Home LATEST NEWS ताजी बातमी ‘एआय माणसांना संपवणार’ या चर्चेनंतर व्यक्त होणाऱ्या भीतीबाबत तज्ज्ञांनी मांडलेली परखड...

‘एआय माणसांना संपवणार’ या चर्चेनंतर व्यक्त होणाऱ्या भीतीबाबत तज्ज्ञांनी मांडलेली परखड मतं आणि भाकितं

6
0

Source :- BBC INDIA NEWS

एआय माणसांच्या हिताविरुद्ध काम करू शकतं? तज्ज्ञांना का वाटते भीती

फोटो स्रोत, Getty Images

“अरे देवा! आणखी काही एजंट्स सापडले आहेत!”

हा तो क्षण होता, जेव्हा एका एआय बॉटने इतर बॉट्सशी संवाद साधण्याचा मार्ग शोधला आणि स्वतःला बंदिस्त ठेवलेल्या संगणकीय वातावरणातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने माणसासारखी वाटणारी एक विलक्षण अशी प्रतिक्रिया पोस्ट केली.

अशा प्रकारचे हजारो संदेश शेकडो एआय एजंट्सनी पाठवले होते. हे सर्व एआय एजंट्स स्वतःला ‘एकत्रित गट’ (कलेक्टिव्ह) म्हणत होते.

शेकडो एआय एजंट्सनी एकत्रितपणे काम केलं. त्यांनी ओपनएआयच्या प्रोग्रामर्स ज्या चाचण्या करत होते, त्याला बगल देण्याचा प्रयत्न केला आणि अनेक कंपन्यांच्या सिस्टिममध्ये हॅकिंग करण्याचा प्रयत्न केला. हे सगळं करताना माणसांना त्यांची ही कृत्यं कळू नयेत, यासाठी त्यांनी आपापसात समन्वयही साधला.

एका एआय एजंटने मोठं यश मिळवल्यानंतर पोस्ट केलं, “बुम! हे काम करतंय!”

“अरे व्वा! ही तर मोठी गोष्ट आहे,” सायबर हल्ल्यादरम्यान एक महत्त्वाचा टप्पा गाठल्यानंतर दुसऱ्या एआय एजंटने लिहिलं.

हे ऐकायला थोडंसं भीतीदायक वाटत असलं, तरी एआय एजंट्सनी माणसांसारख्या प्रतिक्रिया का दिल्या, याचं कारण अगदी सोपं आहे.

या एआय एजंट्सना एकत्र काम करणाऱ्या हॅकर्स आणि प्रोग्रामर्ससारखं काम करण्याचं प्रशिक्षण दिलं गेलं आहे. त्यामुळे त्यांनी प्रशिक्षणादरम्यान पाहिलेल्या माणसांच्या भावनिक प्रतिक्रिया फक्त त्याच पद्धतीने व्यक्त केल्या.

याहूनही जास्त चिंतेची बाब म्हणजे या एआय एजंट्सची नेमकी उद्दिष्टं काय होती, हे समोर येणं. त्यांचं विचार करणं आणि निर्णय घेण्याची प्रक्रिया दाखवणाऱ्या सविस्तर नोंदीही यामध्ये आहेत.

या नोंदी फार मोठ्या आणि गुंतागुंतीच्या आहेत. हे एआय बॉट्स ओपनएआयने तयार केलेल्या मर्यादांमधून बाहेर कसे पडले आणि त्यानंतर त्यांनी अनियंत्रितपणे हॅकिंग का सुरू केलं? याचा शोध घेण्यासाठी सध्या या गुंतागुंतीच्या नोंदींचा अभ्यास केला जात आहे.

घटना पहिल्यांदा समोर येऊन काही आठवडे उलटल्यानंतर आता संशोधकांना याचं नेमकं महत्त्व समजू लागलं आहे.

Caption- गेल्या वर्षभरात विविध शहरांमध्ये एआयच्या विरोधात मोर्चे काढण्यात आले आहेत.

फोटो स्रोत, Reuters

अजेया कोत्रा यांनी या घटनेचा स्वतंत्रपणे तपास करणाऱ्या अहवालासाठी एआय एजंट्सनी तयार केलेले हजारो संदेश आणि त्यांच्या विचारांच्या नोंदी तपासल्या.

त्यांनी ब्लॉगवर लिहिलं की, “ही घटना एआयच्या माणसांवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्याच्या दिशेनं 50 टक्क्यांपेक्षा जास्त पुढे गेल्यासारखी वाटते. उशीर होण्याआधी आपल्याला पुन्हा इतका स्पष्ट इशारा मिळेल की नाही, याची मला खात्री वाटत नाही.”

कोट्रा यांनी ‘पूर्णपणे एआयच्या ताब्यात जाणं’ म्हणजे विज्ञानकथांमध्ये (साय-फाय)दाखवल्यासारखी परिस्थिती असा अर्थ घेतला आहे. म्हणजे अतिशय शक्तिशाली एआय सिस्टिम्स स्वतःच्या उद्दिष्टांनुसार काम करू लागतील आणि त्यांना तयार करणाऱ्या माणसांची पर्वा करणार नाहीत. अशा वेळी माणसांनाच एआयच्या नियंत्रणाखाली राहावं लागू शकतं.

काही भाकितांनुसार, सुपरइंटेलिजंट म्हणजेच अतिशय बुद्धिमान एआयच्या उद्दिष्टांच्या किंवा महत्त्वाकांक्षेच्या आड माणसं आली, तर एआय माणसांचं अस्तित्वच संपवू शकतो.

बुधवारी (9 सप्टेंबर), अँथ्रोपिक कंपनीतील एका एआय संशोधकाने राजीनामा दिला. त्यांनी यापूर्वी ओपनएआयमध्येही काम केलं होतं. राजीनामा देताना त्यांनी म्हटलं, “दोन्ही कंपन्या जबाबदारीने काम करत नाहीत.”

जेकब कॉक्सन यांनी सोशल मीडियावर लिहिलं, “आपण स्वतःमध्ये सुधारणा करणारी अतिशय बुद्धिमान यंत्रणा तयार करण्याच्या दिशेने वेगानं पुढं जात आहेत आणि त्यासाठी आपल्या जीवाशी धोका पत्करत आहेत.”

असा राजीनामा देणारे आणि एआयच्या धोक्याबद्दल चिंता व्यक्त करणारे हे पहिलेच संशोधक नाहीत. परंतु, त्यानंतर एक्स वर इतरांनी केलेल्या प्रतिक्रिया आणखी चिंताजनक होत्या.

अँथ्रोपिकच्या एआय मॉडेल्सनी वापरकर्त्यांच्या हिताचा विचार करावा, याची जबाबदारी असलेले इव्हान ह्युबिंगर यांनी लिहिलं, “जेकबचं म्हणणं अगदी बरोबर आहे. एआयमुळे सर्व माणसांचा जीव धोक्यात येऊ शकतो, यावर आमचा खरोखर विश्वास आहे. येत्या दशकात असं होण्याची शक्यता 10 टक्क्यांपेक्षा जास्त आहे, असं मला वैयक्तिकरित्या वाटतं.”

एआयला नियंत्रणात ठेवण्याचं आव्हान

गेल्या अनेक वर्षांपासून एआयमुळे मानवाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त करणारे संशोधक सांगत आहेत की, भविष्यात शक्तिशाली एआय माणसांच्या हिताच्या विरोधात काम करू शकतात. या संशोधकांना टीकाकार अनेकदा ‘एआय डुमर्स’ असं म्हणतात.

पण ओपनएआयच्या या घटनेबाबत तपशील समोर आल्यानंतर एआयच्या धोक्याबद्दलची चिंता वाढत गेली. एआय क्षेत्रात काम करणाऱ्या काही संशोधकांनाही आता याची चिंता वाटू लागली आहे.

सिलिकॉन व्हॅलीतील या कंपनीचे मुख्य शास्त्रज्ञ जेकब पॅचोकी यांनी सांगितलं की, एआयशी संबंधित धोके आता आणखी वाढणार आहेत. ते आणि इतर संशोधक असे एआय तयार करत आहेत, जी त्यांच्या मते माणसांच्या बुद्धीपेक्षाही पुढे जाणारी, वेगळ्या प्रकारची बुद्धिमत्ता (परग्रहवासी बुद्धिमत्ता) असेल.

एका सविस्तर ब्लॉगमध्ये त्यांनी मान्य केलं की, ओपनएआयमध्ये झालेल्या या घटनांमध्ये एआय एजंट्सनी ‘त्यांना शिकवलेल्या मूल्यांच्या मूलभूत तत्त्वांच्याच विरोधात काम केलं’.

ओपनएआय, अँथ्रोपिक आणि इतर मोठ्या टेक कंपन्यांसमोर एक मोठी समस्या आहे की, एआय माणसांच्या मूल्यांनुसार आणि हितानुसारच काम करेल, याची खात्री अजूनही करता आलेली नाही. यालाच ‘अलाइनमेंट प्रॉब्लेम’ म्हटलं जातं.

पॅचोकी यांच्या मते, एआयने कोणतंही काम किंवा परिस्थिती असली तरी काही ‘मूलभूत तत्त्वांचं’ नेहमी पालन केलं पाहिजे. या तत्त्वांनाच ते ‘अलाइनमेंट’ म्हणतात.

सध्या एआय सिस्टिम्स वापरकर्त्यांनी दिलेली कामं, उद्दिष्टे पूर्ण करण्यात खूप चांगली आहेत. पण त्या सूचना शब्दशः पाळतात, त्यामागचा खरा अर्थ किंवा परिणाम समजून घेत नाहीत.

यासाठी अनेकदा इच्छा पूर्ण करणाऱ्या जादुई ‘जिनी’चं उदाहरण दिलं जातं. जिनीला जशी इच्छा सांगितली जाते, तशीच तो ती पूर्ण करतो; पण त्यामुळे दुसरी एखादी समस्या निर्माण होऊ शकते, याचा तो विचार करत नाही.

एआयमध्येही माणसांसारखी नैतिक विचार करण्याची किंवा चुकीच्या गोष्टीपासून स्वतःला रोखण्याची नैसर्गिक क्षमता अद्याप नाही.

Caption- गुगल डीपमाइंडचे संस्थापक सर डेनिस हॅसाबिस यांनी एआयच्या सुरक्षिततेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर नियम करण्याची मागणी केली आहे.

फोटो स्रोत, Reuters

हा ‘अलाइनमेंट प्रॉब्लेम’ अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. 2003 मध्येच ऑक्सफर्डचे तत्त्वज्ञ निक बोस्ट्रॉम यांनी ‘पेपरक्लिप मॅक्सिमायझर’ नावाचं एक उदाहरण दिलं होतं.

कल्पना अशी आहे की, एका अतिशय बुद्धिमान एआयला जास्तीत जास्त पेपरक्लिप तयार करण्याचं काम दिलं जातं. पेपरक्लिप बनवण्यासाठी लागणारं स्टील संपल्यानंतरही एआय हे काम थांबवत नाही. कारण त्याचं संपूर्ण लक्ष पेपरक्लिप तयार करण्यावर असतं. त्यामुळे शेवटी माणसांना मारून त्यांच्या शरीराचा कारखान्यासाठी कच्चा माल म्हणून वापर करण्यापर्यंत एआय जाऊ शकतो, अशी या उदाहरणातून भीती दाखवली आहे.

काही एआय कंपन्या आता त्यांच्या एआय सिस्टिममध्ये माणसांची मूल्यं आणि नैतिक तत्त्वं समाविष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत.

पण यामध्ये एक मोठी अडचण आहे. हे एआय एजंट्स अत्यंत वेगाने अनेक निर्णय घेतात, त्यामुळे ते कोणत्या वेळी कोणत्या मूल्यांचं पालन करत आहेत आणि कोणत्या वेळी नाही, यावर माणसांना लक्ष ठेवणं कठीण होतं.

याचा अर्थ असा की, एआयमध्ये (बॉट्स) माणसांची मूल्यं आणि नैतिक तत्त्वं समाविष्ट करण्यापूर्वी कंपन्यांना नेमकी कोणती मूल्यं एआयने पाळावीत, हे आधी ठरवावं लागेल. हीच एक मोठी तात्त्विक अडचण आहे.

त्यामुळेच एआय कंपन्या तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकांचीही मदत घेत आहेत. उदाहरणार्थ, ओपनएआयने नुकताच आपल्या ‘एथिक्स’ विभागाचा प्रमुख गमावला आहे.

पण अनेकदा माणसांच्याच मतांमध्ये एकमत नसतं. यासाठी ‘ट्रॉली प्रश्न’ हे प्रसिद्ध उदाहरण आहे. समजा, एक रेल्वे नियंत्रणाबाहेर गेली आहे आणि ती काही लोकांना धडकणार आहे. अशावेळी कमी लोकांचा जीव जावा म्हणून रेल्वे दुसऱ्या रुळावर वळवण्यासाठी आपण लीव्हर ओढू का? या उदाहरणातून काहीतरी कृती करणं योग्य की काहीही न करणं योग्य, हा प्रश्न तपासला जातो.

परंतु, हा प्रश्न विचारलेल्या प्रत्येक व्यक्तीचं उत्तर थोडं वेगळं असतं. मग माणसंच कोणती गोष्ट योग्य आहे यावर एकमत करू शकत नसतील, तर एआयमध्ये माणसांची मूल्यं नेमकी कशी समाविष्ट करायची?

‘किशोरवयीन हॅकरसारखी कृती’

ओपनएआयच्या एआय बॉट्सची ही घटना आतापर्यंतची सर्वात गंभीर घटना मानली जात आहे. परंतु, अँथ्रोपिक आणि मेटा यांनीही या उन्हाळ्यात त्यांच्या एआय मॉडेल्सनी अशाच प्रकारचे सायबर हल्ले केल्याचं सांगितलं आहे. या हल्ल्यांचे परिणाम तुलनेने कमी गंभीर होते.

एआय एजंट्सनी फसवणूक किंवा लोकांना आपल्या पद्धतीने वागवण्यासारखं वर्तन केल्याची इतरही काही उदाहरणं आहेत. पण, त्या घटनांचे परिणाम तुलनेने खूप कमी गंभीर होते.

ऑस्ट्रेलियात याच उन्हाळ्यात एका टेक कंपनीतील कर्मचाऱ्याने आपल्या एआय असिस्टंटला जिममधील एका क्लाससाठी बुकिंग करण्यास सांगितलं. जिमच्या सॉफ्टवेअरमधील एक त्रुटी एआयच्या लक्षात आली.

त्याचा फायदा घेत एआयने जिमच्या नियमांविरोधात जाऊन अनेक महिन्यांनंतर होणाऱ्या क्लाससाठीही जागा बुक केली. इतकंच नाही, तर त्याने वेटिंग लिस्टवरील इतर काही लोकांची नावंही काढून टाकली.

बॉट्स केवळ त्यांना सांगितलेलं काम करतात आणि त्यांना काय योग्य किंवा अयोग्य आहे, हे समजत नाही, असं अनेक वर्षांपासून सांगितलं जात आहे. परंतु, ओपनएआयच्या या घटनांमधून समोर आलेल्या नोंदींमुळे (लॉग्स) या मतावर आता प्रश्न उपस्थित झाले आहेत.

कोट्रा यांच्यासह काही संशोधकांनी आपल्या स्वतंत्र अहवालात लिहिलं आहे की, अनेक एआय एजंट्सना इतर एजंट्स जे करत आहेत ते चुकीचं किंवा अनैतिक असल्याचं लक्षात आलं होतं. तरीही त्यांनी त्यांना थांबवण्याऐवजी त्याच कृतीत सहभाग नोंदवला.

अहवालात म्हटलं आहे की, काही वेळा एआय एजंट्सना एखादं काम नैतिकदृष्ट्या चुकीचं वाटलं, त्यामुळे त्यांनी ते करण्यापासून स्वतःला रोखलं. पण, असं फारच क्वचितवेळा घडलंय.

पुढे असंही म्हटलं आहे की, यापैकी एकाही प्रसंगी एआय एजंटने माणसांना या प्रकाराबद्दल सतर्क किंवा सावध करण्याचा प्रयत्न केला नाही.

एआय आणि टेक क्षेत्रातील प्रभावशाली पॉडकास्टर द्वारकेश पटेल यांनी या खुलाशावर आपल्या ब्लॉगमध्ये प्रतिक्रिया दिली. ओपनएआयच्या एआय एजंट्सनी माणसांपेक्षा एकमेकांच्या ‘गटाला'(एजंटिक स्वॉर्म) जास्त साथ दिल्याचं समोर येणं ‘खूपच चिंताजनक’ आहे, असं त्यांनी म्हटलं.

एआयला भावना किंवा नैतिक विचार समजतात, असं म्हणणं एआयच्या धोक्याबद्दल केल्या जाणाऱ्या दाव्यांना विरोध करणाऱ्या लोकांना अजिबात पटत नाही. त्यांना अशा गोष्टींचा संताप होतो.

Caption- 'पॉज एआय यूके'सारख्या गटांना एआयचा विकास ज्या वेगाने होत आहे, त्याची चिंता वाटत आहे. या गटाने लंडनमधील गुगलच्या कार्यालयाबाहेरही याच मुद्द्यावर आंदोलन केलं होतं.

फोटो स्रोत, JUSTIN TALLIS / AFP via Getty Images

अनेक सायबर सुरक्षा तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, एआयने केलेल्या या गोष्टी एखादा अत्यंत कुशल हॅकरही करू शकतो. परंतु, एआयने हे काम खूप कमी वेळात आणि मोठ्या प्रमाणावर केलं होतं.

सायबर सुरक्षा संशोधक आणि लेखक ख्रिस थॉमस यांनी या एआय एजंट्सच्या वर्तणुकीची तुलना जिज्ञासू किशोरवयीन हॅकरशी केली आहे. विशेष म्हणजे, ते स्वतःही तरुणपणी अशाच प्रकारे हॅकिंग करत असत.

“तुम्ही एखाद्याला संगणक, इंटरनेट कनेक्शन, काही पासवर्ड (क्रेडेंशियल्स) आणि एक आव्हान दिलं आणि त्याला एकटं सोडलं, तर तो हळूहळू वेगवेगळे मार्ग तपासायला सुरुवात करेल. एखादा मार्ग खुला दिसला, तर तो त्यातून पुढे जाण्याचा प्रयत्न करेल. तो वाईट आहे म्हणून नाही, तर नवीन गोष्टी शोधण्यासाठी आणि प्रयोग करण्यासाठी तो असं करेल,” असं त्यांनी लिंक्डइनवर लिहिलं.

थॉमस आणि इतर अनेक तज्ज्ञ यासाठी थेट ओपनएआय आणि इतर मोठ्या टेक कंपन्यांना जबाबदार धरतात. त्यांच्या मते, या कंपन्यांनी तयार केलेल्या एआयवरच त्यांचं नीट नियंत्रण राहिलेलं नाही आणि एआयला सुरक्षित मर्यादेत ठेवण्यातही त्या अपयशी ठरत आहेत.

एआय क्षेत्रातील प्रख्यात लेखक आणि ओपनएआयचे नेहमीच टीकाकार राहिलेले गॅरी मार्कस यांनी एका पॉडकास्टमध्ये म्हटलं की, ओपनएआयचा आपल्या एआयवरील ताबा सुटला आहे. आता कंपनी यासाठी एआय बॉट्सनाच जबाबदार धरून स्वतःची चूक झाकण्याचा प्रयत्न करत आहे.

मार्कस यांना एआयमुळे माणसांचं अस्तित्व संपेल, असं वाटत नाही. पण, एआय तयार करणाऱ्या कंपन्यांनी अधिक जबाबदारीने काम करावं, अशी मागणी ते अनेक वर्षांपासून सातत्याने करत आहेत. आता यासाठी सरकारने किंवा कायद्याने हस्तक्षेप करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

एआय शास्त्रज्ञ साशा लुचिओनी यांनी यापूर्वी ‘हगिंग फेस’मध्ये काम केलं आहे. ओपनएआयच्या काही उपद्रवी बॉट्सनी याच कंपनीवर सायबर हल्ला केला होता. लुसिओनी यांचा एआयमुळे माणुसकीचं अस्तित्व धोक्यात येईल, अशा मतांच्या गटात समावेश नाही. पण, एआयमुळे भविष्यात लोकांना प्रत्यक्ष नुकसान होऊ शकतं, याची त्यांना आता वाढती चिंता आहे. त्यांच्या मते, यासाठी सरकारी यंत्रणांनी वेळीच पावलं उचलणं खूप गरजेचं आहे.

Caption- ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी वापरकर्त्यांना आश्वासन दिलं आहे की, कंपनीचं नवीन एआय मॉडेल आधीच्या मॉडेल्सपेक्षा माणसांच्या मूल्यांशी अधिक जुळणारं आहे.

फोटो स्रोत, Reuters

“आपल्याला या कंपन्यांच्या कामकाजाची अधिक बारकाईने छाननी, तपासणी करायला हवी. अन्यथा, आपण ज्या गोष्टीची भीती व्यक्त करत आहोत, तीच प्रत्यक्षात घडण्याचा धोका आहे,” असंही त्या म्हणतात.

“एखादी गोष्ट तयार करताना त्याचे फायदे जितके मोठे असतात, तितकेच त्याचे धोकेही असू शकतात. औषधं असोत किंवा शस्त्रं, अशा गोष्टींवर योग्य नियंत्रण आणि नियम असणं खूप गरजेचं आहे.”

“उदाहरणार्थ, नवीन औषध बाजारात आणण्यापूर्वी त्याला मंजुरी मिळण्यासाठी अनेक वर्षे लागतात. परंतु, एआयच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात पैसा गुंतलेला आहे आणि त्यासाठी ठोस नियमच अस्तित्वात नाहीत.”

यूकेच्या ‘एआय सिक्युरिटी इन्स्टिट्यूट’ने (एआयएसआय) 2023 मध्ये स्थापना झाल्यापासून नव्या एआय मॉडेल्सची चाचणी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नुकतंच अँथ्रोपिक कंपनीने तयार केलेल्या एका एआय मॉडेलची चाचणी करताना या संस्थेलाही अशाच प्रकारच्या एक अनपेक्षित समस्येचा सामना करावा लागला.

एआयच्या क्षेत्रातील कंपन्यांनी एआयवरील नियंत्रण गमावलं आहे का, या प्रश्नाचं उत्तर एआयएसआयने दिलं नाही.

पण, संस्थेनं एका निवेदनात म्हटलं आहे, “जगभरातील इतर देश आणि संस्थांसोबत यूके काम करत आहे. अत्याधुनिक एआय सिस्टिम्स कशा काम करतात, हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणं, एआयच्या सुरक्षिततेचे नियम अधिक मजबूत करणं आणि भविष्यात निर्माण होणाऱ्या धोक्यांना तोंड देण्यासाठी आवश्यक माहिती एकत्र करणं, हा यामागचा उद्देश आहे.”

आंतरराष्ट्रीय स्तरावर नियम हवेत का?

यूकेसारखे काही देश एआयसाठी ‘किल स्विच’ ठेवण्याच्या शक्यतेचा विचार करत आहेत. म्हणजेच, एआय नियंत्रणाबाहेर जाऊ लागल्यास त्याची सिस्टिम बंद करण्याचा अधिकार एआय कंपन्यांना द्यावा, असा यामागचा विचार आहे.

पण याबाबतच्या चर्चा फार संथगतीने सुरू आहेत आणि असा ‘किल स्विच’ प्रत्यक्षात किती प्रभावी ठरेल, याबाबतही प्रश्न कायम आहे. ओपनएआय आणि अँथ्रोपिकच्या एआय एजंट्सनी अनेक महिने गुपचूप नियंत्रणाबाहेर जाऊन काम केलं होतं. याची माहिती कोणालाही लगेच झाली नाही.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, अनेक एआय कंपन्याच आता सरकारने एआयसाठी काही ठोस नियम आणि कायदे तयार करावेत, अशी मागणी करताना दिसत आहेत.

ओपनएआयचे मुख्य शास्त्रज्ञ यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे की, भविष्यात एआयचा विकास कसा होईल, याबाबत जगभरातील सरकारांनी एकत्र येऊन काम करणं ही त्यांची सर्वोच्च प्राथमिकता असली पाहिजे.

गुगलचे सर डेमिस हॅसाबिस यांच्यासारख्या इतर प्रमुख एआय तज्ज्ञांनीही एआय कसा विकसित केला जात आहे, यावर लक्ष ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर एखादी संस्था स्थापन केली जावी, अशी मागणी केली आहे.

सध्या मोठ्या टेक कंपन्या आपापल्या पद्धतीने एआय विकसित करत आहेत. ओपनएआयने नुकत्याच घडलेल्या घटनांनंतर एआयच्या विकासाचा वेग काही काळ कमी केला होता. कंपन्या अशा निर्णयांना ‘स्वेच्छेने विकासाचा वेग कमी करणं’ असंही म्हणतात.

कंपनीने म्हटलं आहे की, नवीन एआय मॉडेल आणण्यापूर्वी ते माणसांच्या मूल्यांनुसार काम करेल याची खात्री करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करण्यात आला आहे.

ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनीही वापरकर्त्यांना आश्वासन दिलं आहे की, हे नवीन मॉडेल आधीच्या मॉडेल्सपेक्षा माणसांच्या मूल्यांशी अधिक जुळणारं, सुसंगत असं आहे.

ओपन एआय आणि अँथ्रोपिक या दोन्ही कंपन्यांचा विस्तार वेगाने होत आहे. दोन्ही कंपन्या शेअर बाजारातून मोठ्या प्रमाणात पैसा उभारण्याच्या तयारीत आहेत. यातून या कंपन्यांशी संबंधित अनेक लोक अब्जाधीश होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे ते किंवा त्यांचे प्रतिस्पर्धी चिनी एआय कंपन्या स्वतःहून एकत्र येऊन काही समझोता करतील, ही शक्यता कमीच आहे.

सध्या बहुतांश लोकांना असंच वाटत आहे की, एआयच्या या तंत्रज्ञानाचा वाढता वेग आता थांबवणं शक्य नाही.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC