Home LATEST NEWS ताजी बातमी TET पेपरफुटीमुळे 28 जूनची परीक्षा रद्द; नवीन तारीख कधी जाहीर होणार? वाचा

TET पेपरफुटीमुळे 28 जूनची परीक्षा रद्द; नवीन तारीख कधी जाहीर होणार? वाचा

3
0

Source :- BBC INDIA NEWS

TET पेपरफुटीमुळे 28 जूनची परीक्षा रद्द; नवीन तारीख कधी जाहीर होणार? वाचा

फोटो स्रोत, Getty Images

Published

वाचन वेळ: 7 मिनिटे

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे 28 जूनला घेतली जाणारी ‘टीईटी’ परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. परीक्षेच्या आदल्या दिवशी म्हणजे आज (27 जून) टीईटीचा पेपर फुटल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत 28 जूनला संपूर्ण राज्यात एकूण 1028 केंद्रावर शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2026 घेण्याचे प्रस्तावित होते. एकूण 4 लाख 28 हजार 122 उमेदवारांनी नोंदणी केली होती. यापैकी 2 लाख 26 हजार 363 सेवेत असलेले शिक्षक परीक्षेला बसणार होते.

NEET 2026 च्या परीक्षेमधील गैरप्रकार लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना केलेल्या होत्या. मात्र, सर्व उपाययोजनेनंतरही परीक्षेच्या एक दिवसाआधी पेपर फुटल्याने परीक्षार्थ्यांच्या भविष्यावर टांगती तलवार आहे.

दरम्यान, शिक्षक म्हणून नियुक्ती मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या टीईटी परीक्षेसाठीची तयारी करणाऱ्या अनेक उमेदवारांच्या स्वप्नावर पाणी फेरल्याचं चित्र असून उमेदवारांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

आधी NEET परीक्षा आणि आता टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याने विरोधी पक्षाने सत्ताधारी सरकारला धारेवर धरलं आहे. हे सरकार पेपर फुटीचं सरकार असल्याची टीका विरोधी पक्षाने केली आहे.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

यानंतर तपासणीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावून तातडीने पडताळणी केली. या लोकांकडे शिक्षक पात्रता परीक्षा (TET) जून 2026 परिक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान असल्याचे आढळून आले. याप्रकरणी भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

परिस्थिती लक्षात घेता 28 जूनला होणारी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पुढे ढकलण्यात येत असल्याचं या पत्रकातून सांगण्यात आलं आहे.

शिक्षक पात्रता (TET) परिक्षेबाबत अ‌द्यावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

‘2028च्या आता टीईटी उत्तीर्ण व्हा म्हणताय, आता आम्ही कसं करायचं?’

टीईटीची परीक्षा रद्द करण्यात यावी अशी याचिका करणारे किरण शिंदे यांनी सांगितलं की, “आम्हा शिक्षकांसाठी ही सुवर्णसंधी होती. उन्हाळ्याच्या सुट्टीत आमची तयारी झाली होती. आता इतर अनेक गोष्टी आहेत. आपली व्यवस्था एवढी कमकुवत आहे का की एवढे पेपर फुटतात. आता नवीन परीक्षेत काठिण्यपातळी वाढवून येईल, परीक्षार्थींचं मोठं नुकसान झालं आहे. शासनाने यावर निर्णय घेतला पाहिजे.”

शिंदे पुढे म्हणाले, “आधी NEET आणि आता TET. शिक्षकांना 2028च्या आत ही परीक्षा उत्तीर्ण होण्यास सांगितलं आहे. आम्ही 15-15 वर्षं नोकरी केली आहे आता आम्ही कसं करायचं? नोकरी लागल्यावर परीक्षा हे कुठलं धोरण आहे? टीईटी नकोच अशीच आमची भूमिका आहे.”

किरण शिंदे यांनी केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली होती.

टीईटी परीक्षेत झालेल्या पेपरफुटी प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष महेंद्र गणपुले म्हणाले, “लाखो विद्यार्थ्यांची वर्षभराची मेहनत अशाप्रकारे वाया जात असेल तर परीक्षा पद्धती वरच विश्वास ठेवणे अवघड आहे. NEET ही शैक्षणिक जीवनाला कलाटणी देणारी अत्यंत महत्त्वाची परीक्षा म्हणून तर शिक्षकांसाठी TET बाबत अशी पेपर फुटीची परिस्थिती नक्कीच चिंताजनक आहे.”

