Home LATEST NEWS ताजी बातमी ‘आयुष्य संपवण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता’; त्विषा शर्मा प्रकरणात सीबीआयचा आरोपपत्रातील दावा

‘आयुष्य संपवण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता’; त्विषा शर्मा प्रकरणात सीबीआयचा आरोपपत्रातील दावा

5
0

Source :- BBC INDIA NEWS

आयुष्य संपवण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता’; त्विषा शर्मा प्रकरणात सीबीआयचा आरोपपत्रातील दावा

फोटो स्रोत, Twisha’s family

Published

वाचन वेळ: 6 मिनिटे

(या बातमीतील काही तपशील अस्वस्थ करणारे ठरू शकतात.)

मध्य प्रदेशातील भोपाळ येथे त्विषा शर्मा यांच्या मृत्यूच्या प्रकरणात सीबीआयने त्यांचे पती समर्थ सिंह आणि सासू, माजी न्यायाधीश गिरिबाला सिंह यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.

“दोन्ही आरोपींनी (त्विषाचे पती समर्थ सिंह आणि सासू गिरिबाला सिंह) सातत्यानं केलेल्या मानसिक छळामुळे त्विषासमोर स्वतःचं आयुष्य संपवण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता,” असं सीबीआयने आरोपपत्रात म्हटलंय.

सीबीआयनं या दोघांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 85 (पती किंवा नातेवाईकांकडून क्रौर्य), कलम 108 (आत्महत्येस प्रवृत्त करणे) आणि कलम 3(5) (दोन किंवा अधिक व्यक्तींनी समान हेतूनं गुन्हा करणे) अंतर्गत आरोप ठेवले आहेत.

मात्र, सुरुवातीला सीबीआयने समर्थ सिंह आणि गिरिबाला सिंह यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 80(2) अंतर्गत हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला होता.

त्विषाच्या कुटुंबाचे वकील अंकुर पांडे यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, “सीबीआयने पुढील तपासासाठी परवानगीही मागितली आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या पुराव्यांच्या आधारे आणखी काही व्यक्तींच्या भूमिकेची चौकशी केली जाऊ शकते आणि गरज पडल्यास पूरक आरोपपत्रही दाखल केलं जाऊ शकतं.”

अंकुर पांडे यांनी हेही सांगितलं की, पहिला आणि दुसरा शवविच्छेदन अहवाल हा नोंदीचा भाग असेल. ते म्हणाले, “सीबीआयने आत्महत्येस प्रवृत्त केल्याशी संबंधित कलमं लावली आहेत, याचा अर्थ तपासात मृत्यू कथित आत्महत्या म्हणून मानण्यात आला आहे.”

(आत्महत्या ही गंभीर मानसिक आणि सामाजिक समस्या आहे. तुम्ही किंवा तुमच्या परिचयातील एखादी व्यक्ती तणावातून जात असेल तर भारत सरकारच्या ‘जीवन आस्था’ हेल्पलाइन 18002333330 वर संपर्क साधू शकता. मित्र, नातेवाईक किंवा विश्वासू व्यक्तींशीही संवाद साधणं महत्त्वाचं आहे.)

दुसरीकडे, गिरिबाला सिंह यांचे वकील इनोश जॉर्ज कार्लो यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, “सुरुवातीला जे हुंड्यासाठी छळ आणि हत्येचे आरोप केले जात होते, त्यासंबंधी तपासात कोणताही पुरावा आढळलेला नाही. सीबीआयने जबाब नोंदवलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितलं आहे की, त्विषाने अंमली पदार्थ घेतल्यानंतर गर्भपात केल्याचं सांगितलं होतं.”

कार्लो म्हणाले, “अशा परिस्थितीत पतीला आपल्या पत्नीला हे विचारण्याचा अधिकार नाही का? की तिनं गर्भपात का करवून घेतला? आम्ही सुरुवातीपासून हे सांगत आलो आहोत, पण माध्यमांनी आमची बाजू कधीच ऐकली नाही.”

मे 2026 मध्ये अटकेपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत गिरिबाला सिंह यांनी दावा केला होता की, त्विषाला काही मानसिक आणि वैद्यकीय समस्या होत्या तर समर्थ सिंह यांनी अद्याप या प्रकरणावर कोणतीही सार्वजनिक प्रतिक्रिया दिलेली नाही.

मात्र, अंकुर पांडे यांनी सांगितलं की, सीबीआयनं हुंड्यासाठी छळ या मुद्द्याचा पुढील तपास सुरू ठेवण्याची मागणी केली आहे.

सीबीआयच्या आरोपपत्रात आणखी काय?

सीबीआयच्या आरोपपत्रानुसार, त्विषा शर्मा आणि समर्थ सिंह यांची भेट फेब्रुवारी 2025 मध्ये एका ऑनलाइन डेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून झाली होती. मार्च 2025 मध्ये त्विषाने आपल्या कुटुंबाला आपण समर्थ सिंह यांच्याशी विवाह करू इच्छित आहोत असं सांगितलं.

आरोपपत्रानुसार, दोन्ही कुटुंबांच्या संमतीने 9 डिसेंबर 2025 रोजी विवाह निश्चित करण्यात आला होता. लग्नाचा संपूर्ण खर्च त्विषाच्या कुटुंबानं केला होता.

तपासादरम्यान सीबीआयनं म्हटलं आहे की, लग्नानंतर समर्थ सिंह यांनी अनेक वेळा त्विषाचा मानसिक छळ केला. आरोपपत्रात समर्थ यांनी त्विषासाठी वारंवार अपमानास्पद शब्द वापरल्याचाही उल्लेख आहे.

सीबीआयनुसार, “त्विषाचा मानसिक छळ करण्यासाठी गिरिबाला सिंह वेळोवेळी आपल्या मुलाला उत्तेजन देत असत.”

सीबीआयच्या आरोपपत्रात आणखी काय?

फोटो स्रोत, Twisha’s family

त्विषा जेव्हा समर्थविरोधातील मानसिक छळाबाबत गिरिबाला सिंह यांच्याकडे तक्रार करत असत, तेव्हा त्या आपल्या मुलाची बाजू घेत असत, असं या तपासात म्हटलं आहे.

आरोपपत्रात म्हटलं आहे की, दोन्ही आरोपींनी मिळून त्विषावर मानसिक आणि मानसशास्त्रीय दबाव आणला. त्या काळात त्विषा आपल्या वडिलांची देखभाल करत होत्या. मार्च 2026 मध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता.

तपासानुसार, वडिलांच्या उपचार आणि शस्त्रक्रियेच्या काळात त्विषा त्यांच्यासोबत होत्या. त्या काळात दोन्ही आरोपींकडून त्यांच्यावर भोपाळला परतण्याचा दबाव टाकण्यात आला. त्या 24 मार्च 2026 रोजी भोपाळला परतल्या होत्या.

गरोदरावस्था आणि त्यादरम्यान काय घडलं?

सीबीआयच्या तपासानुसार, 16 एप्रिल 2026 रोजी त्विषाने वैवाहिक घरात प्रेग्नन्सी किटद्वारे तपासणी केली आणि त्या गर्भवती असल्याचं त्यांना समजलं. दुसऱ्या दिवशी त्या समर्थ सिंह यांच्यासोबत भोपाळमधील हजेला रुग्णालयात गेल्या, तिथे त्या गरोदर असल्याचं स्पष्ट झालं.

आरोपपत्रानुसार, त्विषाला गर्भ ठेवायचा की नाही याबाबत निर्णय घेण्यासाठी काही काळ हवा होता.

त्यांनी सांगितलं होतं की, “ही गरोदरावस्था नियोजित नव्हती आणि समर्थ सिंह यांचा मानसिक छळ व अपमानास्पद वर्तन यामुळे मला याबाबत विचार करण्यासाठी वेळ हवा आहे.” असं तपासानुसार सांगण्यात येत आहे.

त्विषा

फोटो स्रोत, Twisha’s family

सीबीआयनुसार, समर्थ सिंह यांनी आपल्या आईला त्विषाच्या गर्भावस्थेबाबत माहिती दिली. 17 एप्रिल रोजी या विषयावर दोघांमध्ये वाद झाला आणि समर्थ यांनी त्विषासाठी अपमानास्पद शब्द वापरले.

आरोपपत्रानुसार, मानसिक छळ आणि अपमानास्पद वर्तनामुळे त्विषा यांची तब्येतही बिघडली होती आणि 17 एप्रिल रोजी त्यांनी सासरचं घर सोडलं.

त्या वेळी त्यांचे आई-वडील राजस्थानमधील नसीराबाद येथे होते. त्विषानं आईला फोन करून समर्थ यांच्यासोबत वाद झाल्यानंतर घर सोडल्याचं सांगितलं.

त्विषाच्या 20 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर लक्ष?

आरोपपत्रात त्विषाच्या डीमॅट खात्याचाही उल्लेख आहे. सीबीआयनुसार, त्विषाने शेअर बाजारात सुमारे 20 लाख रुपये गुंतवले होते.

तपासानुसार, या गुंतवणुकीची माहिती मिळाल्यानंतर दोन्ही आरोपींनी ही रक्कम समर्थ सिंह यांच्यासोबतच्या संयुक्त खात्यात हस्तांतरित करण्यासाठी दबाव आणला. हे संयुक्त खातं भारतीय स्टेट बँकेच्या बागमुगलिया शाखेत 7 एप्रिल 2026 रोजी उघडण्यात आलं होतं.

आरोपपत्रानुसार, ही रक्कम चिनी शेअर बाजारात गुंतवण्यासाठी हस्तांतरित करण्याचा विचार होता. मात्र, त्विषानं ही रक्कम वडिलांची असल्याचं सांगत पैसे हस्तांतरित करण्यास नकार दिला. त्यानंतरही त्यांना मानसिक छळ सहन करावा लागल्याचं तपासात नमूद करण्यात आलं आहे.

नोकरी गेल्यानंतर समर्थ सिंह त्विषाची खिल्ली उडवत असत आणि त्यांच्या इंग्रजीबाबत टिप्पणी करत असत, असंही यात म्हटलं आहे.

मृत्यूपूर्वीच्या घटनांबाबत सीबीआयचं म्हणणं

आरोपपत्रात 12 मे 2026 रोजी, म्हणजेच त्विषाच्या मृत्यूच्या रात्री, त्यांची कुटुंबीय आणि नातेवाईकांशी झालेल्या संभाषणांचाही उल्लेख आहे.

तपासानुसार, रात्री सुमारे 7:51 वाजता त्विषानं राशी अबरोल (नात्याने वहिनी) यांना फोन करून आपण परतण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं.

समर्थ सिंह गुंतवणुकीची रक्कम हस्तांतरित करण्यासाठी दबाव टाकत असल्याचंही त्यांनी सांगितलं. रात्री सुमारे 9:20 वाजता त्विषानं पुन्हा राशी अबरोल यांच्याशी संवाद साधला.

गिरिबाला सिंह

फोटो स्रोत, ANI

आरोपपत्रानुसार, त्या सतत रडत होत्या. कंबरेत दुखत असल्याने त्यांनी समर्थ सिंह यांना बेडरुममध्ये झोपण्याची विनंती केली होती. त्यानंतर समर्थ सिंह आक्रमक आणि हिंसक झाले, असं त्यांनी सांगितलं.

रात्री सुमारे 9:36 वाजता त्विषानं राशी अबरोल यांना संदेश पाठवला.

आरोपपत्रात तो संदेश नोंदवण्यात आला आहे. त्यात त्यांनी लिहिलं होतं, “त्याला (समर्थ सिंह) सांगा की, उद्या त्याच्या पत्नीचा उरलेला भाग घेऊन जावा. पण आता मला शांततेत मरू द्या.”

सीबीआयनुसार, सीसीटीव्ही फुटेजमध्ये रात्री सुमारे 9:40 वाजता त्विषा तळमजल्यावरून वर जाताना आणि एकट्या टेरेसच्या दिशेने जाताना दिसतात.

रात्री सुमारे 9:41 वाजता त्यांनी वडिलांना व्हॉट्सअ‍ॅप कॉल केला. आरोपपत्रानुसार, त्या रडत होत्या आणि समर्थ सिंह अत्यंत आक्रमक व हिंसक झाले असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांना भीती वाटत असल्याचंही त्यांनी नमूद केलं आणि कुटुंबाला तातडीनं येण्याची विनंती केली.

रात्री सुमारे 10:05 वाजता त्विषानं आईला फोन केला. आरोपपत्रानुसार, त्यांच्या आईला त्या रडताना आढळल्या. समर्थ सिंह आक्रमक आणि हिंसक झाल्याचं त्यांनी आईलाही सांगितलं.

मृत्यू आणि तपासाबाबत सीबीआयचा निष्कर्ष

आरोपपत्रात सीबीआयनं म्हटलं आहे की, दोन्ही आरोपींकडून सातत्यानं करण्यात आलेल्या मानसिक छळामुळे त्विषासमोर आयुष्य संपवण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता.

सीबीआयनुसार, 12 मे 2026 रोजी त्विषानं कथित आत्महत्या केली.

सीबीआयने त्विषाची डायरी, घटनेच्या दिवसाचं सीसीटीव्ही फुटेज आणि इतर संबंधित सामग्रीच्या आधारे न्यायवैद्यक मानसशास्त्रीय मूल्यांकन आणि वर्तनात्मक विश्लेषणही केलं.

आरोपपत्रानुसार, यात त्विषा मानसिक छळाला सामोरं जात असल्याचं, तसेच निराशा, सातत्याने मानसिक त्रास आणि सासरी सहकार्याचा अभाव हे घटक समोर आले.

सीबीआयने त्विषाचा आयफोन डेटा काढण्यासाठी नवी दिल्लीतील केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत पाठवला आहे. आरोपपत्रानुसार, या फोनमधून आरोपींविरोधातील आक्षेपार्ह सामग्री, इतर संभाव्य आरोपींची भूमिका किंवा नव्या साक्षीदारांबाबत माहिती मिळू शकते. त्याचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

आरोपींच्या घरातील डीव्हीआरमधून काढलेला डेटाही न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. रेकॉर्डमध्ये कोणतीही छेडछाड झाली आहे का, याची चौकशी करण्यासाठी हा तपास केला जात आहे. त्याचाही अहवाल अद्याप आलेला नाही.

आरोपपत्राच्या निष्कर्षात सीबीआयनं म्हटलं आहे की, तपासादरम्यान गिरिबाला सिंह आणि समर्थ सिंह यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 85, 108 आणि 3(5) अंतर्गत दंडनीय गुन्हे केल्याचं प्राथमिकरीत्या सिद्ध झालं आहे. तसेच, हुंड्याची मागणी आणि हुंडाबळी या मुद्द्यांवरील पुढील तपास सुरू ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC