Source :- BBC INDIA NEWS

आर्टिफिशियल इंटेलिजन्स

फोटो स्रोत, Getty Images

आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आता भविष्यातील तंत्रज्ञान राहिलं नसून त्याच्या वापरासाठी आताच महाकाय म्हणता येतील अशा स्वरूपाची गुंतवणूक होते आहे.

जगातील अनेक बड्या कंपन्या त्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. त्यातून या क्षेत्रासाठीच्या पायाभूत सुविधांची निर्मिती केली जाते आहे.

मात्र आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये एवढी प्रचंड गुंतवणूक का केली जाते आहे, कोण-कोण ही गुंतवणूक करत आहे, त्यातील आव्हानं कोणती, याबद्दल जाणून घेऊया.

ओपनएआय (OpenAI) ही तंत्रज्ञान क्षेत्रातील अमेरिकन कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये (AI) पुढील पल्ला गाठण्यासाठी सरसावली आहे.

ओपनएआय, ओरॅकल आणि सॉफ्टबँक यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या स्टारगेट (Stargate) च्या माध्यमातून पुढील चार वर्षांत तब्बल 500 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली जाणार आहे. स्टारगेट ही एक नवी कंपनीच असणार आहे.

ओपनएआयच्या चॅटजीपीटी (ChatGPT) या आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित उत्पादनानं जगभर खळबळ उडवून दिली. चॅटजीपीटीमुळे एकाचवेळी जगाचं लक्ष आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ओपनएआय यांच्याकडे वेधलं गेलं.

या नव्या प्रकल्पातील काही गुंतवणूक तर लगेच केली जाणार आहे. ओरॅकल आणि सॉफ्टबँक या कंपन्यांबरोबर भागीदारी करत ओपनएआय ही कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी डेटा सेंटर्स उभारण्यासाठी तब्बल 100 अब्ज डॉलर्स (81 अब्ज पौंड) “तत्काळ” गुंतवले जाणार आहेत.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

सध्याच्या घडीला इलॉन मस्क या जगातील सर्वात श्रीमंत माणसाची संपत्ती जवळपास 433 अब्ज डॉलर आहे. यावरून ओपनएआयची 500 अब्ज डॉलरची गुंतवणूक किती महाकाय आहे आणि त्यातून नजीकच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा किती व्यापक विस्तार होणार आहे हे लक्षात येतं

ओपनएआय, ओरॅकल आणि सॉफ्टबँक या तीन बड्या कंपन्यांच्या प्रमुखांच्या उपस्थितीत, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यासंदर्भातील घोषणा केली.

ओपनएआय, ओरॅकल आणि सॉफ्टबँक या तीन बड्या कंपन्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी सुरू केला संयुक्त उपक्रम

फोटो स्रोत, Getty Images

ओपनएआयनं आधीच आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठीच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं होतं. त्यासाठी त्यांनी सरकारनं पाठिंबा देण्याचा आग्रह देखील धरला होता.

आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारख्या सर्वात अत्याधुनिक तंत्रज्ञानात एवढी प्रचंड गुंतवणूक होत असल्यानं आगामी काळात त्यातून फार मोठे बदल दिसून येतील.

म्हणूनच ओपनएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम अल्टमन म्हणाले, “मला वाटतं की या काळातील हा सर्वात महत्त्वाचा प्रकल्प ठरणार आहे.”

या क्षेत्रात सरकारी मदतीची अपेक्षा असलेलं अल्टमन ट्रम्प यांना उद्देशून म्हणाले की, “तुमच्याशिवाय हे करणं आम्हाला शक्य झालं नसतं.” या प्रकल्पावर आधीच काम सुरू झालं असलं तरी त्यांनी या कामाचं श्रेय राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना दिलं.

गुंतवणुकीतून नेमकं काय केलं जाणार आहे?

500 अब्ज डॉलर्सच्या महाकाय गुंतवणुकीतून आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत. त्यात डेटा सेंटर्सचाही समावेश असणार आहे. या गुंतवणुकीद्वारे 1,00,000 अधिक नोकऱ्या निर्माण होणार असल्याचं ट्रम्प यांचं म्हणणं आहे.

ओरॅकलचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी लॅरी एलिसन म्हणाले की या प्रकल्पातील पहिल्या डेटा सेंटरची उभारणी अमेरिकेतील टेक्सासमध्ये होते आहे. तर उर्वरित डेटा सेंटर्स इतर ठिकाणी उभारले जाणार आहेत.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात ‘द इन्फॉर्मेशन’ या तंत्रज्ञान क्षेत्राशी निगडीत वेबसाईटनं पहिल्यांदा या प्रचंड प्रकल्पाचं वृत्त दिलं होतं.

500 अब्ज डॉलर्सच्या महाकाय गुंतवणुकीतून AI साठी पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

ओपनएआयनं सांगितलं की स्टारगेट या नव्या कंपनीत युएई समर्थित एमजीएक्स ही गुंतवणूक कंपनीदेखील सहभागी असणार आहे. यासाठी एक वर्षाहून अधिक काळ वाटाघाटी झाल्या होत्या.

या प्रकल्पात इतरही भागीदार असून त्यात जगातील बड्या कंपन्यांचा समावेश आहे. मायक्रोसॉफ्ट, आर्म आणि एनव्हिडिया (NVIDIA) या तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीच्या कंपन्यादेखील या प्रकल्पात भागीदार आहेत, अशी माहिती सॉफ्टबॅंक आणि ओपनएआयनं दिली आहे.

2022 मध्ये ओपनएआयनं आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रातील स्पर्धेची सुरूवात केली होती. त्यावर्षी कंपनीनं चॅटजीपीटी बॉट (ChatGPT bot) लॉंच करून आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आगामी क्रांतीची नांदी केली होती.

चॅटजीपीटीवर युजर्सनं कोणताही प्रश्न विचारून त्याबद्दलची माहिती घेता येत होती, तसंच कोणत्याही विषयावरचं मार्गदर्शन घेता येत होतं. त्यातून या क्षेत्रात होणाऱ्या प्रचंड बदलांची झलक जगाला पाहायला मिळाली होती.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या मानवजातीच्या इतिहासातील अतीप्रगत तंत्रज्ञानाच्या क्षेत्राचा विकास आणखी वेगानं होणार आहे.

का होते आहे इतकी प्रचंड गुंतवणूक?

चॅटजीपीटीला जगभरातून तुफान प्रतिसाद मिळाला आहे. त्यानंतर ओपनएआयनं चॅटजीपीटीच्या पुढील आवृत्त्यादेखील बाजारात आणल्या आहेत.

चॅटजीपीटीच्या यशामुळे संगणकाच्या दुनियेतील गुंतवणुकीला विशेषकरून या क्षेत्रातील डेटा सेंटर्ससारख्या पायाभूत सुविधांच्या उभारणीला प्रचंड वेग आला आहे.

अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्समधील गुंतवणुकीची ही योजना काही अगदीच धक्कादायक आणि नवी नाही.

ओपनएआयचाच एक महत्त्वाचा भागीदार असलेल्या मायक्रोसॉफ्टनं या महिन्याच्या सुरुवातीला आर्टिफिशियल इंटेलिजन्स-संचालित डेटा सेंटर्सच्या उभारणीसाठी यावर्षी 80 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याचं सांगितलं होतं.

एका अहवालानुसार 2030 पर्यंत जगभरातील डेटा सेंटर्सची मागणी तिप्पट होणार आहे.

फोटो स्रोत, Getty Images

ब्लॅकरॉक या आणखी एक बड्या कंपनीच्या 100 अब्ज डॉलर्सच्या उपक्रमात देखील मायक्रोसॉफ्टचा सहभाग आहे. मायक्रोसॉफ्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी डेटा सेंटर्सच्या उभारणीवर लक्ष केंद्रित करतं आहे.

ॲमेझॉन या जगातील आणखी एका बड्या कंपनीनं गेल्या फक्त दोन महिन्यातंच जवळपास 10 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक डेटा सेंटर्सच्या क्षेत्रात केली आहे.

मॅकिन्झीनं गेल्या वर्षीच्या एका अहवालात म्हटलं होतं की 2030 पर्यंत जगभरातील डेटा सेंटर्सची मागणी तिप्पट होणार आहे. त्यात दरवर्षी 19 टक्के ते 27 टक्क्यांची वाढ होते आहे.

ही मागणी इतकी प्रचंड आहे की 2000 सालापासून आतापर्यंत उभारण्यात आलेल्या डेटा सेंटर्सच्या किमान दुप्पट क्षमतेचे डेटा सेंटर्स 2030 सालापर्यंत उभारावे लागणार आहेत.

काय आहेत आव्हानं?

अर्थात या घोडदौडीत वीजेचा पुरवठा, जमिनीची उपलब्धता आणि प्रकल्पांसाठीच्या मंजुरी यासारखे अडथळेदेखील असल्याचं विश्लेषकांचं म्हणणं आहे.

अर्थात भविष्यात जसजसा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर वाढत जाईल तसतशी डेटा सेंटर्सची मागणी देखील वाढत जाणार आहे. हे सेंटर्स चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वीज लागेल. तसंच त्यांच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात पैसा देखील लागणार आहे.

त्यातूनच यासाठी होणाऱ्या वीज पुरवठ्याबद्दल आणि त्यात होणाऱ्या परदेशी गुंतवणुकीबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत.

मायक्रोसॉफ्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी डेटा सेंटर्सच्या उभारणीवर लक्ष केंद्रित करतं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी त्यांच्या कार्यकाळात उचललेल्या शेवटच्या पावलांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंधित चिप्सची जगातील डझनभर देशांमध्ये निर्यातबंदी करण्यासाठीचे नियम पुढे आणले. त्याचं म्हणणं होतं की यामुळे अमेरिकेला आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रावर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल.

तसंच बायडन यांनी अमेरिकन सरकारच्या जमिनीवर डेटा सेंटर्सची उभारणी करण्यासाठीचे आदेश देखील दिले होते. त्यातून या डेटा सेंटर्सना लागणाऱ्या वीजेमधील अपारंपारिक किंवा पर्यापूरक वीज पुरवठ्याची भूमिका अधोरेखित झाली होती.

आर्टिफिशियल इंटेलिजन्समधील गुंतवणूक आणि त्याचं नियमन या दोन्हींच्या माध्यमातून अमेरिकन कंपन्या आणि अमेरिका पुन्हा एकदा जगावर वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज होण्याचा प्रयत्न करत आहेत.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC