Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Getty Images
वाचन वेळ: 4 मिनिटे
राखी पौर्णिमेआधी एका दागिन्यांच्या ब्रँडची जाहिरात सोशल मीडियावर वादाचं कारण ठरली आहे.
या जाहिरातीत अभिनेत्री क्रिती सेनन आहे. काहींना तिचे कपडे आक्षेपार्ह वाटले, तर काहींना तिने तिच्या पाळीव कुत्र्याला राखी बांधल्याचा प्रसंग खटकला.
या वादात अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत हिने प्रतिक्रिया दिल्यानंतर प्रकरण अधिकच चर्चेत आलं.
कंगनाने ही जाहिरात अस्वस्थ करणारी असल्याचं म्हटलं.
दुसरीकडे, क्रिती सेननने या सगळ्या वादावर उत्तर देताना म्हटलं, ‘संस्कृती मनात असते, नेकलाइनमध्ये (कपड्यांचा गळा) नाही.”
आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही क्रिती सेननचं समर्थन करत महिलांना त्यांच्या स्वातंत्र्याचा वापर केल्याबद्दल ट्रोल करणं थांबवावं, असं म्हटलं आहे.
जाहिरातीत नेमकं काय आहे?
सुमारे 35 सेकंदांची ही जाहिरात दागिन्यांच्या ‘जीवा’ या ब्रँडची असून ती 17 ऑगस्ट 2026 रोजी सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आली.
जाहिरातीत क्रिती सेनन राखी पौर्णिमा साजरी करताना दिसते. तिने पांढऱ्या रंगाचा लेहेंगा आणि डीप-नेक ब्रालेट शैलीतील ब्लाउज परिधान केला आहे. ती आपल्या भावाला राखी बांधते आणि त्यानंतर आपल्या पाळीव कुत्र्यालाही राखी बांधते.
फोटो स्रोत, Getty Images
आक्षेप नेमका कशावर?
सर्वात मोठा आक्षेप तिच्या कपड्यांवर घेण्यात आला. अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी सणाच्या दिवशी असा पेहराव योग्य नसल्याचं म्हटलं.
एका युजरने लिहिलं, “एका पवित्र सणाची जाणीवपूर्वक थट्टा करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अभिनेत्री क्रिती सेननही तितकीच दोषी आहे.”
दुसऱ्या एका युजरने लिहिलं, “अशा मूर्खपणाच्या जाहिराती विरोध आणि टीका होऊनही पुन्हा पुन्हा समोर येत राहतात.”
काही जणांनी जाहिरातीत ओवाळणीचं ताट, कपाळावरील टिका यांसारख्या पारंपरिक गोष्टी दाखवण्यात आल्या नसल्याचाही मुद्दा उपस्थित केला.
पाळीव कुत्र्याला राखी बांधण्याच्या दृश्यावरूनही आक्षेप घेण्यात आला. काहींनी तर या ब्रँडवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली.
वादाची दुसरी बाजूही समोर
मात्र, अनेकांनी क्रिती सेननच्या बाजूने भूमिका घेतली.
लोकसभेतील विरोधी पक्षेनेते राहुल गांधी यांनी इन्स्टाग्राम स्टोरीवर क्रिती सेननची पोस्ट शेअर करत तिचं समर्थन केलं.
राहुल गांधींनी म्हटलं, “एक महिला काय घालते, काय करते आणि कुठे जाते, हा तिचा वैयक्तिक निर्णय आहे. महिलांनी त्यांच्या स्वातंत्र्याचा वापर केला म्हणून त्यांना ट्रोल करणं थांबवा.”
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये #SmashThePatriarchy (पितृसत्तेला मोडून काढा ) हा हॅशटॅगही वापरला.
एका युजरने लिहिलं, “महिलांच्या कपड्यांवर निर्बंघ लादणं आपण कधी थांबवणार? प्रत्येक वेळी हा परंपरेचा प्रश्न आहे, असा आव आणणंही थांबवायला हवं.”
दुसऱ्या एका युजरने लिहिलं, “क्रिती सेननचे कपडे नैतिकतेचा मुद्दा कसे बनले, हेच समजत नाही. ही फक्त एक जाहिरात आहे. सगळ्यांनी थोडं शांत व्हायला हवं.”
कंगना रनौत काय म्हणाली?
या वादाच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौत यांनी इन्स्टाग्राम स्टोरीवर सविस्तर प्रतिक्रिया लिहिली. त्यांनी क्रिती सेनन किंवा ब्रँडचं नाव घेतलं नाही, मात्र त्यांच्या टीकेचा रोख स्पष्ट होता.
कंगना लिहितात, “महिला असण्याचा हा सर्वोत्तम काळ आहे. आपल्या कपाटात असंख्य प्रकारचे कपडे आहेत. आजची महिला जागतिक महिला आहे. कॉकटेल ड्रेसपासून लेहेंगा-चोलीपर्यंत, जीन्सपासून साडीपर्यंत, बिकिनीपासून सलवार-कमीजपर्यंत आपल्याकडे इतके पर्याय आहेत. मग भावाला राखी बांधताना बिकिनी किंवा अंतर्वस्त्रांसारखा पेहराव का निवडाल? बाकीचे स्टाइलिंगचे पर्याय कुठे गेले?”
फोटो स्रोत, kanganaranaut/Instagram
याच पोस्टमध्ये कंगनाने ही जाहिरात मुद्दामहून अस्वस्थ करण्यासाठी बनवली असल्याचं म्हटलं
क्रिती सेननने जाहिरातीवर काय स्पष्टीकरण दिलं?
क्रिती सेननने या संपूर्ण वादावर इन्स्टाग्रामवरून प्रतिक्रिया दिली. एखाद्या महिलेची संस्कृतीशी असलेली बांधिलकी तिच्या कपड्यांवरून ठरवली जाऊ नये, असं तिने म्हटलं.
ती म्हणाली, “सणाचा खरा अर्थ तुमच्या कपड्यांमध्ये नसतो, तर तुम्ही मनापासून जपणाऱ्या परंपरांमध्ये असतो. राखी पौर्णिमा हे संरक्षण आणि प्रेमाचं नातं आहे. मी आणि माझी बहीण एकमेकींना राखी बांधतो. आम्ही एकमेकींच्या संरक्षणाचं वचन देतो आणि एकमेकींच्या चांगल्या आरोग्य, आनंद आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो.”
फोटो स्रोत, kritisanon/Instagram
कुत्र्याला राखी बांधण्याच्या दृश्याबद्दल क्रितीने म्हटलं, “आमच्यासाठी हे प्रेम आणि ही प्रार्थना आमच्या कुत्र्यापर्यंतही पोहोचते, कारण तोही आमच्या कुटुंबाचाच एक भाग आहे.”
तिने पुढे लिहिलं, “महिलांनी काय घालावं हे त्यांना सांगणं आपण अखेर कधी थांबवणार? काळानुसार पारंपरिक फॅशनही बदलली आहे. तरीही एखाद्या महिलेचा संस्कृतीबद्दलचा आदर फक्त तिच्या कपड्यांवरूनच का मोजला जातो? संस्कृती आणि परंपरा तिच्या मनात असतात, तिच्या नेकलाइनमध्ये नाहीत.”
यापूर्वी कोणत्या जाहिरातीवरून वाद?
यापूर्वीही सणांशी संबंधित जाहिरातींवरून वाद होणं ही काही नवीन गोष्ट नाही. गेल्या काही वर्षांत अनेक मोठ्या ब्रँड्सना अशाच दबावामुळे आपल्या जाहिराती मागे घ्याव्या लागल्या आहेत.
तनिष्क, 2020: दागिन्यांचा ब्रँड तनिष्कने आपल्या ‘एकत्वम’ कँपेनमधली 43 सेकंदांची जाहिरात 13 ऑक्टोबर 2020 ला मागे घेतली होती. या जाहिरातीत एक मुस्लिम कुटुंब आपल्या हिंदू सुनेचे डोहाळजेवण करताना दाखवण्यात आले होते.
एक्सवर #BoycottTanishq हा हॅशटॅग ट्रेंड झाला आणि या जाहिरातीतून कथित ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन दिलं जात असल्याचे आरोप करण्यात आले.
सर्फ एक्सेल, 2019: होळीच्या जाहिरातीत एक मुलगी आपल्या मुस्लिम मित्राला रंगांपासून वाचवत मशिदीपर्यंत पोहोचवते. नमाज झाल्यानंतर दोघे एकत्र होळी खेळण्याचं कबूल करतात. यानंतर #BoycottSurfExcel हा हॅशटॅग ट्रेंड झाला. ही जाहिरात हिंदूविरोधी असल्याची टीका करण्यात आली. मात्र, ही जाहिरात मागे घेण्यात आली नाही.
फॅब इंडिया, 2021: कपड्यांचा ब्रँड फॅब इंडियाने ‘जश्न-ए-रिवाज’ नावाने सणासुदीसाठीचं कलेक्शन लाँच केलं होतं. त्यावेळी त्याच्या उर्दू नावावर आक्षेप घेण्यात आला आणि #DiwaliIsNotJashnERiwaaz हा हॅशटॅग ट्रेंड झाला.
डाबर, 2021: करवाचौथच्या जाहिरातीत दोन महिला एकमेकींसाठी उपवास करताना दिसल्या. मध्य प्रदेशचे तत्कालीन गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी 25 ऑक्टोबर 2021 रोजी यावर कारवाईचा इशारा दिला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कंपनीने जाहिरात मागे घेतली आणि म्हटलं, “आमच्याकडून अजाणतेपणी लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर त्याबद्दल आम्ही बिनशर्त माफी मागतो.”
या सर्व प्रकरणांमध्ये एक गोष्ट समान होती—वादाची सुरुवात सोशल मीडियावरून झाली, त्यानंतर नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आणि बहुतांश वेळा ब्रँड्सनी आपल्या जाहिराती मागे घेतल्या. क्रिती सेननच्या प्रकरणात सध्या ब्रँडने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही आणि या जाहिरातीवरून चर्चा सुरू आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन
SOURCE : BBC




