Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Forward Seamen’s Union of India/x.com/FSUIINDIA
ओमानच्या किनारपट्टीजवळ अमेरिकन सैन्याने केलेल्या हल्ल्यांमुळे एका तेल टँकर जहाजाला आग लागली होती. या जहाजावर 24 भारतीय खलाशी होते. त्यांची सुरक्षितपणे सुटका करण्यात आली असल्याची माहिती भारतीय अधिकाऱ्यांनी दिली.
या जहाजाला जेव्हा आग लागली होती तेव्हा त्यावर कुठलाही माल नव्हता. कर्मचाऱ्यांनी त्या जहाजाला आग लागल्यानंतर मदतीसाठी संदेश देखील पाठवले होते.
सोमवारची (8 जून) ही घटना आखातातील व्यापारी वाहतूक करणाऱ्या जहाजांशी संबंधित ताजी घडामोड आहे. इराण युद्ध आणि अमेरिकेच्या नेतृत्वाखालील कारवाईमुळे या सागरी मार्गातून होणाऱ्या वाहतुकीला असणारे धोके मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली आहे. या तणावामुळे या सागरी मार्गातून होणारी जहाजांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसंच ओमानचं आखात आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीमधील आणि त्याच्या आसपासच्या परिसरातील लष्करी हालचालींमध्ये वाढ झाली आहे.
ओमाननं जहाजावरील 24 खलाशांना सुरक्षित वाचवलं
‘एमटी मॅरिव्हेक्स’ असं या तेलवाहू जहाजाचं (टँकर) नाव आहे. या टँकरवर स्थानिक वेळेनुसार साधारण दुपारी 1:30 वाजता आग लागली. त्यावेळेस जहाजावर 24 भारतीय खलाशी होते, अशी माहिती भारताच्या बंदर, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयाच्या ओपेश कुमार शर्मा यांनी सोमवारी (8 जून) पत्रकारांना दिली.
फोटो स्रोत, Getty Images
प्राथमिक माहितीनुसार सर्व खलाशी सुरक्षित आहेत आणि त्यांच्या सुरक्षेची खातरजमा करण्यासाठी अधिकारी विविध सरकारी यंत्रणांमध्ये समन्वय साधत असल्याचं शर्मा म्हणाले. या तेलवाहू जहाजावर आग लागण्यामागचं कारण काय होतं, याची सविस्तर माहिती सरकारनं दिलेली नाही.
भारतीय प्रसारमाध्यमांमधील वृत्तांनुसार, ओमानच्या अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरच्या मदतीनं जहाजावरील या कर्मचाऱ्यांना बाहेर काढलं आणि त्यांना मसिराह बेटावर नेलं.
‘मॅरिव्हेक्स’वर अमेरिकेनं घातले होते निर्बंध
मॅरिव्हेक्स जहाजावर इराणशी कथित संबंध असल्याच्या कारणावरून अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी निर्बंध घातले होते, असं वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
भारतीय व्यापारी खलाशांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘ऑल इंडिया सीफेअरर्स युनियन’नं सांगितलं की जहाजावर आग लागल्यानंतर पलाऊ देशाचा ध्वज असलेल्या टँकरवरील एका कर्मचाऱ्याकडून त्यांना संकटात असल्यानं मदतीसाठीचा संदेश मिळाला होता. या संपूर्ण बचाव कार्यादरम्यान ते जहाजावरील कर्मचारी आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात होते.
‘फॉरवर्ड सीमेन्स युनियन ऑफ इंडिया’ ही खलाशांशी संबंधित आणखी एक संघटना आहे. त्यांनी ही घटना ‘गंभीर चिंतेची बाब असल्याचं’ म्हटलं आहे. तसंच त्यांनी जहाजावरील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितता, त्यांच्या कुटुंबीयांना मदत आणि खलाशांच्या सुरक्षेची खातरजमा करण्यासाठी त्वरित कारवाई करण्याची विनंती केली आहे.
मात्र दोन्ही युनियननं पुष्टी केली आहे की जहाजावरील कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली असून ते सुरक्षित आहेत.
यूएसएस अब्राहम लिंकन या विमानवाहू युद्धनौकेवरील लढाऊ विमानानं केला हल्ला
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं नंतर एका निवेदनात म्हटलं आहे की “एका रिकाम्या तेलवाहू जहाजानं इराणच्या बंदराकडे जाण्याचा प्रयत्न करून इराणविरुद्ध सुरू असलेल्या नाकेबंदीचं उल्लंघन केल्यानंतर” अमेरिकेच्या सैन्यानं 8 जूनला ओमानच्या आखातात ‘या जहाजाला निष्क्रिय केलं’.
फोटो स्रोत, Getty Images
“यूएसएस अब्राहम लिंकन (सीव्हीएन 72) वरून एक एफ/ए-18 सुपर हॉर्नेट या लढाऊ विमानानं या जहाजातील कर्मचाऱ्यांनी अमेरिकेच्या सैन्यानं दिलेल्या निर्देशांचं पालन न केल्यामुळे जहाजाच्या इंजिनीअरिंग आणि स्टीअरिंग विभागात अचूकपणे स्फोटकांचा मारा केला” असं या निवेदनात म्हटलं आहे. त्यात पुढे म्हटलं आहे की “मॅरिव्हेक्स जहाज आता इराणकडे मार्गक्रमण करत नाही.”
प्रसारमाध्यमांमधील वृत्तांमध्ये म्हटलं आहे की ही घटना घडली तेव्हा हे जहाज रिकामं होतं आणि ते होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या दक्षिणेला होतं. होर्मुझची सामुद्रधुनी हा एक अरुंद सागरी मार्ग असून सामान्य परिस्थितीत त्यामधून जगातील जवळपास एक-पंचमांश ऊर्जा किंवा इंधनाचा पुरवठा होतो.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC







