Home LATEST NEWS ताजी बातमी ‘आवाजाच्या भीतीनं वडिलांना गावी नेलं, तिथं उपचाराअभावी मृत्यू झाला’; पुण्यात लाऊडस्पीकरच्या आवाजाचा...

‘आवाजाच्या भीतीनं वडिलांना गावी नेलं, तिथं उपचाराअभावी मृत्यू झाला’; पुण्यात लाऊडस्पीकरच्या आवाजाचा मुद्दा ऐरणीवर

5
0

Source :- BBC INDIA NEWS

वर्षा कदम

साऊंड सिस्टिमला विरोध केला म्हणून सोसायटीत सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागत असल्याचा दावा, मोशीमधील एका कुटुंबानं केला आहे.

“साऊंड सिस्टिमच्या मोठ्या आवाजाचा वारंवार त्रास झाल्याने आम्हाला रेफ्यूज एरियात अंधारात रहावं लागलं, या आवाजाच्या भीतीने अत्यवस्थ असलेल्या वडि‍लांना रुग्णालयातून गावी न्यावं लागलं आणि तिथं वेळी उपचार न मिळाल्यानं त्यांचा मृत्यू झाला,” असा आरोप पिंपरी चिंचवड मधल्या मोशीच्या रहिवासी वर्षा कदम यांनी केला आहे.

मुलाला एपिलेप्सिचा त्रास असल्याने त्याला आवाजाचा त्रास होतो, असं सांगूनही सोसायटीतल्या रहिवाशांनी आवाज कमी केला नाही, असा दावा त्यांनी केला आहे.

तर सोसायटीच्या प्रतिनिधींनी मात्र वर्षातून फक्त दोनच वेळा साऊंड सिस्टिम लावली जाते आणि तसंच त्याच्यापेक्षा बाहेरच्या मंगल कार्यालयाच्या आवाजाचा त्रास होत असून त्याबद्दल तक्रार का केली नाही? असा प्रतिप्रश्न केला आहे.

पण आवाजाबाबत अशी तक्रार करणाऱ्या कदम या एकट्या नाहीत. विद्यानंद बापट यांनी डीजे बंदीची मागणी केल्यानंतर आता अनेक जण पुढं येऊन आपल्याला होत असलेल्या त्रासाची मांडणी करत आहेत.

दहीहंडीच्या दिवशी लाऊडस्पीकर विरोधी पुणेकर मंचाच्या वतीने आवाजाची पातळी मोजून तक्रारींची नोंदही करण्यात आली.

पण आता तरी उपाययोजना केल्या जाणार का? असा प्रश्न पुणेकर विचारत आहेत. बापटांच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात नेमकं काय घडतंय? जाणून घेऊया.

‘धर्माच्या विरोधात आहात का?’

पिंपरी चिंचवडमधल्या मोशी मध्ये वर्षा कदम आणि त्यांचे पती गणेश कदम यांनी काही वर्षांपूर्वी घर खरेदी केलं.

त्यांनी या मुद्द्यावर बोलल्यानंतर त्यांना “तुम्ही धर्माच्या विरोधात आहात का?” असं विचारल्याचं वर्षा कदम सांगतात.

मुलाला एपिलेप्सिचा मायनर त्रास असल्यानं रुग्णालयाची गरज पडली तर पटकन जाता यावं या दृष्टीने पहिल्या मजल्यावरचं घर खरेदी केल्याचं त्या सांगतात.

पण याच पहिल्या मजल्यावरच्या घरानं शब्दश: झोप उडवली असा त्यांचा दावा आहे. सोसायटीतल्या त्यांच्या इमारतीच्या खाली गणेसोत्सवासह इतर उत्सव साजरे केले जातात. यावेळी वापरल्या जाणाऱ्या स्पीकर्समुळं मुलाची तब्येत बिघडल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

 सोसायटीतल्या त्यांच्या इमारतीच्या खाली गणेसोत्सवासह इतर उत्सव साजरे केले जातात आणि यावेळी वापरल्या जाणाऱ्या स्पीकर्स मुळे मुलाची तब्येत बिघडल्याचं वर्षा कदम यांचं म्हणणं आहे.

पहिल्या वर्षी गणपती बसवला तेव्हाच सोसायटीतील लोकांना मुलाच्या एपिलेप्सीच्या त्रासाची कल्पना दिल्याचं कदम सांगतात.

मात्र तीन वर्ष गणपती हलवला जाऊ शकत नाही, असं म्हणत सोसायटीच्या प्रतिनिधींनी तो तिथून दुसरीकडं न्यायला नकार दिल्याचं त्या सांगतात.

यानंतर मुलाला त्रास होऊ नये म्हणून सुरुवातीला सोसायटीच्या पाठीमागच्या बाजूला असणाऱ्या फ्लॅटमध्ये काही दिवस राहिल्याचं त्या सांगतात. तिथले रहिवासी आल्यावर मात्र इमारतीच्या आठव्या मजल्यावर असणाऱ्या ‘रेफ्यूज एरीया’मध्ये आसरा घ्यावा लागल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

मुलाला होणारा एपिलेप्सीचा त्रास आणि त्याच काळात असणारी परीक्षा यामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागल्याचं त्या सांगतात.

मुलाने अंधारात बसून अभ्यास पूर्ण केला मात्र सोसायटीनं आवाज कमी केला नाही असं कदम यांचं म्हणणं आहे.

बीबीसी मराठीशी बोलताना कदम म्हणाल्या, “तुम्ही धर्माच्या विरोधात आहात का असं म्हणाले? आम्ही सांगितलं की, साऊंड सिस्टिमचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही दुसरीकडे जिथं जागा दिलीय तिथं जा. तर त्यावर त्यांनी सांगितलं की गणपती बसला आहे तीन वर्ष त्याला हलवू शकत नाही.”

“तीन वर्ष आम्ही सहन केलं. त्यांनी सुरुवातीला धर्माचा मुद्दा आणला, कारण धर्म म्हणलं की लोक जास्त करतात. मात्र नंतर मुलाची परीक्षा असायची आणि मग अभ्यासाची किती वह्या पुस्तकं वर खाली ने आण करणार?”

वर्षा कदम यांची सोसायटी

कदम यांच्या मुलाला एपिलेप्सीचा त्रास आहे. मात्र पुण्यात राहणाऱ्या चिन्मय दामलेला गेली पाच वर्ष टिनिटसचा त्रास होतो. अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीच्या मोठ्या आवाजामुळे हा त्रास सुरू झाल्याचं तो सांगतो.

टिनिटस म्हणजे कानात सतत रातकिड्यांसारखा आवाज होणं. यासोबतच काही वेळा घंटा किणकिणल्यासारखा आवाजही येत असल्याचं चिन्मय मांडतो.

गेल्या पाच वर्षांमध्ये एका कानानं ऐकू येणं कमी झालंय शिवाय हा त्रासही कमी झाला नसल्याचं तो सांगतो.

बीबीसी मराठीशी बोलताना चिन्मय म्हणाला,”2021 पासून हा त्रास सुरू झाला. माझ्या घराजवळ असलेल्या एका वसाहतीचा स्पीकर इमारतीला लागून असतो. वर्षभरात साधारण महिनाभर काही ना काही कारणानं लाऊडस्पीकर सुरू असतो.”

आवाज असतो तेव्हा हा टिनिटसचा त्रास आणखी वाढतो. दहीहंडीच्या दिवशी मी विनंती करायला गेलो त्यानंतर आवाज वाढला आहे.

खिडक्या बंद करूनही आवाज 85 डेसिबल असतो. फक्त स्पीकर नाही तर गणेशोत्सवात काही सोसायट्यांच्या मिरवणुकीत ढोल-ताशा पथक असतं त्याचाही त्रास होतो,” असं त्यांचं म्हणणं आहे.

दहीहंडीच्या आणि आवाजाची मर्यादा

विद्यानंद बापट यांनी लाऊडस्पीकरचा मुद्दा मांडल्यानंतर सुरू झालेल्या लाऊडस्पीकर विरोधी मोहिमेच्या लोकांनी आवाजाची नोंद केली.

लाऊडस्पीकर विरोधी पुणेकर मंचाकडून आवाजाच्या पातळीची नोंद करण्यात आली त्यात नागरिकांकडून केल्या गेलेल्या नोंदींमध्ये 59 ठिकाणी ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारी आल्या.

पोलीस दहिहंडीच्या दिवशी 126 गुन्हे दाखल झाल्याचं सांगतात. तर गणपतीत चार बेस चार टॉप्सना परवानगी असल्याचं पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी घोषित केलं आहे.

आता गणेशोत्सवात पोलीस चार टॉप चार बेस ची परवानगी कशाच्या आधारे देत आहेत असा सवाल या मंचाचे समन्वयक मुकुंद किर्दंत उपस्थित करतात.

स्पीकर्स

बीबीसी मराठीशी बोलताना किर्दंत म्हणाले, “मुळात हे जे चार बेस चार टॉप आहे ना त्याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही. खरंतर ते बेस म्हणजे काय तर ते बॉक्स असतात. हे बॉक्स त्याचा वेगवेगळा पर्पज असतो म्हणून त्याला बेस आणि टॉप असं म्हणतात.

तर यांनी काय केलंय की मुळात कायद्यात काय तरतूद आहे की रेसिडेन्शीयल मध्ये 55 डेसिबल आणि कमर्शिअल भागात 65 डेसिबल आवाज दिवसा चालू शकतो. आता ही तरतूद असताना ही जबाबदारी कोणाकडे येते. ही जबाबदारी महाराष्ट्र प्रदूषण मंडळ यांच्याकडे आहे आणि पोलिसांनी त्यावर नियंत्रण करायचं.

आता पोलिसांनी आदेश काढलेल्या चार बेस चार टॉप याला मुळात काही आधार नाही, कारण एक बेस एक टॉप याचा आवाज कितीही वाढू शकतो आणि त्याच्यामध्ये जशी नवीन टेक्नॉलॉजी येईल त्याप्रमाणे आवाजाची इन्टेन्सिटी वाढेल.

त्यामुळे हे फक्त इन्टेन्सिटीवर आधारित असायला पाहिजे. त्यामुळे साताऱ्याला कमिश्नर वेगळंच बोलतायत, कोल्हापूरला दोन बेस दोन टॉप म्हणाले. त्यामुळे याला काही अर्थ नाही आणि हे आम्ही दहीहंडी वेळी बघितलं.

दहीहंडीला जरी 116 केस असल्या तरी आमच्या कार्यकर्त्यांनी जेव्हा डेटा कलेक्ट केला त्यातल्या तीस ठिकाणी शंभर पेक्षा जास्त डेसिबल आवाज होता. त्यामुळे याला तसा अर्थ नाही.”

आवाज आणि आरोग्याच्या समस्या

स्पीकर मुळे आरोग्याच्या अनेक प्रकारच्या तक्रारी निर्माण होत असल्याचं डॉक्टर सांगतात. काही वेळा तात्पुरतं ऐकायला कमी येणं किंवा चिन्मय दामले मांडतात तसा टिनिटसचा त्रास होणं हे त्याचे प्रमुख परिणाम असल्याचं कान नाक घसा तज्ज्ञ मांडतात.

बीबीसी मराठीशी बोलताना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे ईएनटी स्पेशालिस्ट सचिन गांधी यांनी सांगितलं की, “आपली आवाज बाहेरून मेंदूपर्यंत नेणारी जी नस असते, त्यावर छोटे हेअर सेल्स असतात. ते आवाज कॅप्चर करतात आणि मेंदूपर्यंत पोहोचवतात.

मोठ्या आवाजाचा पहिला परिणाम या हेअर सेल्सवर होतो. यामुळं तात्पुरतं ऐकू येणं कमी होऊ शकतं किंवा कानात आवाज येत राहणं असे त्रास होतात. हा कानात येणारा जो आवाज असतो त्यावर काही उपचार नाहीत.”

तर कोणत्याही प्रकारचा आवाज किंवा उजेड हा एपिलेप्सीवर परिणाम करणारा ठरू शकतो असं डॉक्टर सांगतात.

“एपिलेप्सी मध्ये ब्रेन हा हायपर एक्सायटेबल असतो. त्यामुळे कुठल्याही सेन्सेसचा जर अतिरेक झाला जसं आवाज आणि व्हिजन जर व्हिज्युअल एरीया मध्ये असलेल्या एपिलप्सी व्हिजन ने स्टिम्युलेट होतात तर आवाजाच्या एरिया वर असलेल्या एपिलेप्सी आवाजाने स्टिम्युलेट होऊ शकतात. त्यातून एपिलेप्सीचं प्रमाण वाढू शकतं.

पण हे स्टेटमेंट जनरलाईज करता येणार नाही. कारण आवाजाच्या एरियावर काही एपिलेप्सी असतात त्यावर नक्की परिणाम होतो किंवा फ्रिक्वेन्सी वाढते,” असं एपिलेप्सी सर्जन डॉ. निलेश कुरवाळे सांगतात.

सोसायटीची भूमिका

वर्षा कदम सांगतात की, त्यांनी याबाबत आपली रहिवासी सोसायटीच नव्हे तर पोलिसांकडेही तक्रार केली. काही वेळा त्यांनी आवाज कमी होईपर्यंत सोसायटीच्या बाहेर फिरत राहण्याचाही प्रयत्न करून पाहिला.

मात्र यानंतरही त्रास कमी झाला नाही. कदम यांच्या या सोसायटीतले रहिवासी आणि माजी पदाधिकारी कदम यांचे आरोप फेटाळतात.

सोसायटीचे माजी पदाधिकारी असणारे अशोक गटकळ म्हणाले, “त्यांच्या घरी जो प्रसंग घडला तो नवरात्रात घडला. आमच्या सोसायटीत साऊंड सिस्टिम धुलीवंदन आणि गणपती विसर्जनाला आणतात. त्याही वेळी ती जास्त वेळ सुरू नसते. आमच्या सोसायटीकडे दोन स्पीकर आहेत. ते आम्ही वापरतो.

त्याउलट आमच्या सोसायटीच्या बाजूला जे मंगल कार्यालय आहे त्याचा रहिवाशांना त्रास होतोय. त्याची कधी तक्रार करण्यात नाही आली. पण इथं जे लोकांनी दोन दिवस आनंदोत्सव साजरा करण्यासाठी वाजवलं त्याची तक्रार करण्यात आली.”

कदम कुटुंबियांनी सोसायटीच्या चेअरमनकडे केलेली तक्रार.

या प्रकरणात आणखी एक मुद्दा मांडण्यात आला, तो म्हणजे सोसायटीनं त्यांना वाळीत टाकलं. तर तसं काही नसल्याचं सोसायटी पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

आमची जी 700 – 800 कुटुंब राहतात कधीच कोणाला तसा काही अनुभव आला नाही. वेळोवेळी त्या कुटुंबानं काही समस्या मांडल्या असतील त्या आमच्या अंतर्गत समितीनं सोडवण्याचा प्रयत्न केला. आपण जो उत्सव साजरा करण्यासाठी ग्रुप केलाय त्यात पण त्यांना अँड केलंय.

पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 7 सप्टेंबरला दहीहंडी मध्ये झालेल्या ध्वनी प्रदूषणावरून जवळपास 10 गुन्हे दाखल झाले होते.

ईद मधल्या मिरवणुकीत पोलिसांनी 8 दिवसांच्या आत कोर्टातून निकालही मिळवला. आता गणेशोत्सवात आवाजाचा प्रश्न सुटावा यासाठी पुणे पोलीस किंवा राज्यकर्ते काय निर्णय घेणार का? असा प्रश्न आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC