Source :- BBC INDIA NEWS

पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे यांचं मृत्यूप्रकरण चर्चेत आहे. त्यांनी आत्महत्या केल्याचं सुरुवातीला समोर आलं होतं. पण, त्यांच्या शवविच्छेदन अहवालात शरीरावर मारहाणीच्या खुणा सापडल्या आहेत. त्यांच्या आई-वडिलांनी वैष्णवी यांचा हुंड्यासाठी छळ होत असून तिची हत्या केल्याचा आरोप केला आहे.
वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूप्रकरणावरून पुन्हा एकदा हुंडाबळी हा विषय चर्चेत आला आहे. 1961 मध्ये हुंडा प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आला.
या काद्यानुसार लग्नात एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाला थेट किंवा अप्रत्यक्ष कुठल्याही स्वरुपातील देवाण घेवाण करणं गुन्हा आहे. पण, अजूनही समाजात हुंडा घेणं, त्यासाठी होणारा छळ, प्रसंगी महिलांचे जाणारे बळी या गोष्टी अजूनही का थांबले नाहीत? असा प्रश्न उपस्थित होतो.
या पार्श्वभूमीवर वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नेमकं काय आहे? यामध्ये वैष्णवीच्या कुटुंबीयांनी काय आरोप केले आहेत? हे आधी समजून घेऊयात.
काय आहे वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण?
वैष्णवी हगवणे या राष्ट्रवादीचे मुळशी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांच्या सून होत्या. 16 मे रोजी वैष्णवी हगवणे यांचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगितलं जात होतं. मात्र त्यांच्या शरीरावर व्रण आढळल्यानं तिच्या पालकांनी वैष्णवीची हत्या झाल्याचा आरोप केला. यानंतर ही आत्महत्या की हुंडाबळी असा प्रश्न उपस्थित झाला.
वैष्णवी हगवणे आणि शशांक हगवणे यांचा 28 एप्रिल 2023 रोजी विवाह झाला होता. त्यानंतर सासरच्या लोकांकडून तिला वारंवार त्रास दिला जात असल्याचं तिच्या पालकांनी दिलेल्या पोलिस तक्रारीत म्हटलं आहे.
वैष्णवीचे वडिल अनिल कस्पटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नाच्या वेळीच 51 तोळे सोने, फॉर्च्युनर गाडी, चांदीची भांडी आणि सूचवलेल्या कार्यालयात लग्न लावून देण्याचे मान्य करुन घेण्यात आले होते. मात्र, तिचे सासू, सासरे आणि नवरा यांनी लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच तिच्याशी भांडणं करायला सुरुवात केल्याचा आरोप त्यांनी केला.
लग्नाच्या चार ते पाच महिन्यानंतर वैष्णवीच्या सासू लता हगवणे यांनी चांदीच्या भांड्यांची मागणी केली. ती दिली नाहीत म्हणून तिला त्रास देणे सुरू केल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला.

वैष्णवी गरोदर असताना तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करण्यात आल्याचाही आरोप तिच्या माहेरच्या लोकांनी केला आहे. यानंतर 27 नोव्हेंबर 2023 मध्ये वैष्णवीनं आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारानंतर ती पुन्हा सासरी रहायला गेली होती. मात्र, त्यानंतर 15 दिवसांनी वैष्णवीचे पती शशांक हगवणेंनी जमीन खरेदी करण्यासाठी 2 कोटी रुपयांची मागणी केल्याचं त्यांनी सांगितलं.
ही रक्कम देऊ न शकल्याने पुन्हा वैष्णवीला त्रास देत तुला फुकट पोसणार आहे का तुझ्या खानदानाचा काटा काढतो, अशी धमकी दिल्याचा आरोप कस्पाटे कुटुंबानं केला. यानंतर तिला मारहाण करून पुन्हा माहेरी सोडल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
मार्च 2025 मध्ये वैष्णवीची नणंद आणि सासू यांनी तिला मारहाण करून तिच्या अंगावर थुंकून तिला पुन्हा माहेरी पाठवल्याचाही आरोप वैष्णवीच्या पालकांनी केला.
5 मे 2025 ला वैष्णवी तिच्या चुलत भावाच्या लग्नासाठी माहेरी आली होती तेव्हा जावयाला पोशाख आणि अर्धा तोळ्याची अंगठी दिली. यातला पोशाख फेकून ते निघून गेले आणि वैष्णवीला माहेरी थांबू द्यायलाही नकार दिल्याचा आरोप त्यांनी केला.
16 मे रोजी वैष्णवीच्या नातलगांना फोन करून तिला माहेरी न्यायला सांगा असे शशांक यांनी कळवल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच संध्याकाळी याच नातलगांना वैष्णवीनं आत्महत्या केल्याचं सांगत रुग्णालयात येण्यासाठी कळवल्याची माहिती कस्पटे कुटुंबानं दिली.
वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालात काय?
वैष्णवीचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. या अहवालात तिच्या शरीरावर धारदार वस्तूनं वार केल्याच्या खुणा आणि अनेक जखमा आढळून आल्या.
वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. या घटनेनंतर राजेंद्र हगवणे आणि त्यांचा दुसरा मुलगा सुशील हगवणे फरार झाले आहेत, तर वैष्णवीचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिष्मा हगवणे यांना पोलिसांनी अटक केली आहे.
अटक आरोपींना 26 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तसेच शशांकला दिली गेलेली फॉर्च्युनर कार पोलिसांनी जप्त केली. तसेच सोन्याच्या दागिन्यांसंदर्भात कोणतेही व्यवहार करू नयेत, असं पत्र पोलिसांनी बँकेला दिले.
यानंतर एक फोटो व्हायरल झाला ज्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हातून फॉर्च्युनरची किल्ली शशांकला दिली गेल्याचा आरोप होतो आहे. या प्रकरणानंतर आता विरोधी पक्षांनी कडक कारवाई करावी अशी मागणी करत आंदोलनाची भूमिका घेतली.
दुसरीकडे राष्ट्रवादीकडून अशा कोणत्याही बाबींना थारा दिला जाणार नाही असं म्हणत राष्ट्रवादीतून हगवणेंची हकालपट्टी केल्याचं पत्र प्रसिद्ध करण्यात आलं. दरम्यान राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेत चौकशीचे आदेश दिल्याचं महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सांगितलं.
कायदा अस्तित्वात येऊन हुंडाबळी थांबत का नाही?
वैष्णवीच्या घरच्यांनी लग्नात तिला 51 तोळे सोनं आणि फॉर्च्युनर गाडी इतक्या महागड्या वस्तू दिल्या. पण, हुंडा प्रतिबंधात्मक कायद्यानुसार कुठल्याही अशा वस्तूंची देवाण-घेवाण करणं हा गुन्हा आहे.
हुंडाबंदी कायदा येण्याआधी लोक प्रत्यक्ष हुंड्याची मागणी करत होते. पण, काळानुसार हुंड्याचं स्वरुप बदलत चाललंय. अनेक भागात वेगवेगळ्या पद्धतीनं हुंडा मागितला जातो, काहीजण छुप्या पद्धतीनं हा हुंडा मागतात. लग्नानंतरही हुंड्यासाठी छळ होत असल्याचे प्रकारही समोर येतात.
कायदा अस्तित्वात येऊनही हुंडाबळी का थांबत नाही? याबद्दल स्त्री मुक्ती संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष ज्योती म्हापसेकर या तीन महत्वाची कारणं सांगतात.
त्या म्हणतात, यामागचं पहिलं कारण म्हणजे अजूनही महिलेला समाजात असलेला दुय्यम दर्जा जबाबदार आहे. महिलेचा दर्जा जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत हे प्रकार घडतच राहतील.
याचीच काही उदाहरणं म्हापसेकर देतात. मुलगी अजून आई-वडिलांच्या पश्चात त्यांच्या मालमत्तेत हक्क मागत नाही. स्त्रीनं वारसाहक्क मिळवायला पाहिजे, मग या घटना कमी होतील.
दुसरं म्हणजे आपल्याच जातीत, आपल्याच गावाजवळ श्रेष्ठ असलेला मुलगा लग्नासाठी मिळावा अशा अपेक्षा असतात. मग तो मुलगा त्याची किंमत मागतो आणि मुलीचे आई-वडील ती द्यायला तयारही होतात. पण, त्याऐवजी मुलीला तिचा जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र दिलं, तर अशा घटना कमी होतील. पण, दुर्दैवानं मुलीला तिचा जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य नाही.
पैशांची हाव आणि झटपट मिळणारा पैसा हे या गोष्टीला कारणीभूत आहे. बायकोच्या माहेरहून मागितला की झटपट पैसा मिळतो आणि तो नाही मिळाला की अशा घटना घडतात.
तिसरं म्हणजे ‘चांगला’ मुलगा हातातून जाईल अशी भीती असते. कोणी हुंडा घेत असेल तर सर्वात आधी मुलींनी विरोध करायला पाहिजे. ‘चांगला’ मुलगा गेला, तर गेला. हुंडा दिला तर मी लग्नच करणार नाही अशी भूमिका मुलींनी घ्यायला हवी.

फोटो स्रोत, Getty Images
निलम गोरे या महिलांच्या प्रश्नांवर, हुंडाबळीच्या प्रश्नांवर काम करतात. अजूनही हुंडाबळी हा प्रकार थांबत का नाही यामागे निलम गोरे यांना सुद्धा समाजात मुलीला प्रतिष्ठा नाही हेच महत्वाचं कारण वाटतं.
स्त्रीला एक व्यक्ती म्हणून स्विकारत नाही तोपर्यंत या गोष्टी बंद होणार नाहीत. अजूनही समाजात तिला तिच्या वैवाहिक दर्जावरूनच मान-सन्मान दिला जातो. त्यामुळे मुली, महिला आत्महत्या स्विकारतात पण, एकटं जगायला तयार होत नाहीत. त्यामुळेच ऑनर किलींग, हुंडाबळी अशा घटना घडतात.
मुली सुशिक्षित आहेत त्यांना कायदा माहिती असतो. एकटे राहिले तर इकडची पृथ्वी तिकडे होईल असं नाही, अशी भूमिका घ्यायला हवी. नात्यात आता समझोता शक्य नाही हे समजल्यावर मुलींनी एकटं राहण्याचं पाऊल उचलायला हवं.
असले प्रकार थांबववण्यासाठी मुलांनी बायकोला घरगडी म्हणून न बघता सगळ्या जबाबदाऱ्या दोघांच्या आहेत असं समजून वागलं पाहिजे. तसेच सासू-सासऱ्यांनी सुद्धा सूनेला पैशांची मशिन समजू नये.
मुलीच्या पाठिमागे भक्कम उभे राहणारे आई-वडील, भाऊ समाजात तयार होत नाहीत तोपर्यंत अशा घटना घडत राहतील.
महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या रुपा कुलकर्णी यांना देखील बाईचा दुय्यमपणाचा दर्जा हेच महत्वाचं कारण वाटतं.
त्या म्हणतात, “आपला समाज आणखी मागे चाललाय. समाज मागे जात असेल, तर बाईचं स्थानसुद्धा निकृष्ट होत जातं. तिला त्याच घाणेरड्या मानसिकतेतून बघितलं जातं. त्यामुळे असले हुंडाबळीसारखे प्रकार घडतात.
बाईच्या दुय्यमपणाला टीव्हीवरील मालिका देखील कारणीभूत असल्याचं रुपा कुलकर्णी यांना वाटतं. त्या म्हणतात, “प्रत्येक टीव्ही मालिकेत बाई ही दागिन्यांनी सजलेली दाखवली जाते. तिनं दागिने घालणं, नटणं ही बाईची प्रतिमा तयारी केली जाते. त्याच स्वरुपात तिला बघितलं जातं.”
“हे सगळं चित्र अतिशय नुकसानकारक आहे. या मालिकांमधून खंबीरपणे लढणारी महिला का दाखवली जात नाही. त्यामधून प्रबोधन होईल.”
हुंड्याचं बदलतं स्वरुप
लग्नात दोन पक्षांत होणारी देवाण-घेवाण ती पैशांच्या स्वरुपात असो की वस्तूंच्या, तो हुंडा असतो. पण, या हुंड्याचं स्वरुप काळानुसार बदलत चाललंय.
हल्ली “तुम्ही तुमच्या मुलींचा खर्च बघा, तुम्ही तुमच्या मुलीला सजवा” असं बोलून अप्रत्यक्षपणे हुंडा मागितला जातो. तर काही ठिकाणी “आम्हाला काहीच नको, तुमच्या मुलीला सहखुशीनं जे द्यायचं ते द्या” अशा छुप्या पद्धतीनं हुंडा घेतला जातो.
लग्न ग्रँड व्हावं आणि त्याचा खर्च फक्त मुलींच्या आई-वडिलांनी करावा अशी काहींची मागणी असते. हे सर्व प्रकार हुंडा प्रकारात मोडतात. सध्याच्या काळात ग्रँड लग्न करून आपल्या मुलीच्या सासरच्यांना महागड्या भेटवस्तू देण्याची पद्धत सुरू झाली आहे.
याबद्दल ज्योती म्हापसेकर म्हणतात, “आता दोन्ही पक्षांकडे मोठ्या प्रमाणात पैसा आला की तो यामध्ये खर्च करतात. मेहंदी, हळदी, संगीत असले कार्यक्रम करून लग्न 5-5 दिवसांचं होतं.”
“मुलींना सुद्धा पैशांची पर्वा न करता मौजमजा करायची असते. ज्यांच्याकडे बक्कळ पैसा आहे ते लोक गाजावाजा करत लग्न करतात आणि त्याच श्रीमंत लोकांचं अनुकरण इतर लोक करतात.”
“लग्नासाठी सांगितलेली प्रत्येक पूर्वअट ही हुंडा असते हे मुलींना आणि तिच्या घरच्यांना सुद्धा समजायला पाहिजे. तसेच मुलांनी सुद्धा मी हुंडा घेणार नाही असं सांगायला पाहिजे. निम्मा निम्मा खर्च करून लग्न करण्याची पद्धतच योग्य आहे.”

फोटो स्रोत, Getty Images
तर रुपा कुलकर्णी असे ग्रँड लग्न आणि भेटवस्तू देणाऱ्या मुलींच्या आई-वडिलांनाच जबाबदार धरतात.
त्या म्हणतात, “मुलीचं लग्न असलं की तिला काय काय गिफ्ट द्यायचं आहे ते एक एक जण वाटून घेतात. एकजण म्हणतो फ्रीज देतो, दुसरा म्हणतो स्कूटर देतो. पण, या सगळ्यांमध्ये दोष मुलीवाल्यांचा आहे.”
“त्यांनी या सवयी बिघडवल्या आहेत. त्यांनी वस्तूस्वरुपात मुलीच्या सासऱ्यांना गिफ्ट देऊन या परंपरा निर्माण केल्या आहेत.”
थाटामाटात लग्न करण्याचा समाजाचा दबाव जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत असल्या गोष्टी होतील, असं निलम गोरे यांना वाटतं.
त्या म्हणतात, “पीडितेला सोडून या गोष्टीची खंत कोणालाच वाटत नाही. कायद्याची पायमल्ली करणे, लग्नात एका पक्षानं दुसऱ्या पक्षाकडून पैसे, भेटवस्तू घेणे आणि संपत्तीचं प्रदर्शन करणे यात लोकांना गर्व वाटतो. मुलींच्या मनात देखील प्रचंड उद्दातीकरण झालेलं आहे की आपलं लग्न थाटामाटात व्हावं.”
“पण, प्रत्येकच मुलगी अशी नसते. काही आई-वडिलांचा विचार करणाऱ्या पण असतात. लग्न हे साध्या पद्धतीनं झालं आणि समाजातून देखील थाटामाटात लग्न करायचं आहे हा दबाव कमी झाला, तर आई-वडिलांच्या निम्म्या समस्या सहज सुटतील.”
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC