Home LATEST NEWS ताजी बातमी आयफोन, टीव्ही, फ्रीज… रोज घरी येतात 40 पार्सल; इन्स्टाग्रामवर पत्ता शेअर केल्यानं...

आयफोन, टीव्ही, फ्रीज… रोज घरी येतात 40 पार्सल; इन्स्टाग्रामवर पत्ता शेअर केल्यानं ‘या’ इन्फ्लुएन्सरसोबत काय घडतंय?

4
0

Source :- BBC INDIA NEWS

फोन नंबर शेअर केला आणि रोज घरी यायला लागली 40 पार्सल, इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सरची एक चूक ठरली महागात

“आमच्या घरी दिवसातून किमान 30 ते 40 वेळा ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ची पार्सल येतात. घरमालक आणि शेजाऱ्यांसह सगळेच त्रस्त झाले आहेत. आता आम्हाला घर सोडावं लागणार आहे. कृपया तुमची वैयक्तिक माहिती सार्वजनिकपणे शेअर करू नका,” असं सुमंगली वीरमणी सांगतात.

मदुराईतील इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर वीरमणी यांनी सोशल मीडियावर स्वतःचा घराचा पत्ता आणि फोन नंबर शेअर केल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याकडे अमेझॉन, स्विगी आणि इतर ऑनलाइन ॲप्सद्वारे घरगुती वस्तू, खाद्यपदार्थ आणि इतर सामानाची डिलिव्हरी येत आहे.

मात्र, हे सर्व सामान ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ (COD) पद्धतीने पाठवण्यात येत असल्याने वीरमणी कुटुंबाला त्याचे पैसे देणं शक्य होत नाही आणि त्यांना ती पार्सल परत पाठवावी लागत आहेत.

(‘कॅश ऑन डिलिव्हरी’ या पर्यायात वस्तू घरी आल्यानंतर पैसे देता येतात. यासाठी आधी ऑनलाइन पेमेंट करण्याची गरज नसते.)

“सतत कोणी ना कोणी डिलिव्हरीसाठी दार ठोठावत असतं. त्यामुळे आता दार उघडायलाही भीती वाटते. आम्ही ऑर्डर दिलेली नाही असं सांगितलं तरी काही जण ऐकत नाहीत. यामुळे माझे पती परदेशात गेले आहेत आणि आमच्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे,” असं वीरमणी यांची पत्नी सुमंगली सांगतात.

दरम्यान, सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी सोशल मीडियावर घराचा पत्ता आणि फोन नंबर यांसारखी वैयक्तिक माहिती शेअर न करण्याचा इशाराही दिला आहे.

याची सुरुवात कशी झाली?

मदुराईतील वीरमणी नियमितपणे सोशल मीडियावर व्हीडिओ पोस्ट करतात. इन्स्टाग्रामवर त्यांचे तीन लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

गेल्या महिन्यात पोस्ट केलेल्या एका व्हीडिओत त्यांनी आपला फोन नंबर शेअर करत केरळला जाण्यासाठी फॉलोअर्सकडून मदतीची विनंती केली होती. आणखी एका व्हीडिओत त्यांना यासाठी 6 हजार रुपयांपर्यंत मदत मिळाल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

फोन नंबर शेअर केला आणि रोज घरी यायला लागली 40 पार्सल, इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सरची एक चूक ठरली महागात

त्यानंतर त्यांच्या काही फॉलोअर्सनी भेटवस्तू पाठवण्यासाठी घराचा पत्ता मागितला आणि वीरमणी यांनी तो सोशल मीडियावर शेअर केला.

“त्या दिवसापासून आमच्या घरी विविध वस्तू येऊ लागल्या. पण सगळं काही ‘कॅश ऑन डिलिव्हरी’वर असल्यामुळे आम्ही अडचणीत सापडलो,” असं सुमंगली वीरमणी यांनी बीबीसी तमिळला सांगितलं.

“लोक लाखो रुपयांच्या वस्तू पाठवत आहेत. त्यात आयफोन 17, टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, फर्निचर, कपडे आणि किराणा मालाचाही समावेश आहे. काही दिवसांपूर्वी तर कुणीतरी 20 किलो बिर्याणीही COD वर पाठवली होती.”

यामुळे वीरमणी यांनी इन्स्टाग्रामवर व्हीडिओ पोस्ट करत लोकांना विनंती केली, “माझ्याकडे सतत पार्सल येत आहेत. डिलिव्हरी एजंट्सनाही समजावणं कठीण होतंय. कृपया कोणीही माझ्या नावावर सामान पाठवू नका.”

नंतर आणखी एका व्हीडिओत त्यांनी म्हटलं, “लोक माझ्या घरी सतत COD वर सामान पाठवत आहेत. कुणीतरी माझा नंबर किडनी दानासाठीही दिला आहे. त्यामुळे मी परदेशात जात आहे. कृपया कोणीही माझ्या नावावर सामान पाठवू नका.”

‘100 हून अधिक पार्सल’

मात्र, सुमंगली वीरमणी यांच्या मते, त्यांच्या घरी COD पार्सल येणं अजूनही सुरूच आहे.

त्या म्हणतात, “माझे पती अजूनही मदुराईला परतलेले नाहीत. त्यांना घरी यायलाही भीती वाटते. डिलिव्हरी एजंट माझ्याकडे ओटीपी मागतात. त्यांनाही सामान कुणी पाठवलं आहे हे माहिती नसतं. काही जण आमचं म्हणणं समजून घेतात, तर काही रागावून वाद घालतात. त्यामुळे मलाही घराबाहेर पडण्याची भीती वाटते.”

झोमॅटो

सुमंगली सांगतात, वीरमणी पूर्वी मदुराईतील एका खासगी कंपनीत काम करत होते.

“आता ते बेरोजगार आहेत. ते सतत इन्स्टाग्रामवर व्हीडिओ टाकत असत. पण ही परिस्थिती निर्माण होईल, असं आम्हाला कधी वाटलं नव्हतं. घरमालक आणि शेजारीही नाराज झाले आहेत. आम्ही लवकरच हे घर सोडणार आहोत.”

एका खासगी कुरिअर कंपनीतील कर्मचारी अरुण (नाव बदललेलं) सांगतात की, वीरमणी यांच्या नावावर 100 हून अधिक पार्सल आली आहेत आणि अजूनही त्यांची डिलिव्हरी झालेली नाही.

“COD ऑर्डर परत गेल्यावर त्याचा आमच्या कामावर परिणाम होतो. त्यात लागलेला वेळ, मेहनत आणि इंधन वाया जातं. एका दिवसात एकाच पत्त्यावर 30-40 वस्तू पोहोचवायच्या असतील तर अनेक कर्मचारी तिथे जाणंसुद्धा टाळतात.”

‘प्रसिद्धीसाठी केलेल्या चुका’

सायबर सुरक्षा तज्ज्ञ आणि वकील बालू म्हणतात, “लोक सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी विचार न करता अशा गोष्टी करतात. आजच्या ऑनलाइन जगात आपण नकळत दिलेली अगदी छोटी माहितीही मोठ्या गुन्ह्यांना कारणीभूत ठरू शकते.”

ते पुढे म्हणाले, “डेटा गोपनीयता म्हणजे काय आणि तिचे परिणाम काय असू शकतात, याबाबत जनजागृतीचा अभाव असल्याने अशा घटना घडतात.”

“वारंवार लाखो रुपयांच्या वस्तू COD वर पाठवणं हा मानसिक छळाचा प्रकार आहे. याविरोधात पोलिसांत अधिकृत तक्रार करता येऊ शकते. त्यामुळे अशा ऑर्डर्स पूर्णपणे बंद होतीलच असं नाही, पण त्या कुणी पाठवल्या हे शोधून काढता येऊ शकतं.”

ऑनलाइन फॅक्ट चेकिंग करणारे तज्ज्ञ मुरलीकृष्णन चिन्नादुराई म्हणतात, “अशा प्रकारे घराचा पत्ता आणि फोन नंबर सार्वजनिक करणं आर्थिक फसवणुकीला कारणीभूत ठरू शकतं. इतकंच नाही तर बनावट ओळखपत्रही तयार केलं जाऊ शकतं.”

ते म्हणतात, “आपण कोणासोबत कोणती माहिती शेअर करतो हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ती माहिती कोणत्या उद्देशासाठी वापरली जाणार आहे, हेही तपासून पाहिलं पाहिजे.”

“सोशल मीडियावर जास्त वैयक्तिक माहिती उघड केल्यामुळे अनेक प्रकारची संकटं निर्माण होऊ शकतात. त्यामुळे काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही, याबाबत आत्मसंयम बाळगणं गरजेचं आहे.”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC