Source :- BBC INDIA NEWS

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हिजबुल्लाहविरोधात कारवाई आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर त्यांनी दक्षिण आणि पूर्व लेबनॉनमध्ये जोरदार हल्ले केले. या हल्ल्यांत अनेक जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ताज्या हल्ल्यांत किमान 31 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये अनेक लहान मुलांचाही समावेश आहे.
इस्रायली लष्कराने म्हटलं आहे की, त्यांनी हिजबुल्लाहच्या 100 हून अधिक ठिकाणांवर आणि सैनिकांवर हल्ले केले. एप्रिलच्या मध्यात अमेरिकेच्या मध्यस्थीने शस्त्रसंधी लागू झाल्यानंतरची ही सर्वात तीव्र बॉम्बहल्ल्यांची रात्र मानली जात आहे.
इशारा दिला आणि हल्ले केले
सोमवारी (25 मे) बेंजामिन नेतन्याहू यांनी हिजबुल्लाहविरोधातील कारवाई ‘आणखी तीव्र’ करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर हे हल्ले करण्यात आले.
मंगळवारी (26 मे) सुरक्षा मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोलताना नेतन्याहू यांनी, “लेबनॉनमधील कारवाई आम्ही आणखी वाढवत आहोत,” असं म्हटलं होतं.
ते पुढे म्हणाले, “आयडीएफ (इस्रायल डिफेन्स फोर्स) मोठ्याप्रमाणात जमिनीवर कारवाई करत आहे आणि महत्त्वाच्या भागांवर ताबा मिळवत आहे.” उत्तर इस्रायलमधील नागरिकांना हिजबुल्लाहच्या हल्ल्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी ‘सुरक्षा क्षेत्र अधिक मजबूत’ केलं जात असल्याचंही त्यांनी सांगितलं.
दोन्ही बाजूंनी वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष थांबवण्यासाठी सुरू असलेल्या चर्चांवर संकट निर्माण झालं आहे.
इस्रायलचे हवाई आणि तोफगोळ्यांचे (आर्टिलरी) हल्ले लेबनॉनमध्ये, विशेषतः दक्षिण भागात, दररोज सुरू आहेत.
दुसरीकडे हिजबुल्लाहकडून उत्तर इस्रायलमधील भागांवर आणि दक्षिण लेबनॉनमध्ये तैनात इस्रायली सैन्यावर रॉकेट आणि ड्रोन हल्ले केले जात आहेत. दक्षिण लेबनॉनच्या काही भागांवर इस्रायली सैन्याने कब्जा केला आहे.
900 वर्षे जुन्या किल्ल्याजवळ हल्ले
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हवाई हल्ल्यांमध्ये बेका व्हॅलीतील मशघरा गाव आणि दक्षिण लेबनॉनमधील बुर्ज अल-शामाली या भागांना लक्ष्य करण्यात आलं आहे.
राज्य माध्यमांनी दिलल्या वृत्तानुसार, काही हल्ले ब्युफोर्ट किल्ल्याजवळ झाले. सुमारे 900 वर्षे जुना असलेला हा किल्ला या भागातील ‘मध्ययुगीन किल्ल्यांचे उत्तम जतन केलेले उदाहरण मानले जाते’. युनेस्कोनेही त्याची दखल घेतली आहे.
सोमवारी जारी केलेल्या व्हीडिओत नेतन्याहू यांनी म्हटलं होतं की, इराण समर्थित शिया मुस्लीम गट हिजबुल्लाहच्या हल्ल्यांना उत्तर म्हणून इस्रायल आता कारवाई आणखी तीव्र करणार आहे. हिजबुल्लाहकडून फायबर-ऑप्टिक ड्रोनचा वापर केला जात असून हे ड्रोन इस्रायलच्या संरक्षण व्यवस्थेला चकवा देऊ शकतात, असंही त्यांनी सांगितलं.
“आम्ही त्यांना चोख प्रत्युत्तर देऊ,” असा इशारा त्यांनी दिला होता.
भीतीने लोकांनी गाव सोडलं
या घोषणेनंतर हिजबुल्लाहचा प्रभाव असलेल्या बैरुतच्या दक्षिण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक लोक सुरक्षिततेसाठी घरं सोडून पळून जाताना दिसले. कुटुंबांसह बाहेर पडणाऱ्या लोकांच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा रस्त्यांवर लागल्या होत्या.
रात्रभर झालेल्या हल्ल्यांमधून राजधानी बैरुत वाचली. पण इस्रायली लढाऊ विमानांनी संपूर्ण लेबनॉनमध्ये रात्रभर जोरदार हल्ले सुरू ठेवले. बीबीसीच्या माहितीनुसार, सुमारे 50 ठिकाणी डझनभर हल्ले करण्यात आले.
एनएनएने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी दक्षिण लेबनॉनमधील अरब सलीम शहरात घरावर झालेल्या हल्ल्यात एका पुरुषाचा आणि त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला. तर कौथारियेत एल रेज गावामध्ये आणखी दोघे ठार झाले.
रात्री इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमध्ये मशघरा येथील अनेक घरे उद्ध्वस्त झाली.
लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की, ढिगाऱ्यातून 11 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. यामध्ये एका महिलेचा आणि 2 लहान मुलांचाही समावेश होता. आणखी 15 जण जखमी झाले आहेत.
झोपेत असलेल्या मोहम्मदच्या घरावर क्षेपणास्त्र आदळलं
जखमींमध्ये मोहम्मद नावाच्या एका लहान मुलाचाही समावेश होता. रात्री बचाव पथक ढिगाऱ्यात वेगाने शोधमोहीम राबवत असल्याचे व्हीडिओमध्ये दिसून येते. ढिगाऱ्यामध्ये अडकलेल्या 7 वर्षीय मोहम्मदला अखेर सुखरूप बाहेर काढण्यात आलं.
“जेव्हा मला जाग आली, तेव्हा मला हालचाल करता येत नव्हती. माझ्या आजूबाजूला फक्त अंधार होता,” असं हॉस्पिटलमध्ये बेडवर असलेल्या मोहम्मदने बीबीसीला सांगितलं. हॉस्पिटलमध्ये त्याचे कुटुंबीय त्याच्याबरोबर होते.
“मला वाचवणाऱ्या लोकांचा आवाज मला ऐकू येत होता. मला बाहेर काढण्यासाठी त्यांना खूप वेळ लागला,” असं मोहम्मदने सांगितलं.
त्याच्या डोक्यावर पट्ट्या बांधलेल्या आहेत. हात आणि पायांवरही जखमा आणि ओरखडे आहेत.
फोटो स्रोत, Reuters
मोहम्मद घरात झोपला असताना क्षेपणास्त्र त्याच्या घरावर आदळलं. या हल्ल्यामध्ये त्याचे वडील आणि दोन बहिणींचा मृत्यू झाला आहे.
मशघरा गाव आता ओस पडलं आहे. रस्त्यावर क्वचितच काही गाड्या दिसतात, त्या फक्त आम्ही कोण आहोत हे पाहण्यासाठी थांबतात. गावातील जनजीवन पूर्णपणे थांबलं आहे.
पालिकेचे एक सदस्य अहमद आम्हाला रात्री हल्ले झालेल्या ठिकाणी घेऊन गेले. तिथे घरं आणि दुकानं पूर्णपणे कोसळलेली दिसत होती. सगळीकडे मोठं नुकसान झाल्याचं चित्र दिसत होतं.
अहमद म्हणाले, “मी हिजबुल्लाहचा सदस्य नाही. परंतु, गावातील सर्व लोक प्रतिकाराच्या बाजूने आहेत. आणि शत्रू (इस्रायल) कोणालाही सोडत नाही.”
इतक्यात लढाऊ विमानांच्या मोठ्या आवाजामुळे आमच्याशी बोलत असणाऱ्या अहमदला व्यत्यय येतो. एक मोठा स्फोट झाल्याचा आवाज आला आणि आम्हाला तिथून लगेच निघावं लागलं.
नंतर सोशल मीडियावर आलेल्या व्हीडिओंमध्ये आम्ही चित्रीकरण करत होतो त्या ठिकाणाजवळील रस्त्यावर मोठा स्फोट झाल्याचं दिसून आलं.
दहशतवादी ठार झाल्याचा इस्रायलचा दावा
इस्रायली लष्कराने मशघरा येथील हवाई हल्ल्यांचे व्हीडिओ जारी केले आहेत. या हल्ल्यांमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, ‘हल्ल्यादरम्यान दहशतवादी ठार झाले,’ असंही इस्रायली लष्कराने म्हटलं आहे.
इस्रायली लष्कराने सांगितलं की, रात्री दक्षिण लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहकडून वापरल्या जाणाऱ्या 90 हून अधिक शस्त्रसाठे, कमांड सेंटर, निरीक्षण ठिकाणे (ऑब्झर्वेशन पोस्ट्स) आणि इतर ठिकाणांवर हल्ले करण्यात आले.
मंगळवारी सकाळी इस्रायली लष्कराने लेबनॉनमधील अनेक भागांसाठी नवीन स्थलांतराचे आदेश (निर्वासन आदेश) जारी केले. 17 एप्रिलपासून लागू झालेल्या शस्त्रसंधीचे नियम हिजबुल्लाहकडून मोडले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
लष्कराचे अरबी भाषेतील प्रवक्ते कर्नल अविचाय अद्राई यांनी सांगितलं की, हिजबुल्लाहकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असल्यामुळे इस्रायली सैन्याला कारवाई करण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही.
हिजबुल्लाहने सांगितलं की, ‘इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याच्या प्रत्युत्तरात’ उत्तर इस्रायलमधील 3 लष्करी तळांवर आणि एका सैन्य चौकीवर हल्ला केला.
दक्षिण लेबनॉनमध्ये रविवारी (24 मे) झालेल्या चकमकीत एका इस्रायली सैनिकाचा मृत्यू झाला, असं लष्कराने सांगितलं. त्यानंतर नेतन्याहू यांनी हल्ले आणखी तीव्र करण्याचे आदेश दिले.
2 मार्चपासून सुरू झालेल्या संघर्षात हिजबुल्लाहच्या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 23 इस्रायली सैनिक आणि एका नागरी कंत्राटदाराचा मृत्यू झाला आहे.
लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, याच काळात इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये किमान 3,185 लोकांचा मृत्यू झाला आहे.
(रॉबर्ट ग्रीनॉल यांचे अतिरिक्त वार्तांकन.)
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC







