Source :- BBC INDIA NEWS

कॉफी

फोटो स्रोत, Getty Images

हृदहयविकारानं मृत्यू होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच मृत्यूचा धोका कमी करण्यात कॉफी उपयुक्त ठरत असल्याचा निष्कर्ष ताज्या संशोधनातून काढण्यात आला आहे.

दिवसभरात केव्हाही कॉफी पिण्यापेक्षा सकाळी कॉफी प्यायल्यास त्याचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम होत असल्याचं या संशोधनात म्हटलं आहे. या नव्या संशोधनाची माहिती देणारा हा लेख.

सकाळी कॉफी प्यायल्यामुळे अकाली मृत्यू होण्याचा धोका कमी होऊ शकतो, असं नव्या संशोधनातून समोर आलं आहे.

या अभ्यासात असं आढळलं की जे लोक सकाळी कॉफी पितात त्यांचा हृदयविकारामुळे मृत्यू होण्याचा धोका कमी होतो. तसंच दिवसभर कॉफी पिणाऱ्यांपेक्षा सकाळी कॉफी पिणाऱ्यांमध्ये मृत्यूचा धोका कमी असतो.

मात्र असं फक्त कॉफीमुळेच होतं, याबद्दल या संशोधनात कोणताही पुरावा देण्यात आलेला नाही.

डॉ. लू की, ट्युलेन युनिव्हर्सिटी ऑबेसिटी रिसर्च सेंटरचे संचालक आहेत आणि या संशोधनातील मुख्य संशोधक आहेत. ते म्हणाले, सकाळी कॉफी प्यायल्यामुळे मृत्यूचा धोका का कमी होतो हे या अभ्यासात सांगण्यात आलेलं नाही.

दिवसभरात कॉफी प्यायल्यामुळे त्या व्यक्तीच्या शरीराचं जैविक चक्र किंवा घड्याळ यात कदाचित अडथळा किंवा व्यत्यय असावा हे त्यामागचं एक कारण असू शकतं.

हा अभ्यास बुधवारी (15 जानेवारी) ‘युरोपियन हार्ट जर्नल’मध्ये प्रकाशित झाला.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

सकाळी कॉफी प्यायल्याचा फायदा

डॉ. की म्हणाले, अभ्यासातून त्यांनी जे निष्कर्ष काढले आहेत ते इतर लोकांमध्ये देखील दिसतात का, हे जाणून घेण्यासाठी यात आणखी संशोधन होण्याची आवश्यकता आहे.

ते म्हणाले, “सकाळच्या ऐवजी दिवसाच्या इतर वेळी जेव्हा लोक कॉफी पितात, त्याचा संभाव्य परिणाम जाणून घेण्यासाठी आपण क्लिनिकल चाचण्या करण्याची आवश्यकता आहे.”

कॉफी

फोटो स्रोत, Getty Images

डॉक्टर पुढे बोलताना म्हणाले, “सकाळी कॉफी प्यायल्यामुळे हृदयविकाराच्या आजारांनी मृत्यू होण्याचा धोका कमी का होतो, यामागचं कारण या अभ्यासातून आपल्याला स्पष्ट होत नाही.

यामागचं एक संभाव्य स्पष्टीकरण असं आहे की दुपारी किंवा संध्याकाळी कॉफी प्यायल्यामुळे सर्केडियन रिदम्स (circadian rhythms) म्हणजे जैविक चक्रावर (आपल्या शरीराचं 24 तासांचं शारीरिक, मानसिक चक्र आणि वर्तवणुकीतील बदल) आणि मेलॅटोनिनसारख्या हार्मोन्सच्या पातळीवर परिणाम होत त्यात व्यत्यय येऊ शकतो.

यामुळे ह्रदयाच्या आरोग्याशी संबंधित इन्फ्लेमेशन आणि रक्तदाब यासारख्या धोक्यांमध्ये बदल होतात.”

कॉफीचा परिणाम तपासण्याचं संशोधन

न्यू ऑर्लियन्समधील ट्युलेन विद्यापीठातील संशोधकांनी 1999 ते 2018 दरम्यान अमेरिकेतील नॅशनल हेल्थ अँड न्युट्रिशन एक्झामिनेशन सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या 40,725 प्रौढांचा अभ्यास केला.

या लोकांना ते दिवसभरात काय काय खातात, कोणती पेयं पितात याबद्दल विचारण्यात आलं. तसंच ते कॉफी पितात, ती किती वेळा आणि किती प्रमाणात पितात हे देखील विचारण्यात आलं.

“कॅफीनचे आपल्या शरीरावर जे परिणाम होतात ते लक्षात घेता, आपण दिवसाच्या कोणत्या वेळी कॉफी पितो त्याचा आपल्या आरोग्यावर काही परिणाम होतो का, हे आम्हाला पाहायचं होतं,” असं डॉ. की यांनी सांगितलं.

कॉफी

फोटो स्रोत, Getty Images

यापूर्वी झालेल्या संशोधनातून असं समोर आलं आहे की माफक स्वरूपात कॉफी प्यायल्यामुळे आरोग्याला फायदा होऊ शकतो. मात्र “कॉफी पिण्याच्या वेळा आणि त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम यासंदर्भातील हे पहिलंच संशोधन होतं,” असं ते पुढे म्हणाले.

या संशोधनानुसार, यात सहभागी होणाऱ्यांपैकी 36 टक्के लोक सकाळी कॉफी पिणारे होते तर 14 टक्के लोक दिवसभर कॉफी पिणारे होते.

दशकभराच्या अभ्यासातून समोर आलेली कारणं आणि निष्कर्ष

डॉ. की आणि त्यांच्या टीमनं या जवळपास एक दशकभर या अभ्यासात सहभागी झालेल्यांची नोंद ठेवली. या कालावधीत त्यांच्या माहितीचा आणि ज्यांचे मृत्यू झाले त्यांच्या मृत्यूमागचा कारणांचा अभ्यास केला.

जवळपास 10 वर्षे या सहभागींच्या आरोग्याशी निगडित माहितीचा पाठपुरावा केल्यानंतर, असं आढळून आलं की 4,295 जणांचा मृत्यू झाला होता. त्यातील 1,268 जणांचा मृत्यू हृदयविकाराशी संबंधित कारणांमुळे झाला होता.

या संशोधकांना आढळलं की सकाळी कॉफी न पिणाऱ्यांच्या तुलनेत सकाळी कॉफी पिणाऱ्यांच्या मृत्यूची शक्यता 16 टक्के कमी होती. तसंच सकाळी कॉफी पिणाऱ्यांचा हृदयविकारानं मृत्यू होण्याची शक्यता 31 टक्के कमी होती.

कॉफी

फोटो स्रोत, Getty Images

संशोधकांना असंही आढळलं की कॉफी न पिणाऱ्यांच्या तुलनेत दिवसभर कॉफी पिणाऱ्यांच्या बाबतीत धोक्यात कोणतीही घट झाली नव्हती.

“दिवसभरात कधीही कॉफी पिण्याच्या तुलनेत, सकाळी कॉफी पिण्याचा कदाचित मृत्यूच्या धोका कमी असण्याशी अधिक जास्त संबंध असू शकतो,” असं त्यांनी त्यांच्या शोधनिबंधात लिहिलं आहे.

संशोधकांचं म्हणणं आहे की कॉफी अधिक प्रमाणात पिण्याचा मृत्यूचा धोका कमी होण्याशी ‘लक्षणीय’ संबंध आहे. अर्थात हा संबंध दिवसभरात कॉफी पिणाऱ्यांच्या तुलनेत फक्त सकाळी कॉफी पिणाऱ्यांशी दिसून आला.

याच्याशी निगडित एका संपादकीय लेखात लंडनच्या रॉयल ब्रॉम्प्टन अँड हेअरफिल्ड हॉस्पिटल्सचे प्राध्यापक थॉमस एफ लुशर यांनी कॉफी पिण्याच्या वेळेसंदर्भात प्रश्न विचारला की, “दिवसातील वेळ का महत्त्वाची आहे?”

“सकाळच्या वेळी आपण जागे झाल्यावर आणि अंथरुणातून बाहेर पडल्यावर सिम्पथेटिक अॅक्टिविटी (आपल्या शरीरातील सर्व यंत्रणांना सतर्क ठेवणारी क्रिया) मध्ये लक्षणीय वाढ होते. दिवस जसजसा पुढे जातो तसतसा हा परिणाम कमी होत जातो आणि झोपेच्या वेळेस हा परिणाम सर्वात खालच्या पातळीवर असतो.”

कॉफी

फोटो स्रोत, Getty Images

संशोधक सांगतात त्याप्रमाणे, प्राध्यापक लुशर म्हणाले की असं “शक्य” आहे की दिवसभरात नंतर कॉफी प्यायल्यामुळे आपण विश्रांती घेतली पाहिजे तेव्हा आपल्या शरीरातील अंतर्गत घड्याळ किंवा चक्रात व्यत्यय येऊ शकतो.

“किंबहुना, दिवसभर कॉफी पिणाऱ्यांना अनेकांना झोपेत व्यत्यय येण्याचा, गाढ झोप न येण्याचा त्रास होतो. यासंदर्भात, असं दिसतं की झोप आणण्याच्या कामात महत्त्वाची भूमिका असणाऱ्या मेंदूतील मेलाटोनिनचं प्रमाण कमी होतं किंवा त्याचा प्रभाव कमी होतो.”

या अभ्यासातून असंही आढळलं की कॉफी पिणाऱ्यांमध्ये, जे लोक सकाळी कॉफी पितात ते चहा आणि कॅफिनयुक्त सोडा घेण्याची शक्यता अधिक होती, मात्र ते दिवसभर कॉफी पिणाऱ्यांच्या तुलनेत कॅफिनयुक्त आणि कॅफिन नसलेली अशा दोन्ही प्रकारच्या कॉफीचं सेवन कमी करत होते.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC