Source :- BBC INDIA NEWS

Published
वाचन वेळ: 5 मिनिटे
नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरातून बचावलेल्या नावू कबीरदास आणि विजया भुवनेश्वरी या दाम्पत्याला आपला पुनर्जन्म झाल्यासारखंच वाटत आहे.
नावू कबीरदास आणि त्यांच्या पत्नी विजया भुवनेश्वरी हे शुक्रवारी (28 ऑगस्ट) रात्री नेपाळची राजधानी काठमांडूहून चेन्नईला परतलेल्या 21 जणांमध्ये होते.
हे दोघेही वेलाचेरी इथल्या मुरुगू नगरमधले. कुंभकोणममधल्या एका ट्रॅव्हल एजन्सीमार्फत नेपाळला गेले होते.
एकूण 57 जणांचा हा गट तीन बसमधून रसुवा भागातून जात होता. दोन डोंगरांच्या मधून जाणाऱ्या वळणावळणाच्या रस्त्यावरून प्रवास करताना ते आजूबाजूच्या निसर्गाचा आनंद घेत होते.
पण थोड्याचवेळात त्यांना याच निसर्गाचं रौद्ररुप पाहायला मिळणार होतं.
मोठा आवाज, कोसळणारे दगड आणि दरडी, चिखल आणि मलबा घेऊन वेगाने वाहणारं पुराचं पाणी अचानकपणे त्यांच्या दिशेने आलं.
क्षणार्धात भीषण परिस्थिती निर्माण झाली.
‘आमच्या मागची बस कलंडली’
तीन बसपैकी केवळ दुसरी बसच पुराच्या तडाख्यातून बचावली.
विजया भुवनेश्वरी सांगतात, “काही मिनिटं तर नेमकं काय घडत आहे, हेच आम्हाला समजत नव्हतं. आमच्या मागची बस कलंडत असल्याचं मी पाहिलं. मला ते दृश्य बघवत नव्हतं. तेव्हाच परिस्थिती किती गंभीर आहे, याची मला जाणीव झाली.”
फोटो स्रोत, Vijaya Buvaneswari
तो प्रसंग आठवताना नावू कबीरदास सांगतात, “अचानक मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज आला आणि गाडीवर दगड आदळू लागले. त्यानंतर पुराचं पाणी इतक्या वेगाने आत शिरू लागलं, जणू एखाद्या धरणाचा दरवाजा उघडला होता.”
‘त्या काही मिनिटांमुळेच आमचा जीव वाचला’
पूर येण्यापूर्वी त्या भागातून जात असताना त्यांची बस चिखलात अडकली होती. दुरुस्तीसाठी त्यांना काही वेळ थांबावं लागलं.
विजया भुवनेश्वरी सांगतात, “त्या काही मिनिटांमुळेच आमचा जीव वाचला.”
त्यांचा चालक नेपाळमधील स्थानिक रहिवासी होता. हा डोंगराळ भाग असल्याने तिथे वारंवार भूस्खलन, हिमस्खलन होत असतं. पुराचं पाणी दिसताच त्याला धोक्याची जाणीव झाली.
विजया भुवनेश्वरी सांगतात, “त्याने सगळ्यांना गाडीतून बाहेर पडायला सांगितलं आणि उंच ठिकाणी जाणं हाच सर्वात सुरक्षित पर्याय असल्याचं सांगितलं. त्यानंतर तो स्वतःही सुरक्षित ठिकाणाच्या दिशेने धावला. आम्हीही त्याच मार्गाने गेलो. त्या वेळी आमच्या डोळ्यांसमोर फक्त आमची मुलं होती.”
जीव वाचवण्यासाठी त्यांना उंच ठिकाणी चढावं लागणार होतं…एखाद्या लहानशा इमारतीएवढ्या उंच ठिकाणी.
बचावलेल्या या 21 लोकांपैकी बहुतेक जण 50 वर्षांहून अधिक वयाचे होते. जीव वाचवण्यासाठी त्यांना चिखल आणि गाळाने भरलेल्या रस्त्यावरून वर चढावं लागत होतं.

विजया भुवनेश्वरी सांगतात, “मी आणि आणखी एका महिलेने चढायला सुरुवात केली. पण अर्ध्या वाटेतच आमचा पाय घसरला आणि आम्ही खाली पडलो. माझा पाय दोन वेळा घसरला. माझे पाय चिखलाने माखले होते आणि आधाराला पकडण्यासाठी काहीच नव्हतं.”
अखेर त्या दुसऱ्या महिलेच्या साडीला घट्ट पकडून विजया वर पोहोचू शकल्या. ती महिला आधीच वर पोहोचली होती आणि तिने आपली साडी काढून खाली सोडली होती.
त्या सांगतात, “त्या माझ्या नात्यातील होत्या. माझ्या आधी वर पोहोचल्या होत्या. त्यादिवशी फक्त त्यांनीच साडी नेसली होती. त्यांनी स्वेटर घातला आणि साडी आमच्यासाठी खाली सोडली.
“आम्ही त्या साडीला आणि जवळच्या एका केबलला पकडून चढायला लागलो.”
त्या पुढे सांगतात, “इमारतीएवढ्या उंचीच्या त्या टेकडीवर चढायला आम्हाला दीड तास लागला. एकदा तर मी ज्या झाडाच्या फांदीला पकडलं होतं तीच तुटली. त्यानंतर झाडांना पकडण्याऐवजी आम्ही वर चढण्यासाठी साडीचा आधार घेतला. एक महिला वर पोहोचू शकत नव्हती. आम्ही तिला कमरेभोवती साडी बांधून घेण्यास सांगितलं आणि आमच्या गटातील सदस्यांनी तिला वर ओढून घेतलं.”
वर पोहोचल्यानंतर त्यांना एक मदत केंद्र दिसलं.
तिथे असलेल्या काही लोकांनी त्यांना पाणी आणि बिस्किटं दिली. ज्यांच्या मोबाइलला नेटवर्क मिळत होतं, त्यांच्या मदतीने त्यांनी आपण सुरक्षित असल्याची माहिती तामिळनाडूमध्ये दिली.
फोटो स्रोत, Vijaya Buvaneswari
विजया भुवनेश्वरी सांगतात, “आमच्या गटातील एका सदस्याचे नातेवाईक सचिवालयात काम करतात. त्यांच्या माध्यमातून आम्ही सरकारशी संपर्क साधू शकलो. आम्ही सुरक्षित असल्याचा पुरावा म्हणून एक फोटोही पाठवला.”
वर चढत असताना त्यांनी चिखलात अडकलेल्या एका व्यक्तीला हात हलवताना पाहिलं. विजया भुवनेश्वरी भावुक होत सांगतात, “त्याला पाहिल्यानंतर ना आम्हाला पुढे चढता येत होतं, ना तिथे थांबता येत होतं.”
बचाव पथकाला याची माहिती देण्यात आली आणि त्यानंतर त्या व्यक्तीला वाचवण्यात आलं.
त्या म्हणाल्या, “वर पोहोचल्यानंतरच आम्ही ज्या बसमधून आलो होतो, ती शोधण्याचा प्रयत्न केला. आम्हाला फक्त आमची बस दिसली. तिच्या पुढे अनेक गाड्या उलटलेल्या होत्या. एका गाडीचं फक्त चाक दिसत होतं. तेव्हा आम्हाला त्या दरडींची, पुराची भीषणता जाणवली.”
‘चुकीचं एक पाऊल आणि आम्ही 50 फूट खाली कोसळलो असतो’
ते दीड दिवस मदत केंद्रात राहिले. मात्र, त्यांच्या अडचणी इथेच संपल्या नाहीत. एका मजल्याएवढ्या उंचीच्या मातीच्या ढिगावर चढल्यानंतर त्यांना आता 20 मजली इमारतीएवढ्या उंच, तीव्र उतार असलेल्या डोंगराळ भागातून पुढे जावं लागणार होतं.
नावू कबीरदास यांनी सांगितलं, “तो अतिशय अरुंद, रांगेनं एकापाठोपाठ एक चालता येईल असा रस्ता होता. आम्ही कसे चढलो हे आमचं आम्हाला माहीत. दोन्ही बाजूंना दाट झाडी होती. जगण्याची तीव्र इच्छाशक्ती होती म्हणूनच आम्ही वर चढत गेलो.”
त्यांनी सांगितलं की, हा प्रवास खूपच कठीण होता. कारण त्यांच्यापैकी कोणालाही ट्रेकिंगचा अनुभव नव्हता.
“जमीन चिखल आणि दलदलीने भरलेली होती. त्यामुळे आमचे पाय वारंवार घसरत होते. चुकीचं एक पाऊल पडलं असतं, तर 50 फूट खाली कोसळलो असतो.”
फोटो स्रोत, Vijaya Buvaneswari
“एका ठिकाणी आम्ही चुकीचा रस्ता पकडला. एका नेपाळी व्यक्तीने आम्हाला योग्य मार्ग दाखवला. त्यामुळे आम्हाला आधी खाली उतरावं लागलं आणि त्यानंतर दुसऱ्या दिशेने पुन्हा वर चढावं लागलं.”
“वर चढण्यापेक्षा खाली उतरणं अधिक कठीण होतं. मला वारंवार खाली बसून आणि हळूहळू सरकत खाली उतरावं लागलं.”
तीन तासांनंतर ते ठरवून दिलेल्या पिकअप पॉइंटवर पोहोचले. तिथून लष्कराच्या हेलिकॉप्टरमधून त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं. नेपाळमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधल्यानंतर ते आपापल्या घरी परतले.
चेन्नई, कडलोर, मयिलादुथुराई, कृष्णगिरी आणि त्रिची या भागांतील 21 जण तामिळनाडूत परतले आहेत.
मंत्री राजमोहन यांनी शुक्रवारी सांगितलं की, तामिळनाडूमधून 400 हून अधिक लोक नेपाळमध्ये गेले होते. त्यापैकी 90 जणांशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC




