Source :- BBC INDIA NEWS

“माझ्या पत्नीचा मृतदेह झाकलेला होता. तिला फक्त पायाला थोडी जखम होती. तर तिसऱ्या नंबरवर माझ्या आईचा मृतदेह होता. तो एवढा विद्रूप आणि भयानक होता की पाहू शकत नव्हतो. पाहिल्याबरोबर मला तिथंच चक्कर आली.”
वाघाच्या हल्ल्यात पत्नी शुभांगी आणि आई कातांबाई गमावलेले मनोज चौधरी हे वर्णन करताना ढसाढसा रडत बोलत होते.
मनोज हे सिंदेवाही तालुक्यातील मेंढामल गावचे रहिवासी आहेत. अगदी महामार्गाला लागून त्यांचं घर आहे. आई आणि दोन मुलं असा त्यांचा परिवार. पण पत्नी आणि आईचा एकाचवेळी वाघाच्या हल्ल्यात जीव गेला.
आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो तेव्हा मनोज शून्यात पाहत बसलेले होते. घडलेल्या घटनेमुळं घरात पाहुणेही घरात होते. त्यांची दोन मुलं खेळत होती.
वाघाच्या हल्ल्यात एकाच दिवशी गावातील तीन महिलांचा मृत्यू झाला. तर मे महिन्यात 9 जणांनी प्राण गमावल्यानं हा विषय ऐरणीवर आला आहे.
आम्ही मनोज यांच्याशी बोलत असतानाच अंगणात बसलेल्या मनोज यांच्या सासूबाई हमसून हमसून रडत होत्या. नातवांचं काय होईल? अशी चिंता त्यांना वाटत होती.
“मुलं दिवसभर खेळतात, पण रात्री रडून उठतात. आईची आठवण आली की, कोपऱ्यात जाऊन रडत बसतात. मुलीचा संसार सुखाचा होता. जावई चांगला आहे. पण, आता मुलगी गेल्यानं जावई एकटा पडला आणि माझे दोन नातूही पोरके झाले. आईची माया कोणालाच येत नाही. माझ्या नातवांचं कसं होईल?” असं म्हणत त्यांनी हंबरडा फोडला.
मुलांकडं पाहून मनोजही भावूक झाले होते.
ते म्हणतात, “माझ्या घरात दोन बाया होत्या. वडीलही दोन वर्षापूर्वी मरण पावले. घरी काहीच नसल्यानं मजुरी केल्याशिवाय पर्याय नाही. त्या दोघी आणि मीही मजुरी करत होतो. आता खूप अडचण आली. घरात एकही बाई नाही. दोन लहान मुलं आहेत. मी त्यांचा सांभाळ करू की कामावर जाऊ? की का करू? काही सूचत नाही.”

मनोज यांच्या शेजारीच सारीका शेंडे यांचं घर आहे. त्यांचाही वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. त्यांना धीरज आणि आतिश अशी दोन मुलं आहेत.
आम्ही मनोज चौधरींच्या घरी होतो तेव्हाच धीरज आमच्याकडं आला आणि व्यथा मांडू लागला. आम्ही त्यांच्या घरी गेलो तेव्हा धीरजही आईच्या आठवणीत रडत होता.
“मी कुठूनही आलो की आई आधी स्वयंपाक करायची. आम्ही गप्पा मारत बसायचो. पण आई गेली तेव्हापासून तिथं जायची हिम्मत होत नाही. आईला वाघानं खाल्लं तेव्हा मी छत्तीसगडला कामाला गेलो होतो. तिला शेवटचं बघायची संधीही मिळाली नाही.
मी घरी आलो तेव्हा सगळे पाहुणे बसले होते. पण, आई दिसत नव्हती. आता माझा आधारच हरपलाय, जगून काय करू? कुठंतरी निघून जावंस वाटतं.”
धीरजच्या वडिलांचाही पाच वर्षांपूर्वीच मृत्यू झाला आहे. लहान भाऊ आणि त्याची पत्नी वेगळे राहतात.
वाघांच्या हल्ल्यामुळे गावकरी दहशतीत
गावात वाघाच्या हल्ल्यात प्रथमच तीन जणांचा मृत्यू झाला. त्यामुळं गावात दहशतीचं वातावरण आहे. आम्ही गावात फिरलो त्यावेळी प्रत्येक जण वाघाच्या भीतीबद्दल बोलत होता. गावाच्या मध्यभागी किराणा दुकान चालवणाऱ्या सरंपच श्रद्धा गुरनुले यांनीही ही भीती बोलून दाखवली.
“मागच्या वर्षी प्रत्येकाच्या अंगणात खाटा असायच्या. आज इतकी भीती वाटते की, बाहेर निघता येत नाही. रात्र झाली की, कुठून तरी वाघ येईल असं वाटतं,” असं त्या म्हणाल्या.
शेतीचा हंगाम सुरू झाल्यानं शेतात जावंच लागतं. त्यामुळं शेतात जायचं कसं, अशी भीती वाटते असंही त्या म्हणाल्या.

