Source :- ZEE NEWS
Viral Video: आयुष्यात एकदा तरी स्कायडायव्हिंग करावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र ते करण्यासाठी कधी पैसे नसतात, तर कधी ती हिंमत एकवटता येत नाही. यादरम्यान स्कायडाव्हिंग करताना किती सुरक्षितता बाळगावी लागते हे दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत स्कायडाव्हवर विमानातून उडी मारल्यानंतर विमानाच्या मागच्या शेपटीत अडकल्याचं दिसत आहे. हजारो फूट उंचीवर स्कायडायव्हर हवेत लटकत होता. ऑस्ट्रेलियामध्ये ही घटना घडली असून, अधिकाऱ्यांनी व्हिडीओ जारी केला आहे.
सप्टेंबरमध्ये केर्न्सच्या दक्षिणेला एका स्टंटदरम्यान ही घटना घडली होती. सुदैवाने यामध्ये स्कायडायव्हर बचावला आहे. मात्र, वाहतूक सुरक्षा नियामक संस्थेच्या तपासानंतर ही घटना आता समोर आली आहे.
15 हजार फूट (4600 मीटर) उंचीवर पॅराशूटिस्ट्सद्वारे 16-मार्गी फॉर्मेशन करण्याची योजना होती, ज्याचे चित्रीकरण एका पॅराशूटिंग कॅमेरा ऑपरेटरने केले होते. मात्र, पहिला स्कायडाव्हर विमानाच्या दरवाजाजवळ पोहोचताच गोंधळ उडाला.
ऑस्ट्रेलियन ट्रान्सपोर्ट सेफ्टी ब्युरोने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे, स्कायडाव्हरच्या रिझर्व्ह पॅराशूट उघडले गेले आणि पंख्यात (विंग फ्लॅप) अडकले. नारंगी रंगाचे रिझर्व्ह पॅराशूट विमानांच्या शेपटीभोवती गुंडाळले गेल्याने तो पॅराशूट जंपर मागे फेकला गेला आणि त्याचे पाय विमानाला धडकले.
ब्युरोने एका अहवालात सांगितलं की, या घटनेत पॅराशूट जंपरने कॅमेरा ऑपरेटरलाही खाली ढकलले, जो विमानाच्या बाजूला बसून उडी मारण्याची तयारी करत होता. या अहवालात नाव, वय किंवा स्त्री-पुरुष यांसदर्भात उल्लेख करण्यात आलेला नाही.
जम्पर या सगळ्या प्रकारामुळे काही काळासाठी गोंधळला होता. इतक्या मोठ्या उंचीवर हवेत लटकत असताना, जम्परने प्रसंगावधान दाखवत हुक नाईफच्या सहाय्याने राखीव पॅराशूटच्या दोऱ्या कापल्या आणि आपली सुटका करुन घेतली. त्यानंतर त्याने आपले मुख्य पॅराशूट उघडले आणि जमिनीवर सुरक्षितपणे उतरला.
“हुक नाईफ सोबत बाळगणे ही आवश्यकता वाटत नसली तरी, राखीव पॅराशूट अचानक उघडल्यास ते जीव वाचवणारे ठरू शकते,” असं ब्युरोचे मुख्य आयुक्त अँगुस मिशेल म्हणाले.
या घटनेमुळे विमानाचे शेपूट थोडेसे खराब झाले आणि वैमानिकाचे विमानावर मर्यादित नियंत्रण होते. त्याने ‘मेडे’ असा आपत्कालीन संदेश पाठवला, परंतु अखेरीस त्याने विमान सुरक्षितपणे उतरवण्यात यश मिळवले.
SOURCE : ZEE NEWS

