Source :- ZEE NEWS
Pahalgam Kashmir Terrorist Attack: जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये घट झाली असं म्हटलं जात असतानाच संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या भ्याड हल्ल्यानं अनेक निष्पापांचे बळी घेतले आणि पुन्हा एकदा पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आला. भारतातील अतिशय लोकप्रिय पर्यटनस्थळावर, गजबजलेल्या ठिकाणी हा हल्ला चञवत दहशतवाद्यांनी केलेल्या या रक्तरंजित कृत्यानंतर भारत सरकारनंही काही धोरणात्मक पावलं उचलत पाकिस्तानची वेगळ्याच मार्गानं कोंडी केल्याचं पाहायला मिळालं.
दहशतवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्वतीय भागांसह सर्वच भागांमध्ये संरक्षण पथकांनी मोहिम हाती घेत अनेकांचीच चौकशी केल्याचं वृत्त समोर आलं. दरम्य़ान काही जाणकारांनी पहलगाममध्ये झालेल्या या हल्ल्याची तुलना हमासनं इस्रायलवर केलेल्य़ा हल्ल्याशी केली.
पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याची तुलना अमेरिका पेंटागन येथील माजी अधिकारी मायकल रुबिन यांनी हमासनं इस्रायलवर केलेल्य़ा हल्ल्याशी केली. 7 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या याच हल्ल्यानंतर इस्रायल- गाझा युद्धाची सुरुवात झाली होती. जम्मू काश्मीरचे माजी पोलीस आयुक्त शीश पॉल यांनीसुद्धा पहलगाममधील हल्ल्याला पुलवामा 2.0 मोमेंट असं नाव देत भारतानंही या हल्ल्याचं सडेतोड उत्तर द्यावं असं म्हटलं होतं. ज्याप्रमाणं इस्रायलनं हमासचा हल्ला परतवून लावला त्याचप्रमाणे भारतीय संरक्षण यंत्रणांनी या हल्ल्याचं उत्तर द्यावं असं म्हणत पहलगाम येथील हल्ल्याचा निषेध करण्यात आला.
पाकिस्तानाच हमासच्या दहशतवाद्यांची हजेरी?
पुलवामा इथं झालेल्या हल्ल्याच्या 57 दिवसांपूर्वीच हमासच्या दहशतवाद्यांची पाकव्याप्त काश्मीरमध्ये उपस्थिती पाहायला मिळाली होती, ज्यामुळं पाकिस्तानातून या क्रूर कृत्यांना खतपाणी मिळत असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं. हमासप्रती पाकिस्तानमध्ये असणारी सहानुभूती दर्शनीय असून डिसेंबर 2024 मध्ये तिथं पार पडलेल्या एका रॅलीतून हमासला वैध लष्करी गटाची मान्यता देण्यात यावी अशी मागणीसुद्धा करण्यात आली. वृत्तसंस्थांच्या दाव्यानुसार सेंटर फॉर सिक्योरिटी आणि तत्सम इतर संस्थांमधील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार इस्रायल- पॅलस्टाईन यांच्यातील युद्धाचे अनेक व्हिडीओ आणि फोटो दाखवूनही तरुण पिढीला कट्टरतावादाच्या दिशेनं वळवण्यात आल्याचं काम करण्यात आलं.
SOURCE : ZEE NEWS