Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Getty Images
‘पैसे मोजा आणि गरबा पार्टनर भाड्याने मिळवा!’ एवढंच नाही, तर सगळ्यात महागड्या प्लॅनमध्ये चक्क कपाळावर किस आणि ‘आफ्टर पार्टी’ची ऑफर… नवरात्रीच्या साधारण 25 दिवस आधी सोशल मीडियावर सुरू झालेला ‘रेंट अ गरबा पार्टनर’ हा ट्रेंड प्रचंड चर्चेत आला होता. कदाचित तुमच्याही सोशल मीडिया फीडवर ही पोस्ट कधी ना कधी नक्कीच झळकली असेल.
गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावरील निरनिराळ्या अकाउंट्सवरून नवरात्रीत गरब्यासाठी ‘पार्टनर भाड्याने मिळवा’ अशा ऑफर्सच्या पोस्ट्स मोठ्या प्रमाणावर समोर येत होत्या.
यामध्ये ‘सिल्व्हर’, ‘गोल्ड’ आणि ‘प्लॅटिनम’ असे पॅकेजेस दिले जात होते. प्लॅननुसार वेगवेगळ्या सुविधा देण्याचा दावा यात करण्यात आला होता. तर सर्वात महागड्या पॅकेजमध्ये चक्क कपाळावर किस आणि ‘आफ्टर पार्टी’चीही ऑफर देण्यात आली होती.
पण या सोशल मीडिया अकाउंट्सवरून खरंच ‘गरबा पार्टनर भाड्याने देण्याचे डील्स’ होत होते का? हे शोधण्यासाठी ‘बीबीसी गुजराती’च्या प्रतिनिधीने अशा काही अकाउंट्सना मेसेज पाठवले.
या तपासणीत आम्ही ही ‘अकाउंट्स चालवणाऱ्या लोकांशी’ थेट संवाद साधला.
नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर ‘पैसे मोजून गरबा पार्टनर मिळवून देण्याचा दावा करणाऱ्या या अकाउंट्स आणि जाहिरातीं’मागील नेमके सत्य काय आहे? चला जाणून घेऊया.
फोटो स्रोत, SOCILA MEDIA
कोणत्याही सोशल मीडिया अकाउंटला अनावश्यक प्रसिद्धी मिळू नये आणि त्यांची गोपनीयता जपली जावी, या उद्देशाने युझरनेम आणि प्लॅटफॉर्मची नावे येथे देण्यात आलेली नाहीत.
अशा पोस्ट्स समोर आल्यानंतर या प्रतिनिधीने इन्स्टाग्रामवर ‘गरबा पार्टनर भाड्याने मिळवा’ अशा पोस्ट्स शोधायला सुरुवात केली. एवढंच नाही तर अशा पोस्ट्स टाकणाऱ्या इन्स्टा अकाउंट्सना थेट मेसेज करून या दाव्यांमागे नक्की काय सत्य आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
‘रेंट अ गरबा पार्टनर’च्या पोस्ट्स टाकणाऱ्यांमध्ये काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्ससुद्धा होते. त्यांचे फॉलोअर्स हजारोंच्या घरात होते. तर काही प्रोफाईल्स पाहून हे पेज चालवणारा माणूस सोशल मीडियावर अगदीच नवा किंवा नवशिका असावा, असे वाटत होते.
या ट्रेंडचा फायदा उचलण्यासाठी काही मॅट्रिमोनियल आणि डेटिंग ॲप्सनीसुद्धा अशाच पोस्ट्स शेअर करून युझर्सचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केल्याचे आमच्या लक्षात आले.
जेव्हा या प्रतिनिधीने अशा मॅट्रिमोनियल साइट्सशी संपर्क केला तेव्हा त्यांनी खुलासा केला की, त्यांचे प्लॅटफॉर्म लग्नाशी संबंधित असल्यामुळे त्यांनी ‘गरबा पार्टनर’ची पोस्ट फक्त लग्नाच्या संदर्भानेच टाकली होती.
डेटिंग ॲपकडून मात्र यावर कोणतेही उत्तर आले नाही
एका अकाउंटने तर ‘गरबा पार्टनर’च्या नावाखाली चक्क वेगळे ‘शॅडो अकाउंट’ बनवले होते. त्यांना मेसेज केल्यावर त्यांनी मुख्य अकाउंटची लिंक देऊन ते फॉलो करायला सांगितले.
म्हणजेच फॉलोअर्स आणि व्ह्यूज वाढवण्यासाठी खेळलेली ही केवळ एक ‘ट्रिक’ होती. त्याच अकाउंटने मध्य प्रदेशातील एका शहरात अशी सेवा देण्याची तयारी दाखवली.
पण गुजरातमध्ये ‘गरबा पार्टनर’ देण्यास साफ नकार दिला. तर बाकीच्या बऱ्याच इन्स्टाग्राम अकाउंट्सनी मेसेजला काहीच उत्तर दिले नाही.
फोटो स्रोत, Instagram
यातली विशेष गोष्ट म्हणजे भाड्याने ‘गरबा पार्टनर’ देण्याच्या पोस्ट्स ज्या इन्स्टाग्राम अकाउंट्सवरून आल्या त्यातील बहुतांश अकाउंट्स सप्टेंबर 2026 मध्येच तयार झालेले होते. म्हणजेच ती अगदी नवीकोरी होती.
यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, हे हँडल्स चालवणाऱ्यांनी खास याच कामासाठी ही नवी खाती उघडली असावीत आणि त्यांची अशी इतरही ‘शॅडो अकाउंट्स’ असू शकतात.
दुसरीकडे, ज्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी या सर्विसबद्दल पोस्ट्स शेअर केल्या होत्या, त्यांची खाती मात्र साधारण 3 ते 4 वर्षे जुनी होती.
मुलींसाठी मोफत नोंदणी
अखेर आम्हाला असे एक अकाउंट सापडले ज्याने ‘गरबा पार्टनर’ मिळवून देण्याची सर्विस चालवत असल्याचा दावा केला.
ज्या अकाउंटशी या प्रतिनिधीचे बोलणे झाले आणि ज्यांनी गरबा पार्टनर देण्याची तयारी दाखवली त्यांच्याशी प्रतिनिधीने गरब्यासाठी पार्टनर शोधणारा एक सामान्य तरुण ग्राहक बनून संवाद साधला. विशेष म्हणजे, हे अकाउंटसुद्धा सप्टेंबर 2026 मध्येच नव्याने सुरू करण्यात आले होते.
या अकाउंटवर नवरात्रीच्या थीमचे एक अतिशय आकर्षक पोस्टर शेअर करण्यात आले होते. त्यावर लिहिले होते: ‘आपला पार्टनर शोधा, नवे मित्र बनवा, एकत्र गरब्यावर ठेका धरा आणि मुलींसाठी नावनोंदणी अगदी मोफत!’
फोटो स्रोत, Instagram
आता मुलांसाठी ही सर्विस देण्यासाठी हे लोक नक्की किती पैसे घेत होते, हे आम्हाला शोधायचे होते. एवढंच नाही तर तरुण-तरुणी अगदी जवळ उभे असल्याचे फोटोही गरब्याच्या गाण्यांसोबत या पेजवर पोस्ट करण्यात आले होते. बायोमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून रजिस्ट्रेशन करण्यास सांगितले जात होते.
प्रतिनिधीने त्या अकाउंटला मेसेज पाठवून विचारले, “तुम्ही कोणत्या शहरांत गरबा पार्टनर देत आहात?” त्यांनी लगेच उत्तर दिले, “मुख्यतः दिल्ली, नोएडा आणि इतर राज्यांत.”
गरबा प्रामुख्याने गुजरातमध्येच खेळला जात असल्याने आम्ही विचारले, “मग गुजरातमध्ये का नाही?” त्यावर, “गुजरातच्याही काही मुलींनी आमच्याकडे रजिस्ट्रेशन केले आहे,” असे सांगण्यात आले.
फोटो स्रोत, Instagram
आता दिल्लीतून हे लोक गुजरातमध्ये ‘गरबा पार्टनर’ म्हणून मुलींची व्यवस्था कशी काय करणार, हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला.
या संभाषणात समोरच्या व्यक्तीने सांगितले, “तुम्हाला ठाऊकच आहे की मुलींनाही ‘गरबा पार्टनर’ हवा असतो. त्या इथे रजिस्ट्रेशन करतात आणि आम्ही त्यांना आधीच नोंदणी केलेल्या मुलांसोबत पाठवतो. आमच्याकडे दिल्ली, यूपी, नोएडामधून मुलींनी रजिस्ट्रेशन केले आहे. शिवाय काही मुली राजस्थानच्याही आहेत.”
आम्ही विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरात त्या व्यक्तीने सांगितले, “मुलांना नोंदणीसाठी 99 रुपये भरावे लागतील. तर मुलींसाठी नोंदणी पूर्णपणे मोफत आहे. तुम्ही नोंदणी केली की ‘गरबा पार्टनर’ म्हणून मुलगी कशी मिळेल, हे तुमच्या लक्षात येईल.”
आम्ही लगेच विचारले, “पण मुलगे आणि मुलींमध्ये हा असा फरक का?” त्यावर त्यांचे अगदी थेट उत्तर होते, “हे बघा मी जर फ्री ठेवले नसते तर एकाही मुलीने रजिस्ट्रेशन केलेच नसते.”
‘पूर्ण गोपनीयता आणि सुरक्षिततेची हमी’
‘गरबा पार्टनर’ शोधताना आम्ही प्रायव्हसीचा मुद्दा काढला, तेव्हा पलीकडून सांगण्यात आले, “तुमचा डेटा 100 टक्के सुरक्षित आहे. तुम्ही दिलेले फक्त नाव, वय आणि फोन नंबर एवढीच माहिती आम्ही घेतो.”
बोलता बोलता ती व्यक्ती सारखी आम्हाला ‘आधी रजिस्ट्रेशन करा’ म्हणून घाई करत होती. पण आम्ही बोलणे सुरू ठेवून आतली आणखी माहिती काढण्याचा प्रयत्न केला.
जसे की, “हे 99 रुपये नवरात्रीच्या 9 दिवसांचे आहेत की एकाच दिवसाचे? रोज एकच पार्टनर मिळेल की रोज नवीन? आणि समजा मला ती पार्टनर आवडली नाही तर काय?”
यावर त्या व्यक्तीचे उत्तर होते, “आम्ही फक्त मुलीचा मोबाईल नंबर देऊ, कारण आम्ही केवळ मध्यस्थ आहोत. पुढे तुम्ही तिच्याशी बोलू शकता. जर एकमेकांशी पटले नाही किंवा पार्टनर आवडली नाही, तर आम्ही लगेच दुसऱ्या मुलीचा नंबर देऊ.”
अकाउंटच्या बायोमध्ये दिलेल्या लिंकमध्ये नक्की काय होते?
आम्ही त्या अकाउंटची सर्व माहिती आणि बायोमध्ये दिलेली लिंक घेऊन थेट अहमदाबाद सायबर क्राईम ब्रँचमध्ये पोहोचलो.
एसीपी हार्दिक माकडिया यांनी या अकाउंट्सची माहिती घेऊन आपल्या कॉम्प्युटरवर ती लिंक ओपन केली. त्या लिंकवर चक्क एक गुगल फॉर्म उघडला. त्यात नाव, ईमेल आयडी, इन्स्टा अकाउंट, तुम्हाला पुरुष पार्टनर हवा आहे की महिला, तसेच तुम्हाला नक्की कसा ‘गरबा पार्टनर’ हवा आहे? अशा प्रकारची माहिती विचारण्यात आली होती.
हा फॉर्म सबमिट करताच समोर एक क्यूआर कोड यायचा जो स्कॅन करून 99 रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले जात होते.

एसीपी हार्दिक माकडिया यांनी खुलासा केला, “बायोमधील लिंक ही प्रत्यक्षात केवळ एक साधा गुगल फॉर्म आहे. गुगल फॉर्मचा उपयोग नेहमी विश्वासार्ह कामांसाठी, कुठल्याही सर्व्हेसाठी किंवा लोकांचे फीडबॅक घेण्यासाठी होतो. पण इथे हा गुगल फॉर्म सबमिट केल्यानंतरच खरा खेळ सुरू होतो! फॉर्म भरताच समोर 99 रुपये भरण्याचा मेसेज येतो, ज्यासाठी एक क्यूआर कोड आणि यूपीआय लिंक दिलेली असते.
पैसे ट्रान्सफर केल्यानंतर पेमेंटचा स्क्रीनशॉट तिथे अपलोड करावा लागतो. अशा पद्धतीने लोकांकडून प्रत्येकी 99 रुपये उकळून ही उघड फसवणूक केली जात आहे. आम्ही स्वतः या प्रोफाईलचा माग काढला आहे. लोकांकडून पैसे उकळायचे आणि बदल्यात कोणताही ‘गरबा पार्टनर’ द्यायचा नाही, असा हा शुद्ध बनाव आहे.”
फोटो स्रोत, Google form
एसीपी हार्दिक माकडिया यांनी धोक्याचा इशारा देत सांगितले, “हे लोक जी वैयक्तिक माहिती जमा करत आहेत, तिचा भयानक गैरवापर होऊ शकतो. जे लोक सिंगल आहेत आणि ज्यांना खरंच पार्टनरची गरज आहे, अशा लोकांना हे हेरतात.”
“फॉर्ममध्ये भरलेला मोबाईल नंबर आणि इन्स्टा आयडी वापरून हे लोक पुढे कधीही तुमच्याशी संपर्क करू शकतात. मुलगा असेल तर मुलीच्या नावाने आणि मुलगी असेल तर मुलाच्या नावाने चॅटिंग करून तुम्हाला हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा धोका असतो.”
“एवढंच नाही तर नवरात्रीचे फ्री पासेस देण्याचे आमिष दाखवून एखादी धोकादायक APK फाईल पाठवली जाऊ शकते. त्यामुळे तुमचे व्हॉट्सॲप हॅक होऊ शकते आणि बँकेतील खात्यावरही डल्ला मारला जाऊ शकतो. अशी कोणतीही फिशिंग पेजेस तुमचा डेटा चोरून तुमच्यासोबत सायबर फ्रॉड करू शकतात,” असा इशारा माकडिया यांनी दिला.
‘गरबा पार्टनर’ शोधण्याबाबत कायदा काय सांगतो?
‘गरबा पार्टनर’ शोधण्याबाबत कायदा काय सांगतो? या संदर्भात आम्ही कायदेतज्ज्ञ ॲड. अमित कचवे यांच्याशी चर्चा केली.
ॲड. अमित कचवे यांनी सांगितले, “2 सज्ञान व्यक्तींनी एकमेकांच्या संमतीने गरब्याला जाणे आणि त्यासाठी पैसे घेणे-देणे यात कायद्याने कोणताही गुन्हा ठरत नाही. ही पूर्णपणे त्या दोघांमधील परस्पर कराराचा भाग ठरते.
चीन किंवा हाँगकाँगसारख्या देशांमध्ये सोबत फिरण्यासाठी असे पार्टनर्स शोधणे अगदी सामान्य आहे; पण भारतात अजून ही संस्कृती रुजलेली नसल्याने अशा जाहिराती पाहून लोकांना धक्का बसणे किंवा विचित्र वाटणे अगदी स्वाभाविक आहे.”
तरीही ते सावध करत म्हणतात, “कुठल्याही अनोळखी व्यक्तीसोबत बाहेर जाणे हे नेहमीच धोक्याचे ठरू शकते.”
पोलीस तक्रार का नोंदवली जात नाही?
‘फॉरेन्सिक टॅलेंट इंडिया’ ही गुजरातमधील एक प्रायव्हेट सायबर सिक्युरिटी एजन्सी आहे.
बीबीसीशी बोलताना त्यांचे सायबर एक्सपर्ट अरुणकुमार म्हणाले, “पोलीस तेव्हाच काही ॲक्शन घेऊ शकतात, जेव्हा त्यांच्याकडे तक्रार जाते. अशा सायबर फ्रॉडमध्ये फसवणुकीची रक्कम अगदी नाममात्र असते. पण या स्कॅमर्सचे टार्गेट खूप मोठे असते. 99 रुपयांप्रमाणे जर दिवसाला 100 लोक जरी त्यांच्या जाळ्यात अडकले, तरी त्यांच्यासाठी ती खूप मोठी कमाई होते.”
“समजा माझे 99 रुपये गेले तर मी असा विचार करेन की एवढ्याशा रकमेसाठी कशाला पोलिसांकडे जायचे? पण लोकांच्या याच मानसिकतेमुळे पोलिसांपर्यंत अशा गुन्ह्यांची खरी माहिती वेळेवर पोहोचतच नाही,” असं ते सांगतात.
फोटो स्रोत, Getty
ते पुढे सांगतात, “पोलिसांकडे कमी पैशांच्या फसवणुकीची एखाद-दुसरीच तक्रार आली तरी ते त्यावर लगेच काही करू शकत नाहीत. कारण त्यांच्याकडे आधीच कोट्यवधींच्या मोठ्या घोटाळ्यांची अनेक प्रकरणे असतात. पण अशा छोट्या फ्रॉडबाबत जर 100 लोक एकत्र येऊन तक्रार करायला गेले तर पोलीस नक्कीच त्यावर ॲक्शन घेतील. पण जर लोकच पुढे येऊन बोलत नसतील, तर पोलीस तरी काय करणार?”
लहान रकमेच्या ऑनलाइन गैरव्यवहारांवर बोलताना अरुणकुमार म्हणाले, “अशा प्रकरणांमध्ये हव्यात तेवढ्या तक्रारीच येत नाहीत. जेव्हा लोक खूप मोठे पैसे गमावून बसतात तेव्हा त्यांना जाग येते की आपल्यासोबत फ्रॉड झाला आहे. पण सुरुवातीलाच जिथे सहज सावध होता येऊ शकते आणि फ्रॉड होण्याची शक्यता ‘शून्य’ असते, नेमक्या त्याच टप्प्यावर लोकांमध्ये अजिबात जागरूकता नसते.”
गुजरातमध्ये सायबर क्राईमचे किती गुन्हे नोंदवले गेले?
21 जुलै 2026 रोजी पीआयबीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 2021 ते 2025 या काळात सायबर गुन्ह्यांच्या तक्रारींचा आकडा तब्बल 65 लाख 89 हजार 201 च्या वर पोहोचला आहे. यामध्ये नागरिकांची 55 हजार 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची लूट झाली आहे.
या फसवणुकीप्रकरणी देशभरात 1 लाख 95 हजार 760 हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. एकट्या गुजरातबद्दल बोलायचे तर, राज्यात 2020 ते 2024 दरम्यान सायबर क्राईमचे 7,923 गुन्हे नोंदवले गेले आहेत.
याशिवाय, देशभरात अशा प्रकरणांचा तपास करताना पोलिसांनी बँक खात्यांमधील तब्बल 8 हजार 189 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम गोठवली आहे.”
नवरात्र सुरू होताच ‘गरबा पार्टनर’ मिळवून देणारे अकाउंट झाले गायब!
फोटो स्रोत, Social Media
या पेजवरून किती जणांनी प्रत्येकी 99 रुपये गमावले, याची पोलिसांत तक्रारच न आल्यामुळे नेमका आकडा समोर आलेला नाही. पण पहिल्याच दिवशी दुपारनंतर हे इन्स्टा अकाउंट उघडेनासे झाले आहे.
नवरात्र सुरू झाल्याने ज्यांनी पैसे भरले होते त्यांनी पार्टनरसाठी या पेजवर जाब विचारायला सुरुवात केली असावी, म्हणूनच कदाचित हे अकाउंट बंद करण्यात आले असावे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC




