Source :- BBC INDIA NEWS
Getty Images
वाचन वेळ: 3 मिनिटे
‘सन ग्रुप’च्या काव्या मारन आणि चित्रपट संगीतकार अनिरुद्ध रविचंद्रन यांच्या लग्नाची बातमी तामिळनाडूमध्ये जोरदार चर्चेत आहे.
या विवाहामुळे एम. के. स्टॅलिन-मारन कुटुंब आणि तमिळ चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या कलाकारांपैकी एक असलेल्या रजनीकांत यांचं कुटुंब एकमेकांशी जोडलं जाणार आहे.
सन ग्रुपचे चेअरमन कलानिधी मारन आणि त्यांच्या पत्नी कावेरी मारन यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची भेट घेऊन त्यांना या विवाह सोहळ्यासाठी आमंत्रित केलं आहे, असं तेलंगणा मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयानं सांगितलंय.
मारन दांपत्यानं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनाही लग्नासाठी वैयक्तिकरित्या आमंत्रित केलं आहे.
काव्या मारन यांचा एम. के. स्टॅलिन यांच्याशी काय संबंध आहे?
काव्या कलानिधी मारन या सन टीव्ही नेटवर्कच्या व्यवस्थापकीय संचालकांपैकी एक आहेत. त्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये खेळणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघाच्या सह-मालक देखील आहेत.
सन ग्रुपचे चेअरमन कलानिधी मारन आणि त्यांच्या पत्नी कावेरी कलानिधी यांची कन्या काव्या ही 2016 मध्ये सन टीव्हीमध्ये रुजू झाली. 2019 मध्ये तिची व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती झाली.
कलानिधी मारन यांचे दिवंगत वडील मुरासोली मारन हे माजी केंद्रीय मंत्री होते. मुरासोली मारन हे माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांच्या बहिणीचे पुत्र होते. त्यामुळे, डीएमके प्रमुख एम. के. स्टॅलिन आणि कलानिधी मारन हे नातेवाईक आहेत. म्हणूनच, काव्या मारन या एम. के. स्टॅलिन यांच्या नात आहेत.
Getty Images
अनिरुद्ध आणि रजनीकांत यांचं नातं काय आहे?
तमिळ चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध संगीतकारांपैकी एक असलेल्या अनिरुद्ध रविचंद्रन यांनी 2012 साली प्रदर्शित झालेल्या ‘3’ या चित्रपटाद्वारे संगीतकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.
त्यांच्या पहिल्याच चित्रपटातील ‘व्हाय धिस कोलावेरी डी’ हे गाणं जगभर गाजलं.
यानंतर त्यांनी ‘विक्रम’, ‘लिओ’, ‘जेलर’ यांसारख्या अनेक चित्रपटांना संगीत दिलेलं आहे.
Instagram/lycaproductions
अनिरुद्ध हा अभिनेता रजनीकांत यांच्या पत्नी लता रजनीकांत यांच्या भावाचा मुलगा आहे.
अनिरुद्ध रविचंदरचे वडील रवी राघवेंद्र हे चित्रपट अभिनेते आहेत. याचा अर्थ अनिरुद्ध हा रजनीकांत यांचा पुतण्या आहे.
कौटुंबिक संबंधांव्यतिरिक्त, अनिरुद्ध आणि रजनीकांत यांनी चित्रपटांमध्ये एकत्र कामही केलेलं आहे. अनिरुद्धने रजनीकांतच्या ‘पेट्टा’, ‘दरबार’ आणि ‘जेलर’ यांसारख्या अनेक चित्रपटांना संगीत दिलेलं आहे.
स्टॅलिन आणि रजनीकांत होणार एकमेकांचे नातेवाईक
या विवाहसोहळ्यामुळे तामिळनाडूतील दोन नामांकित घराणी एकत्र येतील.
एकीकडे, वधू काव्या मारन ही करुणानिधी-मुरासोली मारन कुटुंबाशी संबंधित आहे. दुसरीकडे, अनिरुद्ध रविचंद्रन हा रजनीकांतच्या कुटुंबातील जवळचा सदस्य आहे.
अशाप्रकारे, स्टॅलिन आणि रजनीकांत यांची कुटुंबंसुद्धा आता एकाच विस्तारित कुटुंबाचा भाग बनतील.
ANI
सन टीव्ही ग्रुपचं बाजारमूल्य
‘सन टीव्ही नेटवर्क’ ही भारतातील सर्वात मोठ्या मीडिया कंपन्यांपैकी एक असून, तिचं कार्यक्षेत्र टेलिव्हिजन, रेडिओ, डिजिटल स्ट्रीमिंग, प्रिंट मीडिया आणि क्रीडा क्षेत्रातील गुंतवणुकीपर्यंत पसरलेलं आहे.
कंपनीने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, त्यांच्याकडे सात भाषांमधील 37 टीव्ही चॅनेल्स, 69 एफएम रेडिओ स्टेशन्स आणि 14 कोटींहून अधिक घरांपर्यंत पोहोचणारे प्रेक्षक नेटवर्क आहे.
Getty Images & @anirudhofficial
सनएनएक्सटी (SunNxt) ओटीटी प्लॅटफॉर्म आणि सनरायझर्स हैदराबाद क्रिकेट संघ हे देखील त्यांच्या व्यवसायाचा भाग आहेत.
ही आकडेवारी कंपनीच्या कामकाज किती मोठं आहे, याची व्याप्ती दर्शवते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC




