Source :- BBC INDIA NEWS

Published
वाचन वेळ: 5 मिनिटे
दुबईमध्ये रविवारी (13 सप्टेंबर) खेळल्या गेलेल्या महिला टी-20 आशिया कपचा अंतिम सामना जिंकल्यानंतर, भारतीय संघानं आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांच्याकडून चषक स्वीकारण्यास नकार दिला.
तिथे एशियन क्रिकेट कौन्सिल आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख म्हणून मोहसिन नक्वी उपस्थित होते.
या सामन्यात श्रीलंकेला 72 धावांनी पराभूत केल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आपल्या सहकाऱ्यांसोबत जल्लोष साजरा करताना दिसली.
मात्र, आठव्यांदा आशिया कप जिंकवून देणाऱ्या हरमनप्रीतनं ट्रॉफी स्वीकारण्यासाठी प्रेझेंटेशन सेरेमनीला हजेरी लावली नाही.
प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित 20 षटकांत 5 बाद 183 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 20 षटकांत 111 धावांवर सर्वबाद झाला.
अंपायर्सना स्मृतिचिन्हं आणि उपविजेत्या श्रीलंकन खेळाडूंना पदके व बक्षीसाच्या रकमेचा धनादेश प्रदान केल्यानंतर बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला.
पाकिस्तानने या घटनेचा संबंध खिलाडूवृत्तीशी जोडत म्हटलंय की, खिलाडूवृत्ती नसेल तर जय-पराजयाला काही अर्थ नाही.
2025 मध्ये पाकिस्तानला हरवून आशिया कप जिंकल्यानंतरही भारतीय पुरुष संघानं मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता.
दुबईमधील सामना स्थानिक वेळेनुसार रात्री 9 वाजून 55 मिनिटांनी संपला. परंतु, बक्षीस वितरण समारंभ सुरू होण्यासाठी सुमारे 40 मिनिटे वाट पाहावी लागली. यानंतर मैदानावर थोडीफार हालचाल दिसू लागली.
अंपायर्सना स्मृतिचिन्हं देण्यात आली आणि यानंतर उपविजेता श्रीलंकन संघ आपली पदके स्वीकारण्यासाठी सज्ज झालेला दिसला.
कर्णधार चमारी अटापट्टूनं आशियाई क्रिकेट परिषदेचे प्रमुख मोहसिन नक्वी यांच्या हस्ते बक्षीसाच्या रकमेचा धनादेश स्वीकारला.
रविवारी (13 सप्टेंबर) पुरस्कार सोहळ्यात नक्वी यांच्या उपस्थितीमुळे वाद निर्माण होण्याची भीती आधीच होती.
मे 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमेवर तणाव सुरू झाल्यापासून, भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानी खेळाडू आणि त्यांच्या प्रतिनिधींशी हस्तांदोलन करणं टाळत आहेत.
गेल्या वर्षी पुरुषांच्या संघानं हे केलं आणि या वर्षी महिलांच्या संघानंही तसंच केल्याचं दिसून आलं.
भारतीय प्रशिक्षक आणि BCCI सचिव काय म्हणाले?
भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक अमोल मुझुमदार पत्रकार परिषदेत म्हणाले की, “बीसीसीआयनं घेतलेल्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे. आमच्यासाठी ही स्पर्धा संपली आहे आणि आम्ही विजेते आहोत. आमच्यासाठी हे पुरेसं आहे. मोठ्या फलकावर देखील हेच लिहिलं होतं की, भारत हा आशिया कप 2026 चा विजेता आहे. आमच्यासाठी ही स्पर्धा अधिकृतपणे संपली आहे. आम्ही विजेते झाल्याचा आम्हाला आनंद आहे आणि आता आम्ही आशियाई खेळांकडे लक्ष देत आहोत.”
फोटो स्रोत, Alex Davidson-ICC/ICC via Getty Images
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना, बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी आयएएनएस या वृत्तसंस्थेला सांगितलं की, “आशिया कपमधील ट्रॉफीबाबत वाद निर्माण झाला आहे. आमच्या पुरुष संघाने सुमारे दीड वर्षांपूर्वी आशिया कप जिंकला होता. पण एप्रिल 2025 मध्ये पहलगाममध्ये झालेल्या घटनेनंतर संपूर्ण परिस्थिती बदलली. यानंतर, देशातील लोकांकडून आमच्यावर दबाव आला की, आपण आपल्या शेजारी देशाशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवू नयेत आणि त्यांच्यासोबत क्रिकेटही खेळू नये. पण आमच्या सरकारचं धोरण आहे की, आपण बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्रत्येक देशाविरुद्ध खेळलं पाहिजे.”
मोहसिन नक्वी यांच्यासोबतच्या भेटीबद्दल त्यांनी वृत्तसंस्थेला सांगितलं की, “असं नाही की आम्ही कुणालाच भेटत नाही. नाणेफेकीपासून सामना संपेपर्यंत मी रॉयल बॉक्सच्या आसनाबाहेर बसलो होतो. मी संपूर्ण सामनाभर तिथेच होतो. सामन्यादरम्यान जो कुणी मला भेटायला आला होता, तो मला भेटला. कुणीतरी येऊन माझ्या शेजारी बसलं, मग शुक्ला (राजीव) येऊन माझ्यासोबत बसले. तुम्ही उल्लेख केलेली व्यक्ती (मोहसिन नक्वी) सुद्धा येऊन उपसभापती खालिद साहेबांच्या शेजारी बसली. ही एक सामान्य परंपरा आहे. जेव्हा कुणी येतं, तेव्हा आम्ही सर्वांना भेटतो आणि त्यांच्याशी बोलतो.”
पाकिस्तानची प्रतिक्रिया काय?
पाकिस्तानच्या ‘द डॉन’ या वृत्त संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, या घडामोडीवर प्रतिक्रिया देताना पाकिस्तानचे गृह राज्यमंत्री तलाल चौधरी म्हणाले की, ट्रॉफी स्वीकारण्यास नकार देणं हे “अत्यंत दुर्दैवी” आहे.
‘जिओ न्यूज’शी बोलताना ते म्हणाले की, यामुळे “भारताचा राजनैतिक आणि लष्करी पराभव पुसला जाणार नाही.”
त्यांनी भारतावर “क्रीडा संस्कृती नष्ट केल्याचा” आरोप केला.
फोटो स्रोत, Getty Images
तलाल चौधरी म्हणाले की, “खेळभावना महत्त्वाची आहे. तुमच्यात खेळभावना नसेल तर जिंकण्या-हरण्याला काही अर्थ नाही.”
चौधरी म्हणाले की भारतानं “संपूर्ण देशात अतिराष्ट्रवाद रुजवला आहे.”
ते म्हणाले की, “आपली क्रीडा संस्कृती ही शांतता आणि प्रेमाचं प्रतीक राहिली आहे आणि तिनं अनेक युद्धं संपवण्यातही भूमिका बजावली आहे, पण आता ती कमकुवत होत आहे.”
राज्यमंत्री म्हणाले की, पाकिस्ताननं खेळाला राजकारणाचा भाग बनवलेलं नाही, तसेच त्याला दोन्ही देशांमधील संघर्षाचं लक्ष्यही बनवलेलं नाही.
ते असंही म्हणाले की, पाकिस्तान “प्रत्येक वादग्रस्त मुद्द्यावर” चर्चा करण्यास तयार आहे.
कॅप्टन हरमनप्रीत काय म्हणाली?
सहसा, विजयी संघाच्या कर्णधाराची मुलाखत सामन्यानंतरच्या पुरस्कार सोहळ्यात घेतली जाते. मात्र, भारताच्या 72 धावांच्या विजयानंतर काही मिनिटांतच हरमनप्रीत कौरची स्वतंत्रपणे मुलाखत घेण्यात आली.
हरमनप्रीत कौर म्हणाली की, “मला वाटतं की आम्ही आमच्या ठरवलेल्या स्टँडर्डनुसारच कामगिरी केली. कारण इथं येताना आम्ही त्याचबद्दल बोललो होतो. आमचे काही ठराविक मापदंड आहेत आणि आम्हाला दररोज ते पूर्ण करावे लागतात. आम्ही सर्वांनी ज्या प्रकारे कामगिरी केली, त्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत. मला वाटतं की मुलींनी संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली. अंतिम सामन्यात 184 धावा करणं ही एक मोठी गोष्ट आहे.”
फोटो स्रोत, Getty Images
हरमनप्रीतनं विशेषतः स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा यांचे कौतुक केलं. या जोडीनं डावाची सुरुवात करत पहिल्या विकेटसाठी 129 धावा केल्या आणि आक्रमक अर्धशतके झळकावून संघाला एक भक्कम सुरुवात करून दिली.
हरमनप्रीत म्हणाली की, “आम्हा सगळ्यांना माहित होतं की दुबईच्या संथ खेळपट्ट्यांवर फलंदाजी करणं सोपं नसेल. पण आमच्या दोन्ही सलामीवीरांनी आमच्यासाठी उत्कृष्ट कामगिरी केली. स्मृती आणि शफाली ज्या पद्धतीने फलंदाजी करत होत्या, ती अप्रतिम होती. शेवटी, चांगला क्रिकेट खेळणं महत्त्वाचं असतं आणि एकूणच मी खूप आनंदी आहे.”
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC



