Source :- ZEE NEWS

Palwasha Mohammad Zai Khan Viral Speech: पाकिस्तानमधील पाकिस्तान पिपल्स पार्टीच्या खासदार पलवशा मोहम्मद जई खान यांनी दर्पोक्ति करत भरताला धमकावण्याचा प्रयत्न केला आहे. भारतासमोर पाकिस्तानचं लष्करी सामर्थ्य अगदीच किरकोळ असतानाही पलवशा मोहम्मद जई खान यांनी अयोध्येमधील नव्या बाबरी मशि‍दीची पहिली वीट पाकिस्तानी लष्करातील सामान्य सैनिक लावेल असा फाजील आत्मविश्वास व्यक्त केला आहे. पाकिस्तानी संसदेमध्ये बोलताना पहलगाम हल्ल्यानंतर भारताबरोबरचे संबंध तणावपूर्ण झाल्याचा संदर्भ देत भारताकडून धमकावण्यात येत असल्याचा उल्लेख करताना या महिला खासदाराने ही बेताल विधानं केली आहेत. सध्या त्यांच्या भाषणाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. 

“…म्हणून भारतीय शीख सैनिक पाकिस्तानवर हल्ला करणार नाही”

पाकिस्तानी संसदेमधील विरोधी पक्ष असलेल्या पीपीपीच्या पलवशा मोहम्मद जई खान यांनी कोणताही भारतीय शीख सैनिक पाकिस्तानवर हल्ला करण्यास तयार नसल्याचा दावा करत अकलेचे तारे तोडले आहेत. “आपली भूमिका मांडताना आणि पाकिस्तानला धमकावताना त्यांनी (भारताने) हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यांच्या लष्करामधील कोणताही शीख सैनिक पाकिस्तानविरुद्ध लढाई करण्यास तयार नाही. त्यांच्यासाठी ही जमीन गुरुनानक यांची आहे. त्यांच्यासाठी ही भूमी पवित्र आहे. या भूमीच्या इंचाइंचावर गुरुनानक यांची पावलं पडली आहेत,” असा दावा पलवशा मोहम्मद जई खान यांनी केला आहे. पुढे बोलताना या महिला खासदाराने भारतातील खलिस्तानी दहशतवादी पन्नूचेही अभिनंदनही केलं आहे. “मी शिखांचे नेते पन्नू यांचे अभिनंदन करते. त्यांनी असं म्हटलं आहे की भारतीय पंजाबमधील कोणत्याही सैनिकांना आम्ही पाकिस्तानात येऊ देणार नाही असं ते म्हणाले,” असा उल्लेख केला आहे.

“नव्या बाबरीची पहिली वीट पाकिस्तानी लष्कर लावेल”

“तुमच्या इथे (पाकिस्तानमध्ये) मृतांचा सडा घालू अशी धमकी आम्हाला देत आहेत. त्यांना ठाऊक हवं की आमची फौज केवळ 6-7 लाख लोकांची नाही. इथले 25 कोटी लोक लष्करासोबत आहेत. गरज पडल्यास ते लष्करामध्ये सहभागी होतील. भुत्तो यांनी सांगितलं होतं की एक हजार वर्ष आम्ही लढू. बिलावल यांनीही याचाच उल्लेख करत पाणी वाहिलं नाही तर नद्यांमधून रक्त वाहिल असं म्हटलं आहे. मी एवढचं सांगेल की तो काळ दूर नाही. जेव्हा बाबरीमधील नव्या मशि‍दीची पहिली वीट रावळपिंडीमधील एक सामान्य सैनिक ठेवेल. तिथे पहिली अजान पाकिस्तानी लष्करप्रमुख मुनीर घालतील, असा मला विश्वास आहे,” असं म्हणत पलवशा मोहम्मद जई खान यांनी आपलं भाषण संपवलं. 

अनेकांनी उडवली या दाव्याची खिल्ली

अनेकांनी या व्हिडीओवरुन पलवशा मोहम्मद जई खान यांच्यावर टीका केल्याचं व्हायरल व्हिडीओ खालील कमेंट्समध्ये दिसत आहे. ही बाई वैतागून हे बोलत आहे, असं एकाने म्हटलं आहे. तर अन्य एकाने ज्या गोष्टी कधीच घडणार नाहीत त्याबद्दल ही बाई बोलतेय असा टोला लगावला आहे. एकाने पाकिस्तानने त्यांच्या देशांतर्गत विषयांवर आधी लक्ष दिलं पाहिजे, असा सल्ला दिला आहे.

SOURCE : ZEE NEWS