शिक्षक हितकारणी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पवार यांनी देखील या पेपरफुटीचा निषेध केला आहे.

“शिक्षक पात्रता (TET) परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याची घटना अत्यंत धक्कादायक, दुर्दैवी आणि संतापजनक आहे. वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचा आणि उमेदवारांचा शासन व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होत आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून पेपरफुटीस जबाबदार असलेल्या सर्व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी परीक्षा व्यवस्थेत अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि प्रभावी यंत्रणा उभारावी,” असं ते म्हणाले.

दोन दिवसांत नवी तारीख जाहीर करणार – प्रिया शिंदे

टीईटी परीक्षा पुढे ढकलल्यानंतर महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या पत्रकार परिषदेत उपायुक्त प्रिया शिंदे यांनी माहिती दिली.

त्या म्हणाल्या, “परीक्षा परिषदेच्या पेपरफुटीप्रकरणानंतर एकाही विद्यार्थ्याकडून शुल्क घेतले जाणार नाही. उमेदवारांना पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही. ज्यांनी आधीच नोंदणी केली आहे, त्यांना पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता असणार नाही आणि त्यांच्याकडून कोणतीही अतिरिक्त फी आकारली जाणार नाही.”

प्रिया शिंदे

प्रिया शिंदे पुढे म्हणाल्या, “पेपरफुटीनंतर परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून नवीन तारखेबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल. दोन-तीन दिवसांत नव्या तारखेची घोषणा करण्यात येईल.

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असून चौकशी अंतिम निष्पन्न झाल्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल. अशा प्रकारची परीक्षा घेण्यासाठी सुमारे तीन आठवड्यांची प्रक्रिया असते.

या प्रकरणात उमेदवारांचा कोणताही दोष नसून दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. सध्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.”

गृहराज्य मंत्री पंकज भोयर यांनी माध्यमांना सांगितलं, “काही अनोळखी इसमांकडे अशा पद्धतीचे पेपर आढळून येत असल्याची माहिती भिवंडी पोलिसांना मिळाली. तात्काळ आमच्या पोलिसांनी त्या इसमांना पकडलं आणि सदर पेपर हा टीईटीचाच असल्याचं शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून खात्री केली. ही परीक्षा पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी ती पुढे ढकलण्यात आली आहे. पारदर्शक पद्धतीनेच ती घेण्यात येईल.”

परीक्षेसाठीच्या नियमांवरून झाला होता वाद

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं शिक्षक पात्रता (TET) परीक्षेसंदर्भात काही कडक नियम जाहीर केले होते. 28 जून 2026 रोजी होणाऱ्या परीक्षेदरम्यान उमेदवारांची ओळख स्पष्ट व्हावी यासाठी केंद्रांवर Live CCTV निरीक्षणाची व्यवस्था ठेवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे परीक्षा कालावधीत चेहरा पूर्णपणे झाकला जाईल असे कपडे जसे की दुपट्टा, बुरखा, मास्क, टोपी किंवा इतर कोणतेही आच्छादनवापरण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले होते.

परिषदेनं याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले होते की, हे निर्बंध कोणत्याही धार्मिक प्रथांवर आधारित नसून केवळ परीक्षा प्रक्रियेला पारदर्शक आणि निष्पक्ष ठेवण्यासाठी लागू करण्यात आले होते. देशातील UPSC, SSC, MPSC यांसारख्या इतर स्पर्धा परीक्षांमध्येही उमेदवारांची ओळख पटेल यासाठी अशाच प्रकारचे नियम लागू असतात, असेही परिषदेनं नमूद केले होते.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Sanchit Khanna/Hindustan Times via Getty Images

अलीकडच्या काळात परीक्षांमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करून गैरप्रकार केल्याच्या घटना लक्षात घेऊन हे नियम जाहीर करण्यात आले होते. काही उमेदवारांकडून कपड्यांमध्ये किंवा डोक्यावरच्या आच्छादनाखाली उपकरणे लपवण्याचे प्रकारही समोर आले होते. त्यामुळे ओळख पटवताना अडचणी निर्माण होत असल्याने चेहरा, डोळे, कान हे अवयव स्पष्ट दिसणे आवश्यक असल्याचे परिषदेनं स्पष्ट केलं होतं.

महिला उमेदवारांना त्यांच्या परंपरेनुसार पोशाख वापरण्याची मुभा होती, मात्र परीक्षा कक्षात चेहरा झाकला जाणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असल्याचं सांगण्यात आलं होतं. परीक्षेची पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम ठेवण्यासाठी हे नियम आवश्यक असल्याचं परिषदेनं स्पष्ट केलं होतं.

हे सरकार ‘पेपर लीक सरकार’ बनलंय – काँग्रेस

काँग्रेसने आपल्या अधिकृत ‘एक्स’ अकाउंटवरून टीका करत म्हटलं, “आणखी एक पेपर लीक. महाराष्ट्रात TET परीक्षेचा पेपर लीक झाला आहे. ही परीक्षा उद्या होणार होती, ती आज रद्द झाली आहे. भाजप सरकारमध्ये आसा कोणताच पेपर नाही, जो लीक होत नाहीये. हे सरकार ‘पेपर लीक सरकार’ बनलंय.”

NEET पेपरफुटी प्रकरणावर दिल्लीत आंदोलन करणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीने देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. एक्सवर पोस्ट करून त्यांनी म्हटलं आहे की, “आणखी एक पेपरफुटी. आता हे नेहमीचंच झालं आहे. या देशातील मंत्र्यांनी कोणत्याही अपयशाची जबाबदारी कधीच स्वीकारायची नाही, अशी जणू शपथच घेतली आहे. जनतेने मात्र हे सगळं सहन करत राहायचं, कारण मंत्र्यांकडून याचं उत्तरदायित्व कधीच स्वीकारलं जाणार नाही.”

सत्यजित तांबे

विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी देखील एक्सवर पोस्ट करून याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

सत्यजित तांबे यांनी म्हटलं, “कधी MPSC, कधी NEET आणि आता TET… पेपरफुटीच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीत. विभागातील भ्रष्टाचार हेच यामागचं मुख्य कारण आहे. लाखो विद्यार्थ्यांची मेहनत, वेळ आणि भवितव्य यामुळे धोक्यात येत आहे. TET ही परीक्षा अनेक शिक्षकांसाठी नोकरी टिकवण्याशीही संबंधित आहे, त्यामुळे या प्रकाराचा फटका विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही बसला आहे. जग कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सायबर सुरक्षेच्या युगात पोहोचलं असताना आपण अजूनही सुरक्षित आणि पारदर्शक परीक्षा व्यवस्था उभी करू शकलो नाही, हे दुर्दैवी आहे. परीक्षा व्यवस्था जाणीवपूर्वक पारदर्शक केली जात नाही, असं माझं ठाम मत आहे. सरकारने ही व्यवस्था तातडीने सुधारण्याची गरज आहे.”

‘हे कमकुवत सरकार आहे’, दानवेंची टीका

या प्रकरणावर शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सरकारवर टीका करत जाब विचारला.

माध्यमांना प्रतिक्रिया देताना दानवे म्हणाले, “या सरकारला साधा टीईटीचा पेपर सांभाळता येत नाही. नीट पेपरफुटीचं केंद्र महाराष्ट्रात आहे, हे सरकार गुड गव्हर्नन्सच्या गोष्टी करतं, हे सरकार झिरो टॉलरन्सच्या गोष्टी करतं.”

“कुठे गुड गव्हर्नन्स आहे, कुठे झिरो टॉलरन्स आहे? एवढ्या नीटच्या लोकांना जेलमध्ये टाकलं तरी टीईटीचा पेपर फुटतो. याचाच अर्थ सरकारचा पेपरफुटीमध्ये कुठेतरी सहभाग आहे.”

टीईटी परीक्षेचा पेपर लीक

पुढे बोलताना दानवे म्हणाले, “जे शिक्षक भावी पिढी घडवणार आहेत, त्या शिक्षकांची पात्रता परीक्षेचा पेपर फुटतो, याचा अर्थ आपण कुठे चाललोय हे पाहण्याची आवश्यकता आहे.”

“हे कमकुवत सरकार आहे, भ्रष्टाचारी सरकार आहे. म्हणून या सर्व गोष्टी होत आहेत. या छोट्या परीक्षेचा पेपर सरकार सांभाळू शकत नाही, याचाच अर्थ हे सरकार भगवान भरोसे चालू आहे.”

या रॅकेटला नेमकं राजकीय संरक्षण कोणाचं? हर्षवर्धन सपकाळ यांचा प्रश्न

टीईटी पेपरफुटीवर प्रतिक्रिया देताना सपकाळ म्हणाले, “उद्या (28 जून) महाराष्ट्रात होणारा TET परीक्षेचा पेपर उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाण्यातच फुटल्याच्या बातम्या समोर येत आहेत.”

“लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर, स्वप्नांवर आणि भविष्यावर पाणी फेरणाऱ्या या रॅकेटला नेमकं राजकीय संरक्षण कोणाचं आहे?”

टीईटी परीक्षेचा पेपर लीक

फोटो स्रोत, Getty Images

“एकीकडे ‘पारदर्शक कारभार’च्या घोषणा, तर दुसरीकडे पेपरफुटीचं अखंड सत्र! विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा की पेपर आधीच कोणाकडे पोहोचतोय याची चिंता करायची?”

“या प्रकरणाची तत्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. महाराष्ट्रातील तरुणांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना विरोधात काँग्रेस लवकरच रस्त्यावर उतरणार आहे,” असं सपकाळ म्हणाले.

महायुतीचे पेपरफुटी मॉडेल कायम – विजय वडेट्टीवार

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले, “महाराष्ट्राची ओळख ही शिक्षण, आणि स्पर्धा परीक्षांमधील यशामुळे होती. पण आज दुर्दैवाने महाराष्ट्राची ओळख पेपरफुटीची झाली आहे, ही राज्यासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे.

NEET पेपरफुटीचे धागेदोरे महाराष्ट्रात सापडले होते. आता ठाण्यात TET चा पेपर परीक्षा होण्याच्या अवघ्या एक दिवस आधीच फुटल्याने परीक्षा रद्द करण्याची वेळ आली. लाखो विद्यार्थ्यांनी अनेक महिने कष्ट करून, रात्रंदिवस अभ्यास करून परीक्षेची तयारी केली. पण काही भ्रष्ट प्रवृत्तीमुळे त्या सर्व मेहनतीवर एका क्षणात पाणी फेरले गेले.”

विजय वडेट्टीवार

फोटो स्रोत, Vijay Wadettiwar/Facebook

वडेट्टीवार पुढे म्हणाले, “ही केवळ पेपरफुटी नाही, तर लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची, त्यांच्या कष्टांची आणि त्यांच्या भविष्याची चोरी आहे. सरकारी भरती परीक्षा असो किंवा पात्रता परीक्षा, वारंवार पेपरफुटी होत असताना सरकार मात्र नेहमीप्रमाणे चौकशीच्या घोषणा करण्यातच व्यग्र असते. दरवेळी दोषींवर कारवाई करू असे सांगितले जाते, पण पुढचा पेपर पुन्हा फुटतो. याचा अर्थ दोषींना कायद्याचा धाक राहिलेला नाही किंवा त्यांना कुणाचे तरी संरक्षण मिळत आहे.”

“आज महाराष्ट्रातील युवक बेरोजगारीच्या संकटाशी झुंज देत आहेत. महायुती सरकारने या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे. हा पेपर नेमका कसा फुटला? त्यामागे कोणते रॅकेट कार्यरत आहे? त्याला राजकीय किंवा प्रशासकीय संरक्षण आहे का? याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. केवळ लहान-मोठ्या दलालांना अटक करून चालणार नाही, तर या रॅकेटमधील सूत्रधार आणि त्यांना संरक्षण देणाऱ्यांनाही कठोर शिक्षा झाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC