Home LATEST NEWS ताजी बातमी ‘तर इराणचं अस्तित्वच संपुष्टात येईल’; डोनाल्ड ट्रम्प यांची नव्यानं धमकी

‘तर इराणचं अस्तित्वच संपुष्टात येईल’; डोनाल्ड ट्रम्प यांची नव्यानं धमकी

4
0

Source :- BBC INDIA NEWS

गुरुवारी (25 जून) एका कार्गो शिपवर (मालवाहू जहाज) ड्रोन हल्ला झाला होता (फाइल फोटो)

फोटो स्रोत, Getty Images/CENTCOM

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा “शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरूच राहिलं, तर इराणचं अस्तित्वच संपुष्टात येईल”, अशी धमकी दिली आहे.

अमेरिकेने इराणवर नव्याने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी ही धमकी दिली.

अमेरिकन लष्कराने दावा केला आहे की, इराणने पनामाचा ध्वज असलेल्या एका तेलवाहू जहाजाला लक्ष्य केलं होतं. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल अमेरिकेने इराणवर हवाई हल्ले केले.

ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रूथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलं, “इराणने शस्त्रसंधीच्या कराराचं पुन्हा उल्लंघन केल्यानंतर अमेरिकन लढाऊ विमानांनी इराणमधील क्षेपणास्त्र आणि ड्रोन साठवणूक केंद्रं तसेच रडार तळांवर हल्ले केले आहेत.”

ते पुढे म्हणाले, “इराण कदाचित कधीच धडा शिकणार नाही. त्यामुळे अशीही वेळ येऊ शकेल की, आम्हाला संयम बाळगणं शक्य होणार नाही आणि आम्ही यशस्वीपणे सुरू केलेली कारवाई लष्करी बळाच्या जोरावर पूर्ण करण्यास भाग पडू.”

ट्रम्प यांनी इशारा देत म्हटलं, “जर असं झालं, तर इराण या इस्लामिक प्रजासत्ताकाचं अस्तित्वच संपुष्टात येईल.”

आतापर्यंत काय घडलं?

अमेरिकेने शुक्रवारी (26 जून) इराणमधील काही ठिकाणांवर हल्ला केला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर शस्त्रसंधीचे ‘उल्लंघन’ केल्याचा आरोप केल्यानंतर हा हल्ला झाला.

होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये एका कार्गो शिपवर (मालवाहू जहाज) हल्ला झाल्याच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी हा आरोप केला होता.

खरं तर, गुरुवारी (25 जून) जहाजावर एका ड्रोनने हल्ला केला होता. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. यानंतर, हजारो अडकलेल्या खलाशांना बाहेर काढण्यासाठी योजना आखण्यात आली.

अमेरिकेने इराणवर केलेल्या ताज्या हल्ल्यांनंतर ट्रम्प यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

फोटो स्रोत, Kevin Dietsch/Getty Images

यानंतर शुक्रवारी अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (सेंटकॉम) इराणच्या क्षेपणास्त्र-ड्रोन तळांवर आणि किनारपट्टीवरील रडार ठिकाणांवर हल्ला केल्याचे सांगितले.

इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (आयआरजीसी) या हल्ल्यासाठी अमेरिका आणि इस्रायलला जबाबदार धरले आहे.

हल्ल्याची घोषणा करण्याच्या अगदी आधी अमेरिका इराणवर प्रत्युत्तर देईल का, असे ट्रम्प यांना विचारले असता, त्यांनी “तुम्ही बघालच,” असे उत्तर दिले होते.

डोनाल्ड ट्रम्प

फोटो स्रोत, Ken Cedeno / AFP via Getty Images

इराण असा का वागेल, असा प्रश्न ट्रम्प यांना विचारला असता त्यांनी, “ते थोडे वेगळे आहेत,” एवढीच प्रतिक्रिया दिली.

यानंतर शुक्रवारीच (26 जून) अमेरिकेच्या सेंट्रल कमांडटने (सेंटकॉम) इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन तळांवर तसेच किनारपट्टीवरील रडार तळांवर हवाई हल्ला केल्याची माहिती दिली.

इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (आयआरजीसी) या हल्ल्यासाठी अमेरिका आणि इस्रायलला जबाबदार धरले आहे.

आयआरजीसीचा अमेरिकेला इशारा

शुक्रवारी झालेल्या हल्ल्यानंतर इराणच्या आयआरजीसीने अमेरिका आणि इस्रायलवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.

आयआरजीसीने आपल्या निवेदनात म्हटलं, “अमेरिकेचे सरकार नेहमीप्रमाणे यावेळेसही आपल्या वचनांपासून मागे हटले असून विविध कारणं पुढे करत त्यांनी इराणच्या किनारपट्टीवर हवाई हल्ले केले आहेत.”

“जर पुन्हा असा हल्ला झाला, तर आमची प्रतिक्रिया यापेक्षाही अधिक आक्रमक आणि मोठी असेल”, असा इशारा आयआरजीसीने अमेरिकेला दिला.

आयआरजीसीने इस्रायलवर लेबनॉनमधील शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचा आरोपही केला.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC