Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, ANI
“मोठं होऊन काय बनायचं बॅट्समन की बॉलर?” या प्रश्नावर क्षणाचाही विलंब न करता ‘बॅट्समन’ असं उत्तर देणारा सहा वर्षांचा चिमुकला. सुमारे दशकभरानंतर त्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. त्याचं कारण म्हणजे धोनी, विराट सारखे दिग्गज आणि जगभरातल्या चाहत्यांसमोर बेंगळुरुच्या मैदानात IPL मध्ये त्यानं 94 धावांची तुफानी खेळी केली. हा फलंदाज म्हणजे मुंबईचा मराठी पोरगा आयुष म्हात्रे.
चेन्नई सुपर किंग्जच्या संघाचा कर्णधार असलेल्या ऋतुराज गायकवाडला दुखापतीमुळं माघार घ्यावी लागल्यानंतर त्याची जागा आयुषच्या रुपानं दुसऱ्या एका मराठी फलंदाजानेच घेतली.
आयुष फक्त त्याची कमतरता जाणवणार नाही, अशी कामगिरीही करून दाखवली.
शनिवारी झालेल्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू सामन्यात आयुषनं 48 चेंडूंमध्ये 9 चौकार आणि 5 षटकार खेचत 94 धावा ठोकल्या.
त्याचं शतक हुकलं आणि चेन्नईचा विजयही अवघ्या दोन धावांनी हातून निसटला.
पण असं असलं तरी आयुषच्या या खेळीनंतर त्याची प्रचंड चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. अवघ्या 17 वर्षांच्या वयात IPL मध्ये त्याच्या कामगिरीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय.
आयपीएलमध्ये अर्धशतक ठोकणारा तो तिसरा सर्वात युवा फलंदाज ठरला.
वयाच्या पाचव्या वर्षापासून सुरू झालेला आयुषचा क्रिकेटचा प्रवास आज आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याला ओळख मिळवून देण्यापर्यंत पोहोचला आहे. त्याच्या या प्रवासात त्याच्या कौशल्याबरोबरच त्याला घ्यावे लागलेले अथक परिश्रमही महत्त्वाचे ठरले.
पाचव्या वर्षापासून क्रिकेट खेळायला सुरुवात
आयुषनं बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी मैदानावर उतरल्यानंतर त्याच्या क्लासचा वापर करत गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. भुवनेश्वर कुमारसारख्या फलंदाजाला एका ओव्हरमध्ये त्यानं 5 चौकार आणि एक षटकार लगावले. इतर गोलंदाजांचीही धुलाई केली.
पण त्याच्या या प्रवासाची सुरुवात झाली होती ती एका तपापूर्वी, म्हणजे तो अवघ्या 5 वर्षांचा चिमुकला होता तेव्हापासून झाली होती. आयुषला त्याच्या कुटुंबानं बालपणापासूनच क्रिकेटचं व्यावसायिक प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली होती.
“त्याचं टॅलेंट पाहिल्यानंतर भविष्यात काय बनेल हे त्याच्यावर आहे. पण आपण मात्र आपलं कर्तव्य म्हणून त्यांना पुढं जाण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवं,” हा त्यामागचा विचार असल्याचं आयुषचे आजोबा लक्ष्मीकांत नाईक यांनी त्या दशकभरापूर्वीच्या मुलाखतीत सांगितलं होतं.

फोटो स्रोत, ANI
दिलीप वेंगसरकर यांच्या वेंगसरकर क्रिकेट अकादमीमध्ये आयुषच्या क्रिकेटच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली होती. पण हा प्रवास सोपा नव्हता हे त्याच्या बाबतीत शब्दश: होतं.
त्याचं कारण म्हणजे आयुष मुंबईजवळच्या विरार परिसरात राहायचा. त्यामुळं त्याला क्रिकेटचं प्रशिक्षण आणि सरावासाठी तब्बल 80 किलोमीटरचा लोकलचा प्रवास करून वानखेडे मैदानाच्या समोर असलेल्या चर्चगेटला यावं लागायचं.
पण आयुषनं कधी त्याचा कंटाळा केला नाही. लोकलनं येऊन-जाऊन हा अंदाजे तीन तासांचा प्रवास होता. तरीही पण आयुष कधी उशीरा येत नसे, असं त्याचे प्रशिक्षक स्थानिक माध्यमांना सांगतात.
वडिलांनी सोडली नोकरी
कुटुंबाला आयुषमध्ये लहानपणी दिसलेलं क्रिकेटचं टॅलेंट प्रशिक्षणामुळं आणखी बहरू लागलं. त्यामुळं खेळामध्येच त्याचं करिअर करण्याच्या विचाराची सुरुवात झाली.
आयुषचे कोच प्रशांत शेट्टी यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना त्याच्या या प्रवासाबाबत माहिती दिली. आयुषचे वडील योगेश म्हात्रे हे बँकेमध्ये नोकरी करायचे. ते आयुषला क्रिकेटसाठी प्रचंड पाठिंबा देत होते. काहीही झालं तरी शब्दही न काढता त्यांनी मुलासाठी प्रयत्न सुरू ठेवले.

फोटो स्रोत, ANI
मुलाला क्रिकेटमध्ये करिअर करता यावं आणि त्याला आपल्याला पुरेसा वेळ देता यावा म्हणून आयुषचे वडील योगेश यांनी वर्षभरापूर्वी बँकेतील नोकरी सोडली आणि ते पूर्णवेळ मुलाच्या करिअरवर लक्ष केंद्रित करू लागले, असं त्यांनी या मुलाखतीत सांगितलं.
मध्यमवर्गीय कुटुंबाची आर्थिक स्थिती ही फारशी चांगली नसते. तरीही मुलासाठी त्यांनी घेतलेला हा निर्णय म्हणजे एक मोठा त्याग होता, असं प्रशांत शेट्टी म्हणतात.
प्रवास, ताणतणाव, अशा अनेक गोष्टींवर मात करत सतरा वर्षांच्या वयात आयुषनं मुंबई क्रिकेट टीममध्ये स्थान मिळवलं आणि त्याचा क्रिकेटचा प्रवास सुरू झाला.
लिलावात नाही पण नशिबानं मिळाली संधी
आयुषनं वर्षभरापूर्वीच फर्स्ट क्लास क्रिकेट खेळायला सुरुवात केली. आतापर्यंत त्यानं फक्त 9 सामने खेळले असून त्यात त्यानं दोन शतकं आणि एका अर्धशतकासह त्याची क्षमता दाखवून दिली आहे.
2024-25 च्या रणजी करंडकात चौथ्या सामन्यातच त्यानं शतक ठोकलं होतं. डिसेंबर 2024 मध्ये विजय हजारे ट्रॉफीच्या वन डे सामन्यात आयुष म्हात्रेनं 117 चेंडूंमध्ये 181 धावा केल्या आणि 150 हून अधिक धावा करणारा सर्वात तरुण क्रिकेटरही बनला.
या स्पर्धेच्या पहिल्याच मोसमात आयुषनं 65.42 च्या सरासरीनं आणि 135.5 च्या स्ट्राईक रेटसह 458 धावा केल्या होत्या.

फोटो स्रोत, ANI
आयपीएल 2025 साठीच्या लिलावात आयुष म्हात्रेवर बोली लागली नाही. पण चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडला दुखापत झाली आणि आयुषला या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली. लगेचच प्लेइंग इलेव्हनमध्येही त्याचा समावेश झाला.
आयपीएलमध्ये आयुषनं पदार्पण केलं ते मुंबई इंडियन्स विरोधात आणि वानखेडे स्टेडियमवर. त्या सामन्यात आयुषनं केवळ पंधरा चेंडूंमध्ये 32 धावा केल्या होत्या. त्यानं या खेळीदरम्यान सलग दोन षटकार आणि चार चौकार लगावले होते.
मग सनरायझर्स हैदराबाद विरोधात त्यानं 19 चेंडूंमध्ये 30 रन्सची खेळी केली. त्यानंतर शनिवारी आरसीबीच्या विरोधात केलेली त्याची 94 धावांची खेळी कौतुकास्पद ठरली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंकडून वाहवा
चेन्नई सुपर किंग्सचा प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंगनं आयुषचे फटके आणि स्वभावाचं कौतुक केलं आहे.
फ्लेमिंगनं पत्रकार परिषदेत म्हटलं की, “आयुषकडे गुणवत्ता आहे. त्याचं हँड-आय कोऑर्डिनेशन उत्तम आहे. त्याच्या बॅटचा स्विंग सुंदर आहे. पण माझ्यामते त्याचा स्वभवा आणि मोठ्या कसोटीच्या क्षणी खेळण्याची क्षमता जास्त महत्त्वाची आहे. भरपूर फटके खेळता येणं हा एक भाग झाला. पण मोठ्या स्तरावर जगातल्या काही मोठ्या खेळाडूंसमोर खेळता येणं कौतुकास्पद आहे. “
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार अॅडम गिलख्रिस्टनंही आयुष म्हात्रेचं कौतुक केलं आहे. भारतीय क्रिकेटमध्ये आयुषचं नाव पुन्हा पुन्हा ऐकू एईल असं गिलख्रिस्टनं क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

फोटो स्रोत, ANI
काही दिवसांपूर्वीच वैभव सूर्यवंशी चौदा वर्षांच्या वयात पुरुषांच्या आयपीएलमध्ये शतक ठोकणारा सर्वात युवा फलंदाज ठरला होता. आणि आता आयुष म्हात्रेचं शतक होता होता राहिलं.
पण वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे यांच्या खेळीचा उल्लेख करताना गिलख्रिस्टनं म्हटलं की, “मला त्यांच्यात तुलना करायची नाही. पण आयुषची खेळी ही क्लास असलेली खेळी होती. फक्त फटके मारण्याऐवजी मैदानावर वेगवेगळ्या भागांच खेळण्याची क्षमता आणि त्यासाठीचा गेम प्लान त्याच्याकड असल्याचं आयुषनं दाखवून दिलं.”
गेल्या वर्षभरात आयुषनं केलेल्या कामगिरीमुळं मुंबईच्या क्रिकेट वर्तुळात त्याच्या नावाची चर्चा होतीच. पण IPL मध्ये पदार्पण केल्यानंतर गेल्या दोन आठवड्यांत संपूर्ण देशातच काय पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंमध्येही या मराठी फलंदाजाची चर्चा सुरू आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC