Source :- ZEE NEWS

पाकिस्तान सक्रिय दहशतवाद्यांना किंवा दहशतवादी संघटनांना आश्रय देत नाही आणि जे हद्दीत वास्तव्यास आहेत ते पाकिस्तानात किंवा सीमेपार पलीकडे भारतातील दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होत नाहीत असा दावा पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी केला आहे. यांनी या महिन्याच्या सुरुवातीला ब्रिटिश प्रसारक बीबीसीला दिलेल्या मुलाखततीत त्यांनी हा दावा केला आहे. 

२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान लष्करी तणाव वाढल्यानंतर काही तासांतच ही मुलाखत घेण्यात आली. हल्ल्यात एकूण 26 जणांनी जीव गमावला असून, बहुतेकजण नागरिक आहेत. लष्कर-ए-तैयबा या बंदी घातलेल्या दहशतवादी गटाशी संबधित एका गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली होती. भारताने हा गट पाकिस्तानच्या भूमीवरून आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या पाठिंब्याने कार्यरत असल्याचं म्हटलं आहे. 

बीबीसीच्या पाकिस्तान प्रतिनिधी आझादेह मोशिरी यांनी आसिफ यांना पाकिस्तानमध्ये दहशतवादी नेते किंवा दहशतवादी गट सक्रिय आहेत का? अशी विचारणा केली असता पाक संरक्षणमंत्र्यांनी ठामपणे नाही असं उत्तर दिलं. पाकिस्तान 2019 च्या पुलवामा आणि 2016 च्या उरी हल्ल्यामागे असलेल्या जैश-ए-मोहम्मद सारख्या दहशतवादी गटांना कायदेशीर व्यवसायाद्वारे निधी उभारण्याची परवानगी देत ​असल्याच्या अमेरिकेच्या आरोपावरही त्यांनी भाष्य केलं. 

“हे सर्व (दहशतवाद आणि दहशतवादी) भूतकाळातील गोष्टी आहेत,” असं सांगत आसिफ यांनी 1980 च्या दशकात अफगाण-सोव्हिएत युद्धादरम्यान काही अफगाणिस्तान गटांना शस्त्रास्त्रे देण्यात अमेरिकेच्या भूमिकेकडे लक्ष वेधलं. गेल्या काही दशकांमध्ये मुजाहिदीन गट तयार करण्यात आणि त्यांना शस्त्रास्त्रं देण्यात अमेरिकेचा हात होता, ज्या नंतर दहशतवादी संघटना म्हणून उद्यास आल्या. हे विसरुन फक्त पाकिस्तानलाच जबाबदार धरलं जात आहे असा युक्तिवाद त्यांनी केला. त्यावेळी अमेरिकेने (आणि पाकिस्ताननेही) ज्या संघटनांना पाठिंबा दिला होता त्यात हक्कानी नेटवर्कचा समावेश होता, ज्यांचे तालिबान, जैश आणि लष्कर गटांशी संबंध होते आणि अजूनही आहेत.

“जे दहशतवादी किंवा त्यांच्या दहशतवादी संघटना पाकिस्तानात आहेत असा दावा केला जात आहे, ते 80 च्या दशकात अफगाणिस्तानात अमेरिकेने केलेल्या प्रयत्नांचे सहकारी होते. ही गोष्ट अजूनही आपल्याला सतावत असते… की हे सर्व लोक जे प्रत्यक्षात आमचे सहकारी होते, किंवा आम्ही त्यांचे सहकारी होतो… ते सर्व आता ‘ड्राय-क्लीन’ आहेत, पण आम्हाला अजूनही बरबटलेले म्हणून पाहिलं जात आहे. ते अजूनही त्यांचे सहकारी असलेल्या लोकांसाठी आम्हाला दोष देतात,” असाही दावा त्यांनी केला. 

“तुम्ही किंवा मी दहशतवादी आहोत की आम्ही दहशतवादी नाही हे कोण ठरवतं?. हे (दहशतवादी) नेते आता नाहीत… ते जिवंत आहेत, मृत नाहीत, परंतु पाकिस्तानात किंवा सीमेपलीकडे भारतात किंवा इतर कोणत्याही देशात दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होत नाहीत,” असाही दावा त्यांनी केला आहे. 

SOURCE : ZEE NEWS