Source :- BBC INDIA NEWS

पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंब

  • Author, प्राची कुलकर्णी
  • Role, बीबीसी मराठीसाठी
  • Reporting from पुणे
  • 24 एप्रिल 2025, 13:02 IST

    अपडेटेड 25 मिनिटांपूर्वी

22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या सशस्त्र हल्ल्यात पुण्यातील दोन जणांचा मृत्यू झाला. हल्ल्यावेळी मुस्लीम व्यक्तीने आमचा जीव वाचवण्यासाठी हस्तक्षेप केला असं या कुटुंबीयांनी बीबीसी मराठीला सांगितलं. तसेच घटनास्थळाहून परत आणण्यासाठी देखील मुस्लीम घोडेवाल्यांनी मदत केल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या सशस्त्र हल्ल्यात महाराष्ट्रातील इतरही काही पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये प्रामुख्याने डोंबिवली, पनवेल, नागपूर आणि पुणे या ठिकाणच्या पर्यटकांचा समावेश आहे.

कौस्तुभ गणबोटे आणि पुण्याचेच संतोष जगदाळे यांचे मृतदेह 23 एप्रिलच्या रात्री पुणे विमानतळावर आणण्यात आले. 24 एप्रिलच्या सकाळी जगदाळे यांची अंत्ययात्रा पुण्यात निघाली, तेव्हा त्यांची मुलगी आसावरी सर्वात समोर दिसली. तिनेच वडिलांवर अंत्यसंस्कार केले.

जगदाळे आणि गणबोटे दोघेही मित्र होते. दोघंही पुण्यातल्या पेठ परिसरात वाढले होते. दोघांनीही एकत्रच फरसाणचा व्यवसाय सुरू केला. कौस्तुभ गणबोटे यांचे हे गणबोटे फरसाण प्रसिद्ध आहे. तर जगदाळे ही फरसाण व्यवसायात होते. व्यवसाय वाढला तसं गणबोटेंनी स्थलांतर केलं आणि कोंढव्यात फॅक्टरी सुरू केली. तर जगदाळे कर्वेनगर मध्ये राहायला आले.

दोन्ही कुटुंबं एकत्र कश्मीरला गेली होती. जगदाळे पती पत्नींसोबत त्यांची मुलगी आसावरी होती तर कौस्तुभ गणबोटे आणि पत्नी हे दोघं सोबत होते. गणबोटेंच्या घरात लहान बाळ असल्याने इतर कुटुंबीय सोबत गेले नव्हते.

आसावरी जगदाळे

कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नी संगीता यांनी तिथं घडलेल्या प्रसंगाबद्दल माहिती दिली आहे.

22 एप्रिलला काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यातून त्या बचावल्या, त्यानंतर 24 एप्रिलच्या सकाळी पुण्यातील जगदाळे आणि गणबोटे कुटुंबीयांचं सांत्वन करायला शरद पवार आले. तेव्हा गणबोटे यांच्या कोंढवा इथल्या घरी संगीता गणबोटे यांनी तो घटनाक्रम सांगितला.

“त्यांनी आमच्या इथे बसलेल्या एकाला अजान पढता है क्या विचारलं. त्याच्याशी बोलणं सुरू असताना आम्ही लगेच टिकल्या वगैरे काढून फेकल्या की आम्हाला मारायला नको म्हणून आणि अल्लाहू अकबर म्हणायला लागलो. मग तो चालला गेला, आणि या दोघांना मारून टाकलं. तसंच आमच्यामागे बसलेल्या एका माणसाला मारुन टाकलं.”

संगीता सांगतात की घटनास्थळी एकही सुरक्षारक्षक किंवा सैनिक तैनात असता तर आम्हाला मदत झाली असती. गोळीबार झाल्यानंतर पुढे काय घडलं, हेही त्यांनी सांगितलं.

त्या म्हणाल्या, “जाताना आम्ही घोड्यावर बसून गेलो होतो तेव्हा आजिबात भीती वाटली नव्हती. येताना आमचे पाय गुडघ्यापर्यंत चिखलात जात होते, तसंच आम्ही पळत खाली आलो. बूट वगैरे तिथंच सोडून आलो. आमचे घोडेवाले मुसलमान होते. तरीही ते आम्हाला परत न्यायला आले, शेवटपर्यंत त्यांनी आम्हाला साथ दिली. तो घोडेवालाही ढसाढसा रडला. फार चांगली माणसं होती ती.”

संगीता यांनी सांगितलं की ‘आम्हाला वाचवण्यासाठी एक मुसलमान पुढे आला पण त्यालाही त्यांनी गोळ्या घातल्या.’

‘तो म्हणाला तुम्ही कशाला मारता? यांनी काय चुकी केली आहे? त्याला तर कपडे काढून गोळ्या झाडल्या. इतकं क्रूर काम त्यांनी केलं,’ असं संगीता यांनी सांगितलं.

YouTube पोस्टवरून पुढे जा

परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी ‘स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा’.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

मजकूर उपलब्ध नाही

YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

संतोष जगदाळे यांच्या वहिनी जमुना यांच्याशी काल 23 एप्रिल रोजी बीबीसी मराठीने संवाद साधला. जमुना म्हणाल्या, आम्हाला त्या दिवशी रात्री माझे दीर या हल्ल्यात गेल्याचं समजलं. आसावरी (संतोष यांची मुलगी) सर्व गोष्टींना तोंड देतेय. सहलीसाठी, आनंदासाठी ते तिथं गेले होते मात्र अशी वेळ येईल असं वाटलं नव्हतं.”

पहलगाममध्ये नेमकं काय घडलं?

पहलगामला ‘भारताचं स्वित्झर्लंड’ म्हटलं जातं. इथं भारत आणि जगभरातून पर्यटक फिरण्यासाठी येत असतात.

बीबीसीचे प्रतिनिधी माजिद जहांगीर यांनी गुजरातमधून आलेल्या पर्यटकाशी बातचित केली. पर्यटकांच्या ज्या गटावर हल्ला झाला होता, त्या गटामध्येच हा पर्यटकदेखील होता.

या पर्यटकानं सांगितलं की, “अचानक हल्ला झाल्यामुळे तिथे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. प्रत्येकजण ओरडत, रडत तिथून पळू लागला.”

पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या ठिकाणी महाराष्ट्रातील नागपूरचं एक कुटुंब उपस्थित होतं. हे कुटुंब जम्मू-काश्मीरमध्ये फिरण्यासाठी गेलं होतं.

एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना नागपूरच्या या कुटुंबाने आपला अनुभव सांगितला. ते म्हणाले, “आम्ही तिथे फिरायला गेलो होतो. तेथून बाहेर पडताना गोळीबारचा आवाज आमच्या कानावर पडला. या आवाजानं सर्वजण सैरावैरा पळायला लागले. आम्हीही मागे वळून न पाहता, तिथून कसंबसं बाहेर पडलो. या गोंधळात माझ्या पत्नीचा पाय फ्रॅक्चर झाला. सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत.”

पहलगाम आणि पर्यटक

अधिकृत आकडेवारीनुसार 2024 मध्ये 35 लाख पर्यटकांनी काश्मीरला भेट दिली आणि मोठ्या संख्येनं लोक पहलगामलाही आले होते.

यातले बहुतांशजण मार्च ते जून या कालावधीत काश्मीरला भेट देतात. कारण या कालावधीत पहलगामचं सौंदर्य पाहण्याची संधी मिळते.

हे गाव आणि आसपासचा प्रदेश हिरवीगार कुरणं आणि सुंदर सरोवरांसाठी प्रसिद्ध आहे. इथला परिसर गर्द जंगल आणि टेकड्यांनी वेढलेला आहे.

त्यामुळेच अनेकजण पहलगामला भारताचं स्वित्झर्लंड असंही म्हणतात. काश्मीर मधल्या पर्यटनाच्या दृष्टीनं पहलगाम अत्यंत महत्त्वाचं आहे.

हा प्रदेश हिंदू भाविकांच्या अमरनाथ यात्रेच्या वाटेवरचा सर्वांत महत्त्वाचा टप्पा मानला जातो.

निसर्गानं पहलगामला भरभरून सौंदर्य दिलं आहे आणि या नेत्रदीपक परिसरात अनेक जागा पाहण्यासारख्या आहेत.

श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळापासून पहलगाम हे 96 किलोमीटरवर आहे, असं अनंतनाग जिल्ह्याच्या वेबसाईटवर म्हटलं आहे.

तुम्ही रेल्वेनं प्रवास केला, तर उधमपूर आणि जम्मू इथे उतरून पुढे टॅक्सीनं पहलगामला जाता येतं. पहलगाम उधमपूरपासून 217 किलोमीटरवर तर जम्मूपासून 285 किलोमीटरवर आहे.

या परिसरात रस्त्यावरून दळणवळणाची चांगली सोय आहे. राज्याची बस सेवा आहे, तसंच श्रीनगर, जम्मू आणि अनंतनागमधून खासगी बसही उपलब्ध असतात. इथून टॅक्सीनंही पहलगामला जाता येतं.

काश्मीर टूरिझमच्या वेबसाईटवरील माहितीनुसार इथे स्नो लेपर्ड (हिमबिबट्या), आशियाई काळे अस्वल, लाल कोल्हा आणि कस्तुरी मृग अशा जंगली प्राण्यांच्या प्रजातींचा अधिवास आहे.

2011 च्या जनगणनेनुसार पहलगामची लोकसंख्या 9,264 एवढी आहे. पण आता ती 13,200 एवढी वाढल्याचा अंदाज आहे.

या परिसरात मुस्लीम बहुसंख्य (80%) आहेत, तसंच हिंदू (17%), शीख, ख्रिश्चन, बौद्ध, जैन आणि अन्य धर्मीय लोकही राहतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC