Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Getty Images
काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवरून राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा ‘गुंगी गुडिया’ असा उल्लेख करण्यात आला. या टीकेमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यात जोरदार राजकीय संघर्ष दिसून येत आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (4 ऑगस्ट) कुलाबा येथील काँग्रेसच्या गांधी भवन कार्यालयात घुसून घोषणाबाजी केली आणि सुनेत्रा पवार यांची जाहीर माफी मागण्याचीही मागणी केली.
काँग्रेसने सुनेत्रा पवार यांचा बीड दौऱ्यातील एक व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हीडिओत आमदार धनंजय मुंडे बोलत असताना सुनेत्रा पवार या शांत बसल्याचा उल्लेख करत ‘गुंगी गुडिया’ असं त्यांना म्हटलं होतं. त्यानंतर राज्यभरात यावरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत.
दरम्यान, ‘गुंगी गुडिया’ हा शब्द पहिल्यांदा भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबाबत वापरण्यात आला होता.
समाजवादी नेते राम मनोहर लोहिया हे ससंदेत वारंवार इंदिरा गांधी यांचा उल्लेख ‘गुंगी गुडिया’ असा करत. त्यावेळीही या टीकेवरून मोठा वाद निर्माण झाला होता. आज आपण इंदिरा गांधी यांचा ‘गुंगी गुडिया’ ते ‘आयर्न लेडी’ इथंपर्यंतच्या प्रवासाविषयी जाणून घेऊया.
बीबीसी हिंदीने 2017 मध्ये हा लेख प्रकाशित केला होता. सध्या सुरू असलेल्या राजकीय चर्चेच्या पार्श्वभूमीवर हा लेख प्रसिद्ध करत आहोत.
इंदिरा गांधींपेक्षा आधी मी फिरोज गांधींना जवळून पाहिलं होतं. कारण माझे काका सय्यद वसी नक्वी यांचा रायबरेली विधानसभा मतदारसंघ हा फिरोज गांधी यांच्या लोकसभा मतदारसंघात होता. निवडणुकीच्या काळात काकांचंच घर प्रचाराचं मुख्य कार्यालय असायचं.
सरंजामी परंपरा असलेल्या अवध भागात नेहरू कुटुंबाबद्दल लोकांच्या मनात प्रचंड आदर होता. त्यामुळे त्यांच्याबद्दल कोणीही अपमानास्पद वक्तव्यं करत नसत.
परंतु, फिरोज गांधी यांच्या वंशाविषयी लोकांमध्ये कुजबुज व्हायची. निवडणुकीच्या काळात ते ज्या कृष्ण हॉटेलमध्ये उतरत, तिथल्या खिडकी नसलेल्या थंड खोलीत ते मुक्काम करत. मला आठवतं, एकदा इंदिरा गांधीही त्याच हॉटेलमध्ये थांबल्या होत्या.
देशातील एका मोठ्या ब्राह्मण कुटुंबातील मुलगी एखाद्या ‘बनिया’शी (व्यापारी) लग्न कसं करू शकते?” असा प्रश्न काही जण विचारायचे. ‘घांदी’ हे तर सरळ-सरळ बनिया समाजाचं आडनाव आहे, असं म्हणत ते आपलं बोलणं संपवायचे.
फिरोज जहांगीर ‘घांदी’
फिरोज गांधी यांचं खरं नाव फिरोज जहांगीर ‘घांदी’ होतं. ‘घांदी’ हे आडनाव पारशी समाजाशी संबंधित होतं.
इंदिरा गांधी यांच्या मदतीने ‘घांदी’ या आडनावात थोडा बदल करून ते ‘गांधी’ करण्यात आलं. त्यानंतर काँग्रेसने ‘नेहरू-गांधी’ या नावाचा मोठ्या प्रमाणात प्रचार केला. त्यामुळे या कुटुंबाची ओळख पंडित जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांच्या नावांशी जोडली जाऊ लागली.
पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचं 1966 मध्ये ताश्कंद येथे आकस्मिक निधन झालं. त्यानंतर काँग्रेसमधील परंपरावादी गटाचे उमेदवार मोरारजी देसाई यांचा पराभव करून इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या.
फोटो स्रोत, Keystone/Hulton Archive/Getty Images
इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने लढवलेली पहिली लोकसभा निवडणूक पक्षासाठी मोठा धक्का ठरली. काँग्रेसला 8 राज्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला. संसदेतही पक्षाचं संख्याबळ घटलं. त्यामुळे डॉ. राम मनोहर लोहिया यांना इंदिरा गांधी यांच्यावर टीका करण्याची आयती संधी मिळाली.
‘गुंगी गुडिया’
समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांनी इंदिरा गांधी यांना संसदेत अनेकवेळा ‘गुंगी गुडिया’ असं म्हटलं.
माजी आयसीएस (भारतीय नागरी सेवा) अधिकारी आणि फॉरवर्ड ब्लॉकचे नेते एच. व्ही. कामथ यांनी इंदिरा गांधी यांच्या कार्यशैलीबद्दल सांगितलं होतं. इंदिरा गांधी यांनी खासदार राजा दिनेश सिंह यांना थेट उपमंत्री आणि नंतर राज्यमंत्रिपद दिलं. त्यासाठी त्यांनी नेहमीचे नियम बाजूला ठेवल्याचंही ते म्हणाले होते.
“ही बढती त्यांच्या एखाद्या छुप्या गुणामुळेच दिली असावी. तो गुण केवळ पंतप्रधानांनाच दिसला होता.”
इंदिरा गांधींबाबत दबक्या आवाजात चर्चा आणि कुजबुजही होत असत. विशेषतः पंतप्रधान निवासस्थानाच्या मध्यवर्ती भागात योगगुरू धीरेंद्र ब्रह्मचारी यांच्या उपस्थितीमुळे अनेक जण नाराज होते.
त्यावेळची व्यवस्था ब्राह्मण आणि सरंजामी परंपरेच्या प्रभावाखाली होती. त्यामुळे अशा गोष्टींबद्दल कुजबुज आणि अफवा पसरायला भरपूर वाव होता.
फोटो स्रोत, LOHIA TRUST
केरळचं ईएमएस सरकार बरखास्त का झालं?
इंदिरा गांधी या पंडित नेहरू यांच्या कन्या होत्या, हा त्यांना 1959 मध्ये काँग्रेसचं अध्यक्षपद मिळण्यामागचं मोठं कारण मानलं जातं. पण, त्यामुळे पक्षातील उजव्या विचारसरणीच्या गटात त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजीही होती.
हा विरोध कमी करण्यासाठी त्यांनी केरळमधील अडीच वर्षांपूर्वी निवडून आलेलं देशातील पहिलं कम्युनिस्ट सरकार बरखास्त केलं आणि तिथे राष्ट्रपती राजवट लागू केली.
विशेष म्हणजे, ज्या वर्षी केरळ सरकार बरखास्त करण्यात आलं, त्याच वर्षी इंदिरा गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली होती.
फोटो स्रोत, Getty Images
इंदिरा गांधी यांनी कम्युनिस्ट नेते आणि केरळचे पहिले मुख्यमंत्री ई.एम.एस. नंबुद्रीपाद यांचं सरकार बरखास्त केलं. त्यावेळी राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडल्याचं कारण देत राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
मात्र, 1969 मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर इंदिरा गांधींनी बँकांचं राष्ट्रीयीकरण केलं आणि संस्थानिकांना दिला जाणारा प्रिव्ही पर्स (खासगी तनखे) बंद केला. या निर्णयांमुळे त्यांच्या उजव्या विचारसरणीकडे झुकल्याची टीका काही अंशी कमी झाली.
परंतु, लंडनमधील टाइम्सचे पत्रकार पीटर हेजलहर्स्ट यांनी त्यांचं वर्णन ‘स्वार्थीपणाकडे कल असलेल्या’ नेत्या असं केलं.
वाजपेयींनी इंदिरा गांधींना ‘दुर्गा’ का म्हटलं?
इंदिरा गांधी यांचे मुख्य सचिव पी. एन. हक्सर हे डाव्या विचारसरणीचे होते. परंतु, त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी आणि सल्लागार मोहन कुमारमंगलम यांनी इंदिरा गांधींनी भारतीय कम्युनिस्ट पक्षासोबत (सीबीआय) राहण्याचा आग्रह धरला होता.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस श्रीपाद डांगे याला ‘एकता आणि संघर्षाचं धोरण’ म्हणत असत. म्हणजे काँग्रेसच्या ज्या धोरणांना पक्षाचा पाठिंबा आहे, त्यावर एकत्र काम करायचं आणि काँग्रेसच्या जनविरोधी धोरणांविरोधात संघर्ष करायचा.
सोव्हिएत संघाच्या मदतीने इंदिरा गांधी यांनी बांगलादेश निर्मितीच्या प्रक्रियेत हस्तक्षेप केला. त्यावेळी त्यांचा डाव्या विचारांकडे असलेला कल सर्वाधिक दिसून आला. या काळात इंदिरा गांधींची लोकप्रियता शिखरावर होती. इतकंच नाही, तर अटलबिहारी वाजपेयी यांनीही त्यांचा ‘दुर्गा’ असा उल्लेख केला होता.
कम्युनिस्टांसोबत वाढलेल्या जवळिकीतेमुळे भारताच्या राजकारणात आणि जागतिक पातळीवरही मोठी चर्चा आणि उलथापालथ झाली. विशेषतः त्या काळात पाश्चात्य देशांसाठी इतर देशांशी संबंध सुधारणं सोपं नव्हतं.
फोटो स्रोत, Getty Images
या मोठ्या राजकीय बदलांमुळे काँग्रेसमधील आणि बाहेरील समाजवादी नेते, अमेरिकेतील काँग्रेसमधील काही गट, तसेच जनसंघ (आजची भाजप) हे सर्व इंदिरा गांधी यांच्या कथित भ्रष्टाचाराविरोधात एकत्र आले.
या सर्वांचं गांधीवादी विचारांचे आणि माजी समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांनी नेतृत्व केलं. या आंदोलनाला ‘जेपी आंदोलन’ किंवा ‘बिहार आंदोलन’ म्हणून ओळखलं जाऊ लागलं.
जेपी आंदोलनाचा वाढता दबाव
जेपी आंदोलनामुळे इंदिरा गांधी प्रचंड दबावाखाली आल्या होत्या. आंदोलनाच्या काळात जयप्रकाश नारायण यांनी मला कदम कुआँ येथील त्यांच्या घरी राहण्यासाठी बोलावलं होतं. त्यामुळे इंदिरा गांधींनी नेहरू कुटुंबीयांचे जुने मित्र मोहम्मद युनूस, जे मलाही ओळखत होते, त्यांच्या माध्यमातून मला भेटण्यासाठी बोलावलं.
फोटो स्रोत, SHANTI BHUSHAN
त्यांनी मला प्रामुख्याने राजकीय मुद्द्यांवर प्रश्न विचारले. जेपी श्याम नंदन मिश्रांवर विश्वास ठेवतात का? दिनेश सिंह खरंच जेपींच्या जवळचे आहेत का? असे प्रश्न त्यांनी विचारले. या दोन्ही नेत्यांनी जेपी आणि इंदिरा गांधी यांच्यात संदेश पोहोचवण्याचा म्हणजेच संवाद घडवण्याचा प्रयत्न केला होता.
जगातील इतर देशांशी संबंध ठेवताना पंडित नेहरूंनी भारताची प्रतिष्ठा आणि भव्यता दाखवली, तर इंदिरा गांधींनी भारताची ताकद दाखवली. पण, जेव्हा जेपी आंदोलन वाढू लागलं, तेव्हा इंदिरा गांधी स्पष्टपणे अस्वस्थ आणि दबावाखाली दिसू लागल्या होत्या.
आणीबाणीनंतरची पहिली मुलाखत
जेव्हा अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका छोट्याशा चुकीमुळे त्यांची खासदारकी रद्द केली, तेव्हा इंदिरा गांधी अस्वस्थ झाल्या होत्या.
त्यांच्या धाकट्या मुलाने 25 जून 1975 रोजी आणीबाणीची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी इंदिरा गांधींचे मुख्य अधिकारी पी. एन. हक्सर आणि माध्यम सल्लागार शारदा प्रसाद यांना पदावरून दूर केलं.
युनूस भाई (मोहम्मद युनूस) हे इंदिरा गांधी आणि संजय गांधी या दोघांच्याही जवळचे होते. त्यांनी स्वतःची विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करून घेतली. त्यांच्या कामाच्या व्याप्तीमुळे त्यांना प्रसारमाध्यमांच्या कामकाजातही लक्ष घालण्याची संधी मिळाली.
त्यांनी मला एक असं काम दिलं, ज्यामुळे मला इंदिरा गांधी यांची अशी बाजू पाहण्याची संधी मिळाली, जी कदाचित इतर कोणी पाहिली असेल. संडे टाइम्स, लंडनच्या मुलाखतीसाठी मी त्यांना भेटलो होतो. त्या वेळी मी भारतातील त्या वृत्तपत्राचा प्रतिनिधी (स्ट्रिंगर) होतो.
ही मुलाखत खूप चर्चेचा विषय ठरणार होती, कारण इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केल्यानंतरची ही त्यांची पहिलीच मुलाखत होती.
इंदिरा गांधी पूर्णपणे शांत राहिल्या. त्यांनी माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. चेहऱ्यावर कोणतेही भाव न दाखवता त्या केवळ भिंतीकडे एकटक पाहत राहिल्या आणि खाली एका कागदावर न पाहताच काहीतरी रेखाटत राहिल्या.
आयर्न लेडी
परंतु, इंदिरा गांधी यांची ओळख केवळ याच एका प्रतिमेपुरती मर्यादित नव्हती. बांगलादेश युद्धाच्या काळातील त्यांची भूमिका वेगळी होती. या काळात त्यांना ‘आयर्न लेडी’ म्हणून ओळख मिळाली.
पण त्यांच्या धर्मनिरपेक्ष नेत्या म्हणून असलेल्या प्रतिमेवरही प्रश्न उपस्थित झाले, विशेषतः 1982 च्या जम्मू निवडणुकांदरम्यान त्यांच्या प्रचारात जातीयवादी मुद्द्यांचा प्रभाव दिसल्याची टीका झाली.
जम्मूमधील काँग्रेसच्या निवडणूक प्रचारात दिसून आलेल्या धार्मिक आणि जातीयवादी रंगाची मुळं पंजाबमधील खलिस्तान आंदोलनात आहे. पण, 1984 मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतरही हा कल कायम राहिला.
फोटो स्रोत, PTI
सहानुभूतीच्या लाटेमुळे राजीव गांधींना लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळाला. 514 पैकी 404 जागांवर काँग्रेस विजयी झाली. सामान्यतः हा विजय इंदिरा गांधींच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या सहानुभूतीमुळे झाला असं मानलं जातं.
पण, काँग्रेसमधील काही ज्येष्ठ नेत्यांच्या मते, हा विजय अल्पसंख्याकांच्या कथित धार्मिक, जातीयवादी राजकारणाविरोधात हिंदू एकत्रीकरणामुळे मिळाला होता.
या घटनेत संशयाची सुई शीख समुदायाकडे असू शकते, परंतु काँग्रेसने हिंदू एकतेचा मुद्दा पुढे केला. हा मुद्दा नंतर सर्व अल्पसंख्याक समुदायांविरोधात समान पद्धतीने वापरला गेला.
मुस्लीम तुष्टीकरणाचा आरोप आणि हिंदू एकतेचा मुद्दा
राजीव गांधींनी 1989 मध्ये ‘रामराज्य’च्या घोषणेसह अयोध्येतून आपला निवडणूक प्रचार सुरू केला, तेव्हा अनेकांना त्याचं फारसं आश्चर्य वाटलं नाही.
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला न जुमानता, विश्व हिंदू परिषदेने मागणी केलेल्या त्याच ठिकाणी राम मंदिराच्या पायाभरणीला (शिलान्यासाला) परवानगी देण्यास ते तयार झाले.
हा कल आजही कायम असल्याचे दिसून येते. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही गुजरात निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात मंदिरात जाऊन केली होती.
प्रामुख्याने हिंदू बहुसंख्य असलेल्या देशात नेत्यांनी मंदिरात जाणं ही सामान्य गोष्ट मानली जाते, त्यात अस्वाभाविक म्हणजेच असामान्य असं काही नाही.
परंतु, निवडणुकीचा काळ आला की भाजपने काँग्रेसवर मुस्लिम तुष्टीकरण करणारा पक्ष असा आरोप करू नये, यासाठी काँग्रेसचे नेते मंदिरांना भेटी देतात.
काँग्रेसच्या 60 वर्षांच्या राजवटीत मुस्लिमांचे लांगूलचालन कशाप्रकारे केलं गेलं हे 2005 मध्ये आलेल्या सच्चर समितीच्या अहवालातून स्पष्ट झालं, असं म्हटलं जातं. त्यामुळे काँग्रेसला तुष्टीकरणाच्या आरोपाची भीती का वाटावी, असा प्रश्न उपस्थित केला जातो.
उदारमतवादी विचारांच्या लोकांमध्ये आता अशी चर्चा नेहमी ऐकायला मिळते की, काँग्रेस आणि भाजपमध्ये प्रत्यक्षात फारसा फरक नाही. इंदिरा गांधींनाही अशा वाढत्या टीकेला सामोरं जावं लागलं होतं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC




