Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, Serenity Strull/ BBC/ Getty Images
व्हिडिओ गेम्स हे आजघडीला जगात मनोरंजनाचं सर्वात मोठं साधन बनलं आहे. पण ऑनलाईन खेळले जाणारे हे काल्पनिक विश्वातील व्हिडिओ गेम्स आता लोकांच्या खऱ्या वास्तविक जगात घुसखोरी करून एका वेगळ्याच प्रक्रियेला जन्म देत आहेत.
बसल्याजागी ख्रिस्टिअन डाईनचे हात शिवशिवत होते. त्याचा आवडत्या व्हिडिओ गेममधील एखादी महत्वाची मोहीम राबवताना गेम कंट्रोलरवर चालणारे त्याचे हात असे शिवशिवत असत. पण यातली मेख अशी की ख्रिस्टिअन आता ना गेम खेळत होता ना गेमचा कंट्रोलर त्याच्या हातात होता.
शाश्वत विकासावर काम करणाऱ्या अमेरिकेतील एका कंपनीत सल्लागार म्हणून कार्यरत असलेल्या ख्रिस्टिअनसाठी ही एक वेगळीच अनुभूती होती.
आपल्या रूममध्ये बसलेला असताना रूम मधील नजरेला पडतील त्या वस्तू चुंबकीय बलाने आपल्याकडे ओढून घ्याव्यात किंवा गोळा कराव्यात, अशी तीव्र इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली.
तो खेळत असलेल्या व्हिडिओ गेममधील काल्पनिक विश्वात वस्तू व शस्त्र गोळा करत त्याचं पात्र असंच सगळीकडे फिरत असतं.
“जेव्हा आपल्यासोबत असं काही होत आहे याची मला पहिल्यांदा जाणीव झाली तेव्हा तर मी क्षणभर उडालोच. व्हिडिओ गेम आणि बाहेरचं जग यातला फरकच मला तेव्हा कळालेला नव्हता. असं माझ्यासोबत पहिल्यांदाच घडत होतं. माझी तर बोबडीच वळली होती,” असं ख्रिस्टिअन डाईन सांगतो.
जवळपास आठवडाभर तो रोज हा गेम खेळत होता. आता गेममधल्या काल्पनिक जगातून बाहेर पडायला कदाचित त्याचं मन तयार होत नव्हतं.
“हे जवळपास पुढचे काही दिवस वारंवार माझ्यासोबत घडत होतं. गेम खेळत नसतानाही जणू काही मी गेमच खेळतोय आणि माझ्यासमोरच्या घडत असलेल्या घटना व चित्र गेममधीलच आहेत, असं समजून माझं शरीर आणि मन आपोआप प्रतिक्रिया देऊ लागलं होतं. हे सगळं माझ्याच नकळत माझ्यासोबत घडत असल्यानं मी अक्षरशः बिथरलोच होतो,” अशी आठवण ख्रिस्टिअननं सांगितली.
गेम ट्रान्स्फर फेनॉमेनॉन
ख्रिस्टिअन डाईनला झालेली ही अनुभूती म्हणजे गेम ट्रान्स्फर फेनॉमेनॉन (जीटीएफ) नावाची एक मानसिक अवस्था अथवा विकार आहे.
ही अशी अवस्था आहे ज्यात व्हिडिओ गेममधील काल्पनिक जग आणि वास्तवातील भौतिक जग यामधील फरक व्यक्तीला कळेनासा होतो. त्यामुळे भौतिक जगाला व्हिडिओ गेम समजून त्यानुसार माणूस एखाद्या गेमरप्रमाणे प्रतिक्रिया देऊ लागतो.
गेमबाहेर पडल्यानंतरही आपण अजूनही गेममध्येच असल्याचा भास व्यक्तीला होत राहतो. हा मानसिक विकार अथवा अवस्था तुलनेनं नवी असली तरी मोठ्या प्रमाणात व्हिडिओ गेम खेळणाऱ्या गेमर्सना याचा अनुभव येताना दिसतो आहे.
हा वरकरणी मस्करीचा अथवा निरुपद्रवी प्रकार वाटत असला तरी सदरील व्यक्तीवर याचे होणारे संभाव्य परिणाम अतिशय धोकादायक वळण घेऊ शकतात.

फोटो स्रोत, Serenity Strull/ BBC/ Getty Images
जीटीपीने ग्रस्त असलेल्या लोकांचं सर्वेक्षण केलं असता ओर्टिज डी गोर्टारीला असं लक्षात आलं की याचे परिणाम वेगवेगळ्या लोकांवर वेगवेगळे होतात.
काही गेमर्सना जीटीपीमुळे रोजची दैनंदिन कामं पार पाडताना अडचण होते. सतत गोंधळ उडणे, अति क्रियाशील राहणे, चंचलपणा आणि अतार्किक वागणूकही जीटीपीग्रस्त गेमर्समध्ये आढळून आली. तर काही लोकांमध्ये जीटीपीची अगदी सौम्य लक्षणं व परिणाम जाणवतात.
जीटीपीमध्ये नेमकं काय होतं?
काही क्षणांसाठी वास्तवाची पकड जाऊन गेममध्ये गेल्यामुळे आपण कदाचित वेडसर आहोत की काय, असा प्रश्न त्यांना पडत असल्याचं सर्वेक्षणात सहभागी झालेल्या गेमर्सनी सांगितलं.
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या लोकांनी जीटीपीचे आलेले वेगवेगळे अनुभव ओर्टिजशी बोलताना नमूद केले. वर्ल्ड ऑफ वारक्राफ्ट गेम खेळणाऱ्या एका महिलेनं सांगितलं की, गेममधील पात्रांच्या डोक्यावर दिसणारे हेल्थ इंडिकेटर बार तिला तिच्या कार्यालयातील सहकाऱ्यांच्या डोक्यावर दिसू लागले होते.
आणखी एकाने गेममधील प्रतिमा काम करताना मध्येच डोळ्यासमोर येत असल्यामुळे कामावर लक्ष केंद्रित करणं अवघड जात असल्याचं सांगितलं.
आपल्या भवतालातील खऱ्या वस्तू व भिंतींचे रंग बदलून ते गेममधील रंगांसारखे दिसू लागल्याचा अनुभवही काही जणांनी नमूद केला.
जीटीपीमुळे होणारे हे भास फक्त काही क्षण टिकत असले तरी त्या क्षणात वास्तवालाच गेम समजून त्याप्रमाणे प्रतिसाद दिला जाण्याचा धोका असतो, अशा शब्दात ओर्टिज डी गोर्टारी यांनी जीटीपीचं गांभीर्य समजावून सांगितलं.
जीटीपीमुळे खऱ्या जगातील वस्तू व लोकांसोबत आपली वागणूक प्रभावित होऊ शकते. उदाहरणार्थ- सुपरमार्केट मध्ये तुम्ही गेले असता तिथल्या वस्तूंकडे गेम्सच्या चष्म्यातून तुम्ही पाहू लागता.
जणू काही आपल्या हातात रिमोट आहे आणि आता आपल्याला तिथल्या वस्तूंवर अथवा लोकांवर गोळ्या चालवायच्या आहेत, अशा हेतूने आपले हात आपोआप हालचाल करू लागतात.
जीटीपीची तीव्रता वाढल्यानंतर काही जणांकडून अशा शारिरीक प्रतिक्रिया आपोआप आल्याचं आढळून येतं. हे प्रसंगी धोकादायक ठरू शकतं.
ओर्टिज डी गोर्टारीनं आपल्या सर्वेक्षणात 400 वेगवेगळ्या प्रकारचे गेम खेळणाऱ्या लोकांचं सर्वेक्षण केलं. 2024 मध्ये तिने केलेल्या सर्वेक्षणात 623 चीनी गेमर्सनी सहभाग घेतला होता. यात महिला आणि पुरुष दोघांचाही समावेश होता. या 623 पैकी 82 ते 96 टक्के गेमर्संना कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात जीटीपीचा अनुभव आल्याचं ओर्टिजला आढळून आलं.

जीटीपीशी झगडणाऱ्या गेमर्सची संख्या वाटते त्यापेक्षा फार जास्त असल्याचं ओर्टिज डी गोर्टारी सांगतात.
अनेक गेमर्स आपल्याला जीटीपीची अनुभूती होत असल्याचं कोणाला सांगतच नाहीत. कारण आपल्याला लोका वेडा समजतील अशी भीती त्यांना असते.
जीटीपीबद्दल माहिती जास्तीत जास्त लोकांना सांगून त्याबद्दल जागरूकता पसरवणे हा त्यांचा उद्देश आहे. गेममधल्या गोष्टी खऱ्या जगात घडत असल्याचे होणारे हे भास निषिद्ध समजल्या जाणाऱ्या भ्रमित होणे या मानसिक विकाराचं लक्षण समजले जातात.
वास्तवादी गेममुळे जीटीपीची समस्या अधिक
मागच्या काही काळात व्हिडिओ गेमच्या तंत्रज्ञानात प्रचंड सुधार होताना दिसतो. रोल प्लेयिंग, सिम्युलेशन, ॲडव्हेंचर आणि फर्स्ट पर्सन शूटिंगचे व्हिडिओ गेम्स आता वरचेवर आणखी वास्तववादी आणि खिळवून ठेवणारे बनले आहेत.
या गेममध्ये छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा अगदी खोलात जाऊन बारकाईने खऱ्या वाटतील, अशा बनवल्या गेल्या आहेत. हे गेम जास्तच वास्तववादी बनत चालल्यानं व्हर्च्युअल आणि खऱ्या जगात फरक करणं गेमर्सना अवघड जातंय.
अशा वास्तववादी आणि आधुनिक गेममुळे जीटीपीची समस्या जास्त प्रमाणात आणि अधिक तीव्र बनत चालली आहे.
“आधी टेट्रीस आणि सुपर मारिओसारखे अगदी प्राथमिक अवस्थेतील गेम्स जास्त विकसित नव्हते. ते गेम व्हर्च्युअल आहेत आणि खऱ्या जगाशी मिळतेजुळते नाहीत, हे लगेच लक्षात यायचं. त्यामुळे गेमर्सचा गोंधळ उडण्याची शक्यता कमी होती. आताचे आधुनिक व्हिडिओ गेम्स इतके वास्तववादी आणि बारकाईने बनवलेले असतात की त्यात बुडून गेलेला गेमर काय वास्तव आणि काय भ्रम हे लवकर ओळखू शकत नाही. हे गेम जसे आणखी आधुनिक बनत जातीत तसं जीटीपीचं स्वरूप आणखी तीव्र आणि चिंताजनक बनत जाणार आहे,” असं मत ओर्टिज डी गोर्टारी यांनी व्यक्त केलं.

फोटो स्रोत, Getty Images
अली फरहा हे स्टॉकहोम मधील स्टार स्टेबल एन्टरटेन्मेंट या गेमिंग कंपनीत वरिष्ठ गेम प्रोड्युडर आणि गेमिंग उद्योगाचे विश्लेषक आहेत. त्यांनासुद्धा गेमिंग ट्रान्स्फर फेनॉमेनॉनचा अनुभव आलेला आहे.
अर्थात त्यांना आलेला अनुभव हा फारच सौम्य आणि निरुपद्रवी होता, असं ते सांगतात. काही क्षणासाठी गेम बंद झाल्यावरही गेममधून मानसिकरित्या आपल्याला बाहेर पडता येत नसल्याचं त्यांना जाणवलं.
जीटीपीसारखी समस्या उद्भवू नये यासाठी काय करावं?
जीटीपीसारख्या समस्या उद्भवू नयेत म्हणून दीर्घकाळ गेम खेळत असाल तर अधून मधून विश्रांती घेणे आणि गेममधून मानसिकरित्या बाहेर येण्यासाठी पुस्तक वाचणे अथवा टीव्हीवर काहीतरी हलकंफुलकं पाहण्याचा सल्ला ते देतात.
दिवसातून चार तासांपेक्षा जास्त वेळ गेम खेळत असाल तर तुम्हाला जीटीपीची समस्या उद्भवू शकते, असं शास्त्रज्ञ सांगतात. गेमिंग ॲडिक्ट्स ॲनॉनिमस (जीएए) नावाचा व्हिडिओ गेमचं व्यसन जडलेल्या आणि त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असलेल्या लोकांची एक संस्था अमेरिकेत कार्यरत आहे.
या संस्थेचे प्रवक्ते स्कॉट जेनिंग्स सांगतात की, “आमच्या समूहाचे अनेक सदस्य दिवसातील बहुतांश वेळ व्हिडिओ गेम खेळत असत. याचे गंभीर दुष्परिणाम त्यांनी भोगलेले आहेत. आमच्या संस्थेच्या माध्यमातून सातत्याने व्हिडिओ गेम खेळण्याचं व्यसन किती विघातक आहे आणि या व्यसनातून मुक्ती कशी मिळवू शकतो, या बद्दलची जनजागृती आम्ही करत असतो. गेमिंगच्या व्यसनाला बळी पडलेल्या लोकांना मदत पुरवण्याचं काम आमची संस्था करते.”
“ज्याप्रमाणे व्हिडिओ गेममधील व्हर्च्युअल विश्वात जास्त वेळ रमल्यानं त्यातून बाहेर पडत वास्तव जगाशी जुळवून घेण्यात समस्या निर्माण होते त्याप्रमाणे अनेकदा उलटा प्रकारही होतो. खऱ्या आयुष्यातील आपली मतं, मनस्थिती आणि समज घेऊन लोक गेम खेळायला येतात आणि गेम खेळताना त्यांचं व्यक्तिमत्त्व गेममधील त्यांच्या वागणुकीत परावर्तित होतं. म्हणजे वास्तव आणि व्हर्च्युअल जगातील ही देवाणघेवाण दोन्ही बाजूंनी होत राहते.
लोक गेम खेळताना व्हर्च्युअल जगात आठवणी, नातेसंबंध तयार करतात. त्याचं प्रतिबिंब मग त्यांच्या खऱ्या आयुष्यातही उमटतं. गेम खेळताना आलेले अनुभव मेंदूत कोरले जाऊन ते अनुभव आपल्या खऱ्या आयुष्याचा आणि व्यक्तीमत्वाच भाग बनून जातात. म्हणजेच व्हिडिओ गेममध्ये तुम्ही फक्त एक काल्पनिक पात्र नव्हे तर तुमचं वास्तविक स्वत्व घेऊन येता. आणि गेममधून बाहेर पडल्यानंतरही ते तुमच्यासोबत कायम राहतात. तसंच खऱ्या आयुष्यातील तुमचे अनुभव घेऊन तुम्ही गेम खेळायला येता आणि या अनुभवांचं प्रतिबिंब तुमच्या गेममध्ये उमटतं.
व्हिडिओ गेम आणि वास्तव जग यातला फरक मिटत चालल्याचंच हे एक लक्षण आहे. तुम्ही खेळत असलेला व्हिडिओ गेम तुमच्या आयुष्याचा आणि तुमचं आयुष्य तुम्ही खेळत असलेल्या व्हिडिओ गेमचा अविभाज्य भाग बनून जातो,” अशा शब्दात या प्रक्रियेची दुसरी बाजू फरहा यांनी उजेडात आणली.

फोटो स्रोत, Serenity Strull/BBC/Getty Images
जीटीपीच्या प्रभावाखाली येऊन कोणी स्वतःवर अथवा इतरांवर हल्ला केल्याची घटना आजपर्यंत तरी निदर्शनास आलेली नाही. पण भविष्यात असं घडणारच नाही, हे ठामपणाने कोणी सांगू शकत नाही.
“गाडी चालवताना मला राक्षस मारायचे आहेत हे विचार जर माझ्या मनात घोळत असतील तर ती नक्कीच चांगली गोष्ट नाही. अशा प्रकारे मन भरकटणं माझ्या जीवावर बेतू शकतं,” अशी डाइन्स सांगतो.
आपल्या नजरेसमोर घडणारी गोष्ट ही गेमच्या काल्पनिक विश्वातील आहे की आजूबाजूच्या खऱ्या भौतिक जगातील आहे, हे ओळखून त्याप्रमाणे प्रतिसाद देणं कधी कधी मानवी मेंदूला जड जातं.
त्यात या व्हर्च्युअल रिॲलिटी यंत्रणा इतक्या आधुनिक आणि वास्तववादी बनत चालल्या आहेत, त्यामुळे हे आव्हान मेंदूसाठी आणखी मोठं बनत चाललं आहे.
ओर्टिज डी गोर्टारी सांगतात की, “चंचल मनोवृत्तीच्या आणि स्मरणशक्ती कमजोर असलेल्या लोकांना जीटीपीची लागण होण्याची शक्यता अधिक असते. सातत्याने व्हिडिओ गेम खेळत राहिल्याने मेंदूवर परिणाम होतो. गेम मधील गोष्टीप्रमाणे एखादी गोष्ट त्यांना खऱ्या आयुष्यात दिसली तर गेममध्ये जशी प्रतिक्रिया दिली जाईल तशीच प्रतिक्रिया ते खऱ्या आयुष्यात द्यायला लागतात. याचे परिणाम गंभीर आणि प्रसंगी जीवावर बेतणारे असू शकतात.”
पण जीटीपीबाबत सुरू असलेलं सगळं संशोधन अजूनही प्राथमिक अवस्थेत आहे. शास्त्रज्ञ अजूनही या प्रक्रियेला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
त्यामुळे आजघडीला जीटीपीचं कोडं उलगडायला वेगवेगळे सिद्धांत फक्त मांडले जात आहेत. ते जीटीपीवर अचूक व ठाम उत्तर देऊ शकतील, याची काही शाश्वती नाही.
‘व्हर्च्युअल रिॲलिटीच वास्तववादी बनलीये’
“आजचं अत्याधुनिक व्हर्च्युअल जग आणि भौतिक जग यातला फरक नीट ओळखण्याइतका आपला मानवी मेंदू विकसितच झालेला नाही. व्हिडिओ गेम्सची व्हर्च्युअल रिॲलिटी इतकी वास्तववादी बनून गेली आहे की आपल्या मेंदूला काय वास्तव आहे काय काल्पनिक हे लवकर कळत नाही. त्यात हे गेम्स इतके खिळवून ठेवणारे असतात की त्यांचं व्यसनही लागतं. अशा परिस्थितीत कल्पना आणि वास्तव एकमेकांमध्ये मिसळणं साहजिकच म्हणावं लागेल,” अशा शब्दात गेम ॲडिक्ट्स ॲनॉनिमसचे प्रवक्ते स्कॉट जेनिंग्स यांनी गेमर्सची व्यथा मांडली.
स्कॉट जेनिंग्स यांना सुद्धा जीटीपीचा अनुभव आलेला आहे. ते कार चालवण्याचा आक्रमक गेम खेळायचे. खरोखर रस्त्यावरून गाडी चालवत असताना कोणी नीट गाडी चालवत नसेल तर त्याला / तिला जाऊन जोरात गाडी धडकवण्याची तीव्र इच्छा त्यांना व्हायची.
जीटीपी नेमकं काय आहे हे सांगताना जीटीपीची तुलना ते मद्यपानाशी करतात. “मद्यपान करताना तुम्ही किती दारू पिता हे महत्त्वाचं नसतं.
दारू पिल्यानंतर प्रत्येकावर होणारे परिणाम वेगवेगळे असतात. काहीजण अति मद्यपान करून देखील शांतचित्ताने राहतात. काही जण दारूची ठराविक मात्रा ओलांडल्यानंतर अस्थिर आणि विचित्र वागू लागतात. जीटीपीचं देखील तसंच आहे.
गेम खेळल्यानंतर काही जणांच्या खऱ्या आयुष्यावर त्याचा काही प्रभाव पडत नाही. तर काही जणांना गेम बंद केल्यानंतर त्या मनस्थितीतून लवकर बाहेर पडता येत नाही. त्यामुळे दारू प्रमाणेच प्रत्येकाने स्वत:ला झेपेल इतक्या प्रमाणातच गेम खेळावेत,” असा सल्ला जेनिंग्स यांनी दिला.
ओर्टिज डी गोर्टारी यांनीसुद्धा स्कॉट जेनिंग्स यांच्या मताला दुजोरा दिला. “जीटीपीचा प्रत्येक व्यक्तीवर होणारा परिणाम हा वेगवेगळा असतो. जीटीपीमुळे काही जणांना निद्रानाश, तणाव, अस्वस्थता आणि नैराश्य देखील येऊ शकतं. गेमचा आपल्या आयुष्यावर काय आणि कितपत परिणाम होतोय, हे पाहूनच प्रत्येकानं गेमिंगमध्ये उतरावं. कारण जीटीपीचा लोकांवर होणारा परिणाम हा व्यक्तिपरत्वे बदलत जातो,” असं ओर्टिज डी गोर्टारी यांनी अधोरेखित केलं.

फोटो स्रोत, Mario
मॅक्स डिझमिट्रिव्ह हे अमेरिकेतील एक गेमर आणि समुपदेशक आहेत.
ते सांगतात की व्हिडिओ गेम मुळे त्यांची अस्वस्थता वाढली. “व्हिडिओ गेम आपल्याला गुंतवून ठेवतात. त्यांची चेतना देखील जास्त असते. जीटीपीचा मला आलेला अनुभव फार वाईट होता. त्याने माझी सारासार विवेकबुद्धी आणि निर्णयक्षमता प्रभावीत झाली. जवळपास 20 मिनिटं वास्तवापासूनच माझा संपर्क तुटलाय, असं मला वाटलं. दर काही दिवसांनी अधून मधून काही मिनिटांसाठी असेच जीटीपीचे झटके मला येत राहतात.

जीटीपीचा अनुभव फक्त स्वतः गेम खेळल्यानेच नव्हे तर इतरांना गेम खेळताना बघितल्यावर सुद्धा येऊ शकतो, असं मॅक्स डिझमिट्रिव्ह सांगतात.
ते इतरांना माईनक्राफ्ट खेळताना बघत असे. त्यानंतर त्याला आजूबाजूच्या खऱ्या वस्तू व इमारती माईनक्राफ्ट गेममधील वस्तू व इमारतींसारख्या दिसू लागल्या.
त्यामुळे आता स्वतः गेम खेळणं आणि कोणाला गेम खेळताना बघणंही मी बंद केलं असल्याचं डिझमिट्रिव्ह यांनी सांगितलं.
व्हिडिओ गेम्स खेळणाऱ्या लहान मुलांची संख्या लक्षणीय आहे.
या धर्तीवर जीटीपीमुळे गेमर्सच्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांची काहीतरी जबाबदारी गेम बनवणाऱ्या निर्मात्यांनी घ्यायला हवी, अशी मागणी ओर्टिज डी गोर्टारी करतात.
“याची सुरुवात किमान आपले गेम खेळल्यामुळे गेमर्सना या समस्या उद्भवू शकतात, हे मान्य करून होऊ शकते. हे मान्य करून मग आपल्या गेम मुळे होणारा जीटीपीचा प्रभाव कमी करण्यासाठी गेममध्ये सुधारणा करण्यासाठी ते प्रयत्न करू शकतील,” अशी आशा त्या व्यक्त करतात.
“गेम्सच्या निर्मात्यांनी गेम सुरू होताना गेमर्सवर त्यांचे संभाव्य दुष्परिणाम काय असू शकतात, याचा वैधानिक इशारा द्यायला सुरुवात केली पाहिजे”, अशी मागणी डाईन्स यांनी केली.
“खेळणाऱ्याला त्याचं व्यसन लागलं पाहिजे अशा पद्धतीनेच डेव्हलपर्स गेम विकसित करतात. या डेव्हलपर्सच्या जाळ्यात न अडकता योग्य त्या प्रमाणातच गेम खेळला पाहिजे. मी सुद्धा कधीकाळी खूप गेम खेळायचो. त्याचे माझ्या मानसिक स्वास्थ्यावर काय दुष्परिणाम झाले, हे मला माहिती आहे. त्यामुळे गेम खेळा पण जपून,” असा काळजीवाहू सल्ला फरहा गेमर्सना देतात.
‘जीटीपीचा नको इतका बाऊ’
निक बलो हा ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधक मात्र काहीसं वेगळं मत मांडतो. निक व्हिडिओ गेम्स आणि त्याचे गेमर्सवर होणारे मानसिक परिणाम यावर संशोधन करत आहे. त्याच्या मते जीटीपीचा नको तितका बाऊ केला जात आहे.
यामुळे सगळेच गेम हे वाईट असतात आणि गेम खेळणं ही वाईट सवय आहे, असा गैरसमज पसरवला जात असल्याचा आरोपही त्याने केला.
निक बलो नेमकं याच विषयावर संशोधन करत असून या संशोधनासाठी गेमिंग कंपन्यांकडून आवश्यक डाटा सुद्धा त्याला पुरवला जात आहे.
या डाटाचं विश्लेषण करून गेम खेळल्याने गेमर्सवर काय मानसिक परिणाम होतो, याचं चित्र स्पष्ट करण्याचा त्याचा इरादा आहे. येत्या उन्हाळ्यात त्याचं हे संशोधन पूर्ण होऊन प्रसिद्ध होणं अपेक्षित आहे.
“गेम खेळल्याचा कुठलाही नकारात्मक परिणाम बहुतांश गेमर्सवर होत नाही. उलटपक्षी गेम खेळल्यानं त्यांना आणखी चांगलं वाटतं. त्यांचा तणाव कमी होतो, असाच अनेकांचा अनुभव आहे.
गेममधून लोक एकमेकांशी जोडली जातात. त्यांची नाती तयार होतात. समूहात राहिल्याची भावना निर्माण होऊन एकटेपणा दूर होतो.
गेम खेळल्यानं त्यांना निकोप आनंद तर मिळतोच शिवाय त्यातून जिंकल्याचं समाधान आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यात गेमर्सना मदत होते.
जीटीपीचा अनुभव काही जणांना आला असला तरी त्याने काही फार मोठा फरक पडेल, असं वाटत नाही. अन्यथा जीटीपीमुळे गेमर्सनी काहीतरी भलतेच प्रकार करत खऱ्या आयुष्यात स्वतःचं किंवा इतरांचं नुकसान केल्याच्या घटना आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या. पण तसं काही होताना दिसत नाही. त्यामुळे जीटीपीच्या बेडकाचा बैल करून लोकांना फक्त घाबरवलं जात आहे,” असं म्हणत निकनं व्हिडिओ गेम्सना नकारात्मक छायेत पाहणारे सगळे दावे खोडून काढले.
“जीटीपी ही नुकतीच आढळून आलेली नवीन संकल्पना आहे. तिचा नीट उलगडा अजून व्हायचा बाकी आहे. ही प्रक्रिया नीट समजून घ्यायची असेल तर गेम खेळताना गेमर्सच्या मेंदूवर नेमका काय परिणाम होतो, ते अभ्यासावं लागेल. यासाठी गेमर्सच्या मेंदूचे स्कॅन करून त्यांची तपासणी करता येईल. जीटीपी ही काही काल्पनिक नव्हे तर खरीखुरी समस्या आहे, यात काही वाद नाही. पण आता तिच्याविषयी आणखी खोलात जाऊन अभ्यास करण्याची गरज आहे. जीटीपीची समस्या का, कशी आणि कधी उद्भवते आणि लोकांवर नेमकी कसा परिणाम करते हे तिचे सगळे पैलू समोर आल्यानंतरच आपल्याला ठामपणाने काही सांगता येईल. तूर्तास जीटीपीविषयी सजग राहून गेम खेळताना काळजी घेणं इतकंच आपल्याला हातात आहे,” असं ओर्टिज डी गोर्टारी जाता जाता म्हणाल्या.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC