Home LATEST NEWS ताजी बातमी जहाजंही बुडवण्याची ताकद देणारा स्पर्म व्हेलचा ‘हा’ रहस्यमय अवयव कोणता आहे?

जहाजंही बुडवण्याची ताकद देणारा स्पर्म व्हेलचा ‘हा’ रहस्यमय अवयव कोणता आहे?

4
0

Source :- BBC INDIA NEWS

प्रातिनिधिक छायाचित्र

‘मोबी डिक’ या जगप्रसिद्ध कादंबरीला ज्या दुर्घटनेने प्रेरणा दिली, त्यातून जिवंत वाचलेल्या एका खलाशाने स्पर्म व्हेल स्वतःपेक्षा कित्येक पटीने मोठे जहाज कसे उध्वस्त करू शकतो, याचा एक अंदाज वर्तवला होता.

तब्बल 200 वर्षांनंतर त्यांचे हेच म्हणणे अक्षरशः खरे ठरले.

20 नोव्हेंबर 1820 ची सकाळ. एका व्हेलने बोटीला मोठे भोक पाडल्यानंतर 15 वर्षांचा थॉमस निकर्सन थोडक्यात बचावला होता. बोटीत पाणी भरू लागल्यामुळे ते तातडीने मुख्य जहाजाकडे परतले. आपण आता सुरक्षित आहोत असे निकर्सन आणि त्याच्या साथीदारांना वाटत होते.

पण ‘एसेक्स’ या व्हेल-शिकार जहाजाचे नियंत्रण हाती घेताच निकर्सनला आणखी एक, आकाराने अत्यंत मोठा व्हेल थेट त्यांच्या दिशेने वेगाने येताना दिसला. त्याने लगेचच फर्स्ट मेट ओवेन चेसला सावध केले.

जहाजावरील कर्मचाऱ्यांमध्ये एकच गोंधळ आणि आरडाओरड सुरू झाला, तितक्यात “एक प्रचंड मोठा आघात झाला,” अशी नोंद निकर्सनने 50 वर्षांनंतर केली.

व्हेलची ती धडक इतकी जोरदार होती की जहाजावरील सगळे खलाशी खाली आदळले. त्यानंतर तो व्हेल 900 फूट (270 मीटर) मागे गेला, एका क्षणात मागे वळला आणि पूर्ण ताकदीने पुन्हा जहाजावर धडकला. या दुसऱ्या धडकेत जहाजाचा पुढचा संपूर्ण भाग चक्काचूर झाला आणि ‘एसेक्स’ जहाज समुद्रात बुडाले.

ही कथा एखाद्या कादंबरीसारखी वाटू शकते. कारण याच दुर्घटनेवर हर्मन मेलव्हिल यांची प्रसिद्ध ‘मोबी डिक’ ही कादंबरी आधारलेली आहे.

पुस्तक प्रसिद्ध होऊन आज 175 वर्षे उलटल्यानंतर, स्पर्म व्हेल स्वतःपेक्षा कित्येक पटीने मोठे जहाज कसे नष्ट करू शकतो, याचे वैज्ञानिक रहस्य उलगडले आहे. विशेष म्हणजे याचे अचूक उत्तर तब्बल 200 वर्षांपूर्वी खुद्द ‘एसेक्स’चा फर्स्ट मेट चेस यानेच मांडले होते.

आणि त्यात ज्या मौल्यवान तेलासाठी शिकारी या व्हेलचा पाठलाग करायचे नेमके त्याच भागात म्हणजेच त्याच्या डोक्यात या महाकाय जीवाची खरी ताकद दडलेली आहे.

डोक्यातील एक रहस्यमय अवयव

स्पर्म व्हेलचे डोके अवाढव्य असते. त्यांच्या एकूण शरीराचा जवळपास एक तृतीयांश भाग फक्त डोक्यानेच व्यापलेला असतो. पृथ्वीवरील सर्व प्राण्यांमध्ये सर्वात मोठा मेंदू स्पर्म व्हेलचाच असतो ज्याचे वजन तब्बल 9 किलोपर्यंत असते.

त्यांच्या कपाळाच्या भागात चरबीयुक्त आणि मऊ असा एक मोठा अवयव असतो ज्याला ‘स्पर्मासेटी’ म्हणतात. हा अवयव फक्त स्पर्म व्हेलमध्येच पाहायला मिळतो. हा अवयव एका तेलकट घटकाने भरलेला असतो ज्यालाही ‘स्पर्मासेटी’ म्हणूनच ओळखले जाते. सुरुवातीला व्हेलची शिकार करणाऱ्यांना हे वीर्य वाटल्यामुळे त्यांनी त्याला हे नाव दिले होते.

व्हेलच्या स्पर्मासेटी अवयवात 418 गॅलन म्हणजे 1,900 लिटर इतका स्निग्ध आणि मेणासारखा चिकट द्रव असतो. त्याला

स्पर्मासेटीला व्हेल-शिकारींकडून मोठ्या प्रमाणावर मागणी असायची. कारण या तेलापासून उच्च दर्जाचे इंधन मिळायचे आणि ते गोठवून साबण आणि मेणबत्त्यांसारखी उत्पादने तयार करता येत असत. 18 व्या आणि 19 व्या शतकात जगभरात सुमारे 3,00,000 स्पर्म व्हेल मारले गेले.

स्पर्म व्हेलच्या शरीरातून स्पर्मासेटी इतक्या मोठ्या प्रमाणात मिळवूनही त्याचा खरा उपयोग काय आहे हे आपण अजूनही शोधत आहोत. एका सिद्धांतानुसार स्पर्मासेटी हे लढाईचे एक साधन मानले जाते.

“हा मूळचा आमचा अंदाज नव्हता, तो ओवेन चेसचा होता,” असं निवृत्त उत्क्रांती जीवशास्त्रज्ञ डेव्ह कॅरियर म्हणतात.

एका व्यक्तीने असा युक्तिवाद केला होता की व्हेलचे कपाळ हे एक शस्त्र आहे आणि आम्ही त्याचीच पडताळणी करायचे ठरवले.”

गेल्या 200 वर्षांत जीवशास्त्रज्ञांनी चेसच्या या विचारांकडे फारसं लक्ष दिलं नव्हतं. मात्र कॅरियर यांच्या मते, “त्या शिकाऱ्याचा अंदाज आणि अनुभव बहुधा खरा होता.”

2002 मधील एका अभ्यासात कॅरियर यांनी असा निष्कर्ष मांडला की, स्पर्म व्हेलच्या कपाळातील ‘मेलन’ हा अत्यंत मोठा चरबीयुक्त अवयव धडक देणाऱ्या शस्त्राप्रमाणे विकसित झाला आहे. दात असणाऱ्या सर्वच व्हेलच्या डोक्यात हा अवयव आढळतो.

पाणघोड्याप्रमाणे प्रतिस्पर्ध्यावर प्राणघातक वार करण्याची ताकद त्यात असते. “व्हेल हे सस्तन प्राणी असून हरिण किंवा मेंढ्यांसारख्या प्राण्यांशी त्यांचा जवळचा संबंध आहे. या प्राण्यांमध्ये नर एकमेकांवर धडक मारून झुंज देतात. त्यामुळे हे वर्तन व्हेल प्राण्यांना त्यांच्या पूर्वजांकडून मिळालेले असू शकते.”

नुकतेच युनिव्हर्सिटी ऑफ हवाईचे संशोधक ॲलेक बर्स्लेम यांनी स्पर्म व्हेल एकमेकांना डोक्याने जोरदार धडक मारत असतानाचे दृश्य कॅमेऱ्यात कैद केले. यावेळी ते कोणत्याही जहाजाशी नव्हे तर आपसात भिडत होते. बॅलेरिक बेटे आणि अझोरेसजवळ घडलेला हा प्रसंग कॅमेऱ्यात मिळणे हा एक उत्तम योगायोग होता, असं बर्स्लेम सांगतात.

व्हेल भांडताना डोक्याचा वापर करतात हे ऐकून नवल वाटू शकतं. शत्रूवर वार करण्यासाठी कोणी आपल्या शरीराचा एवढा नाजूक आणि मुख्य भाग धोक्यात का आणेल? पण 2015 मध्ये झालेल्या एका संशोधनातून समोर आलं आहे की, या अवयवामध्ये धक्के पचवण्याची भक्कम ताकद असते. त्यामुळे कसलीही इजा न होता व्हेल आपल्या डोक्याचा वापर धडक मारण्यासाठी करू शकतात.

अफाट बळ

बर्स्लेम यांनी अनेक तरुण स्पर्म व्हेलमध्ये ही वर्तणूक अनेकदा पाहिली. त्यांनी नोंदवलेली सर्वात मोठी धडक एका तरुण नर व्हेलची होती. तो दर सेकंदाला 15 फूट म्हणजे दर सेकंदाला 4.5 मीटर वेगाने दुसऱ्या व्हेलच्या दिशेने सुसाट गेला आणि त्याने आपल्या साथीदाराला जवळपास 460 किलोन्यूटन (म्हणजे सुमारे 46 टन वजनाचा धक्का) इतक्या ताकदीने धडक दिली.

बर्स्लेम यांच्या मते, याच वेगाने धडकणारा एखादा पूर्ण वाढ झालेला मोठा स्पर्म व्हेल तब्बल 1,200 किलोन्यूटन (म्हणजे सुमारे 120 टन वजनाचा आघात) इतक्या ताकदीने आदळेल. ही धडक म्हणजे ताशी 40 मैल (ताशी 65 किमी) वेगाने येणाऱ्या बसची जोरदार धडक बसल्यासारखे असेल.

व्हेलने हीच ताकद लावून जहाजाला धडक दिली, तर तो आघात प्रचंड मोठा असतो.

“इतिहास पाहिला तर फक्त तीन मोठी व्हेल-शिकार जहाजे अशी होती, ज्यांच्यावर व्हेलने थेट हल्ला केला होता,” असं नॅनटकेट मधील हिस्टॉरिक सोसायटीचे संग्रहालय प्रमुख मायकेल हॅरिसन सांगतात.

या संस्थेकडे त्या काळातील मूळ लॉगबुक्स म्हणजे मूळ दैनंदिनी आणि ऐतिहासिक वस्तूंचा मोठा संग्रह आहे. मात्र, व्हेल दिसताच मोठ्या जहाजावरून खाली उतरवल्या जाणाऱ्या लहान, उघड्या बोटींवर व्हेल वारंवार हल्ले करायचे.

'एसेक्स' या जहाजाची खरी आणि मन हेलावून टाकणारी दुर्घटना पाहूनच हर्मन मेलव्हिल यांना 'मोबी डिक' ही कादंबरी लिहिण्याची प्रेरणा मिळाली होती.

जेव्हा जेव्हा एखाद्या व्हेलने मुख्य जहाजावर हल्ला केला त्या तिन्ही प्रकरणांमध्ये हल्ला करणारा हा स्पर्म व्हेलच होता. 1851 मध्ये दक्षिण पॅसिफिक महासागरात एका स्पर्म व्हेलने ‘ॲन अलेक्झांडर’ या जहाजावर जोरदार धडक दिली आणि ते पूर्णपणे उद्ध्वस्त केले.

1902 मध्येही एका स्पर्म व्हेलने गालापागोस बेटांजवळ प्रवास करत असलेल्या ‘कॅथलीन’ या जहाजाला धडक देऊन उद्ध्वस्त केले.

पण ‘एसेक्स’च्या वाट्याला जे आले ती कदाचित सागरी इतिहासातील जिवंत राहण्यासाठी करावी लागलेली सर्वात खडतर लढाई ठरली.

त्या दिवशी 20 माणसांनी बुडणारे मुख्य जहाज सोडले आणि ते तीन व्हेल-बोटींवर चढले. ते जमिनीपासून 1,300 मैल अंतरावर होते आणि त्यानंतर जे घडले, ती सागरी इतिहासातील सर्वात भीषण कथांपैकी एक आणि मेलव्हिल यांच्या ‘मोबी-डिक’साठीची प्रेरणा ठरली.

प्रेम आणि युद्ध

ड्रोनची नजर नसताना निसर्गामध्ये स्पर्म व्हेल किती वेळा डोक्याने अशा धडका मारतात हे आपल्याला नक्कीच माहीत नाही, असं बर्स्लेम सांगतात. शिवाय, त्यांच्या डोक्यातील त्या अनोख्या आणि अवाढव्य ‘मेलन’ अवयवाचा नेमका उपयोग काय, हेही आपण पूर्णपणे समजू शकलेलो नाही.

स्पर्मासेटीच्या कामाबद्दल इतरही काही सिद्धांत आहेत आणि त्याचा एकापेक्षा अधिक वापर असू शकतो. हेल हे नाकाच्या पुढच्या टोकाला असलेल्या “मंकी लिप्स” म्हणजेच आवाजाची निर्मिती करणाऱ्या ओठांच्या जोडीच्या साहाय्याने ध्वनी निर्माण करतात.

हा आवाज पाण्यामध्ये पुढेही पसरतो आणि मागे, त्यांच्या डोक्याच्या मागच्या भागात असलेल्या स्पर्मासेटीच्या शेवटच्या टोकापर्यंतही प्रवास करतो.

मादी व्हेल जेव्हा या दोन आवाजांचा मेळ ऐकते तेव्हा नराचा स्पर्मासेटी किती मोठा आहे आणि मिलनासाठी तो एक मोठा, सशक्त जीव आहे का हे ती ठरवू शकते, असं बर्स्लेम सांगतात.

“या प्राण्यांबद्दल शिकण्यासारखे आपल्याकडे अजून खूप काही आहे. त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्याला आपण प्राधान्य दिले पाहिजे,” असं बर्स्लेम म्हणतात. “आपण आता कुठे त्यांना समजून घ्यायला सुरुवात केली आहे.”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC