Source :- BBC INDIA NEWS
करिअर समुपदेशनाच्या नावाखाली अनेक तरुणी आणि अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण केल्याच्या आरोपात नागपूरमध्ये पोलिसांनी एका 47 वर्षांच्या समुपदेशकाला अटक केली आहे.
आधी एका मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून घेतल्यानंतर आणखी दोन मुलींनी या आरोपीविरोधात तक्रार केल्याची माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी दिली.
या तीनही मुली अल्पवयीन आहेत. काही कारणांमुळे या आरोपीचे नाव उघड करू शकणार नसल्याचंही ते पुढे म्हणालेत.
आरोपीकडे समुपदेशक म्हणून प्रशिक्षण घेतल्याचं प्रमाणपत्र असल्याचं पोलीस तपासात सापडलं आहे. गेली अनेक वर्षे तो नागपूर शहरात समुपदेशन केंद्र चालवत होता.
हा आरोपी नागपूरसह आसपासच्या जिल्ह्यांमध्ये करिअर मार्गदर्शनासाठी शिबिरे आणि व्याख्यानंही घेत होता.
करिअरसंबंधी अडचणींबद्दल समुपदेशन घ्यायला समुपदेशन केंद्रावर विद्यार्थी, विद्यार्थिनींची रांग लागत असे.
ज्या मुलींना शालेय शिक्षणात अडचणी येत होत्या त्यांची समुपदेशनासाठी आणि प्रशिक्षणासाठी केंद्रावर राहण्याचीही सोय असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
तक्रार केलेल्या मुलींनी या केंद्रावरच लैंगिक छळ झाल्याचं म्हटलं आहे.
आरोपीनं समुपदेशन केंद्रावर येणाऱ्या मुलींचं आणि तरुणींचं वेगवेगळ्या पद्धतीनं आमिष दाखवून लैंगिक शोषण केलं. एवढंच नाही, तर त्यांचे आक्षेपार्ह व्हीडिओ आणि फोटोही त्यांच्या संग्रहात सापडलेत. या फोटोंच्या आधारावर मुलींना ब्लॅकमेल केलं जायचं असंही पोलीस तपासात उघड झालं आहे.
आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणात आरोपीच्या पत्नीलाही सह-आरोपी केलं आहे.
“आरोपी समुपदेशनासाठी येणाऱ्या तरुणींचा लैंगिक छळ करत असल्याचे माहीत असूनही त्याला थांबवण्याचा किंवा त्याची माहिती पोलिसात देण्याचा प्रयत्न पत्नीने केला नाही. त्यामुळे या गुन्हात त्यांचाही समावेश करून घेण्यात आला आहे. पत्नीचा या गुन्ह्यात किती सहभाग आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही. त्या स्वतः पीडितांपैकी एक होत्या का हेही अजून सांगता येणार नाही,” रवींद्र सिंघल म्हणालेत.
10 वर्षांपासून सुरू असलेला छळ आत्ता उघडकीस कसा आला?
10 वर्षांपूर्वी काढलेल्या आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओंवरून एका तरुणीला आरोपीनं ब्लॅकमेल करणं सुरू केलं होतं. सततच्या धमक्या आणि मानसिक त्रासाला कंटाळून महिलेनं हिंमत करून पोलिसांकडं नोव्हेंबर 2024 मध्ये तक्रार केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं.
तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून घेत पोलिसांनी आरोपी समुपदेशकाला लैंगिक छळाच्या आरोपाखाली अटक केली. प्रकरणाचा शोध घेताना आणखी धक्कादायक खुलासे झाले.
समुपदेशन केंद्रातील कार्यालयाची झडती घेत असताना एक हार्ड डिस्क पोलिसांच्या हाती लागली. त्यात अनेक मुलींचे आणि तरुणींचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हीडिओ पोलिसांना आढळल्याचं सांगितलं जात आहे.
या मुलींची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं रविंद्र सिंघल यांनी सांगितले.
पीडित तरुणींना संपर्क
गेल्या अनेक वर्षांत या समुपदेशकाकडं येणाऱ्या विद्यार्थिनींची यादी बनवून पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क करणं सुरू केलं.
पोलिसांनी विश्वास आणि हिंमत दिल्यानं आणखी दोन मुलींनी त्यात 4 जानेवारीला आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. त्यामुळे आत्तापर्यंत आरोपीविरोधात लैंगिक छळाचे तीन गुन्हे नोंदवण्यात आलेत.
आणखी मुलींनी तक्रार करण्यासाठी पुढे यावं यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. तसा निर्णय मुलींनी किंवा त्यांच्या पालकांनी घेतला, तर आरोपींविरोधात आणखी गुन्हे दाखल केले जातील किंवा याच तक्रारीत त्याचा समावेश केला जाईल, असं पोलिसांनी सांगितलं.
आरोपीविरोधात लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) या कायद्यासोबतच, माहिती आणि तंत्रज्ञान (आयटी) कायदा आणि इतर कायद्यातील लागू होतील ती सर्व कलमं लावली आहेत.
आरोपीचं नाव जाहीर न करण्यामागचं कारण
प्रकरणाचं गांभीर्य ओळखून महिला पोलीस अधिकारी, महिला आणि बालकल्याण विभागातील अधिकारी, सायबर गुन्हा शाखेतील पोलीस अधिकारी आणि काही महिला समुपदेशकांचा समावेश असलेली एक विशेष समिती 31 डिसेंबरला स्थापन करण्यात आली.
यातल्या अनेक मुली लैंगिक छळ झाला तेव्हा अल्पवयीन होत्या. मात्र, आता त्या लग्न करून संसार करत आहेत.
समुपदेशकाचे किंवा केंद्राचे नाव जाहीर केल्यानं त्याचा त्रास या मुलींना होऊ शकतो. त्यामुळे आरोपीचे नाव जाहीर करण्यास पोलिसांनी नकार दिला.
आणखी पुरावे सापडले आणि गरज पडली, तर लवकरच समुपदेशन केंद्राला टाळे लावण्याचा निर्णय घेतला जाईल असं पोलिसांनी सांगितलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC