Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, Getty Images
पहलगाम येथील पर्यटकांवर झालेल्या कट्टरतावादी हल्ल्याने जम्मू काश्मीरमधील शांततेला धक्का बसला आहे. पर्यटकांच्या सुरक्षेची चिंता अधिक तीव्र झाली आहे. अनेक स्थानिक व्यवसाय आणि हॉटेल्स व्यावसायिक त्यांच्या अस्तित्वासाठी संघर्ष करताना दिसत आहेत. काश्मीर खोऱ्यातील पर्यटन उद्योगावर हिंसाचाराचा मोठा परिणाम झाला आहे.
मंगळवारी (22 एप्रिल) पहलगाम या जम्मू काश्मीरमधील थंड हवेच्या ठिकाणी झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
या हल्ल्यामुळं घाबरलेल्या पर्यटकांना आता जम्मू काश्मीरमधून निघून जायची ओढ लागली आहे. श्रीनगर येथील विमानतळाकडे जाणाऱ्या टॅक्सींची गर्दी सतत वाढत आहे. अनेक पर्यटक हायवेने जम्मू काश्मीरबाहेर निघून जात आहेत.
“आम्हाला भीती वाटत आहे, कारण आम्हाला माहीत नाही की, दहशतवादी कुठे आहेत आणि पुढे काय होईल,” असं पर्यटक गौतम यांनी बीबीसीला सांगितलं.
काश्मीरमध्ये येण्यापूर्वीच त्यांनी पुढील काही दिवसांसाठी वेगवेगळ्या योजना आखल्या होत्या. पण आता त्यांना आपल्या राज्यात जाण्याची घाई लागली आहे.
जम्मू काश्मीर अनेक दशकांपासून हिंसाचाराचे केंद्र राहिले आहे. परंतु, पर्यटकांवर होणारे हल्ले दुर्मीळ असतात. यापूर्वी अशा हल्ल्यांच्या घटना क्वचितच घडल्या होत्या.
सर्वात मोठा नागरी हल्ला
जम्मू काश्मिरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलं, “नागरिकांवर करण्यात आलेला हा हल्ला, गेल्या काही वर्षांतील इतर सर्व हल्ल्यांपेक्षा खूप मोठा आणि भयावह आहे.”
वर्ष 1947 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांना ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळाल्यापासून, या दोन्ही शेजारी देशांनी जम्मू काश्मीरवर दोन युद्धं लढली आहेत. दोघेही हा संपूर्ण भाग आपला असल्याचा दावा करतात, मात्र प्रत्यक्षात त्यातील केवळ काही भागच त्यांच्या ताब्यात आहे.
1980 च्या उत्तरार्धात आणि 1990 च्या दशकात जम्मू काश्मीरमध्ये असंतोष वाढला आणि दहशतवादाचा उद्रेक झाला. भारतानं पाकिस्तानवर या उठावाला मदत व निधी पुरवण्याचा आरोप केला. या अस्थिर आणि अशांत वातावरणात हजारो लोकांनी आपला जीव गमावला.
दहशतवाद कमी झाल्याचा केला होता दावा
गेल्या काही वर्षांत हिंसाचारात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे, असा केंद्र सरकारने दावा केला होता. मार्च महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत सांगितले, “2004 ते 2014 या कालावधीत 7,217 दहशतवादी घटना घडल्या, पण 2014 ते 2024 दरम्यान हा आकडा केवळ 2,242 वर आला.”
पर्यटन हा जम्मू काश्मीरमधील परंपरागतपणे चालत आलेला व्यवसाय आहे. येथील अर्थव्यवस्थेचा तो एक मोठा आधार आहे. गेल्या काही काळात यात पुन्हा एकदा वाढ झाली होती.

फोटो स्रोत, Getty Images
भारताच्या पर्यटन मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 2023 मध्ये 2 कोटींहून अधिक पर्यटकांनी या प्रदेशाला भेट दिली, जी कोविडपूर्व पातळीपेक्षा 20 टक्क्यांनी जास्त आहे.
परंतु, पहलगाममधील हल्ल्याने या वाढलेल्या पर्यटनाला धक्का देण्याची शक्यता निर्माण निर्माण झाली आहे.
आता सर्व काही संपलं…
“सर्व काही संपलं आहे, मला अश्रू अनावर झाले आहेत,” अत्यंत उद्विग्न होऊन पहलगामधील शाल विक्रेते शकील अहमद बीबीसीला सांगत होते. ते म्हणाले, “आमचं संपूर्ण आयुष्य पर्यटकांवर अवलंबून आहे. मी बँकेकडून कर्ज घेतलं होतं, पण आता माझा माल मी कोणाला विकायचा?”
जावेद अहमद एक हॉटेल व्यावसायिक आहेत. त्यांनी या हल्ल्याला ‘भीषण’, ‘अमानवी’ म्हटलं. काश्मिरी लोकांसाठी आणि या भागातील पर्यटन उद्योगासाठी ही वाईट बातमी आहे, असं ते म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
अहमद यांच्या हॉटेलमधील सर्व रुम्स जूनपर्यंत बुक झाल्या होत्या. परंतु, या हल्ल्यानंतर पर्यटकांनी आपलं बुकिंग रद्द केल्यामुळं ते आता तणावात आले आहेत. आपल्या व्यवसायावर याचा परिणाम होईल असं त्यांना वाटतं.
ही काश्मीर खोऱ्यातील पर्यटनाच्या हंगामाची सुरुवात आहे. यासाठी देशभरातून पर्यटकांची येथे गर्दी होते. उन्हाळ्यात हे थंड हवेचं ठिकाण पर्यटकांसाठी एक आवडीचं पर्यटनस्थळ मानलं जातं आणि शाळांना सुट्ट्या असल्यामुळं पर्यटक सहकुटुंब इथे येतात.
परंतु, या सुट्टीच्या हंगामात आता परिस्थिती वेगळी असू शकते. कारण या खोऱ्यात कडक सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे.
पर्यटकांमध्ये भीती आणि राग
मुंबईतील अभिषेक हॉलिडेजचे अभिषेक संसारे, जे ग्रूप टूरची व्यवस्था करतात, त्यांनी बीबीसीला सांगितलं की, श्रीनगरमध्ये आधीच असलेल्या काही पर्यटकांमध्ये ‘गोंधळ’ आहे आणि ज्या पर्यटकांनी नंतर येण्याचं ठरवलं होतं त्यांच्यामध्ये ‘भीती आणि राग’ दोन्ही आहे.
“अनेक जण त्यांच्या सहली रद्द करत आहेत. सहली रद्द करण्याचं प्रमाण वाढलं आहे,” असं अभिषेक संसारे यांनी सांगितलं.
जगभरातील नेत्यांनी हल्ल्याचा निषेध केला आहे, तर भारतीय पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी गुन्हेगारांना कडक शिक्षा देण्याचं आश्वासन दिलं आहे. सामान्य काश्मिरींनी देखील पीडितांसाठी न्यायाची मागणी करत निषेध मोर्चे काढले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानची कोणतीही भूमिका नसल्याचं म्हटलं आहे.
ते म्हणाले, “भारत सरकारविरोधी घरगुती बंडखोरीचे वर्णन करत या हल्ल्याबद्दल पाकिस्तानवर आरोप करणं खूप ‘सोपं’ आहे.”
पहलगाम लाइन ऑफ कंट्रोलपासून (नियंत्रण रेषा), ज्याला भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वादग्रस्त काश्मीर प्रदेशाचे विभाजन करणारी वास्तविक सीमा मानली जाते, ती सुमारे 200 किलोमीटर अंतरावर आहे.
370 हटवलं, विविध प्रकल्पांची घोषणा पण…
भारताच्या सत्ताधारी पक्षाने 2019 मध्ये विशेष स्वायत्तता देणारा घटनात्मक दर्जा रद्द केल्यापासून आणि राज्याला दोन संघराज्य शासित प्रदेशांमध्ये, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये विभागल्यानंतर दोन अण्वस्त्रधारी देशांदरम्यानचे संबंध बिघडले आहेत.
केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर संवाद साधनांवर बंदी घालण्यात आली, शाळा आणि कार्यालये महिनोंमहिने बंद राहिले आणि पत्रकारांनी भाषण स्वातंत्र्यावर बंधने घातल्याचा आरोप केला होता.
सर्वोच्च न्यायालयाने स्वायत्तता देणारा घटनात्मक राज्याचा दर्जा रद्द करण्याच्या विरोधातील अनेक याचिकांवर सुनावणी केली. त्यांनी या निर्णयाला मान्यता दिली आणि केंद्र सरकारला पाच वर्षांच्या आत त्या प्रदेशात निवडणुका घेण्याचे निर्देश दिले.

फोटो स्रोत, Getty Images
पुढील काही वर्षांत केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधील पर्यटनाला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. श्रीनगरमध्ये 2023 मध्ये जी 20 पर्यटन कार्यगटाची बैठक आयोजित केली होती. यामध्ये अनेक विदेशी प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला होता.
2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढल्यानंतरच्या पहिल्या भेटीदरम्यान 6 हजार 400 कोटी रुपये (774 मिलियन डॉलर; 607 मिलियन पौंड) किमतीच्या स्थानिक कृषी आणि पर्यटनासाठी विविध प्रकल्पांची घोषणा केली होती.
“जम्मू आणि काश्मीर आता विकासाच्या नवीन उंचीवर पोहोचत आहे. कारण आता ते मोकळेपणाने श्वास घेत आहे. कलम 370 हटवल्यानंतर हे स्वातंत्र्य मिळाले आहे. तो एक अडथळा होता,” असं मोदींनी श्रीनगरमधील म्हटलं होतं.
परंतु, काहींनी सुरुवातीला पर्यटकांच्या संख्येतील वाढीबाबत सतर्कतेचा इशारा दिला होता.
पर्यटन वाढलं म्हणजे परिस्थिती सामान्य नाही
उमर अब्दुल्ला यांनी 2022 मध्ये म्हटलं होतं, “पर्यटन ही सामान्य स्थिती नाही, तो आर्थिक विकासाचा मापदंड आहे. सामान्य स्थिती म्हणजे भीतीचा अभाव, दहशतवाद्यांना मर्जीप्रमाणे हल्ला करण्याची क्षमता नसणे, लोकशाही शाश्वत असणे. पण ज्या कोणत्या मापदंडानुसार तुम्ही तुलना करत असाल, त्यानुसार जम्मू काश्मीर आजही सामान्य स्थितीपासून दूर आहे.”
अब्दुल्ला हे 2024 मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर जम्मू काश्मिरचे मुख्यमंत्री म्हणून निवडले गेले.
पहलगाममधील हल्ल्यानंतर त्यांनी ट्वीट केलं, “भयंकर दहशतवादी हल्ल्यानंतर आपल्या पाहुण्यांची परिस्थिती पाहून ह्रदय हेलावून गेलं.”
पहलगाम हे हिल स्टेशन राज्यातील सर्वाधिक पर्यटकांची गर्दी असलेलं स्थळ आहे. हिरव्या गवतानं भरलेलं आणि अप्रतिम नैसर्गिक सौंदर्यामुळे ते चित्रपट निर्मात्यांचंही आवडतं ठिकाण आहे. ते हिंसक हल्ल्यांपासून आतापर्यंत दूर राहिलं होतं. मंगळवारचा हा हल्ला अनेकांसाठी धक्कादायक ठरला आहे.”
“संपूर्ण देशासमोर वास्तव उघडं झालं आहे,” असं मेहबूब हुसेन मीर यांनी म्हटलं. मीर यांनी श्रीनगरमध्ये काश्मीर हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशनच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाचं नेतृत्त्व केलं होतं.
“जम्मू काश्मिरचा विशेष दर्जा हटवण्यापूर्वी आणि त्यानंतरही हल्ले झाले आहेत. प्रत्येक वेळी अशांतता निर्माण होते, तेव्हा स्थानिक लोकांनाच याचा फटका बसतो. सरकारने यावर उपाय शोधला पाहिजे, अन्यथा आमचं जीवन नेहमीच असुरक्षित राहिल,” असंही त्यांनी सांगितलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC