Source :- ZEE NEWS

मुंबई : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला. या तणावाच्या काळात आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीचा मुद्दा ठळकपणे समोर आला. दुष्मन का दुष्मन दोस्त अस म्हणत भारताने अफगाणिस्तान सोबतच्या संबंधांवर लक्ष केंद्रित केलं आहे. यासाठीच परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुताकी यांच्याशी संवाद साधला आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणीच कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. ऑपरेशन सिंदुरनंतर भारत पाक सीमेवरच्या तणावात अनेक देशांनी भारताला उघडपणे पाठिंबा दिला. तर तुर्किए, अझरबैजान या देशांनी पाकला समर्थन दिलं. पण अशा युद्धजन्य परिस्थितीत आंतरराष्ट्रीय पातळीवर छोट्या मोठ्या देशांचा पाठिंबा असणं महत्वाचं असतं. आणि याच अनुषंगाने भारत तालिबानशी संबंध प्रस्थापित करत आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी गुरुवारी तालिबानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री अमीर खान मुताकी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तालिबानने निषेध केल्यानंतर जयशंकर आणि मुत्ताकी यांच्यात चर्चा झाली.

हेही वाचा : Operation Sindoor ची माहिती पाकिस्तानला लीक? काँग्रेसच्या प्रश्नाला सरकारने काय उत्तर दिलं?

भारत-अफगाणिस्तान संबंध कसे आहेत?

ऑगस्ट 2021 मध्ये अफगाणिस्तानातल्या महत्त्वाच्या शहरांवर तालिबानने ताबा मिळवला आहे. तालिबान सत्तेत आल्यानंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये फारसे संबंध नव्हते. पहलगाम हल्ल्याच्या अफगाणिस्ताननं उघडपणे धिक्कार केला. तालिबान्यांनी केलेल्या या धिक्काराचं भारताकडून स्वागत करण्यात आलं आहे. यानंतर एस. जयशंकर आणि तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुताकी यांच्यात चर्चा झाली. तालिबान्यांनी अफगाणचा ताबा घेतल्यानंतर पहिल्यांदाच द्विपक्षीय चर्चा झाली. गेल्या 20 वर्षांत भारताने अफगाणिस्तानला 20 हजार कोटी रुपयांची मदत केली आहे. या द्विपक्षीय संवादात व्यापारासह प्रमुख चार विषयांवर चर्चा झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अमेरिकाही आपला मध्यपूर्वेतील सर्वात मोठा शत्रू इराणवर लक्ष केंद्रित करत आहे. ट्रम्प यांनी सीरियावर लादलेले निर्बंध उठवले आहेत. त्यामुळे उभय देशातील संबंध सुधारत आहेत. भारतानेही आता पाकिस्तानचा शत्रू असलेल्या अफगाणिस्तानसोबत संवाद वाढवला आहे. तालिबानसोबतची चर्चा भारतासाठी सामरिकदृष्ट्या महत्त्वाची आहे. अफगाणिस्तानातील पाकिस्तानचा हस्तक्षेप कमी करणे आणि स्थैर्य भारतासाठी महत्त्वाचे आहे. त्यातच भारत आणि अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये चर्चा झाली. ही चर्चा भविष्यात भारतासाठी व्यापार आणि दशहतवादविरोधी लढ्यात महत्वाची ठरणार आहे. 

SOURCE : ZEE NEWS