चौकात बसलेले 65 वर्षीय सदाशिव शेंडेही रात्री गावाच्या परिसरात वाघ फिरत असल्याचं सांगतात.
“वाघाची भीती आहेच. रात्री 9-10 वाजता बाहेर जातो म्हटलं, तर भीती वाटतेच. तलावाजवळून, शेतातून वाघ गावात येतात,” असं ते म्हणाले.
वाघाला गावाच्या दूर नेऊन सोडण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
तेंदूपत्त्याच्या हंगामावरही परिणाम
गावात एकाच दिवशी तीन मृत्यू झाल्यानं तेंदूपत्त्याची फळी बंद करण्यात आली. त्यामुळं यावर्षी फक्त तीन दिवस तेंदूपत्त्याचा हंगाम चालला.
त्याचा परिणाम इथल्या मुजरांवर झाला आहे. नेहमी 15 दिवसांच्या हंगामात 8-9 हजार रुपयांपर्यंत पैसे कमावणाऱ्या लोकांच्या हाती यावर्षी फक्त 1 हजार रुपये आले.
गरीब माणसानं आता काय करायचं असा सवाल याच गावातल्या तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या महिला शेवंता चौधरी उपस्थित करतात.

फोटो स्रोत, Getty Images
“आमच्या गावात अशी घटना झाली नसती तर तेंदूपत्त्याची फळी आठ दिवस तरी सुरू असती. त्यामधून चार पैसे मिळाले असते,” असं त्या म्हणाल्या.
तर तेंदूपत्ता तोडतानाही मनात वाघाची भीती असल्याचं गोपिका शेंडे यांनी सांगितलं.
“मनात वाघाची भीती राहिली तरी जंगलात पानं तोडतच जातो. आता वाघ खाओ की ठेवो, असं म्हणत पानं तोडत जातो. आम्ही आयटीआयकडे गेलो होतो. बरेच पानं तोडून आणलो. आम्हाला वाघ दिसला नाही.
पण, दुसऱ्या बाजूला हल्ला झाला. यावर्षी तीन दिवस पानं तोडले. तिसऱ्या दिवशी तीन बाया वाघानं खाल्ल्या तर तेंदूपत्ता बंदच झाला. यावर्षी फक्त हजार रुपये कमाई झाली,” असं त्यांनी सांगितलं.

महाराष्ट्रात मानव-वन्यजीव संघर्ष सर्वाधिक
या एकाच गावातल्या महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला असं नाही. फक्त मे महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यात 9 जणांचा बळी गेला आहे.
हे मृत्यू मागील काही वर्षांच्या मे महिन्यातील मृत्यूंपेक्षा जास्त आहेत. गेल्या काही वर्षांत मे महिन्यात फक्त दोन ते तीन लोकांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता, अशी माहिती वनविभागानं दिली.
मे महिन्यात मृत्यू जास्त असले तरी गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत वाघांच्या हल्ल्यातील मृत्यू कमी झालेले दिसतात.
वनविभागानं दिलेल्या आकडेवारीनुसार चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत वाघाच्या हल्ल्यात एकूण 147 जणांचा मृत्यू झाला आहे. 2021 आणि 2022 मध्ये मृत्यूंची संख्या वाढलेली आहे, तर 2023 पासून ही संख्या कमी झालेली दिसतेय.

फोटो स्रोत, Getty Images
देशातही वाघांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांचं प्रमाण हे महाराष्ट्रात जास्त आहे. 2022 मध्ये एकट्या महाराष्ट्रात वाघाच्या हल्ल्यांत 85 जणांचे मृत्यू झाले. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार 2018 ते 2022 या पाच वर्षांत सर्वाधिक मृत्यू हे 2022 मध्ये झाले आहेत.
राज्यानिहाय वाघांची संख्या
मानव-वन्यजीव संघर्ष हा महाराष्ट्रात अधिक असला तरी वाघांच्या संख्येत महाराष्ट्राचा चौथा क्रमांक लागतो.
वाईल्डलाईफ इन्स्टीट्युट ऑफ इंडियाच्या विश्लेषणानुसार पीआयबीने 2023 मध्ये काढलेल्या एक प्रेस रिलिजनुसार, देशात वाघांची सरासरी संख्या 3682 आहे. तसेच चार राज्यांत सर्वाधिक वाघ आहेत.

प्रशासनाकडून काय उपाययोजना?
देशात महाराष्ट्रात सर्वाधिक मानव-वन्यजीव संघर्ष दिसतो. त्यापैकी चंद्रपुरात हा संघर्ष सर्वाधिक पाहायला मिळतो. पण हा संघर्ष कमी करण्यासाठी वनविभाग नेमक्या काय उपाययोजना करत आहे?
याबद्दल चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर म्हणाले की, “या भागात मोठ्या प्रमाणात वाघाचा वावर असल्यामुळे आपण काही उपाययोजना केलेल्या आहेत. आपण गावागावात प्रायमरी रिस्पॉन्स टीम नेमल्या आहेत ज्याला प्राथमिक दल म्हणतो.
त्यांच्या माध्यमातून तेंदू संकलनकर्त्यांना पूर्वसूचना दिली जाते. त्यांच्यावर निगराणीसुद्धा ठेवतो. जंगलात जाण्याची आणि येण्याची वेळ आहे. ती मर्यादीत असते. सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही वेळ आहे अशा वनविभागाच्या स्पष्ट सूचना आहेत.”

फोटो स्रोत, Getty Images
“तरीही काही लोक भल्या पहाटे किंवा सायंकाळपर्यंत जंगलात असतात. त्यामुळं वाघासोबत संघर्ष वाढतो. तेंदू तोडायला समूहानं जाण्याच्या सूचना असतात. समूहानं राहून संकलन केलं तर अशा प्रकारच्या घटना थांबतात.
पण, जास्तीत जास्त तेंदूपत्ता गोळा करण्याच्या प्रयत्नात लोक एकएकटे घनदाट जंगलात जातात. पिल्लं असलेली वाघीण अतिशय प्रोटेक्टीव्ह असते. त्यामुळे अशाप्रकारचे हल्ले होतात,” असंही त्यांनी सांगितलं.

चंद्रपूर, गडचिरोली इथल्या जंगलात राहणारे आदिवासी आहेत. पण, त्यांनी वनजमिनींवर अतिक्रमण केल्याचा आरोपही त्यांच्यावर केला जातो.
याबद्दल ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, “ताडोबा आणि पेंचमधील वाघ असे पसरले आहेत की सरपण गोळा करायला गेलेल्या महिलांना ठार मारतात, आणि हे लोक म्हणतात की आदिवासींनी जंगलावर अतिक्रमण केलेलं आहे.
मी गेल्या 100 वर्षातील महसूल रेकॉर्ड पाहिले आहेत जिथली गाव तिथेच आहेत. त्यांनी अतिक्रमण केलेलं नाही.
पण आदिवासींनी अतिक्रमण केलं मग त्यांना वाघ मरणारच, त्यात काय बिघडतंय असं बोलून हे लोक मोकळे होतात.
मी म्हणालो की तुम्ही त्या गावामध्ये येऊन राहा आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या पत्नीसोबत सरपण गोळा करायला जा. वाघाने तुमच्यावर हल्ला केला की त्याला नमस्कार करा.”
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC