Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, Emmanuel Lafont/ BBC
कानातील मळ ही अजिबात दखल न घेतली जाणारी किंवा दुर्लक्ष केली जाणारी गोष्ट. मात्र आता हाच मळ आरोग्यक्षेत्रात अत्यंत बहुमूल्य ठरू शकतो. ताज्या संशोधनांमधून असं समोर आलं आहे की कानातील मळाचं रासायनिक विश्लेषण केल्यास त्यातून अनेक आजारांचं निदान होऊ शकतं.
इतकंच नाही तर भविष्यात होणारे आजारदेखील आधीच लक्षात येऊ शकतात. भविष्यात रक्त आणि लघवीच्या चाचण्यांप्रमाणे कानातील मळाचा वापर देखील आजारांचं निदान आणि उपचार करण्यासाठी केला जाऊ शकतो. या अतिशय महत्त्वाच्या आणि तितक्याच रंजक संशोधनाविषयी जाणून घेऊया.
अल्झायमरपासून ते कर्करोगापर्यंत, कानातील मळ त्या व्यक्तीच्या आरोग्याबद्दल महत्त्वाचे संकेत देत असतो. आता वैज्ञानिक कानातील मळात असणाऱ्या रसायनांचे विश्लेषण करत आहेत. त्यांना आशा आहे की आजारांचं निदान करण्याचे नवीन मार्ग त्यातून सापडतील.
कानातील मळ नारिंगी असतो, स्निग्ध असतो. अर्थात कानाचा मळ हा काही चारचौघांमध्ये बोलायचा विषय नाही पण तरीदेखील आरोग्याच्या दृष्टीने त्याचा विचार करणे आवश्यक असल्याचे म्हटले जाते.
ज्या वैज्ञानिक आणि संशोधकांना कर्करोग, हृदयविकार आणि टाईप 2 मधुमेहासारख्या आजारांबद्दल जाणून घ्यायचंय ते लोक या विषयाकडे आता लक्ष देत असल्याचं म्हटलं जात आहे.
कानातील या गुळगुळीत पदार्थाचं नाव आहे सेरुमेन. कानाचा बाह्यभाग आणि कानाच्या पडद्याला जोडणाऱ्या नळीसारख्या भागातून दोन प्रकारच्या ग्रंथी असतात. या दोन ग्रंथी म्हणजे सेरुमिनस आणि सेबेशियस. या ग्रंथींमधून निघणाऱ्या मिश्रणातून हा पदार्थ तयार होतो.
हा ओलसर चिकट पदार्थ केस, मृत त्वचेचे तुकडे आणि शरीरातील इतर कचऱ्यासारख्या पदार्थांच्या मिश्रणातून तयार होतो. हे सर्व मिश्रण तोपर्यंत मिसळले जातं जोपर्यंत एक मेणासारखा एकजिनसी पदार्थ तयार होत नाही. त्यालाच आपण कानातील मळ म्हणतो. एरवी कानातील मळाबद्दल आपण विचारदेखील करत नाही.
कानातील मळाची रचना आणि फायदे
कानात हा पदार्थ तयार झाल्यानंतर तो कन्व्हेयर बेल्टसारख्या एका यंत्रणेद्वारे वाहून नेला जातो. कानाच्या आतल्या बाजूनं बाहेर प्रवास करताना हा पदार्थ त्वचेच्या पेशींना चिकटून राहतो. हा पदार्थ पुढे सरकण्याची अत्यंत सावकाश होत असते. असं समजा की दिवसाला एका मिलीमीटरच्या विसाव्या भागाने हा मळ पुढे सरकत असतो.
कानात मळ का तयार होतो, त्याचा उपयोग काय यावर वैज्ञानिकांमध्ये मत-मतांतरे आहेत. मात्र त्यांचं सर्वाधिक संभाव्य काम म्हणजे कानाचा आतला भाग स्वच्छ ठेवणं आणि कानासाठी लुब्रिकंट म्हणून काम करणे आहे.
तसेच जीवाणू, बुरशी आणि इतर बाह्य घटक कानाद्वारे आपल्या डोक्याकडे जाण्यापासून रोखण्याचे काम देखील कानातील मळामुळे होत असते.
तरीदेखील कानातील मळ दिसण्यास चांगला नसल्यामुळे शरीरातील स्रावांचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांनी कानातील मळाकडे काहीसं दुर्लक्षच केलं आहे.
मात्र आता अनेक आश्चर्यकारक वैज्ञानिक शोधांमुळे त्यात बदल होऊ लागला आहे. एखाद्या व्यक्तीच्या कानातील मळ त्या व्यक्तीच्या आरोग्याबाबत बरीच माहिती देऊ शकतो असं समोर आलं आहे.

फोटो स्रोत, Emmanuel Lafont/ BBC
उदाहरणार्थ, युरोपियन किंवा आफ्रिकन वंशाच्या बहुतांश लोकांचे कानाती मळ ओलसर असतो. तो पिवळ्या किंवा नारिंगी रंगाचा आणि चिकट असतो. मात्र पूर्व आशियातील 95 टक्के लोकांच्या कानातील मळ कोरडा असतो.
तो रंगानं करडा किंवा राखाडी असतो आणि चिकट नसतो. ओलसर किंवा कोरड्या मळाची निर्मिती ज्या जनुकामुळे होते, त्याला ABCC11 म्हणतात. एखाद्या व्यक्तीच्या काखेत वास येतो की नाही यालादेखील हाच जनुक जबाबदार असतो.
जवळपास 2 टक्के लोकांमध्ये – ज्यात बहुतांशपणे ज्यांच्या कानातील मळ कोरडा असतो – हा जनुक असतो. त्यामुळे त्यांच्या काखेला किंवा बगलेला वास येत नाही.
किंबहुना आपल्या कानातील मळाशी निगडीत सर्वात उपयुक्त शोध, आपल्या कानातील मळ आपल्या आरोग्याबद्दल काय सांगतो याच्याशी संबंधित आहेत.
कानातील मळासंदर्भातील महत्त्वाचे निष्कर्ष
सॅन फ्रान्सिस्कोमधील कॅलिफोर्निया विद्यापीठातील वैद्यकशास्त्राचे प्राध्यापक निकोलस एल पेट्राकिस यांना 1971 मध्ये यावर संशोधन केलं होतं. त्यांना असं आढळलं की कानात ओलसर मळ असणाऱ्या अमेरिकेतील कॉकेशियन, आफ्रिकन-अमेरिकन आणि जर्मन महिलांची स्तनाच्या कर्करोगानं मृत्यू होण्याची शक्यता, कानातील कोरडा मळ असलेल्या जपानी आणि तैवानी महिलांच्या तुलनेत जवळपास चार पट होती.
अलीकडच्या काळात 2010 मध्ये, टोकियो इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतील संशोधकांनी, स्तनाचा गंभीर कर्करोग असलेल्या 270 महिला रुग्णांचे आणि निरोगी 273 महिलांचे नमुने घेतले. संशोधकांना असं आढळलं की कर्करोग असलेल्या जपानी महिलांमध्ये कानातील ओलसर मळासाठीचं जनुक असण्याची शक्यता निरोगी महिलांपेक्षा 77 टक्के अधिक होती.
तरीदेखील, संशोधकांचा हा निष्कर्ष वादग्रस्त राहिला आहे. जर्मनी, ऑस्ट्रेलिया आणि इटलीत मोठ्या प्रमाणात झालेल्या अभ्यासातून, कानातील कोरडा मळ असणारे लोक आणि ओलसर मळ असणारे लोक यांच्यात कर्करोगाच्या धोक्याबाबत कोणताही फरक आढळलेला नाही. जरी या देशांमध्ये कानातील कोरडा मळ असणाऱ्या लोकांची संख्या खूपच कमी आहे.
या अभ्यासांमधून काही आजार आणि कानातील मळ यांच्यातील संबंध अधिक प्रस्थापित झाला आहे. मेपल सिरप युरिन आजाराचं उदाहरण घ्या. हा एक दुर्मिळ अनुवांशिक आजार आहे.
या आजारामुळे अन्नातील काही विशिष्ट अमिनो अॅसिड्सचं विघटन करण्यास शरीरात अडथळा येतो. त्यातून रक्तात आणि लघवीमध्ये अस्थिर संयुगं गोळा होतात. परिणामी लघवीला मेपल सिरपचा विशिष्ट वास येतो.
सोटोलोन या रेणूमुळे लघवीला गोड वास येतो. ज्या लोकांना हा विकार असतो, त्यांच्या कानातील मळामध्ये सोटोलोन आढळू शकतो.
याचा अर्थ, निव्वळ एखाद्याच्या कानातील मळाद्वारे या विकाराचं निदान केलं जाऊ शकतं. अनुवांशिक चाचणी करण्यापेक्षा ही खूपच सोपी आणि स्वस्त प्रक्रिया आहे.
“कानातील मळाला अक्षरश: मेपल सिरपसारखा वास येतो. त्यामुळे बाळाच्या जन्मानंतर 12 तासांच्या आत, जर तुम्हाला हा वेगळा आणि सुंदर वास आला, तर त्यातून तुम्हाला कळतं की त्यांच्या चयापचयात हा जन्मजात दोष आहे,” असं रबी अॅन मुसाह म्हणतात. त्या लुईसियाना स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये पर्यावरणीय रसायनशास्त्रज्ञ आहेत.
काहीवेळा कोरोना विषाणू देखील कानातील मळात आढळू शकतो. एखाद्या व्यक्तीच्या कानातील मळातून तुम्हाला कळू शकतं की त्या व्यक्तीला टाईप 1 किंवा टाईप 2 मधुमेह आहे की नाही.
महत्त्वाचं संशोधन
यासंदर्भातील सुरुवातीच्या अभ्यासातून असं दिसून आलं आहे की एखाद्या व्यक्तीला विशिष्ट प्रकारचा हृदयरोग आहे की नाही हे तुम्ही कानातील मळावरून सांगू शकतो. जरी या आजाराचं निदान रक्ताच्या चाचण्यांतून करणं अजूनही सोपं असलं तरी.
कानाशी निगडित एक आजार असतो. तो कानाच्या आतल्या भागाशी संबंधित असतो. त्यामुळे लोकांना चक्कर येणं आणि श्रवणशक्ती कमी होणं, यासारख्या समस्या उद्भवतात. त्याला मेनिएर्स आजार म्हणतात. “त्यामुळे शरीर खूपच कमकुवत होऊ शकतं,” असं मुसाह म्हणतात.
“यात तीव्र मळमळ होणं आणि चक्कर येण्याचा समावेश आहे. गाडी चालवणं किंवा एखाद्या ठिकाणी जाणं अशक्य होऊ होऊन बसतं. शेवटी ज्या कानाला ही समस्या असेल त्या कानातील श्रवणशक्ती पूर्णपणे जाते.”
मुसाह यांनी संशोधकांच्या एका टीमचं नेतृत्व केलं. त्यांनी शोधून काढलं की निरोगी लोकांपेक्षा मेनिएर्स आजार असलेल्या रुग्णांच्या कानातील मळात तीन फॅटी अॅसिड्सचं प्रमाण कमी असतं.
या आजारासाठी बायोमार्कर शोधलं जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. सहसा त्याचं निदान इतर सर्व गोष्टी वगळून केलं जातं. या प्रक्रियेसाठी कित्येक वर्षे लागू शकतात.

फोटो स्रोत, Emmanuel Lafont/ BBC
या शोधामुळे आशा निर्माण झाली आहे की भविष्यात या आजाराचं निदान लवकर करण्यासाठी डॉक्टर्स कानातील मळाचा वापर करू शकतील.
मुसाह म्हणतात, “एखाद्या रोगाचा निदर्शक म्हणून कानातील मळाबाबत आमचा रस अशा आजारांच्या संदर्भात आहे, ज्यांचं निदान रक्त, लघवी किंवा सेरेब्रल स्पायनल फ्लुइडसारख्या सामान्य जैविक द्रवपदार्थांचा वापर करून करणं कठीण आहे.
“तसंच जे आजार दुर्मिळ असल्यामुळे त्यांचं निदान करण्यास बराच कालावधी लागतो अशा आजारांच्या बाबतीत कानातील मळाचा वापर होऊ शकतो.”
पण कानातील मळात असं काय आहे की ज्यामुळे तो आरोग्यविषयक माहितीचा खजिना ठरतो आहे? शरीराच्या आता होणाऱ्या रासायनिक अभिक्रियांना – व्यक्तीच्या चयापचयाला प्रतिबिंबित करण्याची मेणासारख्या स्त्रावांची क्षमता हाच यातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे.
“सजीवांमधील अनेक आजार चयापचयाशी संबंधित असतात,” असं नेल्सन रॉबर्टो अँटोनियोसी फिल्हो म्हणतात. ते ब्राझीलमधील गोइआस फेडरल विद्यापीठात रसायनशास्त्राचे प्राध्यापक आहेत.
ते यासाठी मधुमेह, कर्करोग, पार्किसन्स आणि अल्झायमर्ससारख्या आजारांची उदाहरणं देतात.
नेल्सन म्हणतात, “या प्रकरणांमध्ये, मायटोकोन्ड्रिया (लिपिड, कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटिनचं ऊर्जेत रुपांतर करण्यासाठी जबाबदार असलेला अवयव) निरोगी पेशींपेक्षा वेगळ्या पद्धतीनं कार्य करण्यास सुरूवात करतात. ते वेगवेगळ्या रासायनिक पदार्थांची निर्मिती करण्यास सुरूवात करतात आणि इतरांची निर्मिती देखील थांबवू शकतात.”
गंभीर आजारांच्या निदानातील अडचणी
नेल्सन रॉबर्टो अँटोनियोसी फिल्हो यांच्या प्रयोगशाळेनं शोधून काढलं आहे की रक्त, लघवी, घाम आणि अश्रू सारख्या जैविक द्रवांपेक्षा कानातील मळ पदार्थांच्या प्रचंड विविधतेला जास्त केंद्रित करतो.
“हे खूपच अर्थपूर्ण आहे, कारण कानातील मळात जास्त उलाढाल होत नाही. ते एकप्रकारे वाढत जातं आणि म्हणूनच चयापचयातील बदलांचं दीर्घकालीन चित्र पकडण्यासाठी ते एक चांगलं ठिकाण असू शकतं, असं मानण्यास नक्कीच कारण आहे,” असं ब्रुस किमबॉल म्हणतात. ते फिलाडेल्फियास्थित मॉनेल केमिकल सेंटर या संशोधन संस्थेत रासायनिक पर्यावरण शास्त्रज्ञ आहेत.
ही बाब लक्षात घेऊन, नेल्सन रॉबर्टो अँटोनियोसी फिल्हो आणि त्यांची टीम “सेरुमेनोग्राम” विकसित करते आहे. हे एक निदान करण्याचं साधन आहे. जे एखाद्या व्यक्तीच्या कानातील मळाच्या आधारे त्या व्यक्तीला विशिष्ट प्रकारचा कर्करोग आहे की नाही हे अचूकपणे सांगू शकतं, असा त्यांचा दावा आहे.
2019 मध्ये नेल्सन रॉबर्टो अँटोनियोसी फिल्हो यांच्या टीमनं एक अभ्यास केला होता. त्यात या टीमनं कर्करोगाच्या 52 रुग्णांच्या कानातील मळाचे नमुने घेतले होते. या रुग्णांना लिम्पोमा, कार्सिनोमा किंवा ल्युकेमिया झाल्याचं निदान झालं होतं.
तसंच संशोधकांनी 50 निरोगी लोकांच्या कानातील मळाचे नमुनेदेखील घेतले. त्यानंतर त्यांनी एका पद्धतीचा वापर करून या नमुन्यांचं विश्लेषण केलं.
ही पद्धत व्होलाटाईल ऑर्गेनिक कम्पाउंड्स (व्हीओसी) म्हणजे हवेत सहजपणे बाष्पीभवन होऊ शकणाऱ्या रसायनांची उपस्थिती अचूकपणे शोधून काढू शकते.
कानातील मळामध्ये संशोधकांनी 27 संयुगं शोधली, जी कर्करोगाचं निदान करण्यासाठी एकप्रकारे “फिंगरप्रिंट” म्हणून काम करतात.
दुसऱ्या शब्दात, या 27 संयुगांच्या उपस्थितीच्या आधारे ही टीम 100 टक्के अचूकतेनं सांगू शकली की एखाद्याला कर्करोग (लिम्पोमा, कार्सिनोमा किंवा ल्युकेमिया) आहे की नाही.
गमतीची बाब म्हणजे, ही चाचणी कर्करोगाच्या विविध प्रकारांमध्ये फरक करू शकली नाही. यातून लक्षात आलं की हे संयुगं किंवा रेणू एकतर सर्व प्रकारच्या कर्करोगाच्या पेशींद्वारे तयार होतात किंवा त्यांच्या प्रतिसादातून तयार होतात.
“कर्करोगात शेकडो प्रकारचे आजार असले तरी, चयापचयाच्या दृष्टीकोनातून कर्करोग ही एक जैवरासायनिक प्रक्रिया आहे. ती व्होलाटाईल ऑर्गेनिक कम्पाउंड्स (व्हीओसी)च्या विश्लेषणातून कोणत्याही टप्प्यावर शोधता येते,” असं नेल्सन रॉबर्टो अँटोनियोसी फिल्हो म्हणतात.
कर्करोगाच्या निदान आणि उपचारांची बदलणार दिशा
2019 मध्ये या टीमनं जरी 27 व्होलाटाईल ऑर्गेनिक कम्पाउंड्स (व्हीओसी)ची ओळख पटवली होती. तरी ते आता विशिष्ट चयापचयाच्या प्रक्रियेचा भाग म्हणून कर्करोगाच्या पेशींद्वारे तयार करण्यात आलेल्या त्यापैकी छोट्या संख्येवर लक्ष केंद्रित करत आहेत.
नेल्सन रॉबर्टो अँटोनियोसी फिल्हो म्हणतात की अद्याप प्रकाशित न झालेल्या अभ्यासात, त्यांनी हे देखील दाखवून दिलं आहे की कर्करोगाआधीच्या अवस्थेत निर्माण होणाऱ्या चयापचयाच्या विकारांचा शोध घेण्यास सेरुमेनोग्राम सक्षम आहे.
ज्यात पेशी, संभाव्य कर्करोगामुळे होऊ शकणारे असामान्य स्वरूपाचे बदल दर्शवितात, मात्र त्यात पेशींना अद्याप कर्करोग झालेला नसतो.
“कर्करोगाच्या पहिल्या टप्प्यात निदान झाल्यानंतर बहुतांश कर्करोग बरा होण्याचं प्रमाण 90 टक्क्यांपर्यंत असल्याचं औषधांवरून दिसून येतं. ते लक्षात घेता, कर्करोग होण्यापूर्वीच्या टप्प्यात कर्करोगाचं निदान झालं तर उपचारांमध्ये यश येण्याचं प्रमाण खूप जास्त असेल,” असं नेल्सन रॉबर्टो अँटोनियोसी फिल्हो म्हणतात.

फोटो स्रोत, Emmanuel Lafont/ BBC
संशोधकांची ही टीम यावरदेखील अभ्यास करते आहे की पार्किसन्स आणि अल्झायमर्ससारख्या न्युरोडिजनरेटिव्ह आजारांमुळे होणारे चयापचयातील बदल देखील या पद्धतीद्वारे शोधले जाऊ शकतात. अर्थात हे काम अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे.
नेल्सन रॉबर्टो अँटोनियोसी फिल्हो म्हणतात, “भविष्यात आम्हाला आशा आहे की सेरुमेनोग्राम हा एक नियमित वैद्यकीय तपासणीचा भाग होईल. शक्यतो दर सहा महिन्यांनी ही चाचणी करता येईल.”
“ज्यामध्ये कानातील थोड्याशा मळाद्वारे कर्करोग, मधुमेह, पार्किसन्स आणि अल्झायमर्ससारख्या आजारांचं निदान एकाच वेळी करता येईल. त्याचबरोबर इतर आजारांमुळे होणाऱ्या चयापचयातील बदलांचं विश्लेषणदेखील करता येईल.”
ब्राझीलमध्ये अमारल कार्व्हालो हॉस्पिटलनं अलीकडेच कर्करोगावर उपचार करण्यासाठी निदान करण्याची आणि देखरेख करण्याची पद्धत म्हणून सेरुमेनोग्रामचा वापर सुरू केला आहे, असं नेल्सन रॉबर्टो अँटोनियोसी फिल्हो म्हणतात.
मुसाह यांनादेखील आशा आहे की त्यांच्या संशोधनामुळे एक दिवस मिनिएर्स आजारानं ग्रस्त असलेल्या लोकांना फायदा होईल. सध्यातरी या आजारावर कोणताही इलाज नाही.
त्यांना आधी क्लिनिकमधील रुग्णांच्या मोठ्या संख्येनं असलेल्या नमुन्यांवर त्यांच्या चाचणीची खातरजमा करायची आहे. त्यानंतर डॉक्टर्स क्लिनिकमध्ये या निदान चाचणीचा वापर करू शकतील.
“कोरोनाच्या काळात तुम्हाला चाचणीसाठी विकत घेता येत होते, तसे ओव्हर-द-काउंटर प्रकारच्या किटसारखेच टेस्ट किट विकसत करण्यावर सध्या आम्ही काम करत आहोत,” असं मुसाह म्हणतात.
कानातील मळाबद्दल जाणून घेताना
कानात सामान्यपणे आढळणाऱ्या मळाच्या तुलनेत तीन फॅटी अॅसिडचं प्रमाण खूपच कमी आहे, हे निरीक्षणदेखील पुढील संशोधनासाठी काही संकेत देऊ शकतं, असं मुसाह सांगतात.
त्या म्हणतात, “त्यामुळे आजारामागचं कारण काय आहे, हे समजून घेण्यास आपल्याला मदत होऊ शकते किंवा त्या आजारांवर कशाप्रकारे उपचार करायचे हे देखील त्यातून निष्पन्न होऊ शकतं.”
मुसाह म्हणतात की कानातील निरोगी, सामान्य मळाची रासायनिक रचना समजून घेण्यासाठी आणि वेगवेगळ्या आजारांमध्ये त्यात बदल कसे होतात हे समजून घेण्यासाठी, अजून बरंच मूलभूत स्वरुपाचं संशोधन होण्याची आवश्यकता आहे.
मात्र त्यांना आशा आहे की एक दिवस हॉस्पिटलमध्ये आजारांचं निदान करण्यासाठी, रक्ताच्या चाचण्यांप्रमाणेच कानातील मळाचं विश्लेषण करण्याची पद्धतदेखील नियमितपणे वापरली जाऊ शकते.
“कानातील मळ ही खरोखरंच एक अद्भूत गोष्ट आहे. कारण त्यात मोठ्या प्रमाणात लिपिड असतं आणि लिपिडच्या चयापचयातील अनियमिततेमुळे होणारे अनेक आजार आहेत,” असं मुसाह म्हणतात.
पेर्डिटा बॅरन युकेमधील मँचेस्टर विद्यापीठात रसायनशास्त्रज्ञ आणि मास स्पेक्ट्रोमेट्रीच्या प्राध्यापक आहेत. त्या कानातील मळाचा खास अभ्यास करत नाहीत. मात्र त्या जैविक रेणूंचं विश्लेषण करतात आणि त्याचा वापर आजारांचं निदान करण्यासाठी करता येईल का, याचा शोध घेतात.
त्यांना ही गोष्ट मान्य आहे की सैद्धांतिकदृष्ट्या तरी यात अर्थ आहे की आजारांचं लक्षण शोधण्यासाठी हा पदार्थ एक चांगला पर्याय असेल.
पेर्डिटा बॅरन म्हणतात, “रक्तात आढळणारी संयुगं पाण्यात विरघळणारी असतात. तर कानातील मळात मात्र मोठ्या प्रमाणात लिपिड असतं आणि लिपिड पाण्यात विरघळत नाहीत.”
त्या पुढे म्हणतात, “त्यामुळे जर तुम्ही फक्त रक्ताचाच अभ्यास केला तर तुम्हाला अर्धवट चित्र स्पष्ट होतं. लिपिड हे कोळशाच्या खाणीतील रेणूंमधील कॅनरीप्रमाणे असतात. सर्वात आधी त्यांच्यातच बदल होण्यास सुरूवात होते.”
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC