Source :- BBC INDIA NEWS

दूध पिताना महिला

फोटो स्रोत, Getty Images

गेल्या काही वर्षात जीवनशैलीत झपाट्यानं झालेलं बदल, आहार-विहाराच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव यासारख्या कारणांमुळे गंभीर आजारांचं प्रमाण वाढलं आहे.

कर्करोगाच्या रुग्णांची वाढती संख्या हा त्याचाच एक भाग आहे. त्यातही आतड्याचा कर्करोग मोठ्या प्रमाणात आढळून येतो.

जीवनशैलीत आणि विशेषकरून आहारात योग्य ते बदल केल्यास, कॅल्शियमचं आहारातील प्रमाण वाढवल्यास या कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत होते, असं ताज्या संशोधनातून समोर आलं आहे. या महत्त्वाच्या संशोधनाविषयी.

युकेमधील एका मोठ्या अभ्यासातून असे पुरावे समोर आले आहेत की ज्या लोकांच्या आहारात कॅल्शियम अधिक प्रमाणात असतं त्यांना आतड्याचा कर्करोग (bowel cancer) होण्याचा धोका कमी होण्यास मदत होते.

अधिक प्रमाणातील कॅल्शियम म्हणजे दररोज एक ग्लासभर दूधाइतकं कॅल्शियम.

संशोधकांनी 16 वर्षांहून अधिक वयाच्या पाच लाखांहून अधिक महिलांच्या आहाराचं विश्लेषण केलं.

फोटो स्रोत, Getty Images

संशोधकांनी 16 वर्षांहून अधिक वयाच्या पाच लाखांहून अधिक महिलांच्या आहाराचं विश्लेषण केलं. त्यातून त्यांना आढळलं की कॅल्शियम असलेल्या हिरव्या पालेभाज्या, ब्रेड आणि इतर बिगर डेअरी पदार्थ किंवा अन्न यांचा आहारात समावेश केल्यामुळे देखील आतड्याचा कर्करोग (bowel cancer) होण्याचा धोका कमी होतो.

तसंच संशोधकांना असंही आढळून आलं की खूप जास्त प्रमाणात मद्यपान केल्यामुळे आणि प्रक्रिया केलेलं मांस खाल्ल्यामुळे याच्या उलटा परिणाम होतो आणि कर्करोग होण्याचा धोका वाढतो.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

कर्करोगावर काम करणाऱ्या समाजसेवी संस्थांचं म्हणणं आहे की चांगला पोषक, संतुलित आहार घेतल्यामुळे, वजन योग्य प्रमाणात राखल्यामुळे आणि धूम्रपान थांबवल्यामुळे आतड्याच्या कर्करोगाचा होण्याचा धोका कमी होतो.

आहाराचा परिणाम किती मोठा असतो?

एका ताज्या अभ्यासातून समोर आलं की डेअरी उत्पादनांमुळे आतड्याच्या कर्करोगाचा धोका ‘बहुधा’ कमी होतो.

ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि कॅन्सर रिसर्च युके यांनी केलेल्या या अभ्यासातून असं समोर आलं आहे की डेअरी आणि बिगर डेअरी उत्पादनं किंवा अन्नातून मिळणाऱ्या कॅल्शियममुळे हा परिणाम होतो.

रोजच्या आहारात 300 मिलीग्रॅम अतिरिक्त कॅल्शियमचा समावेश केल्यास किंवा एक मोठा ग्लासभर दूध घेतल्यास आतड्याचा कर्करोग होण्याचा धोका 17 टक्क्यांनी कमी होतो.

“आतड्याच्या कर्करोगाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असलेल्या डेअरी उत्पादनांची संभाव्य संरक्षक भूमिका या अभ्यासातून स्पष्ट होते,” असं ऑक्सफर्ड विद्यापीठातील प्रमुख संशोधक डॉ. केरेन पेपियर म्हणतात.

दूध

फोटो स्रोत, Getty Images

नाश्त्यात खाण्यात येणारी तृणधान्यं, फळं, संपूर्ण धान्य, कर्बोदके (कार्बोहायड्रेट्स), फायबर आणि व्हिटामिन सी यामुळे देखील कर्करोगाचा धोका कमी झालेला दिसून आला. मात्र त्याचा प्रभाव फारच कमी होता.

यासंदर्भात हा अभ्यास आणखी पुरावे सादर करतो

  • दररोज एक मोठा ग्लासभर अतिरिक्त वाईन प्यायल्यानं किंवा 0.7 औंस (20 ग्रॅम) मद्य घेतल्यानं कर्करोगाचा धोका 15 टक्क्यांनी वाढतो.
  • दररोज 1 औंस लाल आणि प्रक्रिया केलेलं मांस, उदाहरणार्थ हॅमचा एक तुकडा, अधिक खाल्ल्यानं कर्करोग होण्याचा धोका 8 टक्क्यांनी वाढतो.

या टक्केवारीचा नेमका अर्थ सांगणं कठीण आहे. कारण प्रत्येकाला आतड्याचा कर्करोग होण्याचा धोका वेगवेगळा असतो. हा धोका प्रत्येक व्यक्तीची जीवनशैली, आहार, सवयी आणि अनुवांशिकता यावर अवलंबून असतो.

कॅल्शियम नेमकं काय करतं? ते कोणत्या पदार्थांमध्ये असतं?

हाडं मजबूत करण्यासाठी आणि तुमचे दात निरोगी ठेवण्यासाठी कॅल्शियम हे एक महत्त्वाचं खनिज असतं. मात्र कॅल्शियममुळे काही प्रकारच्या कर्करोगांचा धोका कमी होतो, याचे अधिक पुरावे समोर येत आहेत.

दूध, दही आणि चीजमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असतं. युकेतील आहारात डेअरी उत्पादनांचा वापर केला जातो आणि ही उत्पादनं कॅल्शियमचा एक मुख्य स्त्रोत आहेत. (आपल्याला सकाळच्या वेळी धान्य खायला आवडतं.)

दूध, दही आणि चीजमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असतं.

फोटो स्रोत, Getty Images

सोया आणि तांदळापासून तयार केलेल्या पेयांमध्ये, पांढरा ब्रेड, बिया, शेंगदाणे, सुकामेवा आणि अंजीर सारखी फळं, कर्ली केल आणि कॅनमधील सार्डिन माशामध्ये तसंच लॅक्टोज-फ्री दूध यासारख्या इतर अन्नपदार्थांमध्ये देखील कॅल्शियम असतं.

या अभ्यासात म्हटलं आहे की कॅल्शियममुळे आतड्याच्या कर्करोगापासून बचाव होऊ शकतो, “कारण कॅल्शियम, आतड्यातील बाईल ॲसिड्स (विशिष्ट प्रकारचा पाचक द्रव) आणि फ्री फॅटी ॲसिड्स बांधण्यास सक्षम असतं आणि त्यामुळे या अॅसिड्सचे संभाव्य कर्करोगजन्य परिणाम कमी होतात.

आतड्याचा कर्करोग इतक्या मोठ्या प्रमाणात का आढळतो?

युकेमध्ये दरवर्षी आतड्याच्या कर्करोगाचे जवळपास 44,000 रुग्ण आढळतात. त्यामुळे आतड्याचा कर्करोग हा सर्वाधिक आढळणाऱ्या कर्करोगांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.

शंका असेल तर डॉक्टरकडे वेळीच जाणं आवश्यक आहे.

फोटो स्रोत, Getty Images

तज्ज्ञांच्या मते, अयोग्य किंवा पोषण नसलेला आहार आणि स्थूलपणा ही यामागच्या अनेक कारणांपैकी काही कारणं आहेत.

आतड्याच्या कर्करोगाची लक्षणं

  • पचनाशी संबंधित बाबींमध्ये, शौचास जाण्यासंदर्भात बदल होणं, म्हणजे पोट बिघडून अधिकवेळा शौचास जावं लागणं, बद्धकोष्ठता, वारंवार शौचास जावं लागणं.
  • गुदद्वारातून रक्त बाहेर येणं किंवा शौचामध्ये रक्त येतं.
  • तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत नसताना, वजन कमी होऊ लागणं.
  • कारण नसताना थकवा येणं किंवा श्वास घेण्यास त्रास होणं.

यातील कोणतंही लक्षण आढळल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

इतर तज्ज्ञ काय म्हणतात?

हा अभ्यास लोकांची निरीक्षणं करून करण्यात आला होता. त्यात लोकांवर चाचण्या करण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे या अभ्यासातून कॅल्शियम किंवा इतर कोणत्याही अन्नपदार्थामुळे कर्करोगापासून बचाव होतो किंवा कर्करोगाची शक्यता वाढते, हे निर्विवादपणे किंवा स्पष्टपणे सिद्ध करता येत नाही.

मात्र संशोधकांचं म्हणणं आहे की “आहार आणि आतड्याचा कर्करोग यांच्या बाबतीतील हा आजवरचा सर्वात मोठा” अभ्यास आहे. त्यामुळे संशोधकांना ते योग्य दिशेनं अभ्यास करत असल्याचा विश्वास यातून मिळतो. त्याचबरोबर आधी केलेल्या अभ्यासांमधून जे निष्कर्ष समोर आले होते, त्यांच्याशी या अभ्यासातून समोर आलेले निष्कर्ष सुसंगत आहेत.

या अभ्यासात सहभागी झालेल्या 12,000 हून अधिक महिलांना आतड्यांचा कर्करोग झाला होता. त्यांना कर्करोग होण्यामागची संभाव्य कारणं शोधण्यासाठी त्यांच्या आहारातील जवळपास 100 अन्नपदार्थ आणि पोषक तत्वांचा अभ्यास करण्यात आला.

लीड्स विद्यापीठातील प्राध्यापक जेनेट केड पोषण तज्ज्ञ आहेत. ते म्हणाले की “या अभ्यासातून आतड्याचा कर्करोग होण्याच्या धोक्यावर एकूणच आहाराचा परिणाम होऊ शकतो हे दाखवणारे पुरावे या अभ्यासातून मिळतात.”

आहार समतोल असणं अत्यंत आवश्यक आहे.

फोटो स्रोत, Getty Images

लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिनचे प्राध्यापक अँड्र्यू प्रेंटिस यांना कॅल्शियम कर्करोगापासून बचाव करण्यात उपयुक्त ठरू शकतं याबद्दल आश्चर्य वाटतं. मात्र ते म्हणतात की “अर्थात लोकांनी याबद्दल कोणतंही निश्चित मत व्यक्त केलेलं नाही किंवा यावर अंतिम निष्कर्ष काढलेला नाही.”

लंडनच्या किंग्स कॉलेजचे प्राध्यापक टॉम सँडर्स यांच्यासाठी यातून घ्यायचा संदेश असा आहे की, “सुरक्षित मर्यादेपेक्षा अधिक मद्यपान केल्यामुळे ( दर आठवड्याला 14 युनिट्स पेक्षा अधिक) महिलांमध्ये आतड्याच्या कर्करोगाचा धोका वाढतो. मात्र दररोज जवळपास एक कपभर गाईचं दूध प्यायल्यामुळे कदाचित कर्करोगापासून बचाव होऊ शकतो.”

बॉवेल कॅन्सर युके या सेवाभावी संस्थेच्या डॉ. लिसा विल्डे म्हणतात की, “दर 12 मिनिटांनी” एखाद्याला आतड्याचा कर्करोग झाल्याचं निदान होतं आणि आतड्याच्या कर्करोगाचे निम्मे रुग्ण निरोगी जीवनशैलीमुळे कमी होऊ शकतात किंवा टाळले जाऊ शकतात.

“जर तुम्ही दूध पीत नसाल तर अतिरिक्त कॅल्शियम मिळवण्याचे इतर मार्ग आहेत. उदाहरणार्थ ब्रोकोली किंवा टोफू यातून कॅल्शियम मिळू शकतं. यामुळे देखील तुम्हाला आतड्याचा कर्करोग होण्याचा धोका कमी होतो,” असं डॉ. लिसा पुढे सांगतात.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC