Source :- BBC INDIA NEWS
कुंभमेळ्यामुळे प्रयागराजमधील त्रिवेणी संगमाची चर्चा होते आणि त्रिवेणी संगमाचा विषय निघाला की, गंगा, यमुना या नद्यांसोबत सरस्वती नदीचाही हमखास उल्लेख होतो.
गेल्या कित्येक वर्षांपासून सरस्वती नदी एक गूढ बनून राहिली आहे.
या नदीचं खरोखरंच अस्तित्व आहे का? ती भारतात नेमकी कुठे अस्तित्वात आहे किंवा होती, याबद्दल बरीच चर्चा झाली आहे आणि अजूनही ती होत असते.
पौराणिक कथांमध्ये सरस्वती नदीचा उल्लेख आहे. अलीकडच्या काळात यावर काही संशोधनदेखील झालं आहे. तरीही अनेक मुद्द्यांवर चर्चा होतच असते.
सरस्वती नदीचं अस्तित्व आहे की नाही, तिचा नेमका मार्ग, कुंभमेळ्याशी असलेला संबंध याबद्दल जाणून घेऊया.
प्रयागराजमध्ये 13 जानेवारीपासून महाकुंभमेळ्याची सुरूवात झाली आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी देशभरातून आणि परदेशातून लाखो भाविक प्रयागराजला गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती नदीच्या संगमावर येत आहेत.
सरकारचा अंदाज आहे की, यावर्षीच्या महाकुंभमेळ्याला 40 कोटीहून अधिक लोक भेट देणार आहेत.
14 जानेवारीला कुंभमेळ्यातील पहिलं शाही स्नान आहे. अर्थात, उत्तर प्रदेश सरकारनं आता शाही स्नानाचं नाव बदलून अमृत स्नान असं केलं आहे.
त्रिवेणी संगमावर भाविकांची गर्दी होण्यास सुरूवात झाली आहे. आपण नेहमीच ऐकतो, वाचतो की त्रिवेणी संगम, हा गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांचा संगम आहे.
सध्या प्रयागराजमधील त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी फक्त गंगा आणि यमुना नद्याच दिसतात. या दोन नद्यांचं पाणी तिथं एकत्र होतं.
संगमाच्या ठिकाणी यमुना नदी पश्चिमेकडून वाहत येते तर गंगा नदी उत्तर दिशेकडून वाहत येते. त्रिवेणी संगमावर या दोन्ही नद्या एकत्र होतात. तिथून पुढे ती गंगा नदी म्हणूनच ओळखली जाते.
या संगमाला त्रिवेणी संगम असं जरी म्हणत असले तरी तिसरी सरस्वती नदी संगमाच्या ठिकाणी का दिसत नाही? इतिहास संशोधक याबद्दल काय सांगतात? सरस्वती नदीच्या अस्तित्वाबद्दल काही ऐतिहासिक पुरावे आहेत का?
सरस्वती नदी खरोखरंच अस्तित्वात होती का आणि नंतर ती लुप्त झाली की सरस्वती नदी हे मिथक आहे? नेमकं सत्य काय आहे?
प्राचीन कथा, पुराण काय सांगतात?
काही विश्लेषकांचं म्हणणं आहे की, सरस्वती नदी त्रिवेणी संगमात एक आंतरप्रवाह म्हणून वाहते. सरस्वती नदी लुप्त किंवा गायब होण्यामागे अनेक कथा असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
अनामिका रॉय अलाहाबाद विद्यापीठात प्राचीन इतिहासाच्या प्राध्यापिका आहेत. बीबीसी यासंदर्भात त्यांच्याशी बोललं.
अनामिका रॉय म्हणाल्या, “पुराणांनुसार, सरस्वती नदीला ब्रह्मदेवाची मुलगी म्हटलं जातं. असं म्हटलं जातं की, एकदा सरस्वती पुरुर्वा राजाच्या प्रेमात पडली. पुरुर्वा कौशंबी राज्याच्या राजा होता. ते प्रयागराजजवळ आहे. ब्रह्मदेवाला याबद्दल कळालं आणि रागाच्या भरात ब्रह्मदेवानं सरस्वतीला गायब होण्याचा शाप दिला.”
अशीच एक पौराणिक कथा मथुरेतील धनंजय दास यांनी सांगितली.
ते म्हणाले, “असं म्हणतात की सरस्वती नदीचा उगम ब्रद्रिनाथच्या परिसरात होतो. एका ऋषीनं शाप दिल्यामुळे ही नदी नामशेष झाली. असं म्हटलं जातं की सरस्वती नदीच्या प्रवाहामुळे जो आवाज निर्माण व्हायचा त्यामुळे त्या ऋषीच्या तपश्चर्येत अडथळा यायचा.”
“पुराण आणि प्राचीन शास्त्रांनुसार, प्रयागराजमधील त्रिवेणी संगमावर सरस्वती नदी दिसत नाही. मात्र, ही नदी निश्चितच तिथे आहे. तिथे सरस्वती नदी अदृश्य स्वरुपात वाहते. म्हणूनच गंगा आणि यमुना या नद्यांच्या संगमाला त्रिवेणी संगम असं म्हणतात.”
सरस्वती नदीच्या काही खुणा सापडतात का?
आपण सरस्वती नदीचं नाव ऐकतो, मात्र भारतात ही नदी कुठेही आढळत नाही.
गंगा, यमुना आणि कावेरी या नद्यांप्रमाणे सरस्वती नदी कुठेही वाहताना दिसत नाही.
मात्र, अनेक भाविकांचा विश्वास आहे की सरस्वती नदी अस्तित्वात आहे.
अनामिका रॉय म्हणतात, “सरस्वती नदी लोकांच्या मनात आहे. लोकांचा या नदीवर श्रद्धा आहे. स्थानिक लोकांकडून सांगितल्या जात असलेल्या कथांमधून ही नदी अजूनही जिवंत आहे. अगदी त्रिवेणी संगमाच्याही आधी, सरस्वती नदीचा यमुनेशी संगम झाला आणि ती द्विवेणी झाली.”
अनामिका रॉय पुढे म्हणतात की सरस्वती नदीचा प्रवाह शेवटचा हरियाणातील कुरुक्षेत्रमध्ये दिसल्याचे पुरावे आहेत.
“पुरातत्वशास्त्रज्ञांना सापडलेल्या पुराव्यानुसार, हरियाणातील घग्गर परिसरात सरस्वती नदी यमुना नदीला मिळाली. तिथून प्रयागराजपर्यंत ही नदी यमुना नदीबरोबर दोन प्रवाहात वाहते. त्यानंतर प्रयागराजला ती गंगेला मिळते आणि तिथे त्रिवेणी होते.”
पुराणांमध्ये असंही लिहिलं आहे की, “गंगा यमुनायो यात्रा गुप्त सरस्वती.”
सरस्वती नदीसंदर्भात संशोधन करण्यात आलंय का?
15 जून 2002 रोजी तत्कालीन केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जगमोहन यांनी घोषणा केली की, सरस्वती नदीचा मार्ग शोधण्यासाठी उत्खनन केलं जाईल.
यासाठी तज्ज्ञांची एक टीम नेमण्यात आली होती. त्यामध्ये इस्रोचे बलदेव सहाय, पुरातत्वशास्त्रज्ञ एस. कल्याण रमण, हिमनदीशास्त्रज्ञ वाय के पुरी आणि जल सल्लागार माधव चितळे यांचा समावेश होता.
ही टीम राजस्थानातील विविध भागात गेली. यात राजस्थानच्या सीमेवरील राज्यांचाही समावेश होता. तज्ज्ञांच्या या टीमनं बरीच माहिती गोळा केली. त्या माहिती आणि अभ्यासाच्या आधारे, 28 नोव्हेंबर 2015 ला इस्रोच्या वैज्ञानिकांनी सरस्वती नदीवर एक अहवाल प्रकाशित केला.
‘सरस्वती नदी: प्रत्यक्ष जमिनीवरील माहितीसह रिमोट सेन्सिंग आणि जीआयएस तंत्रावर धारित एकात्मिक अभ्यास’ असं त्या अहवालाचं शीर्षक होतं. हा अहवाल डॉ. जे आर शर्मा, डॉ बी सी भद्रा, डॉ. ए के गुप्ता आणि डॉ. जी श्रीनिवास यांच्यासारख्या वरिष्ठ वैज्ञानिकांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला होता.
हा अहवाल इस्रोच्या जोधपूर येथील प्रादेशिक रिमोट सेन्सिंग केंद्रानं तयार केला होता. या अहवालात म्हटलं होतं की देशाच्या वायव्य (उत्तर-पश्चिम) प्रदेशातून अनेक नद्या वाहायच्या.
वेद आणि पुराणांमध्ये म्हटलं आहे की, सिंधू नदीप्रमाणेच सरस्वती नदी देखील इसवीसनापूर्वी 6,000 वर्षांपूर्वी वाहत होती. म्हणजेच ही नदी जवळपास 8,000 वर्षांपूर्वी वाहत होती.
या अहवालात असंही म्हटलं आहे की त्यावेळेस सरस्वती नदी, आजच्या हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, राजस्थान या राज्यांमधून वाहत शेवटी गुजरातमधील कच्छमध्ये समुद्राला मिळायची.
हवामान बदल आणि हिमालयातील टेक्टॉनिक प्लेट्सच्या हालचालींमुळे हजारो वर्षांपूर्वी सरस्वती नदी कोरडी पडली, अशाही कथा आहेत.
कुंभमेळ्याला मिळाली मोठी प्रसिद्धी
कवी कालिदासानं इसवीसनापूर्वी 4 – 5 व्या शतकात ‘रघुवंश’ हे काव्य लिहिलं होतं. त्यात गंगा आणि यमुना या नद्यांची नावं आहेत. मात्र त्यात सरस्वती नदीचा उल्लेख नाही.
अनामिका रॉय म्हणतात की कालिदासानं सरस्वती नदीचा उल्लेख केला नसेल कारण त्या कालखंडात या नदीचा फारसा उल्लेख आढळत नाही.
त्या पुढे म्हणाल्या, “कुंभमेळ्याची सुरूवात झाल्यानंतर सरस्वती नदी खूप प्रसिद्ध झाली. मात्र जर आपण ऐतिहासिक पुरावे पाहिले तर आपल्याला म्हणता येईल की सरस्वती नदी अस्तित्वात होती आणि नंतर ती लुप्त झाली.”
रॉय म्हणाल्या, “के चट्टोपाध्यायसारखे इतिहासकार म्हणतात की सिंधू नदी म्हणजेच सरस्वती नदी आहे. तर धर्मशास्त्राचारी लिहिणाऱ्या पी व्ही काणे यांच्यासारखे इतिहासकार यांना मात्र हा युक्तिवाद पडत नाही. तर इतर काही इतिहासकाराचं म्हणणं आहे की कुरुक्षेत्रापासून सरस्वती नदी अनेक प्रवाहांमध्ये विभाजित होते.”
त्रिवेणी संगमाला विशेष प्राधान्य
प्रयागराजमध्ये दर 12 वर्षांनी महा कुंभमेळा भरतो. तिथल्या त्रिवेणी संगमावर हा कुंभमेळा होतो.
अलीकडेच उत्तर प्रदेश सरकारनं कुंभमेळ्यासाठी त्रिवेणी संगमावर एक विशेष घाट बांधला. या घाटावर आता बोटी देखील उपलब्ध आहेत.
गंगा आणि यमुना या नद्यांचा प्रवाह जेव्हा कमी होतो, तेव्हा भाविक बोटीतून संगमावर जातात आणि आंघोळ करतात.
पूजेबरोबर भाविक तिथे इतर विधी देखील करतात. ते त्यांच्या नातेवाईकांच्या अस्थी देखील घेऊन येतात.
काही भाविक म्हणतात की या सर्व गोष्टींमुळे नदीमध्ये कचराच कचरा दिसतो.
हजारोंना रोजगाराच्या संधी
दररोज मोठ्या संख्येनं भाविक त्रिवेणी संगमावर येतात. उत्तर प्रदेश सरकारचं म्हणणं आहे की कुंभमेळ्यासाठी लाखोंच्या संख्येनं भाविक इथे येतील.
इथल्या नावाड्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रयागराजमध्ये 2,000 बोटी आहेत. कुंभमेळ्यामुळे इथे हजारो लोक बोट चालवून कुटुंबाचं पोट भरत आहेत.
त्रिवेणी संगमावर देशाच्या विविध राज्यांमधून भाविक येत असल्यामुळे या नावाड्यांना आता विविध राज्यांच्या अनेक भाषादेखील येतात.
त्यांना तेलगू, कन्नड, गुजराती, तामिळ यासारख्या भाषांमधील काही शब्ददेखील येतात.
“इथे 15-20 भाषा बोलणारे लोक येतात. त्यांच्याशी बोलता यावं म्हणून आम्ही काही भाषांमधील शब्द शिकलो आहोत,” असं बच्चनलाल यांनी बीबीसीला सांगितलं. ते नावाडी आहेत.
त्रिवेणी संगमावर वेणीदान देखील केलं जातं.
चंद्रशेखर शर्मा तेलगू पुजारी आहेत. त्यांनी या परंपरेबद्दल बीबीसीला सांगितलं की, “पती आणि पत्नी इथे पुन्हा लग्न करतात आणि त्यानंतर पत्नी तिचे केस दान करते.”
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC