Home LATEST NEWS ताजी बातमी ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यावर विरोधी पक्ष ठाम, राहुल गांधी यांना पुन्हा घेतले पोलिसांनी...

ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यावर विरोधी पक्ष ठाम, राहुल गांधी यांना पुन्हा घेतले पोलिसांनी ताब्यात

4
0

Source :- BBC INDIA NEWS

राहुल गांधी आणि खासदार डेरेक ओ ब्रायन

Published

वाचन वेळ: 3 मिनिटे

दिल्लीमध्ये निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात विरोधकांचे आंदोलन बुधवारीही सुरू आहे. लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना दिल्ली पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेतले आहे.

मंगळवारी ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राहुल गांधी यांना सोडून देण्यात आले होते. त्यानंतर बुधवारी इंडिया ब्लॉकचे खासदार आणि राहुल गांधी जंतर-मंतरवर आंदोलनासाठी निघालेले असताना राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आंदोलनादरम्यान काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी विरोधकांची मागणी आहे.

मंगळवारी निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चानंतर आणि त्यानंतर आकाशवाणी भवन येथे झालेल्या प्रदीर्घ धरण्यानंतर बुधवारी पुन्हा आंदोलन सुरू झाले.

मतदार यादीतील कथित अनियमिततेवरून राहुल गांधी सातत्याने ‘मतचोरी’चा आरोप करत आहेत. मात्र, निवडणूक आयोग आणि भाजपने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

काँग्रेससह विरोधी पक्ष मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत गडबड झाल्याचा आरोप करत आहेत. तसेच, ज्ञानेश कुमार भाजपसोबत मिळून काम करत असून, भाजपला फायदा पोहोचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा त्यांचा आरोप आहे.

खासदारांशी गैरवर्तणूक केल्याचा प्रियंका गांधींचा आरोप

जंतर मंतरवर उपस्थित असलेले बीबीसी प्रतिनिधी दिलनवाज पाशा यांनी सांगितले की जंतर मंतरवर जात असताना पोलिसांनी राहुल गांधी यांना ताब्यात घेतले.

खासदार प्रियंका गांधी यांनी म्हटले की पोलिसांनी खासदारांसोबत गैरवर्तन केले.

“निवडणूक आयुक्तांच्या भेटीसाठी जाणाऱ्या खासदारांसोबत पोलीस कसं वर्तन करत आहेत? त्यांनी आमच्या खासदारांंना मारले, पोलिसांकडून मला खेचण्यात आलं. त्यांनी मला धक्का देऊन जमिनीवर पाडलं, आता आम्ही या ठिकाणाहून सरकणार नाहीत,” असे प्रियंका गांधींनी सांगितले.

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी रस्त्यावर आडवे पडून आंदोलन केले

याआधी काय घडलं?

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवारी दिल्लीतील जनपथ येथील एका रेस्टॉरंटमध्ये इंडिया ब्लॉकच्या खासदारांसाठी लंचचे आयोजन केले होते.

त्यानंतर राहुल गांधी आणि विरोधी पक्षांचे खासदार जंतर-मंतरसाठी रवाना झाले. त्यांच्यासोबत काँग्रेस आणि इंडिया ब्लॉकमधील इतर नेतेही उपस्थित होते.

6 ऑक्टोबर रोजी दिल्लीत आंदोलनादरम्यान राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचे टिपलेले छायाचित्र

‘ज्ञानेश कुमार वैध मुख्य निवडणूक आयुक्त नाहीत’- राहुल गांधी

दुपारच्या जेवणानंतर राहुल गांधी म्हणाले की, विरोधी खासदारांनी मंगळवारी (6 ऑक्टोबर) तिन्ही निवडणूक आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना भेटू दिलं गेलं नाही.

त्यांनी पुन्हा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच, आपण त्यांना ‘वैध/कायदेशीर मुख्य निवडणूक आयुक्त’ मानत नसल्याचे ते म्हणाले.

मंगळवारी झालेल्या आंदोलनानंतर राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि ‘इंडिया’ आघाडीतील काही नेत्यांविरोधात आकाशवाणी भवनात कथितपणे परवानगीशिवाय प्रवेश केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

यावर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी म्हणाले की, त्यांच्याविरोधात आतापर्यंत 45 एफआयआर दाखल झाले आहेत आणि आपल्याविरोधात 100 एफआयआर दाखल व्हाव्यात, अशी त्यांची इच्छा आहे.

ते म्हणाले, “प्रत्येक एफआयआर माझ्यासाठी एक पदक आहे.”

राहुल गांधी म्हणाले की, ते आणि विरोधी पक्ष मागे हटणार नाहीत.

मंगळवारी काय घडलं?

6 ऑक्टोबर रोजी दिल्लीत अनेक घडामोडी झाल्या. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात इंडिया ब्लॉकचे नेते निवडणूक आयोगाकडे जात होते. त्यांना भेटून निवेदन द्यायचे होते असे विरोधी पक्षातील नेत्यांनी सांगितले.

पण राहुल गांधी-प्रियंका गांधी हे आकाशवाणी भवन जवळ येथे आले असता त्यांना पुढे जाऊ दिले नाही. राहुल गांधी इतर नेत्यांसह दिवसभर आकाशवाणी भवन परिसरात थांबले होते. नंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि रात्री त्यांना सोडून देण्यात आले.

निवडणूक आयोगाने मंगळवारी रात्री निवेदन जारी केले होते आणि सांगितले की राहुल गांधी आणि त्यांच्या शिष्टमंडळाने आमच्या भेटीची वेळच घेतली नव्हती त्यामुळे आम्ही त्यांना भेटू शकलो नाहीत.

सर्व औपचारिकता आणि शिष्टाचाराचा आम्ही आदर करतो त्यामुळे कोणत्याही नेत्याने किंवा पक्षाच्या प्रतिनिधीने आमची वेळ घेऊन प्रक्रियेप्रमाणे आमची भेट घ्यावी असे निवडणूक आयोगाने म्हटले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC