरवणारं रडार असतं.
एस-400 – सुदर्शन चक्र यंत्रणा काम कशी करते?
सगळ्यात आधी दीर्घपल्ल्यापर्यंत टेहळणी करण्याची क्षमता असणारं रडार आकाशातली हालचाल टिपतं आणि ही माहिती कमांड व्हेईकलला पाठवली जाते. कमांड व्हेईकलकडून या संभाव्य धोक्याची पडताळणी केली जाते.
टार्गेट नेमकं काय प्रकारचं आहे हे स्पष्ट झालं, की मग कमांड व्हेईकलद्वारे मिसाईल डागण्याचे आदेश दिले जातात.
टार्गेट टिपण्यासाठी कोणतं लाँच व्हेईकल योग्य ठिकाणी स्थित आहे त्यानुसार हा लाँच डेटा त्या व्हेईकलला पाठवला जातो. आणि मग या लाँच व्हेईकलवरुन जमिनीवरून हवेत वेध घेणारं क्षेपणास्त्र डागलं जातं.
एंगेजमेंट रडार या मिसाईलला टार्गेटच्या दिशेने जायला मदत करतं.
ही S-400 हवाई बचाव यंत्रणा जगातल्या अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टीम्सपैकी एक आहे. ती ड्रोन्स, तसेच सहजासहजी रडारवर टिपली न जाणारी विमानं, क्रूझ मिसाईल्स आणि बॅलिस्टिक मिसाईल्स टिपू शकते.

फोटो स्रोत, ANI
400 किलोमीटर्सपर्यंतच्या अंतरावरच्या हवाई टप्प्यातले आणि 30 किलोमीटर्स उंचीवरची टार्गेट्स या S-400 यंत्रणेद्वारे टिपली जाऊ शकतात.
वेगवेगळ्या अंतरावरची टार्गेट्स निकामी करण्यासाठी वेगवेगळी मिसाईल्स वापरली जातात. यामध्ये पुढीलप्रकारे विभाजन केलं जातं.
- 40 किमी पर्यंतचं अंतर Short Range – लहान पल्ला
- 120 किमी पर्यंतचं अंतर Medium Range – मध्यम पल्ला
- 250 किमी पर्यंतचं अंतर Long Range – दीर्घ पल्ला
- 400 किमी पर्यंतचं अंतर Very Long Range – अति-दीर्घ पल्ला
ही सिस्टीम एकावेळी 160 लक्ष्यांवर नजर ठेवू शकत, त्यांचा माग काढते आणि एकावेळी 72 लक्ष्यांवर हल्ला करू शकते.
शिवाय मार्गस्थ असताना 5 मिनिटांत कार्यन्वित होऊ शकते. या स्क्वाड्रनमधली लाँच व्हेईकल्स हेवी ड्युटी ट्रेलरवर बसवलेली असतात.
हे ट्रेलर जमिनीवर ताशी 60 किलोमीटरच्या वेगाने तर ताशी 25 किमीच्या वेगाने ऑफ रोड प्रवास करू शकतात. त्यामुळे ती वेगाने दुसऱ्या जागी तैनात करणं शक्य होतं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC