Source :- ZEE NEWS

YouTuber Jyoti Malhotra : पाकिस्तानसाठी (India Pakistan Tension) हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या हरियाणाच्या युट्यूबर ज्योती मल्होत्राचं पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील अधिकाऱ्यांची असणारं नातं सध्या अनेक चर्चांना वाव देत असून, त्यातूनच ज्योतीचा पाकिस्तनातील वावर तिच्या हेरगिरीच्या आरोपांसाठीचे ठोस पुरावे टप्प्याटप्प्यानं समोर आणत आहे. 

दानिश अलीसोबतचं ज्योतीचं बोलणं, तिचं सतत पाकिस्तानात जाणं, तिथं दहशतवादी तळावर कथित स्वरुपात मुक्काम करणं हे असे पुरावे समोर येत असतानाच आता आणखी एक महत्त्वाच्या गोष्टीचा खुलासा झाला आहे. पाकिस्तानातील गुन्हे शाखेच्या अली हसन याच्यासोबतचा तिचा आणखी एक व्हॉट्सअॅप चॅट नुकताच समोर आला आहे.

या गप्पांमध्ये अली हसन ज्योतीला सांगतो…

अली हसन- माझ्या मैत्रिणी.. माझे मन नेहमीच प्रार्थना करतें की तू आनंदी राहा. नेहमी हसत आणि हसवत राहा… तुला आयुष्यात कधीही दुःख होणार नाही.

यानंतर ज्योतीने अली हसनला हसणारा इमोजी पाठवला आणि त्याला सांगितलं…

ज्योती- माझे लग्न पाकिस्तानात कर.

अलीकडे थेट लग्नाचा विषय काढण्याच्या ज्योतीच्या या मेसेजमधून आणि या दोघांच्या या गप्पांमधून हे स्पष्ट होतंय की ज्योतीचं पाकिस्तानशी भावनिक नातंही होतं. सूत्रांच्या माहितीनुसार, ज्योती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या अधिकारी अली हसनसोबत सतत संपर्कात होती आणि त्यांच्याशी तिचं बऱ्याचदा बोलणं होत होतं. 

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, तपासादरम्यान पोलिसांना ज्योतीच्या 4 बँक खात्यांबद्दल माहिती मिळाली. यामध्ये एका बँक खात्यात दुबईहून झालेला व्यवहारही आढळला. तपास यंत्रणा आता ज्योतीच्या सर्व बँक खात्यांची तपासणी करत आहे आणि तिच्या खात्यात पैसे कुठून येत होते हेसुद्धा शोधण्याचा प्रयत्न करत आहे.

ज्योतीनं तपासादरम्यान काय सांगितलं? 

इथं ज्योतीनं पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी साधलेला संवाद हळुहळू समोर येत असतानाच तिनंही पोलिसांना आपण पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या संपर्कात असण्याची कबुली दिली. तपासादरम्यान ज्योती म्हणाली, ‘माझं एक युट्यूब चॅनल आहे ज्याचं नाव आहे Travel with JO. माझ्याकडे पासपोर्ट आहे, माझा पासपोर्ट क्रमांक आहे 56098262. मी 2023 मध्ये पाकिस्तानला जाण्यासाठी व्हिसा क्रमांक मिळवण्यासाठी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात गेले होते’, असं ज्योती म्हणाली. 

आम्ही बोलण्यास सुरुवात केली

ज्योतीनं तिच्या जबाबात दिलेल्या माहितीनुसार तिथं तिची भेट एहसान-उर-रहिम म्हणजेच दानिशशी झाली आणि त्यानं, मी एकमेकांचे मोबाईल क्रमांक घेतले, आम्ही बोलण्यास सुरुवात केली. पुढे ज्योतीनं पाकिस्तानात दोनदा भेट दिली आणि तिथं दानिशनं तिची भेट अली हसन नावाच्या त्याच्या सहकाऱ्याशी घडवून आणली. 

अलीविषयी माहिती देताना ज्योतीनं सांगितलं, ‘अली हसननं तिथं माझ्या राहण्याची आणि पाकिस्तानात फिरण्याची सोय केली. अली हसननंच पाकिस्तानी संरक्षण अधिकारी आणि इटलीच्या अधिकाऱ्यांशी माझी भेट घडवून आणली. जिथं मी शाकीर आणि राणा शहबाजला भेटले. मी शाकिरचा मोबाईल क्रमांक घेतला आणि कोणाला संशय येऊ नये यासाठी त्याचा नंबर जट रंधावा नावानं मोबाईलमध्ये सेव्ह केला. मी पुन्हा भारतात परतले…’

भारतात परतल्यानंतर पाकिस्तानाचील या व्यक्तींशी ज्योतीनं व्हॉट्सअॅप, स्नॅपचॅट, टेलिग्रामच्या माध्यमातून संपर्क ठेवला आणि इथूनच संवेदनशील माहितीची देवाणघेवाण सुरू झाली. ज्योतीनं आतापर्यंत दिलेल्या माहितीतून अनेक मोठे पुरावे तपास यंत्रणांच्या हाती लागले असून त्या धर्तीवर आता तपास यंत्रणा पुढे कोणती कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

SOURCE : ZEE NEWS