Source :- BBC INDIA NEWS

“शेतीवर 3 लाख रुपये कर्ज काढलं, घरावर 5 लाख रुपये कर्ज काढलं. एकूण 8 लाख रुपयांचं कर्ज आहे. आता शेती अशी आहे. कर्ज कसं फेडावं समजत नाहीये. माझी बायको कामाला जाते, त्यावर पोट भरणं सुरू आहे. रात्रभर झोप येत नाही”
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील संत्रा बागायतदार शेतकरी रामचंद्र राणे आपली व्यथा सांगत होते. राणे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांच्याकडे दोन एकर शेती असून त्यामध्ये संत्र्याची बाग आहे.
पण, यावर्षी झाडाला संत्रा फार कमी आला. त्यातही पावसात मोठा खंड पडल्यानं संत्र्यांचा आकार वाढला नाही. त्यामुळे मार्केटही नाही. आता कर्ज फेडणार कसं? पुढे जगायचं कसं? असा प्रश्न राणे यांना पडलाय.
यावर्षी राज्यात दुष्काळ आहे. त्याचा संत्रा, मोसंबीच्या बागांवर काय परिणाम होतो आहे हे बघण्यासाठी आम्ही या फळांचं दर्जेदार उत्पादन होतं त्याठिकाणी पोहोचलो.
विदर्भात 1 लाख 50 हजार हेक्टरवर संत्र्याचं उत्पादन घेतलं जातं. यामध्ये करोडो रुपयांची उलाढाल आहे. यापैकी सर्वाधिक संत्र्याचं उत्पादन नागपूर जिल्हा आणि अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी या भागात घेतलं जातं, मोसंबीसाठी नागपूरचा काटोल, नरखेड तालुका प्रसिद्ध आहे. पण, आता याठिकाणच्या शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे.
आंबिया बहाराचे संत्र आता मार्केटमध्ये येतात. पण, राणे यांच्या शेतातलं एकही संत्रं अजून मार्केटमध्ये पोहोचलं नाही. आंबिया बहाराच्या संत्र्याची फळगळ झाली, उरला त्याचा आकार वाढला नाही. तर आता मृगाचं संत्री सुद्धा मोठी व्हायला हवी होती. पण, त्याचाही आकार वाढला नाही.
पावसामध्ये खंड पडला. त्यामुळे संत्र्याची वाढ खोळंबली. इतकंच नाहीतर दुष्काळामुळे संत्र्याची झाडं सुद्धा सुकायला लागली आहेत.
दुष्काळामुळे संत्र्याची बाग सुकली
मोर्शी तालुक्यातील दापोरी इथले शेतकरी गिरीश काळे यांच्याकडे 7 एकरावर संत्र्याची बाग आहे. पण, त्यांच्या बागेतील अर्ध्यापेक्षा अधिक झाडं दुष्काळानं सुकली आहेत. आता सुकलेली झाडं काढायला सुद्धा त्यांनी सुरुवात केली आहे.
गिरीश सांगतात, उन्हाळ्यात 47-48 डिग्रीपर्यंत तापमान होतं. त्यामधून बागा कशाबशा वाचवल्या. पण, आता पावसाळ्यात पाऊस कमी पडला. तीव्र ऊन आणि कमी पाऊस यामुळे बाग सुकली. कसातरी मृग बहाराची संत्री लागली. पण, त्याचा आकार लहान आहे. आंबियाचं संत्र मोठं झालं नाही. त्यामुळे व्यापारी फिरकत नाहीये. आमच्याकडे तूर आणि कापसाचं उत्पन्न दांडगं नाहीये. कितीही सोय केली तर एकरी तीन क्विंटलच्या वर कापूस होत नाही. आमची जमीन संत्र्यासाठीच चांगली आहे. पण, आता दुष्काळामुळे झाडं सुकली आहेत.

गिरीश यांनी खासगी सावकराकडून 5 लाख रुपये कर्ज घेतलं आहे. पण, आता ते कर्ज फेडण्यासाठी आणि पुढे जगण्यासाठी दोन एकर शेती विकण्याशिवाय पर्याय नसल्याचं ते सांगतात.
ते म्हणतात, मरण्यापेक्षा दोन एकर शेती विकून जगायचं. माझ्याकडे 14 एकर आहे तर मी दोन एकर विकेन. पण, ज्यांच्याकडे दोन एकर आहे त्यांनी काय करायचं? मरायची पाळी आहे ना?
विहिरीचं पाणी पुरत नाही, बागा कशा वाचवायच्या?
मोर्शी-वरुड हा ड्राय झोनचा भाग आहे. याठिकाणी नव्यानं विहिरी आणि बोरवेल करण्याची परवानगी नाही. कारण, पाण्याची पातळी अत्यंत खोलवर गेली आहे.
आता पाऊस कमी झाल्यानं विहिरींचं पाणी सुद्धा बागेला पुरत नसल्याचं शेतकरी सांगतात. विहिरीतल्या पाण्याच्या पातळीनं ऑक्टोबर महिन्यातच तळ गाठला आहे. जे पाणी गेल्यावर्षी 12 तास पुरायचं ते आता दीड तासात संपत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. त्यामुळे बागा वाचवायच्या कशा? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

काही मोजक्या शेतकऱ्यांच्या बागेत संत्रा दिसतोय. पण, त्याचं उत्पादन कमी दिसतं. कारण, याआधीच फळगळ झालेली आहे.
मोर्शी तालुक्यातले रुपेश वाळके यांच्या शेतात झाडावर संत्री दिसतात. पण, त्याची संख्या ही नेहमीपेक्षा कमी असल्याचं ते सांगतात.
रुपेश म्हणतात, 50 यावर्षी उन्हाळा चांगला तापला. त्यामुळे आंबिया बहाराचा संत्रा 70 टक्के तेव्हाच खाली आला. त्यानंतर वाटलं की पावसाळा चांगला होईल. जो तीस चाळीस टक्के संत्रा आहे तो तरी होईल. पण, पावसानं दगा दिला आणि संत्र्यांची साईज कमी झाली. पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्न पण होणार नाही.
मोसंबीच्या उत्पादनावरही परिणाम
नागपूर जिल्ह्यातील मोसंबी बागांची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. दरवर्षी येत असलेल्या मोसंबीच्या तीस टक्केही मोसंबी यावर्षी झाडावर दिसत नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.
आम्ही काटोल तालुक्यातील मोसंबी बागा बघितल्या. इथं झाडावर बोटावर मोजण्याइतकी मोसंबीची फळं दिसतात. तसेच संत्र्याप्रमाणे मोसंबीचा आकार सुद्धा वाढलेला नाही.
काटोल येथील येरला गावचे शेतकरी स्वप्नील धोटे सांगतात, मागच्या वर्षी एका झाडाला तीस किलो माल होता, तो यावर्षी एका झाडाला तीन किलो आहे. जास्तीत जास्त सात आठ किलो मोसंबी दिसतेय. फ्लॉवरींग इतकं छान झालं होतं. सेटींग इतकं छान झालं होतं. पण, यावर्षी उन्हाळा तापला तिथं फळगळ झाली. त्यानंतर दोन तीन दिवस सतत पाऊस राहिला. त्यामुळे फळगळ झाली. त्यानंतर पावसानं खूप खंड दिला. त्यामुळे ताण जास्त आला आणि तेव्हाही फळगळ झाली. त्यामुळे झाडांवर माल नाही. झाडांना खूप ताण पडला आहे. यावर्षी पाऊसही शॉवरसारखा झाला. पाणी जमिनीत मुरलंच नाही.

स्वप्नील धोटे यांची 12 एकरावर मोसंबीची बाग आहे. पण, यामध्ये एक लाख रुपयांचंही उत्पादन होणार नसल्याचं ते सांगतात.
मोसंबीची बाग संत्र्यापेक्षा जोखमीची असते. कारण, चौथ्या वर्षीपासून फळ द्यायला सुरुवात होते. पण, जसं फळ द्यायाल सुरुवात झाली तसं बागेतील एक-एक झाडं मरायला सुद्धा लागतात. त्यामुळे मोसंबीचं उत्पादन जोखमीचं मानलं जातं.
यावर्षी तर दुष्काळामुळे मोसंबीच्या बागा सुकण्याची चिंता शेतकरी बोलून दाखवतात.
‘शेतकरी 15-20 वर्ष मागे जाईल’
संत्र्याची एक बाग तयार करायला सहा वर्ष लागतात. सातव्या वर्षीपासून फळ मिळायला सुरुवात होते. तोपर्यंत एक एकरातील बागेला 9-10 लाख रुपये खर्च होतो. तसेच एकदा लावलेलं संत्र्याचं झाड 25 वर्ष उत्पन्न देऊ शकतो. त्यामुळे दुष्काळामुळे झाडं सुकणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही.
बागा सुकल्या म्हणजे शेतकरी 15-20 वर्ष मागे जाईल, अशी भीती महाऑरेंजचे संचालक मनोज जवंजाळ

ते म्हणतात, “यावर्षी फक्त दोन पाऊस झाले. सप्टेंबर महिना आला तरी पाऊस पडला नाही. मागच्या वर्षी पावसाळा खूप पडला. पण, उन्हाळा खूप तापला. गेल्या एप्रिल, मे आणि जूनमध्ये एकही पाऊस पडला नाही. त्यामुळे इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर झालं. त्यामुळे बागांना पाणी खूप लागलं. मागच्या वर्षी उन्हाळ्यात विहिरींची स्थिती एवढी खालावलेली होती शेवटच्या टप्प्यात उन्हात दहा टक्के बागा खराब झाल्या होत्या. विहिरीला जे पाणी यायला पाहिजे ते पाणी नाही. आता आपल्याला फेब्रुवारीपर्यंत बागा वाचवता येतील. फेब्रुवारीपर्यंत बागांना काही होणार नाही. खरा प्रॉब्लेम त्यानंतर सुरू होणार आहे. बागा गेल्या तर शेतकरी 15-20 वर्ष मागे जाईल. यासाठी शासनानं वेळीच मीटींग घेऊन नियोजन केलं तर आपल्याला बऱ्याच बागा वाचवता येतील.”
शेतकऱ्यांच्या पूर्णच बागांचं नुकसान झालं तरी त्यांना नुकसान भरपाई मिळताना फक्त दोन किंवा तीन हेक्टरपर्यंत मिळते. पण, उर्वरीत बागांच्या नुकसानीचं काय? फळ मिळालं नाहीतरी आम्हाला बागा वाचवायला खर्च करायला लागतो. त्याचं काय? असाही प्रयत्न शेतकरी उपस्थित करतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC



