Source :- BBC INDIA NEWS

जवळपास वीस दिवस उलटून गेले असूनही त्यावर अद्याप काही उपाय सापडलेला नाही.

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील 12-13 गावांमधील काही लोकांचे केस गळत आहेत. ही समस्या इतकी गंभीर आहे की या गावांतील काही लोकांना 3-4 दिवसांतच टक्कल देखील पडत आहे.

केसगळतीच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. शेगाव तालुक्यात 150 तर नांदुरा तालुक्यात केसगळतीचे 7 असे 157 रुग्ण या भागात आढळून आले आहेत.

परंतु अचानक ही केस गळती का होत आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांना टक्कल का पडत आहे याचा तपास करण्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) चे पथक बुलढाण्यात दाखल झाले आहे.

दिल्ली, भोपाळ, चेन्नई आणि पुणे येथील ICMR च्या तज्ज्ञांची पथकं या गावांमधे जाऊन तपासणी करत आहे.

या संपूर्ण घटना क्रमाला आता जवळपास वीस दिवस उलटून गेले असूनही त्यावर अद्याप काही उपाय सापडलेला नाही. ही केसगळती संसर्गजन्य आहे का? यामागे काय कारणं असू शकतात? लोकांनी काळजी करण्याचं कारण आहे का? याबाबत जाणून घेऊयात.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

तज्ज्ञ काय म्हणतात?

आयसीएमआरच्या तज्ज्ञांच्या पथकानं या गावांमध्ये रुग्णांची तपासणी सुरू केली आहे. या प्रकरणावर भोपाळ आयसीएमआरचे तज्ज्ञ डॉ. राज तिवारी यांनी बीबीसी मराठीशी चर्चा केली.

त्यांनी सांगितल्यानुसार, “या केसगळतीमागे दोन मुख्य कारणं असू शकतात. यामध्ये हा एक प्रकारचा संसर्ग असू शकतो किंवा जड धातू किंवा रासायनिक घटक शरीरामध्ये जमा झाल्यामुळं देखील ही केस गळती होऊ शकते.”

 ICMR च्या तज्ज्ञांची पथकं या गावांमधे जाऊन तपासणी करत आहेत.

डॉ. तिवारी म्हणाले की,”आम्ही पर्यावरणाच्या हिशोबानं रक्त, लवघी, अन्नं, पाणी आणि मातीचे नमुने घेणार आहोत. भोपाळला आमच्या प्रयोगशाळेत जाऊन त्याचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर या मागचं नेमकं कारण आम्हाला समजू शकेल.

“मात्र, या नमुन्यांचा अहवाल येईपर्यंत साधारण एक महिन्याचा कालावधी तरी नक्कीच लागेल. आम्ही प्रत्येक माणसाचे जवळपास 5-6 नमुने घेत आहोत. अशाप्रकारे 50 लोकांना घेतलं तरी जवळपास 250-300 नमुने होतील,” असंही पुढं ते म्हणाले.

जे जड धातू असतात ते शरीराच्या केस, नखं, रक्त आणि लघवीमध्ये जमा होत असतात. त्यामुळे रुग्णाला नक्की कोणत्या कारणामुळं त्रास होतोय याचं निदान व्हायला मदत होते. असं देखील डॉ. तिवारी यांनी स्पष्ट केलं आहे.

रुग्णांना तात्पुरती औषधी दिली जात आहेत का?

सध्या रुग्णांना केस गळती थांबवण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात कोणती औषधं दिली जात आहेत की नाही यावर बोलताना डॉ. राज तिवारी म्हणाले की, “आम्ही या रुग्णांना कोणतीही तात्पुरत्या स्वरुपातील औषधं देऊ शकत नाही.

“कारण अजून केस गळतीचं नेमकं निदान झालेलं नाही. संसर्गामुळं केस गळती होत असेल किंवा जड धातू आणि रासायनिक घटकांमुळं केस गळती होत असेल तर त्यावरील उपचार हे वेगवेगळे असतात. म्हणूनच जोपर्यंत निदान होत नाही तोपर्यंत कोणती ट्रीटमेंट या रुग्णांना द्यायची हेही सांगता येणार नाही,” असंही ते पुढं म्हणाले.

केसगळतीच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे या भागातील गावांमध्ये भीतीचं वातावरण दिसून येतंय.

फोटो स्रोत, BBC/NiteshRaut

दरम्यान काही रुग्णांचे केस गळल्यानंतर पुन्हा उगवायला सुरुवात झाली आहे. अचानक केस गळून टक्कल पडणं आणि नंतर पुन्हा नव्याने केस उगवणं याबाबत बोलताना डॉ. राज तिवारी यांनी म्हटलंय की, “ही एक चांगली गोष्ट आहे की ज्यांचे केस गळले आहेत त्यातल्या काहींचे केस पुन्हा यायला लागले आहेत. परंतु तरीही हा चिंतेचा विषय आहे. कारण आलेले केस ओढल्याने पुन्हा तुटत असल्याच्या तक्रारी येत आहेत.

“आम्ही पाहिलं की 1-2 रुग्णांच्या नवीन आलेल्या केसांची वाढ तर होत आहे. मात्र जर ते ओढले तर ते पुन्हा तुटत आहेत. मात्र आम्हाला अजून कळलेलं नाही की हे का घडत आहे. त्यामुळं जेव्हा आम्ही सगळं संशोधन पूर्ण करू तेव्हाच या मागचं सत्य काय आहे ते कळेल. यासाठी आम्ही सगळ्या पैलूंचा विचार करुन तपासणी करत आहोत,” असंही त्यांनी पुढं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान हा अतिशय चिंतेचा विषय आहे. हे सगळे तज्ज्ञ या आगळ्यावेगळ्या प्रकरणाची कसून तपासणी करत आहेत.

संसर्गजन्य व्हायरस की दुसरं काही?

या गावांमधल्या काही लोकांमध्ये अशी भीती आहे की हा संसर्गजन्य विषाणूचा आजार आहे. त्यामुळे ज्यांचे केस गळत आहेत त्यांच्यामुळे इतर लोकांनाही त्याचं संक्रमण होऊन त्यांचेही केस गळू शकतात अशी चर्चा तेथील गावकऱ्यांमध्ये आहे.

ICMR अंतर्गत तपासणीसाठी आलेले दिल्ली अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS)चे त्वचारोग तज्ज्ञ डॉ. सोमेश गुप्ता यांनी बीबीसी मराठीशी चर्चा केली.

YouTube पोस्टवरून पुढे जा

परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी ‘स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा’.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

मजकूर उपलब्ध नाही

YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

त्यांनी म्हटलंय, “हे एखाद्या व्हायरसमुळं झालेलं संक्रमण असेल असं अजून तरी वाटत नाही, शिवाय तसं काही असण्याची शक्यताही कमी वाटत आहे. कारण गावातल्या सगळ्यांनाच केस गळतीची समस्या आहे असं अजून आढळून आलं नाही. शिवाय याचं संक्रमण असून जास्त वाढत जाईल असंही वाटत नाही.”

“एकाच घरात अनेक लोकांना केस गळतीचा त्रास होताना दिसतोय. परंतु घरातल्या एकाला झाला तर बाकीच्यांना पण होतोय असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही.

“यावर ठोस असं काही सांगण्यासाठी अधिक माहितीची गरज आहे. तेव्हाच कळेल की एकामुळं कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीला हा त्रास होतोय की एकाच कारणामुळं एकाच घरातील इतरांनाही केसगळतीचा त्रास होतोय,” असं डॉ. गुप्ता सांगतात.

मात्र डॉ. सोमेश गुप्ता यांनी म्हटल्याप्रमाणं, अशा प्रकारच्या घटना फार कमी पाहायला मिळतात. एकाच वेळी इतक्या कमी काळात एवढ्या लोकांचे केस गळत आहेत. त्यामुळं हा चिंतेचा विषय नक्कीच आहे.

त्यामुळेच केसगळतीचं हे प्रकरण फक्त याच परिसरापुरतं मर्यादित आहे की अजून इतर वेगवेगळ्या परिसरामधे देखील ते पसरत चाललं आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न देखील त्यांची टीम करत आहे.

केसांचं अशा पद्धतीनं गळणं हे मानसिक धक्का देणारं

काही लोकांसाठी केसांचं अशा पद्धतीनं अचानक गळणं हे मानसिक धक्का देणारं आहे असं मत डॉ. सोमेश गुप्ता यांनी व्यक्त केलं आहे. त्यांनी म्हटलंय, “नागरिकांनी काळजी करू नये. कोणासोबत भेदभाव करू नये. हा काही कायमस्वरुपीचा आजार नाही.”

“कारण सुरुवातीला आम्हालाही कळत नव्हतं की इथं खरंच लोकांचे केस गळत आहेत की लोकांमध्ये फक्त याबाबत भीतीचं वातावरण आहे. परंतु आम्ही इथे आलो तेव्हा समजलं की खरंच लोकांचे केस गळत आहेत.”

“काही लोकांचे केस गळायला डिसेंबर महिन्यापासून सुरुवात झाली. आम्हाला तपासात असं आढळून आलं की ज्यांचे केस सुरुवातीला गळले होते त्यांचे केस आता पुन्हा पहिल्यासारखे यायला लागले आहेत,” असं पुढं ते म्हणाले.

सगळे तज्ज्ञ या आगळ्यावेगळ्या प्रकरणाची कसून तपासणी करत आहेत.

हे फार काळ चालेल असं डॉ. गुप्ता यांना वाटत नाही. ते म्हणतात, “ज्यांचे केस उशिरा गळायला सुरुवात झाली त्यांचे केस अजूनही गळत आहेत. हे केस मुळापासून जात आहेत असं नाही, ते वरच्या वर गळत आहे.

“त्यामुळे जी काही तपासणी आम्ही केली त्यावरून तरी ही कायमस्वरुपीची केस गळती असेल असं नाही वाटत. त्यामुळं मी लोकांना हेच सांगेल की घाबरून जाऊ नका. गेलेले केस परत येण्याची पूर्ण शक्यता आहे.”

दरम्यान काही गावांमध्ये केस गळतीचं प्रमाण कमी आहे, काही गावांमध्ये ते जास्त आहे तर काही गावांमध्ये अजिबातच नाहीये. ही एक पर्यावरणीय समस्या आहे की कोणता संसर्ग आहे जो पसरत चालला आहे याचा शोध घेत असल्याची माहिती डॉ. गुप्ता यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.

दरम्यान ज्या रुग्णांचे नमुने घेतले गेले आहेत, त्या नमुन्यांना ICMR आणि AIIMS च्या प्रयोगशाळांमध्ये तपासणीसाठी पाठवलं जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC