Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Getty Images
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे
दरम्यान, मुंबईसह उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले असून, सततच्या पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
फोटो स्रोत, @RMC_Mumbai
मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, रत्नागिरी, बुलढाणा, अमरावती, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. काही ठिकाणी ताशी 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
तसेच, पुढील 3 दिवस मुंबई, कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
कुठे किती पाऊस
मागील 24 तासांत म्हणजे 2 जुलैला सकाळी 8.30 ते 3 जुलै सकाळी 8.30 दरम्यान सह्याद्रीच्या घाटमाथा भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे.
रायगड आणि पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी 100 मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला असून, भिरा येथे सर्वाधिक 210 मिमी पावसाची नोंद झाली.
त्यानंतर ताम्हिणी येथे 170 मिमी, डोंगरवाडी 141 मिमी, लोणावळा कार्यालय 140 मिमी, दावडी 135 मिमी, शिरगाव 130 मिमी, धारावी 122 मिमी, लोणावळा 116 मिमी, आंबोणे 108 मिमी आणि खोपोली येथे 100 मिमी पाऊस झाला.
भिरा येथे आतापर्यंत तब्बल 1,675 मिमी पावसाची नोंद झाली असून, डोंगरवाडी (821 मिमी), ताम्हिणी (794 मिमी), पोफळी (729 मिमी), लोणावळा कार्यालय (659 मिमी), धारावी (632 मिमी), दावडी (615 मिमी) आणि शिरगाव (571 मिमी) येथेही लक्षणीय पाऊस झाला आहे.
घाटमाथ्यावर सुरू असलेल्या या जोरदार पावसामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठी आवक होत असून, नद्या-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.
प्रशासनाने नागरिकांना आणि पर्यटकांना घाट परिसरात आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.
पुढच्या 4 आठवड्यांचा अंदाज
दर गुरुवारी हवामान विभाग पुढच्या चार आठवड्यांचा विस्तारीत अंदाज जाहीर करतो.
फोटो स्रोत, Getty Images
2-9 जुलै या पहिल्या आठवड्यात राज्यात बहुतांश ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल.
9-16 जुलै या आठवड्यात उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त, पण इतर ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे.
16 ते 23 जुलै आणि 23 जुलै ते 3 ऑगस्ट या आठवड्यात मान्सूनच्या पावसात खंड पडण्याची चिन्हं आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC




