Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, ANI
42 मिनिटांपूर्वी
जम्मू आणि काश्मीरमध्ये सायरन वाजून ब्लॅकआऊट झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. जम्मू शहरातून याबाबत माहिती मिळाली आहे. भारतीय लष्कराच्या सूत्रांनी बीबीसीला सांगितले की, जम्मूमधील संरक्षण यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे.
तसंच जम्मू विमानतळावर स्फोट झाल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. जम्मू शहरातील गुज्जर नगर पुलावरील एका प्रत्यक्षदर्शीने बीबीसीला सांगितले की, जम्मू विमानतळाजवळ 16 वस्तू पडल्याचं त्यांनी स्वतः मोजलं.
याबरोबरच चंदिगढ शहरातही सायरन वाजवण्यात आले असून तात्काळ ब्लॅकआऊटचे आदेश देण्यात आले आहेत.
गुरुवारी बीसीसीआयनं धरमशालामध्ये होणारा 11 मे रोजीचा IPL सामना रद्द केला. हिमाचल प्रदेशातील कांगडा इथला विमानतळ बंद असल्यानं खेळाडू धरमशालामध्ये पोहोचू शकणार नसल्यामुळे हा सामना रद्द झाल्याचं सांगितलं आहे.
दरम्यान, एका सूत्रानं एएफपी वृत्तसंस्थेला जम्मू विमानतळावर स्फोट झाल्याचं सांगितलं आहे. प्रत्यक्षदर्शीने बीबीसीला सांगितले की, बाजारपेठा बंद होत्या आणि त्यांनी लोकांना पळताना पाहिले. सायरन वाजून शहरात वीज गेल्याचंही ते म्हणाले.
एशियन न्यूज इंटरनॅशनल या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तान जम्मूला दारुगोळ्याचा मारा करून लक्ष्य करत आहे. शस्त्र वाहून नेणाऱ्या ड्रोनचा वापर ते करत आहेत.ही ड्रोन्स किंवा loitering munitions (लॅायटरिंग म्युनिशन्स) आहेत. कामिकाझे ड्रोन्स म्हणूनही ओळखली जातात. टार्गेट शोधून मग त्याला धडकतात. यासाठीच जम्मूत ब्लॅकआऊट केलं आहे.
भारतीय हवाई संरक्षण दलाची सुरक्षा यंत्रणा प्रत्युत्तर देत असल्याचंही वृत्त वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
बीबीसी प्रतिनिधी दिव्या आर्य यांच्या मते, ‘जम्मूमध्ये अनेक ठिकाणी लोकांना स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत. संपूर्ण शहरात वीजपुरवठा खंडित झाला आहे.’
‘कठुआमधील नागरिकांनी दोन ठिकाणी स्फोटांचे आवाज ऐकले. इथंही वीज पुरवठा खंडित झाला आहे. कठुआ जम्मूपासून दीड तासाच्या अंतरावर आहे. सध्या दोन्ही शहरे पूर्णपणे अंधारात आहेत.’
(ही बातमी सातत्याने अपडेट होत आहे.)
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC