Home LATEST NEWS ताजी बातमी ‘तर माझा मृत्यू झाला असता’; नेतन्याहू यांना कॅप्टन स्मित मच्छर यांनी सांगितलं...

‘तर माझा मृत्यू झाला असता’; नेतन्याहू यांना कॅप्टन स्मित मच्छर यांनी सांगितलं संपूर्ण घटनाक्रम

4
0

Source :- BBC INDIA NEWS

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी फोनवर कॅप्टन स्मिथ मच्छर यांच्याकडून फ्लायदुबई विमान घटनेबद्दल जाणून घेतलं.

Published

वाचन वेळ: 6 मिनिटे

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी फ्लायदुबई विमान घटनेनंतर चर्चेत आलेले भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छर यांच्याशी फोनवरून संवाद साधला.

30 सप्टेंबरला घडलेल्या या घटनेत स्मित यांनी दाखवलेल्या धाडसाचं कौतुक करताना नेतन्याहू यांनी त्यांना भारत, इस्रायल आणि संपूर्ण जगाचे हिरो असं म्हटलं.

फोनवरील संभाषणादरम्यान नेतन्याहू यांनी कॅप्टन स्मित यांच्याकडून घटनेची माहिती घेतली. इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने (PMO) या दोघांच्या संभाषणाचा व्हीडिओदेखील पोस्ट केला आहे.

स्मित यांनी नेतन्याहू यांना विमानातील प्रवासादरम्यान नेमकं काय घडलं आणि कॉकपिटचा दरवाजा उघडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न त्यांनी कसा केला, याबद्दल सांगितलं.

नेतन्याहू कॅप्टन स्मित यांच्याशी बोलताना म्हणाले, “कॅप्टन, आमच्या पुढील स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात विशेष उत्सवाची मशाल प्रज्वलित करण्यासाठी मी तुम्हाला आणि माझे प्रिय मित्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करू इच्छितो.”

“तुम्ही भारतातील आणि इस्रायलमधील शूर जनतेचे खरे हिरो आहात. संपूर्ण जगासाठीही तुम्ही हिरो आहात. तुम्ही लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो.”

विमानात नेमकं काय घडलं?

फोनवरील संभाषणादरम्यान नेतन्याहू यांनी स्मित यांना विमानात नेमकं काय घडलं, याबाबत प्रश्न विचारला.

घटनेची माहिती देताना कॅप्टन स्मित म्हणाले की, हे एक नेहमीप्रमाणे सामान्य उड्डाण होते. त्यांच्या सहवैमानिकाने प्रार्थना करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांना त्यात काहीही असामान्य असं जाणवलं नाही.

स्मित म्हणाले, “मात्र, तो प्रार्थना करत असताना त्याचा आदर राखण्यासाठी मी मागे न पाहता समोरच्या दिशेने पाहत होतो. अंदाजे 4-5 मिनिटांनंतर अचानक माझ्या डोक्यावर मागच्या बाजूला जोरदार प्रहार झाला.”

कॅप्टन स्मित नेतन्याहूंना घटनेबद्दल माहिती देताना म्हणाले की, त्यांना सुरुवातीला वाटले होते की विमानाचे मोठे नुकसान झाले आहे (फाइल फोटो).

स्मित यांनी सांगितलं की, सुरुवातीला विमानाचं मोठं नुकसान झालं असावं, असं त्यांना वाटलं होतं. पण, त्यांच्यावर लगेच पाठोपाठ हल्ले झाले. तेव्हा हा हल्ला विमानातील बिघाडामुळे नव्हे, तर कॉकपिटमध्ये उपस्थित असलेल्या दुसऱ्या व्यक्तीमुळे होत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

स्मित म्हणाले, “मी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला; पण सुरुवातीच्या हल्ल्यातील जखमांमुळे मला जवळजवळ काहीच दिसत नव्हतं. माझी दृष्टी पूर्णपणे धूसर झाली होती. त्याच वेळी माझ्या मनात पुढचा विचार आला की, विमान वेगाने खाली जातंय. त्यामुळे मला अजूनही त्या घटनेची आठवण तुटक स्वरूपातच आहे.”

‘मी असं केलं नसतं, तर माझा मृत्यू झाला असता’

कॅप्टन स्मित यांनी सांगितलं की, त्यांनी कॉकपिटचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला; मात्र तो पुन्हा बंद करण्यात आला. त्यानंतर ते कॉकपिटच्या जमिनीवर आडवे झाले. त्या वेळी त्यांना विमानाचा आवाज, सोसाट्याने वाहणारा वाऱ्याचा आवाज आणि प्रवाशांच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या.

स्मित म्हणाले, “माझ्यात शेवटचा एक प्रयत्न करण्याइतकी ताकद शिल्लक होती. तुम्ही याला वैयक्तिक लढाई म्हणा किंवा लोकांसाठीची लढाई; पण मला वाटलं की, मी असं केलं नाही, तर माझा मृत्यू होईल. त्यानंतर मी माझी संपूर्ण ताकद एकवटली, दरवाजाच्या दिशेने गेलो आणि तो उघडला.”

“सुदैवाने, तिथे काही लोक माझी वाट पाहत होते. त्यांनी परिस्थितीचा ताबा घेतला. त्यानंतर काय घडलं, हे तुम्हाला माहीतच आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

त्यावर स्मित यांनी सांगितलं की, कॉकपिटचा दरवाजा आतून उघडण्यासाठी त्याच्या नॉबला फिरवावं लागतं, तर बाहेरून एका कोडच्या मदतीने हा दरवाजा उघडता येतो (फाइल फोटो).

नेतन्याहू यांनी स्मित यांना कॉकपिटचा दरवाजा कसा उघडला, असा प्रश्न विचारला.

त्यावर स्मित यांनी सांगितलं की, कॉकपिटचा दरवाजा आतून उघडण्यासाठी त्याच्या नॉबला फिरवावं लागतं, तर बाहेरून एका कोडच्या मदतीने हा दरवाजा उघडता येतो.

ते म्हणाले, “बाहेरून माझे सहकारी कोडच्या मदतीने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होते; मात्र तो माणूस (सहवैमानिक) दरवाजा उघडू देत नव्हता. दरवाजा उघडण्याचा एकच मार्ग होता, तिथपर्यंत पोहोचून त्याचा नॉब फिरवणं.”

“दरवाजा उघडण्यासाठी तो नॉब थोड्या वेगाने फिरवावा लागतो. खरी लढाई तिथपर्यंत पोहोचण्याचीच होती. माझा हात त्या नॉबपर्यंत पोहोचताच, मी तो फिरवला आणि दरवाजा उघडला.”

नेतन्याहू यांनी इस्रायलमध्ये येण्याचं दिलं निमंत्रण

कॅप्टन स्मित यांचं म्हणणं ऐकल्यानंतर नेतन्याहू यांनी त्यांच्या धाडसाचं कौतुक केलं. स्मित यांनी केवळ अनेकांचे प्राण वाचवले नाहीत, तर कठीण परिस्थितीतही धैर्य दाखवलं, असं म्हणत त्यांची प्रशंसा केली.

नेतन्याहू म्हणाले, “तुम्ही अनेकांचे प्राण वाचवले. पण मला वाटतं, तुम्ही त्याहूनही आणखी एक मोठी गोष्ट वाचवली आहे. तुम्ही हा विश्वास टिकवून ठेवला की, धाडसी वैमानिक आणि धाडसी प्रवासी कितीही धोकादायक आणि हिंसक असलेल्या कोणत्याही वाईट शक्तीचा सामना करून त्यावर मात करू शकतात.”

“जगभरात तुमचं कौतुक होत आहे. तुम्ही इस्रायलचे नायक आहात. तुम्ही भारताचे नायक आहात. तुम्ही संपूर्ण जगाचे हिरो आहात. मी तुम्हाला सांगू शकतो की, इथले लोक तुमचं मनापासून स्वागत करतील,” असंही त्यांनी नमूद केलं.

ग्राफिक्स

संभाषणादरम्यान कॅप्टन स्मित यांनी विमानात उपस्थित असलेल्या एका दंतवैद्याचाही उल्लेख केला. आपले प्राण वाचवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्यामुळे त्या दंतवैद्यांना भेटण्याची इच्छा असल्याचं स्मित यांनी सांगितलं.

नेतन्याहू यांनी कॅप्टन स्मित आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही इस्रायलमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं. इस्रायलच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या एका विशेष सोहळ्यात मशाल प्रज्वलित करण्यासाठी दोघांनाही आमंत्रित केलं जाईल, असं त्यांनी सांगितलं.

नेतन्याहू यांनी पुन्हा एकदा म्हटलं, “कॅप्टन स्मित आणि पंतप्रधान मोदी यांनी या विशेष प्रसंगी मशाल प्रज्वलित करावी, अशी माझी इच्छा आहे. इस्रायलच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त दिला जाणारा हा सर्वोच्च सन्मान आहे. सहसा हा सन्मान इस्रायलच्या नागरिकांसाठी राखीव असतो. मात्र, या प्रसंगी इस्रायलमधील सर्व नागरिक तुमचं स्वागत करतील, असा मला विश्वास आहे.”

“तुम्ही लवकरच इस्रायलमध्ये याल अशी आम्हाला आशा आहे,” असं ते म्हणाले.

पंतप्रधान मोदींनीही फोनवर साधला होता संवाद

यापूर्वी शुक्रवारी (2 ऑक्टोबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कॅप्टन स्मित मच्छर यांच्याशी फोनवरून संवाद साधला होता.

स्वत: गंभीर जखमी असूनही प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी कॅप्टन स्मित यांनी दाखवलेल्या धाडसाचा संपूर्ण देशाला अभिमान असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं होतं.

देशभरातील लोक त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

लोकांचे प्राण वाचवणं ही सर्वोच्च प्राथमिकता मानणाऱ्या भारताच्या भावनेचं प्रतीक म्हणजे स्मित यांचं धाडस असल्याचं मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी कॅप्टन स्मित मच्छर यांच्याशी व्हीडिओ कॉलवर संवाद साधला

संभाषणादरम्यान कॅप्टन स्मित यांनी पंतप्रधानांना घटनेची माहिती दिली. ते स्वतः खाली पडून जखमी झाले होते; मात्र विमानातील परिस्थिती बिघडत असल्याची त्यांना जाणीव होत होती. शेवटचा प्रयत्न करत त्यांनी कॉकपिटचा दरवाजा उघडला. त्यामुळे इतरांना आत येता आलं, असं त्यांनी सांगितलं.

वेदना होत असतानाही आपण सतत हनुमान चालीसाचं पठण करत होतो, असं स्मित यांनी पंतप्रधानांना सांगितलं.

पंतप्रधान मोदी यांनी कॅप्टन स्मित यांच्या उपचारांसाठी आणि देखभालीसाठी सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) सरकारांचेही आभार मानले. गरज असेल तेव्हा कॅप्टन स्मित यांच्यासाठी आपण नेहमीच एका फोन कॉलच्या अंतरावर उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलं.

यूएईच्या क्राउन प्रिन्स यांनी घेतली स्मित यांची भेट

संयुक्त अरब अमिरातीचे (यूएई) क्राउन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद यांनी शनिवारी (3 ऑक्टोबर) रुग्णालयात जाऊन कॅप्टन स्मित मच्छर यांची भेट घेतली आणि त्यांच्या धाडसाचं कौतुक केलं.

भारतीय दूतावासाच्या माहितीनुसार, विमान चालवत असताना सहवैमानिकाने केलेला कथित हल्ला परतवून लावताना जखमी झालेल्या स्मित यांना सौदी अरेबियातील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं होतं. पुढे अधिक चांगल्या उपचारांसाठी त्यांना यूएईची राजधानी अबू धाबी येथे हलवण्यात आलं.

संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) क्राउन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद यांनी रुग्णालयात कॅप्टन स्मित मच्छर यांची भेट घेतली.

यूएईचे क्राउन प्रिन्स यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर कॅप्टन स्मित यांच्यासोबतच्या भेटीचे फोटो शेअर केले.

कॅप्टन स्मित यांनी धैर्य, जबाबदारी आणि मानवी जीवनाप्रती असलेल्या बांधिलकीचे सर्वोच्च उदाहरण घालून दिलं आहे, असं ते म्हणाले.

ते म्हणाले, “माझ्याकडून आणि देशाच्या नेतृत्वाकडून त्यांचं कौतुक करतो आणि त्यांच्याप्रती आदर व्यक्त करतो.”

शेख हमदान पुढे म्हणाले, “आम्हाला अभिमान आहे की, ते आमच्या टीमचा भाग आहेत, आमच्या देशाच्या इतिहासाचा एक भाग आहे आणि ज्या मूल्यांसाठी यूएई ओळखले जाते, त्या मूल्यांचं ते प्रतिनिधित्व करतात, याचा आम्हाला आनंद आहे.”

यूएई हा “करुणा, शांतता आणि जीवनाला महत्त्व देणारा देश” असल्याचं म्हणताना त्यांनी कॅप्टन स्मित मच्छर यांचं हे शौर्यपूर्ण कृत्य याच मूल्यांचं प्रतिबिंब आल्याचंही नमूद केलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC