Home LATEST NEWS ताजी बातमी ‘डायना बेशुद्धावस्थेत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होत्या’; कसा होता त्यांचा शेवटचा दिवस?

‘डायना बेशुद्धावस्थेत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होत्या’; कसा होता त्यांचा शेवटचा दिवस?

3
0

Source :- BBC INDIA NEWS

ड्यूक अँड डचेस ऑफ ससेक्स, प्रिन्स हॅरी आणि मेगन यांच्याशी प्रसारमाध्यमांचं वर्तन चुकीचं असल्याचं प्रिन्सेस डायना यांचे भाऊ अर्ल स्पेंसर यांनी म्हटलं.

फोटो स्रोत, PA

Published

वाचन वेळ: 9 मिनिटे

“ड्यूक अँड डचेस ऑफ ससेक्स, प्रिन्स हॅरी आणि मेगन यांच्याशी प्रसारमाध्यमं ज्या पद्धतीचं वर्तन करत आहेत त्यामुळं आपली बहीण, प्रिन्सेस ऑफ वेल्स डायना यांच्यासोबत जे घडलं त्याची आठवण येते,” अशा भावना राजकुमारी डायना यांचे भाऊ अर्ल स्पेन्सर यांनी बीबीसी बरोबर बोलताना म्हटलं आहे.

प्रिन्स हॅरी आणि मेगन यांच्याबद्दल माध्यमं ज्या पद्धतीचं वार्तांकन करत आहेत ते ‘कर्करोगाइतकंच धोकादायक’ आहे, असं स्पेन्सर म्हणाले. डायनाच्या उदाहरणातून लोकांनी धडा घेणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले.

ससेक्स दाम्पत्यानं राजघराण्याच्या जबाबदाऱ्या सोडल्यानंतर सहा वर्षांनी ते नुकतेच कॅलिफोर्नियाहून ब्रिटनला परतले आहेत. पण त्यांच्यावर माध्यमांवरून सातत्यानं टीका होत आहे.

31 ऑगस्ट 1997 रोजी पॅरिसमध्ये एका कार अपघातात डायनाचा मृत्यू झाला होता. त्यावेळी प्रसारमाध्यमं त्यांच्या पाठलाग करत होती, असं म्हटलं जातं.

डायना यांच्या आयुष्याचा शेवटचा दिवस कसा होता, यावर आम्ही 7 वर्षांपूर्वी ही स्टोरी केली होती. ती आता पुन्हा प्रकाशित करत आहोत.

काय झालं होतं त्यादिवशी?

डायना यांनी त्यांचा शेवटचा दिवस त्यांचे पार्टनर डोडी अल फायद यांच्या बोटीवर व्यतीत केला होता. बोटीच्या वरच्या भागात त्यांचं वास्तव्य होतं. सकाळी नाश्त्यात त्यांनी ताज्या जॅमबरोबर क्रोएसाँही खाल्लं.

त्याबरोबर त्यांनी भरपूर दूध घातलेली कॉफी बनवली. साडेअकराच्या सुमारास त्यांनी बोट सोडली. कारण त्यांना डोडी यांच्या वैयक्तिक विमानाने पॅरिसला जायचं होतं. त्यांच्याबरोबर डोडी यांचा बटलर आणि मालिश करणारा होता. कारण डोडी यांच्या पाठीचं दुखणं बळावलं होतं.

31 ऑगस्ट 1997 ला पॅरिसमध्ये एका कार अपघातात डायना यांचा मृत्यू झाला होता. (फाईल फोटो)

फोटो स्रोत, PA

त्यादिवशी डोडी यांच्या कॅलेंडरमध्ये एकच गोष्ट दिसते आहे. संध्याकाळी साडेसहा वाजता त्यांना आपल्या वडिलांच्या रिट्स हॉटेलजवळच्या एका ज्वेलरच्या दुकानातून अंगठी घ्यायची होती. संध्याकाळी ते दोघे रिट्झ हॉटेलला पोहोचले. डायना केशरचनेसाठी सलूनमध्ये गेल्या. डोडी ज्वेलरला भेटण्यासाठी गेले.

प्रसिद्ध पत्रकार क्रिस्तोफर अँडरसन यांनी ‘द डे डायना डाईड’ या पुस्तकात लिहिलं आहे. सुरुवातीला ते दोघे पॅरिसमधल्या शे बेनॉय या रेस्टॉरंटमध्ये गेले. मात्र तिथे फोटोग्राफरचा जत्था बघून हॉटेल् रिट्झच्याच डायनिंग रुममध्ये आले. डायना यांनी तिथे व्हेजेटेबल टेंपुरा ऑर्डर केलं तर डोडी यांनी ग्रिल्ड टरबोट मच्छी मागवली.

ऑर्डर करताक्षणी त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. कारण अनेक नजरा त्यांच्या दिशेनेच रोखल्या गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्या डायनिंग रुममधून निघाल्या. त्यांनी ऑर्डर इंपिरियल स्वीटमध्ये पोहोचवण्यास सांगितलं.

ड्रायव्हर दारू प्यायलेला होता

अँडरसन पुढे लिहितात, डोडी यांनी पापाराझींला टाळण्यासाठी एक प्लॅन केला. ड्रायव्हर आणि अंगरक्षकाला समोरच्या गेटने बाहेर पडणार असल्याचं भासवायचं त्यांनी ठरवलं. त्यावेळी त्यांच्या गाड्यांचा ताफा प्रतीक्षा करत असेल. तेव्हा डोडी मागच्या दारानं दुसऱ्या मर्सिडीजमधून बाहेर पडतील, अशा विचार त्यांनी केला.

डोडी यांची ही कल्पना यशस्वी ठरली. पण त्यादिवशी त्यांचा ड्रायव्हर आनरी पॉलनं मद्यपान केलं होतं. फ्रान्समध्ये वाहतूक करण्याबाबतचे जे नियम आहेत त्यातील नियमापेक्षा त्यानं जास्त मद्यपान केलेलं होतं.

नंतर जेव्हा त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. त्यामध्ये प्रोजेक आणि टियाप्राइडल अशा घटकाचे अंश मिळाले. अँटी डिप्रेसेंट म्हणून त्यांचा वापर केला जातो.

बोगद्यातील खांबाला धडकली मर्सिडीझ

डोडी आणि डायना जेव्हा गाडीतून निघाले तेव्हाच फोटोग्राफर्सच्या लक्षात आलं आणि मोटारसायकलींचा ताफा त्यांच्या मागे लागला. डोडी यांच्या ड्रायव्हरने त्यांना गुंगारा दिला आणि आयफेल टॉवर्सजवळच्या पो दे अलमा बोगद्यात गाडी शिरली.

याच फोटोग्राफर्सना चकवा देण्याच्या प्रयत्नामध्ये दुपारी 12 वाजून 23 मिनिटांनी गाडी काँक्रिटच्या खांबाला जाऊन धडकली.

या धडकेच्या काही क्षण आधीच डोडी यांचे अंगरक्षक ट्रेव्हर रीस जोन्स यांनी सीटबेल्ट लावला होता. गाडीतल्या चारपैकी फक्त तेच वाचू शकले.

अपघातात नुकसान झालेली प्रिन्स डायना यांची कार. (फाईल फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

एका प्रत्यक्षदर्शीने बीबीसीशी बोलताना सांगितलं की, “आम्ही सेन नदीच्या किनारी होतो. तेवढ्यात एका जोराचा आवाज आला. कोणीतरी जवळून बंदुकीचं फायरिंग करतंय असा तो आवाज होता. तेवढ्यात गाडीचे टायर जमिनीला जोराने घासत गेल्याचा आवाज आला.”

दुसऱ्या एका प्रत्यक्षदर्शीनं म्हटलं की, “मी आणि माझी गर्लफ्रेंड इतर काही पर्यटकांसह बोगद्याच्या सुरुवातीच्या भागात होतो. गाड्यांची वाहतूक हळू गतीनं सुरू होती. तेवढ्यात जोरदार स्फोट झाला. पीडितांना मदत करता यावी म्हणून आम्ही सगळेच त्या गाडीच्या दिशेने धावलो.

ड्रायव्हरसह डोडी यांचा घटनास्थळीच मृत्यू

1 वाजून 20 मिनिटांनी रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली. त्यामध्ये डॉ. अरनॉल्ड डोरोसी होते.

त्यांनी नंतर बीबीसीशी बोलताना सांगितलं की, “आम्हाला तिथं कार किंवा कारचे अवशेष मिळाले नाही. ड्रायव्हर आणि डोडी यांचा जागीच मृत्यू झाला होता. कारपासून दहा बारा फुटांवर एक माणूस पडला होता. मेडीकल टीम त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होती.”

ब्रिटनच्या वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित डायना यांच्या मृत्यूची बातमी. (फाईल फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

“आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा राजकुमारी डायना जीवंत होत्या. त्या गाडीच्या मागच्या बाजूला बसलेल्या होत्या. त्यांचं अर्ध शरीर जमिनीवर आणि अर्ध गाडीत होतं. त्या जवळपास बेशुद्धावस्थेत होत्या. त्या आम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होत्या.”

बीबीसीने त्यांना विचारलं, “त्या काय म्हणण्याचा प्रयत्न करत होत्या हे तुम्हाला आठवतंय का?” त्यावर डॉक्टर डोरोसी म्हणाले, “ते सांगणं कठीण आहे, कारण त्या जवळपास बेशुद्धावस्थेत होत्या. त्यांना खूप वेदना होत होत्या. शब्द कसेबसे जुळवत मला खूप त्रास होतोय असं त्या सांगत होत्या.”

दीड तासाने पोहोचली अ‍ॅम्ब्युलन्स

क्रिस्टोफर अँडरसन पुढे लिहितात, “अमेरिकन पॅरामेडिक्स ‘स्कूप अँड रन’ म्हणजे उचला आणि पळा या पद्धतीने काम करतात. तर फ्रान्समध्ये ‘स्टे अँड प्ले’ पद्धतीनं काम केलं जात.

लेडी डायना यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळं रुग्णवाहिका थांबवून त्यांना ‘एईडी’ आणि ‘सीपीआर’ देण्यात आला.

“पावणेदोन वाजता फ्रान्समधले इंग्लंडचे राजदूत मायकल रे यांना अपघातासंदर्भात माहिती देण्यात आली. त्यांनी तातडीने राणी एलिझाबेथ यांचे खासगी सचिव रॉबिन जॅनविन यांना कळवलं. बरोबर दोन वाजून एक मिनिटांनी डायना यांना घेऊन रुग्णवाहिका रुग्णालयात पोहोचली.”

‘बचावण्याची पूर्ण आशा होती’

त्यांच्यावर उपचार करणारे आणखी एक डॉक्टर डॅनियल इरोड यांनी सांगितलं की, डायना यांना गाडीतून बाहेर काढून रुग्णवाहिकेत नेलं तेव्हाच त्यांच्या हृदयाची धडधड थांबली होती. पण कार्डियाक मसाज दिल्यानंतर हृदय पुन्हा सुरू झालं.

रुग्णवाहिकेत त्यांची प्रकृती पुन्हा खालावली. डॉक्टरांनी उपचार करण्यासाठी रुग्णवाहिका थांबवली. त्या रुग्णालयात पोहोचल्या तेव्हा श्वास घेण्यास मदत व्हावी म्हणून त्यांना कृत्रिम उपकरणही बसवण्यात आलं.

प्रिन्सेस डायना यांच्या अंत्ययात्रेचं एक दृश्य. (फोटो : 6 सप्टेंबर, 1997)

फोटो स्रोत, PA

रुग्णवाहिका कमी वेगाने आणण्यात आली याचं कारण रुग्णवाहिकेचं सारथ्य करणारे मायकेल मेसेबियू यांनी सांगितलं. डायना यांचा रक्तदाब खूप खाली गेला होता. डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत होते म्हणून रुग्णवाहिका हळू चालवली असं ते म्हणाले.

दरम्यान चार वाजेपर्यंत डॉक्टरांनी प्रयत्न केले पण त्यांना लेडी डायना यांचा जीव वाचवण्यात यश येऊ शकलं नाही.

डायना यांच्या मैत्रिणीचा बटलरला फोन

त्याचवेळी लंडनमध्ये डायना यांचे बटलर पॉल बरेल यांना डायना यांची मैत्रीण ल्युसिया फ्लेचा डे लिमा यांनी फोन केला. त्यांनी वॉशिंग्टनमधून फोन केला होता.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या चीफ ऑफ प्रोटोकॉल यांनी दूरध्वनी करून लिमा यांना प्रिन्सेस डायना यांचा अपघात झाला याबाबत कळवलं होतं.

डायना यांचा हा फोटो 1980 मधला आहे. त्यावेळी त्यांचा आणि चार्ल्स यांचा विवाह झाला नव्हता. (फाईल फोटो)

फोटो स्रोत, PA

लिमा यांच्याकडे डायना यांच्या नवीन मोबाईलचा नंबर नव्हता. त्यामुळं त्यांनी त्यांच्या घरी बटरल बरे यांना त्यांनी फोन लावला.

बरेल यांना माहिती होतं की, डायना त्यांचा मोबाईल घेतल्याशिवाय कुठंही जात नाहीत. त्यांनी लगेचच नंबर डायल केला. बेल वाजली पण काही सेकंदातच तो फोन ‘ऑटोमेटेड अन्सरिंग सर्व्हिस मोड’मध्ये गेला.

मदर टेरेसांनी दिलेली जपमाळ

डोडी यांचा मृत्यू झाला असल्याचं दीड तासानंतर स्पष्ट झालं. डायनाच्या खासगी सचिव जॅकी एलन यांनी पॉल आणि जायना यांच्या ड्रायव्हरसाठी पॅरिसला जाण्याचे तिकिट बूक केले होते.

त्यावेळी ब्रिटिश एअरवेजची लंडनची सर्व कार्यालयं बंद होती. त्यामुळं हे तिकिट एअरलाई्सच्या न्यूयॉर्क ऑफिसमधून बूक करण्यात आलं होतं.

पहाटे चार वाजता प्रिन्सेस यांना मृत घोषित करण्यात आलं. बरेल यांनी घरी जाऊन एका बॅगमध्ये सामान भरलं आणि नंतर ते डायना यांच्या अपार्टमेंटमध्ये गेले.

चार्ल्स आणि प्रिन्सेस डायना (फाईल फोटो)

फोटो स्रोत, PA

पॉल बरेल त्यांच्या ‘अ रॉयल ड्युटी’ पुस्तकात ते लिहितात की, “डायना यांच्या अपार्टमेंटमध्ये त्यांनी मागून प्रवेश केला. तिथली शांतता काळजाला घर करणारी होती. मी त्यांच्या टेबलाजवळ पोहोचलो. तीन छोट्या घड्याळांची टिकटिक सुरू होती.”

“डझनभर पेन्सिली होत्या. एका कागदावर पत्रात लिहिण्यासाठीच्या चांगल्या शब्दांची यादी होती. इंग्रजी भाषेतील स्पेलिंगमध्ये त्यांना अडचणी येत असल्याचं त्यांनी कधी लपवलं नाही. त्यानंतर मला दिसली जपमाळ. मदर तेरेसा यांनी त्यांना ती जपमाळ दिली होती. जिझसच्या एका छोट्या मूर्तीभोवती ती माळ गुंडाळलेली होती.

डायना यांच्यासाठी राजदूताच्या पत्नीचा काळा ड्रेस

बरेल याबाबत पुढं लिहितात की, “या वस्तू मी ताब्यात घेतल्या. टेबलवर डायना यांचं आवडत्या ‘फाऊबर्ग24’ परफ्युमची अर्धी झालेली बाटली होती. पँटीन हेअरस्प्रे, कॉटन बड्सने भरलेला ग्लास, अनेक लिपस्टिक्स होत्या. मी एक लिपस्टिक आणि कॉम्पॅक्ट उचललं आणि बॅगेत ठेवलं.”

प्रिन्सेस डायना आणि चार्ल्स यांच्या लग्नानंतरचा फोटो. (फाईल फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

पॅरिसमध्ये बरेल थेट ब्रिटिश राजदूतांच्या घरी गेले. बरेल लिहितात की, “मी राजदूतांच्या पत्नी सिल्व्हिया यांना बाजूला नेलं आणि म्हटलं की, ‘अपघातानंतर डायना यांचे कपडे खराब अवस्थेत असतील. आपण अशा लोकांनी पाहणं त्यांना आवडणार नाही.’ सिल्व्हिया मला वॉर्डरोबच्या दिशेने घेऊन गेल्या.

यातला जो ड्रेस योग्य वाटेल तो तुम्ही घेऊन जा, असं त्यांनी म्हटलं. मी एक काळ्या रंगाचा ड्रेस निवडला. काळ्याच रंगाचे हिल्स असलेले शूजही निवडले. त्यानंतर आम्ही रुग्णालयाच्या दिशेने गेलो. त्यानंतर आम्ही रुग्णालयात पोहोचताच सिल्व्हिया यांनी मला धीर ठेवण्याचा सल्ला दिला.”

पार्थिवाला दुसरे कपडे घातले

बरेल यांना डायना यांचं पार्थिव ठेवण्यात आलेल्या खोलीत नेण्यात आलं. एकाबाजुला असलेल्या नर्स बीट्रेस यांचा हात त्यांनी धरला. तर दुसरीकडून डायना यांचे ड्रायव्हर कोलिन यांनी त्यांना सावरलं.

पॉल बरेल लिहितात की, “मी त्यांना पाहिलं. ज्या महिलेची मी एवढी वर्ष काळजी घेतली होती, ती माझ्यासमोर शांत लोटलेली होती. मानेपर्यंत तिचा चेहरा पांढऱ्या कपड्याने ढाकलेला होता. माझे अश्रू अनावर झाले. मी आजूबाजूला पाहिलं गुलाबाच्या फुलांचा एक गुच्छ दिसला. फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष वेलेरी गिस्का दे एस्ताँ यांनी मानवंदना म्हणून ते पाठवले होते.”

सैनिकांसह ब्रिटनच्या बेस कॅम्पमध्ये प्रिन्सेस डायना. (फाईल फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

“मी माझे अश्रू पुसले आणि माझी संपूर्ण शक्ती एकवटून तिथं उभ्या असलेल्या नर्स बीट्रिस हम्बर्ट यांना म्हटलं की, “मी राजकुमारीसाठी काळा ड्रेस आणि शूज आणले आहेत. माझ्याकडे त्यांची एक लिपस्टिक आणि पावडरही आहे.

मग मी खिशातून मदर तेरेसांनी दिलेली जपमाळ काढली आणि त्यांना म्हटलं, ‘तुम्ही ही राजकुमारीच्या हातात ठेवाल का?’ थोड्या वेळाने, जेव्हा मी राजकुमारी डायनाच्या मृतदेहाकडे परत गेलो, तेव्हा त्यांचं रूप पूर्ण बदललं होतं. त्यांनी आता काळा ड्रेस आणि शूज परिधान केले होते. त्यांचे केस ब्लो-ड्राय केलेले होते आणि हातात मदर तेरेसांनी दिलेली जपमाळ होती.”

प्रिन्स चार्ल्स यांनी घेतले दर्शन

दरम्यान, ब्रिटिश कॉन्सुल जनरल कीथ मॉस यांनी डायनाच्या शरीराच्या वरच्या भागावर अंशतः लेपन करण्यास मान्यता दिली. त्यामुळं संपूर्ण शवविच्छेदन करणं शक्य झालं नाही. कारण मृतदेह जतन करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या फॉर्मल्डिहाइडमुळं अनेक चाचण्यांचे निष्कर्ष चुकीचे आले असते.

दरम्यान, प्रिन्स चार्ल्स यांनी डायना यांच्या दोन बहिणी, लेडी सारा आणि लेडी जेन फिलोज आणि त्यांचे उपखासगी सचिव, मार्क बोलँड यांच्यासह राणीच्या बीएई 146 रॉयल जेटमधून फ्रान्सकडे निघाले.

प्रिन्सेस डायना और प्रिन्स (आता राजे) चार्ल्स (फाईल फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

पॅरिसमध्ये उतरल्यावर, त्यांना एका सिल्व्हर जॅग्वार कारमधून रुग्णालयात नेण्यात आलं. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष जॅक शिराक यांनी रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर त्यांचं स्वागत केलं. त्यांनी त्यांना दुसऱ्या मजल्यावरील त्या खोलीपर्यंत नेलं, तिथं राजकुमारी डायना यांचा मृतदेह ठेवला होता.

क्रिस्टोफर लिहितात, “जेव्हा डायना यांचा मृतदेह काचेची खिडकी असलेल्या राखाडी रंगाच्या शवपेटीत ठेवण्यात आला, तेव्हा त्या शवपेटीतून फॉर्मल्डिहाइड आणि गुलाब तसंच लिलीच्या फुलांचा वास एकत्र येत होता.”

“एअर कंडिशनरच्या वाऱ्याने डायनाच्या केसांना स्पर्श केला, तेव्हा चार्ल्स खूप भावूक झाले. त्यांच्या ओठांतून एक सुस्कारा बाहेर पडला. ते डायना यांच्या बहिणींकडं वळले त्या खूप रडत होत्या. त्यांनी त्यांचं सांत्वन केलं. नंतर चार्ल्स यांनी अस्खलित फ्रेंच भाषेत, डायनावर उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टरांचे आभार मानले.”

डायना यांचा मृतदेह ब्रिटनला पोहोचला

प्रिन्सेस डायना (फाईल फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

डायना यांचा मृतदेह असलेलं विमान ब्रिटनमध्ये उतरलं तेव्हा तत्कालीन पंतप्रधान टोनी ब्लेअर तिथं वाट पाहत होते.

पॉल बरेल यांनी लिहलंय की, “हवाई दलाच्या आठ सैनिकांनी प्रिन्सेस डायना यांचा मृतदेह विमानातून खाली उतरवला. जणू काही हे सर्व स्लो मोशनमध्ये घडत होतं. नंतर आमच्या गाड्यांचा ताफा मध्य लंडनच्या दिशेने निघाला. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या प्रत्येक चालकानं गाड्या थांबवल्या आणि आदराने नतमस्तक होऊन डायनाच्या गाडीसमोर उभे राहिले. जर डायना जिवंत असत्या तर त्यांनी याबद्दल काय विचार केला असता? असं मला एका क्षणाला वाटलं. त्या लाजल्या असत्या.”

एल्टन जॉन यांनी वाहिली श्रद्धांजली

राजकुमारी डायना यांचा अंत्यविधी 6 सप्टेंबर 1997 रोजी सकाळी 9 वाजून 8 मिनिटांनी सुरू झाला.

त्यांचं पार्थिव लंडनच्या रस्त्यांवरून नेण्यात आलं, तेव्हा लाखो लोक रस्त्यावर उतरले. डोळ्यांतील अश्रूंसह त्यांनी लोकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या राजकन्येचा निरोप घेतला.

त्याच दिवशी, वेस्टमिन्स्टर ॲबी येथे आयोजित श्रद्धांजली सभेत, प्रसिद्ध गायक एल्टन जॉन यांनी त्यांच्या सन्मानार्थ एक गाणं गायलं. ‘गुड बाय इंग्लंड्स रोझ.. यू लिव्ह्ड यूवर लाईफ लाईक अ कँडल इन द विंड’.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC