Source :- BBC INDIA NEWS

मलेरिया

फोटो स्रोत, SPL

एक हजार लोकसंख्येमागे एक वर्षांत आढळून येणारे एकूण मलेरियाचे रुग्ण म्हणजे Annual Parasite Index (API) होय. हा API जर दोनपेक्षा जास्त असेल तर याला अधिक भार (High Burden) असे मानले जाते.

गडचिरोलीतील भामरागड तालुक्यात हा निर्देशांक तब्बल 174.63 इतका जास्त आहे. गडचिरोलीतील 27 प्राथमिक आरोग्य केंद्रांचा API हा दोनपेक्षा जास्त आहे. म्हणजेच या 27 प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या चार लाख लोकसंख्येला मलेरियाचा अधिक धोका आहे, असे आपण म्हणू शकतो.

भारतात गडचिरोलीसारखे एकूण 25 जिल्हे असे आहेत, ज्यांचा API हा दोनपेक्षा जास्त आहे. या 25 जिल्ह्यांत मलेरिया निवारणासाठी कोणती रणनीती अवंलबली जाते आणि त्याची अंमलबजावणी कशी होते यावर भारत येत्या 3 वर्षांत मलेरियाचे उच्चाटन करणार का, या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे.

मलेरियाचे उच्चाटन होणे भारतासाठी का महत्त्वाचे आहे? आणि या मागील आव्हाने काय आहेत? हे समजून घेण्याआधी आपण मलेरियाचे उच्चाटन म्हणजे काय? हे समजून घेऊ.

समजा एखाद्या परिसरात मलेरियाचा रुग्ण आढळला, आणि त्याला हा संसर्ग स्थानिकरीत्या झाला असेल तर याला Indigenous Case असे म्हटले जाते. Indigenous Casesचे प्रमाण शून्यावर आले तर या परिसरासाठी मलेरियाचे उच्चाटन झाले, असे म्हटले जाते.

भारतासमोरील आव्हान मोठे का?

1947 साली भारतात दरवर्षी 8 लाख लोकांचा मृत्यू मलेरियाने होत होता, तर जवळपास साडेसात कोटी लोकांना मलेरियाचा संसर्ग होत असे. 1947 ते 2023 या काळात मलेरियाचे उच्चाटन होण्यासाठी भारतात भरीव प्रयत्न झाले.

2023 च्या शासकीय आकडेवारीनुसार भारतात 2 लाख 27 हजार 564 इतक्या मलेरिया रुग्णांची नोंद झाली होती, तर यात 83 रुग्णांचा मृत्यूही झाला.

मलेरियाचे उच्चाटन करण्यासाठी रुग्णांचे लवकरात लवकर निदान आणि उपचार होणे आवश्यक असते.

फोटो स्रोत, Getty Images

Sustainable Development Goal नुसार 2030 पर्यंत मलेरियाचे उच्चाटन होणे अपेक्षित आहे. तर भारताने 2027 पर्यंत हे आव्हान पेलण्याचे ठरवले आहे.

एकूण आकडेवारी लक्षात घेतली आणि मलेरिया संसर्ग कसा होतो, हे समजून घेतले तर भारतासमोरील हे आव्हान खडतर आहे असे म्हणावे लागते.

मलेरियाचा संसर्ग झाला आहे, पण कोणतीच लक्षणं नाहीत, अशा रुग्णांना Asymptomatic म्हटले जाते. हे रुग्ण मलेरियाचे वाहक असतात. म्हणजेच या रुग्णांना चावलेला डासाने दुसर्‍या व्यक्तीचा चावा घेतला तर त्या व्यक्तीला मलेरिया होऊ शकतो.

शासकीय आकडेवारीनुसार अजूनही भारतात दरवर्षी 2 लाखावर लोकांना मलेरिया होतो. Asymptomatic रुग्णांची यात भर पकडली तर मलेरिया उच्चाटन किती कठीण आहे, याचा अंदाज येऊ शकतो.

शहरी आणि जंगल किंवा आदिवासी भागातील मलेरिया

गेल्या काही वर्षांत तज्ज्ञ शहरी आणि जंगल भागातील मलेरियाची साथ यात फरक करताना दिसतात. शहरी भागातील ड्रेनेजची समस्या, कुलर किंवा ए. सी., पावसात साठणारे पाणी यामुळे डासांच्या फैलावाला वाव मिळतो.

तर जंगल किंवा आदिवासी भागात पावसात जंगलात मोठ्या प्रमाणावर आणि सातत्याने पाणी साचत राहते. त्यामुळे डासांचा फैलावही जास्त होतो. अगदी 2 मिलिलीटर इतके पाणीसुद्धा डासांच्या पुनरुत्पादनासाठी पुरेसे असते, हे येथे लक्षात घेतले पाहिजे.

Sustainable Development Goal नुसार 2030 पर्यंत मलेरियाचे उच्चाटन होणे अपेक्षित आहे.

फोटो स्रोत, Science Photo Library

आदिवासी भागात लोकांचा जंगलाशी आणि पर्यायाने डासांशी येणारा संपर्कही जास्त असतो, त्यातून डास चावण्याची शक्यताही तितकीच वाढते. त्यातच आदिवासी भागात आरोग्य सुविधा तोकड्या असतात.

मलेरियाची चिंता का करावी?

प्लाजमोडियम या जंतूमुळे मलेरिया होतो आणि तो डासांमुळे फैलावतो. भारतात मलेरियाचे मुख्यतः चार प्रकार आहेत ते म्हणजे पी. फाल्सीपेरम, पी. व्हायवॅक्स, पी. मलेरिया आणि पी. ओव्हेल. यातील पी. फाल्सीपेरम हा जास्त धोकादायक मानला जातो.

पी. फाल्सीपेरममध्ये रक्तपेशींचे विघटन होणे आणि मेंदूला इजा होणे अशा गुंतागुंत निर्माण होऊ शकतात.

मुलांना आणि गरोदर महिलांना या प्रकारचा मलेरिया झाला तर तो जास्त धोकादायक ठरतो. त्यामुळे वर्षाला भारतातील आताची मलेरियाची रुग्ण संख्याही गांभीर्याने घ्यावी लागते.

मलेरियाचे उच्चाटन कसे होऊ शकते?

भारतात 25 जिल्ह्यांत मलेरियाचा जास्त भार आहे. या 25 जिल्ह्यांवर विशेष लक्ष द्यावे लागेल आणि त्यासाठी स्वतंत्र रणनीती राबवावी लागणार आहे. या 25 पैकी बहुतांश जिल्हे आदिवासी, जंगल भाग असणारे आणि डोंगराळ आहेत.

मलेरियाचे उच्चाटन करण्यासाठी रुग्णांचे लवकरात लवकर निदान आणि उपचार होणे आवश्यक असते. जेणे करून मलेरियाच्या फैलावाला आळा घातला जातो.

लोकांपर्यंत डास पोहोचू नयेत आणि डासांची संख्या कमी व्हावी असे उपाय केले जातात. Long-lasting insecticide-treated bednets (LLIN) प्रकारातील मच्छरदाणींचा वापर, डासविरोधी अगरबत्ती, घरात कीटकनाशक फवारणी (Indoor Residual Spraying) आणि डासांची पैदास रोखण्यासाठीचे प्रयत्न असे उपाय केले जातात. या सगळ्या उपायांचा रोख हा मलेरियाचा जंतू म्हणजे प्लाजमोडियमचे उच्चाटन करण्याकडे असतो.

भारतात गडचिरोलीसारखे एकूण 25 जिल्हे असे आहेत, ज्यांचा API हा दोनपेक्षा जास्त आहे.

फोटो स्रोत, Getty Images

हे उपाय करत असताना स्थानिक बाबी विचारात घ्याव्या लागतात. उदाहरण म्हणजे गडचिरोलीत मलेरियाचा अधिक प्रादूर्भाव असणाऱ्या गावांत प्रत्येक एका व्यक्तीसाठी एक मच्छरदाणी द्यावी, असे सुचवण्यात आले आहे.

याचे कारण म्हणजे या भागात कुटुंबात एकत्र झोपणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. शिवाय मच्छरदाणीचा वापर होतो की नाही? हे पाहण्यासाठीही यंत्रणा उभी केली जात आहे.

गडचिरोलीत 300 वर गावे अशी आहेत, ज्यांचा पावसात संपर्क तुटतो, आणि नेमका हाच काळ मलेरियाच्या उद्रेकाचा असतो, त्यामुळं पावसात या गावांतील आरोग्य सुविधा सुरळीत ठेवणे आव्हानात्मक असते.

भारतातून मलेरियाचे उच्चाटन होणार का?

2023 च्या आकडेवारीनुसार जगातील मलेरियाची एकूण रुग्ण संख्या 263 दशलक्ष इतकी आहे, तर मृतांची संख्या 5 लाख 97 हजार इतकी आहे. यातील 95 टक्के वाटा हा आफ्रिकेतील देशांचा आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या South आणि South-East या क्षेत्रात येणाऱ्या देशांतील मलेरिया रुग्णांत भारताचा वाटा 65 टक्के इतका जास्त आहे.

मलेरियाचा संसर्ग झाला आहे, पण कोणतीच लक्षणं नाहीत, अशा रुग्णांना Asymptomatic म्हटले जाते.

फोटो स्रोत, Getty Images

भारताचा शेजारी राष्ट्र असणाऱ्या श्रीलंका, मलादिव अशा देशांतून मलेरियाचे उच्चाटन शक्य झालेले आहे. त्यामुळे भारतातून मलेरिया उच्चाटन होणे अशक्य नाही.

यासाठी मलेरियाचा प्रादूर्भाव जास्त असलेल्या जिल्ह्यांत विशेष उपाययोजना राबवणे, एकात्मिक रणनीतीचा अवलंब करणे आणि हे उपाय वेगाने आणि प्रभावीपणे अंमलात आणणे महत्त्वाचे ठरणार आहे.

तसेच मलेरियाचे उच्चाटन करत असतानाच व्हेक्टरबॉर्न प्रकारातील इतर आजारांवरही (उदाहरणात डेंग्यू, चिकनगुनिया, जपानी एन्सेफलायटीस) नियंत्रण मिळवता येणार आहे.

मलेरियावरील लस भारतात का नाही?

सध्या आफ्रिकेतील देशांत मलेरियावरील लसींची चाचणी सुरू आहे. ही लस भारतात का उपलब्ध नाही, असा प्रश्न विचारला जातो.

आफ्रिकेतील बऱ्याच भागांतील API हा 300पेक्षाही जास्त आहे, त्यामुळे तेथे लसींचा उपयोग केला जात आहे.

भारतातील API हा इतका जास्त नसल्याने लसींचा वापर न करताही मलेरियाचे उच्चाटन होण्याची आशा आहे.

देशातील मलेरियाचा उच्च भार असणारे जिल्हे

देशातील मलेरियाचा उच्च भार (High Burden) असणारे जिल्हे

फोटो स्रोत, डॉ. सुप्रियालक्ष्मी तोटिगेर

(लेखिका डॉ. सुप्रियालक्ष्मी तोटिगेर, उपसंचालक, कम्युनिटी हेल्थ रिसर्च, सोसायटी फॉर एज्युकेशन, ॲक्शन अँड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ, (SEARCH) या गडचिरोलीतील मलेरिया उच्चाटनासाठीच्या टास्क फोर्सच्या सदस्य आहेत.)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC